Tuesday, November 9, 2021

Jai Bhim : क्रूरतेच्या पलिकडचा अत्याचार कधीपर्यंत सहन करणार?

Jai Bhim – आपल्या समोर अन्याय होत असताना आपण अनेकदा पाहिलंय. आपल्या अवतीभोवतीही अनेकांना अन्यायाला सामोरे जावं लागतं. अन्याय वेगवेगळ्या पातळींवर होत असतो. मग आपण काय करतो. निमूटपणे सहन करतो किंवा बघून गप्प बसतो. पण, अन्यायाला वाचा फोडणारं कुणीतरी हवं ना! कधी ते धर्मावरून होत असतं तर कधी जातीवरून. कधी लाचार, गरिबांवर अन्यायाचा मारा होत असतो. जय भीम हा मूळ तमिळ भाषेतील चित्रपट आहे. कधीही न पाहिलेल्या अत्याचाराचे दृश्य जय भीम चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. घालून दिलेल्या व्यवस्थेच्या भिंती आणि त्यावर राज्य करणारी एकमेकांशी लागेबंद असणारी काही माणसं किती क्रूरपणे वागतात. हे जय भीम! चित्रपटात दाखविण्यात आलं आहे. (Jai Bhim)

स्वत: केलेला गुन्हा लपवण्यासाठी संरक्षण करणारेचं पोलिसचं एका आदिवासी माणसावर क्रूरपणे अत्याचार करतात. जबरदस्तीने त्याला पोलिस स्टेशनमध्ये उचलून नेतात. त्याला इतकं मारतात की, त्यात त्याचा मृत्यू होतो. तुम्ही हे दृश्य पाहिल्यानंतर तुम्हालाही चिड येईल. तुमचं रक्त खवळेल. तुम्हीही म्हणाल, चित्रपटातील पोलिस इतके राक्षसी वृत्ताचे कशी असू शकतात? (Jai Bhim)

आदिवासी राजकन्नू आणि सेंगानी

हा आदिवासी म्हणजेच राजकन्नू होय. राजकन्नूची पत्नी तिच्या पतीला वाचवण्यासाठी पुढे सरसावते. ती एका वकिलाकडे जाते, त्या वकिलाचं नाव आहे-चंद्रू. चंद्रू एक उत्तम वकिल आणि अन्यायाविरोधात लढणारा आहे. या वकिलाची भूमिका साकारलीय-साऊथ सुपरस्टार सूर्या याने. मानवाधिकार प्रकरण तो हाताळत असतो. तो या आदिवासीची केस लढताना अनेक घृणास्पद सत्य उघडकीस येतात. चंद्रूची अन्यायाविरोधातील लढाई ही केवळ अत्याचाराची कहाणी नाहीय. तर व्यवस्थेतील भ्रष्टपणा, आर्थिक विषमता, जाती-पाती आणि खालच्या वर्गाला दाखवलेल्या हीनपणाची कहाणी होय.


अनेक शतकं आपण जाती-धर्माची रचना मांडत त्याखाली जगत आलोय. आजही तेचं घडतंय. अनेक ठिकाणी पदोपदी जात-धर्म काढली जाते. उच्च-नीच असा भेदभाव केला जातो. आतादेखील खालच्या वर्गातील माणसांची वस्ती वेशीबाहेर वा गावाबाहेर असते. आजदेखील शिवाशिवसारखे प्रकार घडतात. आपण, अनेकवर्षे हे पाहत आलोय आणि सहनही करत आलोय. जय भीमचा विषय असाचं काहीसा आहे. यामध्ये पोलिसांकडून झालेला अत्याचार म्हणजे क्रूरतेच्या पलिकडचा हिंसाचार होय.

जातीचा राग भलताच!

राजकन्नू हा आदिवासी असून तो साप, उंदिर पकडण्याचे काम करतो. एकदा गावातील एक उच्च व्य़क्तीचा नोकर त्याला बोलवायला येतो. त्याला गाडीवरून घेऊन जात असताना राजकन्नू आधारासाठी त्याच्या खांद्यावर हात ठेवतो, तेव्हा तो नोकर मागे वळून रागाने त्याच्याकडे पाहतो. तेव्हा त्याच्या डोळ्यातील भावना राजकन्नू जाणतो आणि तो हात पटकन मागे घेतो.


दोन साऊथ सुपरस्टारचा दमदार अभिनय

चंद्रू म्हणजेच सूर्या आणि आय़जी पेरुमल स्वामीची भूमिका साऊथ स्टार प्रकाश राज यांनी साकारलीय. चंद्रू हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तामिळनाडूतील समाजसुधारक पेरियार यांच्या विचारांनी प्रेरीत आहे.

महापुरुषांविषयी शाळेतील शिक्षकांमध्ये अनास्था का?

