'नाना परीट,' 'पांगरी' या शॉर्ट फिल्ममुळे अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वाहव्वा मिळवलेला कोल्हापूरचा तरुण दिग्दर्शक नीरज नारकर आणि त्याचा भाऊ निखिल नारकर सातासमुद्रापार पोहोचलेले आहेत. एका छोट्या गावातील संवेदनशील कथा शॉर्टफिल्मच्या माध्यमातून जगभरात दाखवली जाणार आहे. निखिल नारकर आणि नीरज नारकर यांची 'देवी' ही शॉर्टफिल्मची निवड आंतरराष्ट्रीय महोत्सवात झाली आहे. २० मे रोजी या शॉर्टफिल्मचे स्क्रिनिंग टोरँटो, कॅनडा येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आशियाई चित्रपट महोत्सवात होणार आहे. सातासमुद्रापार पोहोचलेली 'देवी' ही शॉर्टफिल्म कशी साकारली? याबाबत 'देवी'चा निर्माता निखिल नारकरशी 'पुढारी ऑनलाईन'ने विशेष बातचीत केली.
कोल्हापूरचे दोन तरुण निखिल नारकर आणि नीरज नारकर हे सख्खे भाऊ. नीरजला लहानपणापासूनच कथा, गोष्टी लिहिण्याचा छंद आहे. तो सुरूवातीपासूनच सुंदर कथा लिहितो. नीरजने 'देवी'ची कथा स्वत:च्या कल्पनेतून साकारली. निमशहरी, किंवा ग्रामीण जीवन जवळून बघितल्याने तेथे कोणत्या समस्या असू शकतात, तिथलं वास्तव जीवन नारकर बंधुंनी अनुभवलय. 'देवी'ची कथाही त्यातूनच साकारली गेली. याचं संपूर्ण श्रेय नीरजला जातं.
देवीची संकल्पना नीरज नारकरची
देवीची कथा, संकल्पना ही नीरज नारकरची होती. 'देवी'चा निर्माता या नात्याने निखिल नारकरने या शॉर्टफिल्मला वैचारिक दिशा देण्याची जबाबदारी घेतली. पांगरी, नाना परीट यासारख्या शॉर्टफिल्मसमध्ये देखील निखिलची महत्त्वाची भूमिका होती.
देवीची कथा वास्तव प्रसंगावर आधारित आहे. पण, ते प्रसंग जसंच्या तसं आहे. असं नाही. पण, आम्ही जे अनुभवलं, पाहिलं आहे, ते शॉर्टफिल्मच्या माध्यमातून समोर आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, असे निखिलने सांगितले. छोट्या गावात एखाद्या दंगलीनंतर काय काय घडू शकतं आणि लोकांच्या आयुष्यात काय उलथापालथ होऊ शकतं, हे दाखवण्याचा प्रयत्न नीरजने केला आहे. नीरज नारकर सध्या जर्मनीत काम करतो. काम करून जे काही पैसे साठवले जातात, त्या पैशांतून शॉटफिल्म बनवली आहे. कुठलीही स्पॉन्सरशीप मिळवलेली नाही, असेही निखिल म्हणाला.
नीरज हा निखिलपेक्षा दोन वर्षांनी लहान आहे. दोघांनाही लहानपणासून जे ज्ञान मिळालं, जे वाचलं आणि घरातलं जे वातावरण होतं, त्यातून समाजाकडे बघण्याचा एक दृष्टिकोण मिळाला. हा दृष्टिकोण अंमलात आणायचा असेल तर कलेसारखं दुसरं माध्यम नाही, असं निखिल म्हणाला.
कथा लिहून ती साकारेपर्यंतचा ८ महिन्यांचा कालावधी लागला. एक दोन ड्राफ्ट तयार गेले आणि त्यानंतर फायनल कथेचा ड्राफ्ट तयार केला गेला. कलाकार कुठले असावेत, सिनेमॅटोग्राफर, एडिटर, साऊंड डिझायनर कोण असावं, हे ठरवलं गेलं. मग, शूटिंगला सुरूवात झाली. संकलन करण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागला.
देवीची कथा देवळात घडली
कोल्हापुरातल्या गिरगावात देवीचं शूटिंग झालं. 'देवी' ही १३ मिनिटांची शॉर्टफिल्म आहे. शॉर्टफिल्मच्या टायटलवर बरीच चर्चा झाली. गावातला एक म्हातारा पुजारी, त्याचा एक नातू आणि एक मुलगी यांच्या जीवनात एका घटनेमुळे काय होतं. ही घटना मंदिरात घडते. या शॉर्टफिल्ममध्ये पुजारीची मध्यवर्ती भूमिका आहे. वैचारिकदृष्ट्या आपल्या समाजात, आयुष्यात देवांचं काय स्थान आहे, हा कथेचा मूळ गाभा आहे. ही घटना घडते देवीच्या देवळात म्हणून 'देवी' हे नाव शॉर्टफिल्मला दिलं गेलं.
