खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली रायगडाची स्वच्छता करण्याचा हा उपक्रम होता. 'स्वच्छ रायगड' या लोगोखाली शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न करण्याचे खासदार संभाजीराजे यांच्या भेटीत ठरले होते. रायगडचा परिसर पाहता किल्ल्याच्या कड्याखाली पडलेला जो कचरा आहे, तो बाहेर काढणे खूपच कठिण होतं. बरीच वर्षे साचलेला हा कचरा होता. गिर्यारोहणाच्या मदतीने ही स्वच्छता मोहीम फत्ते करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मोहिमेचे नियोजन
२५, २६, २७ मे हे तीन दिवस स्वच्छ रायगड मोहिमेसाठी निश्चित करण्यात आले होते. विनोद कांबोज यांचे सहकारी, इतर टीम आणि गिर्यारोहक २६ मे रोजी दुपारी रायगडावर पोहोचले. त्यानंतर गिर्यारोहकांना दरीत उतरून कशा पध्दतीने कचरा काढता येईल? याचे नियोजन करण्यात आले. नियोजनानुसार, २६ मे आणि २७ मे या दोन दिवशी सकाळी ६ वाजल्यापासून ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत स्वच्छता मोहिमेचे काम हाती घेण्यात आले.
विनोद कांबोज म्हणाले, 'जिथे कड्याच्या खाली कचरा टाकण्यात आला आहे, अशी स्थळे शोधण्यात आली. रायगडला जावून पाहणी करण्यात आली. रोपवे पासून रायगडला वर चढायला सुरूवात करतो तेथेपर्यंत आणि भवानी कड्यापासून काळेश्वरी बुरूजापर्यंत जो परिसर आहे, तो पाहण्यात आला. आणि नंतर लक्षात आले की, एमटीडीसीची मागील बाजू म्हणजे रोपवेतून वर येतानाची डावी बाजूच्या कड्याखाली मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला दिसला. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेची मागील बाजूसही खूप कचरा साचला होता. महादरवाजावरून पायर्या उतरताना त्याची उजवी बाजू तसेच चित दरवाजापासून महादरवाजापर्यंतच्या डाव्या बाजूला कड्यांवर कचरा अडकून होता. ही ठिकाणे पाहून याठिकाणी किती टीम लागतील, गिर्यारोहणाचे साहित्य किती लागणार? याचा अंदाज घेऊन त्यापद्धतीने नियोजन करण्यात आले.'
२५ जणांची टीम स्वच्छतेसाठी रायगडावर
१५ जण कोल्हापूरमधील होते. दोघेजण सातार्यातून आले होते. ६-७ जण मुंबईतून आले. अशी साधारणत: २५ जणांची टीम रायगडला पोहोचली होती. त्यात महिबूब मुजावर, मलय मुजावर, अमीर नदाफ, कृष्णा ताम्हणकर, महेश शिंदे, आकाश ऐतवडे, सोहील मुजावर, विनोद कांबोज, सूरज ढोली, जयदीप जाधव, पी. जी. जाधव, पार्थ चव्हाण, प्रणव महामुने, आशिष सोमवंशी, अनिकेत जुगदार, सुमेध पवार, धीरज चव्हाण, सुहास बेळेकर, अमोल आळवेकर, मानसिंग मांगोरे पाटील यांचा या माोहिमेत सहभाग होता.
गिर्यारोहणाचे सिसेंडर्स, हेल्मेट, रोप्स, ज्युमर असं सगळं साहित्य घेऊन सर्वजणांनी रायगडावर आगेकूच केली. कचरा गोळा करण्यासाठी शंभर बॅग्ज सोबत घेतल्या होत्या. तसेच प्लास्टिक बॉटल्स उचलण्यासाठी लोखंडी पंजांचा वापर करण्यात आला. २५ तारखेला ही टीम रायगडला पोहोचली. संध्याकाळी सर्व साहित्य रागयडवर आणण्यात आले. २६ मे रोजी सकाळी ६.३० वाजता प्रत्यक्षात काम करण्यास सुरूवात केली. सुरूवातीला एमटीडीसीची मागची बाजू आणि जिल्हा परिषदेची मागची बाजू असे दोन टप्पे निवडण्यात आले. पहिल्या अर्ध्या दिवसातच एमटीडीसीच्या मागच्या बाजूला साधारण ४० ते ४५ पोती कचरा उचलण्यात आला. रोप-वेचा आधार घेऊन गिर्यारोक कड्याच्या खाली उतरले. कचर्याने भरलेली ४० पोती होती, रोपच्या आधाराने वर उचलण्यात आली. दुपारनंतर जिल्हा परिषदेची जी मागील बाजू होती, तेथून जवळजवळ ४०-५० पोती कचरा एकत्र करण्यात आला. पहिल्या दिवशी साधारण ९० ते ९५ पोती कचरा गोळा करण्यात आला. त्यात पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, कागदे, थर्मोकॉलच्या प्लेट्स, दारूच्या बाटल्या होत्या.