चित्रपटामधील एका दृश्यात तो एका सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावल्याचे दाखवण्यात आलंय. तेथे लहान मुले महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्या वेषात उभे असतात. चंद्रूला या महापुरुषांमध्ये मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर कुठेचं दिसतं नाहीत. तेव्हा चंद्रू मुख्याध्यापकांना विचारतो- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कुठेचं दिसतं नाहीयेत. अगदी तळागाळातील लोकांचा उध्दार करणारे, त्यांना त्यांचे हक्क-अधिकार मिळवून देणाऱ्या या महापुरुषांविषयी शाळेतील शिक्षकांमध्ये अनास्था का? हे या दृश्यावरून प्रतीत होते. या चित्रपटातील अभिनेत्रीने राजकन्नूच्या पत्नीची उत्तम साकारलीय. ती अभिनेत्री Lijomal Jose होय. या अभिनेत्रीने चित्रपटात सेंगानीची व्यक्तीरेखा साकारलीय.


जेव्हा पोलिस राजकन्नूला उचलून पोलिस ठाण्यात नेतात आणि तुरंगात डांबतात. त्यावेळी चित्रपटाचे कथानक सेंगानीकडे वळते. पुढचा बराच चित्रपट सेंगानीवर भार टाकतो. दोन साऊथ स्टार प्रकाश राज आणि सूर्य चित्रपटामध्ये असतानाही सेंगानी आपली अभिनयाची छाप सोडायला यशस्वी ठरलीय. हा चित्रपट पाहिल्यानंतर कनिष्ठ वर्गाचे दुःख तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे आणि शेवटी सामजिक संदेश देण्यासाठी जय भीम यशस्वी ठरतो.

Thursday, November 4, 2021

Kangana : घरातून पळून गेली होती बंडखोर कंगना, वडिलांनाही जुमानले नाही

 बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना राणावत (Kangana) नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. राष्ट्रीय पुरस्कार विजेती कंगना राणावत आपल्या प्रत्येक चित्रपटावरून नेहमीचं चर्चेत असते. चित्रपटांवरून मीडियामध्ये न केवळ ती चर्चेत राहते. तर आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांमध्ये एक वेगळी छापदेखील सोडलीय. काल कंगनासाठी (Kangana) सुवर्ण दिवस होता. उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांनी ६७ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात तिचा गौरव केला. पण, तिचा हा पहिला पुरस्कार नाहीये. याआधीही तिने तीन राष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. आतापर्यंत चार राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी कंगना पहिली अभिनेत्री ठरली आहे. पण, तुम्हाला माहितीये का? बालपणापासूनचं बंडखोर असलेली कंगना वयाच्या १५ व्या वर्षी घरातून पळून गेली होती. आधीही तिने कुणाला जुमानले नाही आणि आताही ती सर्वांना पुरून उरते.

चार राष्ट्रीय पुरस्कारांची मानकरी

कंगनाला तिचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार २००८ मध्ये रिलीज झालेला चित्रपट फॅशनसाठी मिळाला होता. त्यानंतर २०१४ मध्ये ‘क्वीन’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. २०१५ मध्ये ‘तनु वेड्स मनु’साठीदेखील कंगनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. आता २०२१ मध्ये ६७ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात तिला ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ आणि ‘पंगा’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत

कंगना राणावत आतार्पंत अनेक वादग्रस्त वक्तव्ये करून चर्चेत आली आहे. बिनधास्त आणि स्पष्ट विधाने केल्यामुळे तिला अनेक आव्हानांनाही सामोरे जावे लागले आहे. तिच्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह ट्विट करणं, द्वेष पसरवणे आणि देशद्रोहाचे खटले होते. आक्षेपार्ह ट्विट केल्यानंतर ट्विटरने तिचे अकाऊंट तात्पुरते क्लोज केले होते. त्यावेळीही तिने व्यक्त होण्यासाठी असंख्य व्यासपीठ असल्य़ाचे म्हणत ट्विटरला सुनावले होते.

कंगनाने प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांच्यासोबतही पंगा घेतलाय. तिने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, जावेद अख्तर यांनी कंगनाला घरी बोलावून धमकावलं होतं आणि ऋतिक रोशनला माफी मागण्यासाठी म्हटलं होतं. कंगनाच्या मुलाखतीतील या विधानानंतर जावेद अख्तर भडकले होते. नंतर जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणावरून कंगनाविरोधात वॉरंट जारी करण्यात आले होते.

महेश भट्ट यांच्यावरही तिने आरोप केल होते. कंगनाची बहिण रंगोलीने म्हटले होते की-महेश भट्ट यांनी कंगनावर चप्पल फेकली होती. कारण कंगनाने त्यांच्या चित्रपटात सुसाईड बॉम्बरची भूमिका करण्यास नकार दिला होता.

कंगना राणावत व तिच्या बहिणी विरोधात धार्मिक भावना भडकवणे आणि दोन समूहांमध्ये वितुष्ट निर्माण करण्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. असंख्य प्रकरणांमधील वादात कंगना अडकली होती. तिच्यावर विविध प्रकरणांतर्गत अनेक गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

ऋतिक रोशनसोबत अफेअर?