आर्थिक अडचण
शॉर्टफिल्म तयार करण्यासाठी सर्वांत मोठी आर्थिक समस्या उद्भवली. तंत्रज्ञ मंडळींना एकत्र आणून काम करणं, त्यांची वेळ जमवून शूटिंग सुरू करणं मुश्किल होतं. पण, या सर्वांवर मात करत निखिल आणि नीरज बंधुंनी वाटचाल सुरूच ठेवली. सिनेमॅटोग्राफर सुमन साहू आणि साऊंड डिझायनर शिषिर चौसाळकर हे तंत्रज्ञ हिंदी सिनेसृष्टीत काम करणारे आहेत. त्यांनीही वेळात वेळ काढून या फिल्मसाठी काम केल्याच निखिल म्हणाला.
पावसाचा व्यत्यय
'देवी'च शूटिंग रात्रीच्यावेळी सुरू असताना पावसाला सुरूवात झाली. जेव्हा जेव्हा पाऊस थांबेल, तेव्हा-तेव्हा शूटिंग करावं लागलं. गावातल्या काही लोकांच्या घरातून वीजेचे कनेक्शन घेऊन रात्रीच शूटिंग पार पाडलं. संध्याकाळी सात वाजल्यापासून मध्यरात्री दोन अडीचपर्यंत शूटिंग सुरू असायचं. यासाठी गिरगावकरांनी मोलाची मदत केली, असेही निखिल म्हणाला.
मग कलाकारांची निवडीचा विषय होता. अत्यंत छोट्या मुलाची जी गोष्ट आहे, ती संवेदनशील कथा आहे.
केवळ सामाजिक संदेश देणारी कथा नाही. तर मला असं वाटतं की, आज लोकांना एक चांगला सिनेमा बघण्याची सवय लागली आहे. लोकांना काहीतरी नवीन हवं असतं. अशावेळी जे कलावंत मनापासून काम करत असतात. आपल्या समाजाशी जोडून घेणार्या कथा सांगत असतात, ते लोकांना मनापासून पाहायला आवडतात. अगदी स्थानिक पातळीवरची कथा असते, पण, ते जागतिक दर्जाचं असतं. एक चांगली कलाकृती म्हणून पाहायला देवीची कथा आवडेल.
आपल्याकडे फिल्म फेस्टिवल होतात. त्यात लघुपट दाखवले जातात. लोक ते उत्साहाने पाहतात. असा आमचा अनुभव आहे. हे लघुपट बघावेत. काही लोकांनी असे लघुपट पाहायला आवडतात, अशी इच्छा बोलून दाखवली.
कॅनडा टोरँटो येथे होणार्या आंतरराष्ट्रीय आशियाई चित्रपट महोत्सवासाठी ही शॉर्टफिल्म पाठवण्यात आली. आणि 'देवी' सिलेक्ट झाला. टोरँटोमधला हा महत्त्वाचा फिल्म फेस्टिवल मानला जातो. कारण, दक्षिण आशियाई देशातले बहुतांशी दिग्दर्शक, निर्माते फिचर फिल्म्स, शॉर्टफिल्म्स, कलाकृती या फिल्म फेस्टिव्हलसाठी पाठवत असतात. देवीचं स्क्रिनिंग २० मे ला होणार आहे. भारतातही काही फिल्म फेस्टिव्हलला ही शॉर्टफिल्म पाठवण्यात आलीय. तिथे 'देवी' सिलेक्ट होईल, अशी आशा निखिलने बोलून दाखवली.
अत्यंत आनंदाचा क्षण
याच चित्रपट महोत्सवात २०१६ मध्ये 'नाना परीट,' 'पांगरी'चे स्क्रिनिंग करण्यात आलं होतं. या दोन्ही शॉर्टफिल्म्सना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - बंगलोर आणि मुंबईमध्ये (२०१५) दोन पुरस्कारही मिळाले होते. त्यामुळे टोरँटोत देवीचं सिलेक्शन होईल, असं वाटत होत. ज्यावेळी समजलं की, 'देवी' सिलेक्ट झाली, त्यावेळी तो क्षण आनंदाने भरलेला होता. अपेक्षापूर्ती झाल्यानं आनंदापेक्षा समाधान मोठं होतं. कारण, आपल्या गिरगावामध्ये शूट झालेली ही फिल्म कॅनडामध्ये पोहोचतेय. आपल्या लोकांची कलाककृती, कष्ट जगासमोर आलं, याच एक विलक्षण समाधान होतं, अशी प्रतिक्रिया निखिलने दिली.