कंगना आणि ऋतिक रोशनच्या अफेअरच्या खूप चर्चा रंगल्या होत्या. कंगनाने ऋतिक रोशनला पाठवण्यात आलेल्या ईमेल प्रकरणाची चांगलीचं हवा झाली होती. कंगना विरोधात ऋतिक रोशनने एफआयआर केलं होतं. ऋतिकने २०१७ मध्ये सायबर सेलमध्ये एक तक्रार दाखल केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, २०१३ ते २०१४ पर्यंत १०० ई-मेल मिळाले होते. तक्रारीत म्हटलं होतं की, हे ई-मेल कंगनाच्या मेल आयडीवरून पाठवण्यात आले होते. या मुद्द्यावरून ऋतिक रोशनने २०१७ मध्ये सायबर सेलमध्ये एक तक्रार दाखल केली होती. यावर कंगना म्हणाली होती, तिचे ई-मेल हॅक झालं होतं आणि तिने ऋतिकला कोणताही ई-मेल केलेला नव्हता.

2008 – Best Supporting Actress for film Fashion

थेट मुंबई महापालिकेसोबत पंगा

बेकायदा बांधकामासंदर्भात महापालिकेने कंगनाला नोटीस बजावली होती. पण, उत्तर न आल्याने कंगनाच्या मुंबईतील अवैध कार्यालयालयावर बीएमसीने जेसीबी चालवला होता. या कारवाईविरोधात कंगना न्यायालयात गेली होती.

2014 – Best Actress for Queen movie

बंडखोर कंगना

कंगनाने सोशल मीडियावरून सांगितले होते. ती वयाच्या १५ व्या वर्षी कशी बंडखोर झाली, हे तिने सांगितले होते. ती म्हणाली होती – एकदा तिला वडिलांनी कानाखाली लगावली होती. त्यावेळी कंगनादेखील बंडखोर झाली होती.

2015 – Best Actress for Tanu Weds Manu Returns

वडिलांनाही जुमानले नाही

कंगनाने म्हटले होते की, “माझ्या वडिलांकडे रायफल आणि पिस्तुल होती. मी लहान होते. ते माझ्यावर रागावले की, माझे पाय थरथर कापत. त्यांच्या काळात ते कॉलेजमध्ये गँगवार करण्यासाठी प्रसिद्ध होते. यामुळे त्यांची ओळख गुंड अशी झाली होती. मी वयाच्या १५ व्या वर्षीच त्यांच्यासोबत भांडून घर सोडले होते. मी वयाच्या १५ वर्षांच्या वयातच पहिली बंडखोर राजपूत महिला ठरले होते.”

वडिलांनी थप्पड मारण्याचा केला होता प्रयत्न

आपल्या वडिलांसंदर्भात बोलताना कंगनाने त्यांचा फोटो शेअर केला आहे. तिने म्हटले आहे, ‘मी जगातील सर्वोत्कृष्ट डॉक्टर व्हावे, अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. जेव्हा मी शाळेत जाण्यास नकार दिला, तेव्हा त्यांनी मला कानाखाली मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मी त्यांचा हात पकडला आणि म्हणाले, तुम्ही मला कानाखाली माराल, तर मीही तुम्हाला मारीन.’

कंगना म्हणाली की, ‘तेथे आमच्या नात्याचा शेवट झाला होता. त्यावेळी माझ्या वडिलांनी केवळ माझ्याकडे आणि माझ्या आईकडे बघितलं आणि आपल्या खोलीत निघून गेले. मला माहित होतं की, मी मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यानंतर मी त्यांना पुन्हा मिळवू शकले नाही. मी कायमची त्यांच्यापासून दूर गेले. मी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी काहीही करू शकत होते.’

Image
कंगना आपल्या आई-वडिलांसोबत

बॉलिवूड नेपोटिझ्मवर नेहमीचं निशाणा

ती म्हणते की- या चिल्लर इंडस्ट्रीला वाटते, की, मला मिळालेले यश माझ्या डोक्यात घुसले आहे. ते मला नीट करू शकतात. पण, मी नेहमीच बंडखोर होते. यशामुळे फक्त माझा आवाज वाढला आहे. इतिहास साक्षी आहे, की ज्यांनी-ज्यांनी मला नीट करण्याचा प्रयत्न केला, त्यांना मीच नीट केले आहे. बॉलिवूडमध्ये नेपोटिझ्म जोरात आहे. ज्या कलाकारांची कुठलीही कलेशी पार्श्वभूमी नाहीये. त्यांना या इंडस्ट्रीत टिकू दिलं जात नाही.

पण, कंगनाने तिची कुठलीही फिल्मी पार्श्वभूमी नसतानाही तिने इंडस्ट्रीत बस्तान बसवले. वयाच्या १६ व्या वर्षी एकटी मायानगरी मुंबईत येऊन आपली ओळख बनवणं सहजसोप्पं नाही. मार्गात अनेक काटे रुतले असतील. पण, त्या काट्यांच्या जखमा भरून येण्यासाठी तिने दिवस-रात्र मेहनत घेतली. ती आपल्या मतांवर ठाम राहीली. इंडस्ट्रीतील अनेक बाबी समोर आणल्या. म्हणूनचं की काय-तिला काही वर्गाकडून विरोध होत राहिलाय.

आर्यनचं नव्हे तर समीर वानखेडेंनी 'या' सेलिब्रिटींवरही केली कारवाई

 

ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक झाल्यानंतर रोज नवे अपडेट समाेर येत आहेत. या प्रकरणी चर्चेत आलेले एनसीबी अधिकारी म्हणजे समीर वानखेडे. ड्रग्‍ज पार्टीच्‍या संशयावरुन एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी मुंबईवरील कॉर्डिलिया क्रूझवर छापा टाकला. आर्यन खान, मुनमुन धमेचा, अरबाझ मर्चंटसह ८ जणांना ताब्यात घेण्यात आले. चौकशी करून त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान समीर वानखेडे यांच्यावर ड्रग्‍ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी आरोपही केले. पण, धाडसी अधिकारी म्हणून नावाजलेले वानखेडे यांच्याकडे आर्यनची पहिलीच केस नाहीय. त्याआधी त्‍यांनी अनेक सेलिब्रिटींवर धडक कारवाई केली आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. मलिकांनी वानखेडेंची फॅमिली हिस्ट्री सर्वांसमोर आणलीय.

दुसरीकडे, वानखेडे यांनी अनेक सेलिब्रिटींची वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चौकशी केली होती. बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांना त्यांच्या चौकशीला सामोरं जावं लागलंय.

आर्यन खानच्या आधी १२ सेलिब्रिटींची चौकशी वानखेडेंनी केलेली आहे.

शाहरुख खान

शाहरुख खानला जुलै, २०११ रोजी त्याच्या कुटुंबीयांसह विमानतळावर थांबवण्यात आलं होतं. त्यावेळी शाहरुख खानची फॅमिली लंडनहून परत आली होती. मर्यादेपेक्षा जास्त साहित्य आणल्यामुळे त्याला दीड लाखांचा दंड भरावा लागला. त्यावेळी कस्टमच्या टीमचे प्रमुख वानखेडे होते.

कॅटरीना कैफ

कॅटरीना कैफला २०२१ मध्ये मुंबई विमानतळावर अडवलं होतं. फॉरेन एक्स्चेंज रेग्युलेशन ॲक्टच्या अंतर्गत त्याला १२ हजार रुपयांचा दंड भरावा लागला होता. लगेज क्लेम न करता तिने एक्झिट घेतली होती. तिच्याकडे दोन बॅगा सापडल्या. त्यात एक आयपॅड, दोन व्हिस्की बॉटल, ३० हजार रुपये कॅश हाेती.

मिनिषा लांबा

मिनिषा लांबा हिलाही मुंबई विमानतळावर २०११ मध्ये रोखण्यात आलं होतं. कस्टम डिपार्टमेंटने तिला अडवलं होतं. तिची चौकशी केल्यानंतर तिच्या बॅगेतून डायमंड ज्वेलरी, किंमती स्टोन मिळाले. या वस्तूंची किंमत ५० लाखांच्या जवळपास होती. या प्रकरणी वानखेडेंनी मिनिषा लांबाची १६ तास चौकशी केली होती.

मिका सिंग

२०१३ मध्ये गायक मिका सिंग बँकॉकहून परत येत होता. मिकाच्या बॅगेत ९ लाख रुपयांचं सामान होतं. त्याची माहिती मिकाने दिली नव्हती. तो तसाच एअरपोर्टच्या बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होता. त्यावेळी कस्टमने त्याला अडवून चौकशी केली होती. त्याच्या बॅगेत मद्याच्या बाटल्या, गॉगल्स आणि परमफ्युम्स सापडले होते.

अनुराग कश्यप

वानखेडे सर्व्हिस टॅक्स डिपार्टमेंटचे डेप्युटी कमिश्नर होते. त्यावेळी २०१३ मध्ये अनुराग कश्यपला टॅक्स इन्वेशनसंदर्भात ५५ लाखांचा दंड भरावा लागला होता. अनुराग कश्यपचं अकाऊंटही डिसेंबरमध्ये सील करण्यात आलं होतं.

विवेक ओबेरॉय

अनुराग कश्यपच्या या केसनंतर एक महिन्याने विवेक ओबेरॉयलाही सर्व्हिस टॅक्स डिपार्टमेंटद्वारे कर चुकवल्याप्रकरणी पकडण्यात आलं होतं. त्याच्यावर ४० लाखांच्या उत्पन्नात कर चुकवल्याचा आरोप होता.

अनुष्का शर्मा

अभिनेत्री अनुष्का शर्माला २०११ मध्ये मुंबई विमानतळावर थांबवण्यात आलं होतं. त्यावेळी अनुष्का शर्माकडे असलेल्या बॅगा वानखेडेंच्या टीमने तपासल्या होत्या. अनुष्काच्या बॅगेत डायमंड ब्रेसलेट, नेकलेस, इअर रिंग्ज, २ घड्याळे मिळाली होती. त्यावेळी अनुष्काची ११ तास चौकशी केली होती.