कलाकारांची निवड अशी झाली
याच चित्रपटामध्ये अभिनेता किरण खेबुडकर यांनी पुजारीची भूमिका केलीय. किरण खेबुडकर यांच्याशी नारकर यांची जुनी ओळख होती. परंतु, ओळख आहे म्हणून त्यांनी ही भूमिका खेबुडकर यांच्याडे दिली असं नाही तर ते उत्कृष्ट कलाकार आहेत. शिवाय, 'देवी'च्या कथेला साजेशी असणारी पुजार्याची भूमिका अत्यंत चांगल्या पध्दतीने खेबुडकरच करू शकतील, म्हणून त्यांची निवड करण्यात आली. खेबुडकर यांनीही उत्कृष्टपणे ती भूमिका कॅमेर्यासमोर मांडली. दुसरे म्हणजे, अभिनेते स्वप्निल राजशेखर यांची कन्या अभिनेत्री कृष्णा भूतकर. मुलीच्या भूमिकेसाठी अनेक कलाकारांना भेटलो, अभिनेत्रींची भेट घेतल्याचे निखिलने आठवण सांगितली. शेवटी कृष्णाशी बोलल्यानंतर 'देवी'तल्या मुलीची भूमिका कृष्णाच करू शकेल, असे नारकर बंधुंना वाटलं. कारण, 'देवी'त मुलीच्या भूमिकेसाठी (कृष्णा भूतकर) डायलॉग्ज नाहीत. केवळ हावभाव करून ती भूमिका सादर करायची होती. हे कृष्णा भूतकरने ओळखलं. यात तिची छोटी भूमिका आहे. परंतु, प्रभावीपणे तिच्या भूमिकेचं सादरीकरण करण्यात आल्याचं निखिल म्हणाला.
'देवी' आपण कुणाला म्हणावं?, एका मुलीवर शारिरीक अत्याचार झाल्यानंतर देवीचा काय रोल आहे. हे त्या मुलीने आपल्या डोळ्यांतून सांगावं आणि हावभावातून ते कळावं, अशी ती कथा आहे.
अथर्व गुरव याने बालकलाकाराची भूमिका साकारलीय. नारकर यांच्या आधीच्या शॉर्टफिल्ममध्येदेखील त्याने काम केलं. अथर्व हा पांगरी गावात राहतो. त्याला चित्रपटात काम करायची आवड आहे. त्याने आमच्या एका डॉक्युमेंट्रीमध्येही काम केलयं. साहित्य ॲकॅडमीसाठी ही डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली होती. म्हणून 'देवी'साठी अथर्वची निवड करण्यात आली.
मुली, महिलांकडं बघताना माणूस म्हणून पाहा
आपल्या समाजात मुली, स्त्रियांना माणूस म्हणून कधी समजून घेतलं जात नाही. स्त्रियांकडं माणूस म्हणून बघा, असा संदेश देणारी ही कथा आहे. देवीच्या कथेत पुजार्याची भूमिका महत्त्वाची आहे. पुजार्याचा जो काही विश्वास आहे, त्या विश्वासाला कसा तडा जातो. माणुसकीच दर्शन त्याला घडतं, याबद्दलची कथा 'देवी'त दाखवण्यात आलीय.
'देवी' आणि तिचा पुजारी यांच्या भावनिक नात्याचा विषय नीरजने त्यात मांडलाय. बलात्कार पीडित एक मुलगी मंदिरात आणल्यानंतर तेथील एक वृध्द पुजारी आणि त्याचा वयात येणारा मुलगा जग्गू यांचे त्या मुलीशी कशा पध्दतीने वर्तन करतात, या आशयाभोवती ही कथा फिरते. नाजूक आणि संवेदनशील कथा मांडणार्या नीरज नारकरची देवी कथाही अत्यंत संवेदनशील मांडण्यात आलीय.
शॉर्टफिल्मचं जे प्रिमीयर आहे, व्हिडिओच्या सुरूवातीला एका दगडावर देवीचे चित्र रेखाटलेले दिसते. हे चित्र कोल्हापुरातल्याच दिनकर कुंभार या आर्टिस्टने रेखाटलयं.
आगामी प्रोजेक्ट
नीरजने एक कथा लिहिली होती. त्या कथेची निवड झाली होती. सन डान्स ॲकॅडमी नावाची अमेरिकेत संस्था आहे. ज्यांची कथा त्या संस्थेला आवडते, अशा भारतातल्या सहा लोकांना बोलावले जाते. त्यात नीरजची निवड झाली होती. आता त्यावर लवकरच काम सुरू होईल, असे निखिल म्हणाला. आपली जी काही कला आहे, ती जागतिक दर्जाची कला व्हावी आणि त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असं नीरज आणि निखिलला लहानपणापासून वाटतं होतं. त्याचदृष्टीने त्यांची वाटचाल सुरू आहे.