रणबीर कपूर

रणबीर कपूर २०१३ मध्ये ब्रिटीश एअऱवेजच्या फ्लाईटने लंडनहून मुंबईला आला होता. त्यावेळी ज्या मार्गाने फक्त विमानतळ कर्मचारी आणि अधिकारी जाऊ शकतात. त्या मार्गाने तो जात होता. त्यावेळी त्याच्या बॅगेत १ लाखांहून अधिक किंमतीचे साहित्य होते. ४० मिनिटांची चौकशी झाली. ६० हजारांचा दंड भरल्यानंतर त्याची सुटका झाली होती.

बिपाशा बसू

बिपाशा बसूलाही मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वानखेडेंच्या टीमने अडवलं होतं. तिच्याकडे ६० लाखांपेक्षा जास्त किंमतीचं साहित्य मिळालं होतं. चौकशीनंतर तिला १२ हजार रुपये दंड भरावा लागला होता.

दीपिका पदुकोण

सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील ड्रग्ज केलमध्ये दीपिका पदुकोणची चौकशी झाली होती. श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंग यांनाही एनसीबीने समन्स पाठवलं होतं.

रिया चक्रवर्ती

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवतीचं नाव समोर आलं होतं. ८ सप्टेंबर, २०२० रोजी ड्रग्ज प्रकरणात तिला अटक करण्यात आली होती. ही कारवाई वानखेडे यांनींच केली होती.

अरमान कोहली

अभिनेता अरमान कोहली ड्रग्ज प्रकरणात सापडला होता. त्यावेळी ऑगस्ट २०२१ मध्ये त्याला ड्रग्ज प्रकरणात अटक झाली होती. ही कारवाईही वानखेडेंनी केली होती.

अरमान कोहली

कशाची लाज? 'या' ६ अभिनेत्रींनी पोस्ट केले 'ब्रेस्ट फिडिंग'चे फोटो

 मातृत्व लाभल्यानंतर स्त्रीचा आनंद गगनात मानत नाही. तिच्या आयुष्यातील आई ही सर्वात मोठी पदवी तिने मिळवलेली असते. बॉलिवूड अदाकारांनीदेखील आई झाल्यानंतर आनंदाची बातमी त्या-त्यावेळी दिलीय. विशेष म्हणजे, या अदाकारांनी बाळाला ‘ब्रेस्ट फिडिंग’ (स्तनपान) करतानाचे विलक्षण क्षण सर्वांसोबत शेअर केले. कशाची लाज? असे म्हणत कशाचीही तमा न बाळगता या अभिनेत्रींनी ‘ब्रेस्ट फिडिंग’चे फोटो शेअर केले.

पाहुया, या सहा अदाकारा कोण आहेत ज्यांनी स्तनपान करतानाचे फोटोज पोस्ट केले होते. मातृत्व लाभल्यानंतर कुठल्याही प्रकारची तमा बाळगायची गरज नाहीये. असे म्हणत आतापर्यंत या अभिनेत्रींनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत.

नेहा धूपिया

बॉलीवूड अभिनेत्री नेहा धूपियाने ब्रेस्ट फीडिंग करत फोटो पोस्ट केलीय. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

लीजा हेडन

लीजा हेडनने काही दिवसांपूर्वी तिसऱ्या बाळाला जन्म दिलाय. तिनेदेखील आपल्या मुलाला ब्रेस्ट फीड करतानाचा फोटो पोस्ट केलाय.

शिखा सिंह

‘कुमकुम भाग्य’ फेम शिखा सिंहने आपल्या बाळाला ब्रेस्ट फीड करतानाचा एक फोटो शेअर केलाय.

श्वेता साळवे

श्वेता साळवे ही हिप हिप हुर्रे आणि लेफ्ट राइट लेफ्ट यासारख्या शोमध्ये दिसली होती. या अभिनेत्रीने ऑगस्ट २०१९ मध्ये स्तनपान करतानाचा एक फोटो शेअर केला होता.

अमृता राव

बॉलीवूड अभिनेत्री अमृता रावनेदेखील बेबी ब्रेस्ट फीड करतानाचे फोटोज पोस्ट केले होते.

सेलिना जेटली

सेलिना जेटलीनेदेखील ब्रेस्ट फीड करतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

ऐश्वर्या राय : मॉडलिंग, मिस वर्ल्ड, फ्लॉप चित्रपट आणि...


 एखाद्या सौंदर्यवतीसाठी आपल्‍या डोक्‍यावर सौंदर्यवतीचा मुकूट पाहणं म्‍हणजे अविस्‍मरणीयच क्षण असतो. काळ कोणताही असो, तरुणींचं सौंदर्य नेहमीच आकर्षित करणारं आणि प्रभाव पाडणारं असतं. त्‍याचं व्‍यक्‍तिमत्त्‍वही अनेकदा छाप पाडून जातं. सौंदर्याबरोबरच हुशार, तत्‍काळ निर्णय घेण्‍याची क्षमता आणि कलेमध्‍ये प्रावीण्‍य असणार्‍या तरुणींची नेहमीच स्‍तुती केली जाते. सार्वजनिकपणे तरुणींचं टॅलेंट दिसण्‍यासाठी काळानुरूप, मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्‍हर्स यासारख्‍या स्‍पर्धादेखील अस्‍तित्त्‍वात आल्‍या. जागतिकीकरणाच्या युगात सौंदर्याच्या स्‍पर्धा या वैश्‍विक स्‍तरावर पोहोचल्‍या. मिस वर्ल्ड या स्‍पर्धेचेच घ्‍या. जगभरातील तमाम देशांतील सौंदर्यवती मिस वर्ल्ड स्‍पर्धेत सहभागी होतात. परंतु, जिंकते तिचं जी सौंदर्याबरोबर आपलं टॅलेंट जगासमोर मांडते. असेचं टॅलेंट ऐश्वर्या राय हिने मिस वर्ल्ड १९९४ मध्ये दाखवले होते. ऐश्वर्या राय हिने जगभरातील सौंदर्यवतींना पिछाडीलवर टाकत ही स्पर्धा जिंकली होती.

सौंदर्याचे मोजमाप करायला न कुठले माप असते ना परिमाण. परंतु, माणसांनी सौंदर्याचे विश्‍लेषण करण्‍यासाठी स्‍पर्धा ठेवल्‍या. सौंदर्य आणि स्‍किल या दोन्‍ही कसोट्‍या पार करून अनेक तरुणींनी मिस वर्ल्डचं मुकूट परिधान केलं आहे. सौंदर्य स्‍पर्धेत भाग घेणं म्‍हणजे केवळ आपलं सौंदर्य दाखवणं, इतकचं असत नाही तर तरुणींमधले सुप्‍त गुण, त्‍यांची कला, स्‍किल या गोष्‍टीही पाहिल्‍या जातात.
मिस वर्ल्ड या सौंदर्य स्‍पर्धेत सहभागी होणार्‍या शंभरहून अधिक देशांतील सौंदर्यवतींबरोबर स्‍पर्धा करुन ही कठीण स्‍पर्धा पार पाडणे, तितके सोपे राहिलेले नाही.

मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशन

विश्‍वसुंदरी निवडणारी मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनची स्‍थापना २९ जुलै १९५१ मध्ये झाली होती. पहिली स्‍पर्धा कॅलिफोर्नियाच्‍या पॅसिफिक मिल्‍सने १९५२ मध्‍ये घेतली होती. १९६६ च्‍या आधी केवळ परदेशातच सौंदर्य स्‍पर्धा आयोजित केल्‍या जात होत्या. पाश्‍चात्‍य देशातील तरुणी त्‍यात सहभागी व्‍हायच्‍या. आता जगभरातील कानाकोपर्‍यातून तरुणी सहभागी होतात. त्‍यात भारतानेही जगाच्‍या नकाशावर आपली वेगळी प्रतिमा निर्माण केलीय. रिटा फारिया, ऐश्‍वर्या, डायना हेडन, युक्‍ता मुखी, प्रियांका चोप्रा आणि मानुषी छिल्‍लर या भारताच्‍या सौंदर्यवतींनी जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली.

मॉडलिंग आणि चित्रपटांची रेलचेल

ऐश्वर्या राय हिला मिस वर्ल्डचं मुकूट १९९४ मध्ये मिळालं. मिस वर्ल्ड जमैकाची रहिवासी असणारी लिसा हन्नाने घातलं होतं. ऐश्‍वर्याने आंतरराष्‍ट्रीय कॉन्‍ट्रॅक्‍ट अंतर्गत एक वर्षापर्यंत मॉडेलिंग, चित्रपटात काम करू शकत नव्‍हती. विशेष म्‍हणजे याकाळात तिच्‍याकडे २४ चित्रपटांचे प्रस्‍ताव आले होते.

पुढे ऐश्‍वर्या राय चित्रपटात आली. मणीरत्‍नम यांचा ‘इरुवर’ या तामिळ चित्रपटातून तिने सिनेजगतात पाऊल ठेवलं. तिचे एकामागोमाग एक तीन चित्रपट फ्‍लॉप ठरले. परंतु, ऐश्‍वर्याने हार मानली नाही. १९९९ मध्‍ये अभिनेता अक्षय खन्‍नासोबत तिने ‘आ अब लौट चले’ चित्रपट केला. हा चित्रपट सुपरहीट ठरला. त्‍यानंतर एकापेक्षा एक चित्रपट तिला मिळत गेले.

संजय लीला भन्‍साळी यांचा ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपट केला. त्‍यात अजय देवगण आणि सलमान खान यांच्‍या मुख्‍य भूमिका होत्‍या. या चित्रपटाच्‍या माध्‍यमातून बॉलिवूडमध्‍ये तिने यशाचं शिखर गाठलं. सुभाष घई यांचा ‘ताल’ आणि भन्‍साळी यांच्‍या ‘देवदास’ने ऐश्‍वर्याच्‍या अभिनयात चारचाँद लावले.

ऐश्वर्या राय हिला २०१४ च्‍या ‘मिस वर्ल्ड पीजेंट’ दरम्‍यान ‘सक्सेसफुल मिस वर्ल्ड’ने गौरवण्‍यात आलं होतं. डिसेंबर २०१४ मध्‍ये मिस वर्ल्ड स्‍पर्धेत ऐश्‍वर्याला चीफ गेस्ट म्‍हणूनही आमंत्रित करण्‍यात आलं होतं.

ऐश्वर्या रायचा जन्‍म १ नोव्‍हेंबर १९७३ रोजी मंगळुर, कर्नाटकात झाला. ऐश्वर्याचे वडील कृष्णराज मरीन इंजिनिअर होते. तिच्‍या आईचे नाव वृंदा राय. त्‍या लेखिका आहेत. ऐश्वर्याचा एक मोठा भाऊ देखील आहे. त्‍याचं नाव आदित्य राय असं आहे.

ऐश्वर्या रायची मातृभाषा तुलु आहे. शिवाय, तिला कन्नड, हिंदी, मराठी, इंग्रजी आणि तमिळ भाषा देखील येतात. ऐश्वर्या रायचे प्राथमिक शिक्षण (इयत्ता ७वी पर्यंत) हैदराबाद, आंध्र प्रदेशमध्‍ये झालं. त्‍यानंतर तिचे कुटुंबीय मुंबईत आले.

मुंबईत ॲशने सांताक्रूज येथील आर्य विद्या मंदिर आणि नंतर डी. जी. रुपारेल कॉलेज, माटूंगा येथे शिक्षण घेतलं. शिक्षणासोबत तिने मॉडलिंगकडेही लक्ष दिलं.

ऐश्वर्याला मॉडलिंगचा पहिला प्रस्ताव कॅमलिन कंपनीकडून मिळाला होता. त्‍यावेळी ॲश नववीत शिकत होती. नंतर ती कोक आणि पेप्सीच्‍या जाहिरातीत दिसली.

  • या भारतीय सौंदर्यवतींनीही मिळवलं ग्लॅमर आणि करिअर

भारताची पहिली मिस वर्ल्ड रिटा फारिया

भारताची पहिली मिस वर्ल्ड रिटा फारिया. १९६६ मध्‍ये पहिल्‍यांदा भारताचं प्रतिनिधीत्‍व करत रिटा फारियाने विश्‍वसुंदर स्‍पर्धेत आपली उपस्‍थिती लावली होती. मिस वर्ल्डचं मुकूट परिधान करून भारतच नाही तर जागतिक स्‍तरावर भारताची नवी ओळख तिनं करून दिली. सावळ्‍या रंगाची १९ वर्षीय रिटा फारिया त्‍यावेळी मुंबईच्‍या जे. जे. कॉलेजमध्‍ये मेडिकलची विद्यार्थिनी होती. रिटा एक डॉक्टर (फिजीशियन) देखील आहे. तिचा जन्म मुंबईत १९४५ ला झाला.

मिस वर्ल्ड स्‍पर्धेत भाग घेणं, तिच्‍यासाठी स्‍वप्‍नासारखं होतं. परंतु, तिची मोठी बहीण फिलोमिनाच्‍या आग्रहास्‍तव रिटा सौंदर्य स्‍पर्धेत उतरली. रिटाची मिस इंडिया स्‍पर्धेसाठी निवड झाली. त्‍यावेळी तिने आईची जुनी साडी आणि जुने सी सँडेल घालून रॅम्‍प वॉक केलं होतं. मिस इंडिया स्‍पर्धा तिने जिंकली. काही कालावधीनंतर ती लंडनच्‍या रॉयल अल्‍बर्ट हॉलमध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या मिस वर्ल्ड स्‍पर्धेत भाग घेतला. तिथेही तिने आपली चुणूक दाखवून मिस वर्ल्डचं मुकूट आपल्‍या नावे केलं.

डायना हेडन

ऐश्‍वर्यानंतर १९९७ मध्‍ये हैदराबादच्‍या डायना हेडनने मिस वर्ल्डचं मुकूट परिधान केलं. सावळ्‍या रंगाची डायनाचं व्‍यक्‍तिमत्त्‍व आकर्षक होतं. डायना ‘बिग बॉस-२’मध्‍ये तसेच अनेक चित्रपटांतही भूमिका केल्‍या आहेत. तिचं चित्रपट करिअर म्‍हणावं फुललं नाही.

युक्ता मुखी

लंडनमध्‍ये ४ डिसेंबर, १९९९ मध्ये युक्‍ताने ४९ वी मिस वर्ल्ड स्‍पर्धा जिंकली. ९३ देशांच्‍या सौंदर्यवतींना मागे टाकत या मुकूटावर आपलं नाव कोरलं. युक्‍ता मुखीला सहजासहजी हा किताब मिळाला नव्‍हता. तिच्‍या वडिलांना सौंदर्य स्‍पर्धेत भाग घेणं पसंद नव्‍हते. युक्‍ताने डॉक्‍टर बनावे, अशी त्‍यांची इच्‍छा होती. परंतु, युक्‍ताने आपल्‍या वडिलांना जिंकून दाखवेन, असा विश्‍वास दिला. युक्ताने २००२ मध्‍ये आलेला चित्रपट ‘प्यासा’ मधून बॉलिवूड डेब्‍यू केलं होतं. त्‍यात आफताब शिवदासानीची मुख्‍य भूमिका होती. हा चित्रपट फ्‍लॉप ठरला. त्‍यानंतर २००५ मध्‍ये युक्‍ताने ‘मेमसाब’ आणि ‘लव्‍ह इन जपान’ चित्रपट केले. या चित्रपटांची जादू बॉक्‍स ऑफिसवर म्‍हणावी तशी चालली नाही.

प्रियांका चोप्रा

सन २००० मध्‍ये प्रियांकाने मिस वल्‍ड स्‍पर्धा जिंकली. प्रियांकाचा जन्‍म जमशेदपूरमध्‍ये झाला. नंतर ते बरेलीत आले. नंतर प्रियांका आई मधू चोप्रा यांच्‍यासोबत मुंबईत आली, आणि मिस इंडिया स्‍पर्धेत उतरली. टॅलेंट आणि सौंदर्याच्‍या जोरावर प्रियांकाने मिस इंडियाचा किताब पटकावला. त्‍यावेळी प्रियांका १८ वर्षांची होती. त्‍यानंतर मिस वर्ल्डच्‍या तयारीसाठी प्रियांकाने मुंबईच्‍या जयहिंद कॉलेजमध्‍ये प्रवेश घेतला होता. तिने मिस वर्ल्ड स्‍पर्धेत सहभागी झाली स्‍पर्धा जिंकलीही. लंडनच्‍या मिलेनियम डोममध्‍ये प्रियांकाला युक्‍ता मुखीने मुकूट घातला होता. मिस वर्ल्ड बनल्‍यानंतर ‘द हीरो’तून प्रियांकाने बॉलिवूडमध्‍ये पदार्पण केलं. एकानंतर एक सुपरहिट चित्रपट देऊन ती बी-टाऊनची लोकप्रिय अभिनेत्री बनली.

भल्‍याभल्‍यांना मागे टाकले मानुषीने

मानुषी छिल्लरने १७ वर्षांनंतर मिस वर्ल्ड २०१७ चा मुकूट आपल्‍या नावे केला. आधी प्रियांकाने २००० मध्‍ये हा मुकूट परिधान केला. मानुषीने चीनच्‍या सान्या शहर एरीनामध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या मिस वर्ल्ड स्‍पर्धेत भाग घेतला. जगभरातील विविध देशांतील १०८ सौंदर्यवतींना मागे टाकून मानुषीने ही स्‍पर्धा जिंकली. मानुषीने आपलं शिक्षण दिल्‍लीच्‍या सेंट थॉमस स्‍कूलमध्‍ये पूर्ण केलं. नंतर सोनीपतच्‍या गव्‍हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्‍ये तिने प्रवश घेतला. ती एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करत आहे.

मिस वर्ल्ड होण्‍यासाठी तिने शिक्षणातून एक वर्षाचा ब्रेक घेतला होता. त्‍याआधी २०१६ मध्‍ये तिने कॉलेज प्रिन्‍सेसचा किताब पटकावला होता. तिला तेथे ब्‍युटी विथ ब्रेन असं म्‍हटलं जायचं. २०१६ मध्‍ये ती मिस हरियाणा देखील झाली होती. जून २०१७ मध्‍ये मुंबईत झालेली फेमिना मिस इंडियाच्‍या स्‍पर्धेत मानुषीने ३० सौंदर्यवतींना मागे टाकले.

आज छोट्‍या-छोट्‍या शहरांतही सौंदर्यस्‍पर्धा भरवल्‍या जात आहेत. अनेक तरुणींना आपलं सौंदर्य, आपले गुण, टॅलेंट दाखवण्‍यासाठी हे एक हक्‍काचं व्‍यासपीठ मिळालय. याचं व्‍यासपीठावरून त्‍यांना जगात ओळख निर्माण करण्‍याची संधी मिळते. कुणीही ओळखत नसलेल्‍या त्‍या तरुणींना सौंदर्य स्‍पर्धांच्‍या माध्‍यामातून एका रात्रीत जग ओळखू लागतं.

सौंदर्यस्‍पर्धेतून जगभर ओळख निर्माण होते. आता या स्‍पर्धा केवळ सौंदर्यस्‍पर्धा राहिल्‍या नसून त्‍याकडे ग्‍लॅमर म्‍हणून पाहिले जाते. स्‍पर्धा जिंकल्‍यानंतर अनेक चित्रपटांचे प्रस्‍ताव त्‍यांच्‍याकडे येऊ लागतात. या स्‍पर्धांकडे एक करिअर म्‍हणूनही पाहिले जाते. अशा स्‍पर्धांमुळे करिअरच्‍या अनेक संधी निर्माण होताहेत. काळानुसार आता सौंदर्याच्या व्‍याख्या बदलल्या आहेत. जागतिक पातळीवर एकाद्या स्‍त्रीच्या सौंदर्याचा गौरव होतो तेव्‍हा तो तिचा एकटीचा गौरव होत नाही तर स्‍त्री जातीचाही तो गौरव होत असतो.

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...