गिर्यारोहकांनी जीव धोक्यात घातला
दुसर्या दिवशी म्हणजेच २७ मे रोजी किल्ल्याच्या महाद्वारच्या खालच्या बाजूला एक टीम आणि एमटीडीसीच्या मागच्या बाजूला दुसरी टीम कार्यरत होती. तटबंदीवरून ३०० ते ३०० फूट खाली उतरून हा कचरा काढायचे होते. विशेष म्हणजे, एमटीडीसीचा जी मागील बाजू होती, ती वाट खूपच बिकट होती. तेथून खाली दीड हजार फूट खोल दरी होती. डोंगरातून बाहेर आलेला जो भाग होता, तो साधारणत: ३०० ते ३५० फूट खोल होता. अशी कठिण वाट असतानाही गिर्यारोहक रोपच्या सहाय्याने आपला जीव धोक्यात घालून दरीत उतरले. रोप फिक्स करून गिर्यारोहक अमोल आळवेकर रॅपल करत खाली उतरले. हे अतिशय अवघड काम होते. माऊंटनेअरिंग टेक्निक वापरून कचरा या डोंगराळ भागातून एकत्र करण्यात आला. यादिवशी सकाळी साडेसहा वाजल्यापासून हे काम सुरू होते, असे कांबोज यांनी सांगितले.
स्वच्छतेबाबत रायगडच्या रहिवाशांशी चर्चा
किल्ले रायगडाच्या जवळ असणारे छोटेखानी हॉटेल्स, चहाच्या टपर्या, खाऊच्या गाड्या त्यांच्या मागील बाजूस प्रचंड मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला पाहायला मिळाला. जेथे पर्यटकांना सोईसुविधा मिळतात, त्याठिकाणच्या परिसरात कचरा पाहायला मिळाला. यासंदर्भात पर्यटक, स्थानिक लोकांशीही चर्चा करण्यात आली. हॉटेल्स, खाऊच्या गाड्या असणारे व्यावसायिकांनीही हा कचरा उघड्यावर न टाकता तो एकत्र करा, कचर्याची विल्हेवाट लावण्याविषयीचे आवाहन करण्यात आले.
या मोहिमेत कोल्हापुरातील समिट ॲडव्हेन्चर्स, हिल रायडर्स ॲण्ड हायकर्स ग्रुप, शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंच, माऊंटनेअरिंग ॲण्ड ॲडव्हेंन्चर्स फौंडेशन यांचे गिर्यारोहक सहभागी झाले होते. त्याचबरोबर मुंबईतून काही गिर्यारोहक सहभागी झाले होते. कोल्हापुरातून विनोद कांबोज, अमोल आळवेकर, सुहास बेलेकर असे १४ ते १५ सहकारी कोल्हापुरातून तर मुंबईतून महिबूब मुजावर यांच्यासोबत ७ ते ८ सहकारी या टीममध्ये होते.
शिवाजी विद्यापीठाची मदत
गिर्यारोहणाचे अत्यंत चांगले साहित्य शिवाजी विद्यापीठाकडून उपलब्ध झाले. स्पोर्ट्स डिपार्टमेंटचे डॉ. प्रकाश गायकवाड यांची मोलाची मदत मिळाली. समिट ॲडव्हेंचर्स, हिल रायडर्स ॲण्ड हायकर्स ग्रुप, ३२ एमएस मुंबई, कोल्हापूर माऊंटनेअरिंग ॲण्ड ॲडव्हेंचर्स फौंडेशनचे या सर्व संस्थांच्या माध्यमातून ही मोहीम यशस्वी झाल्याचे विनोद कांबोज म्हणाले.
जिथे लोक राहायला येतात, जिथे पर्यटन वाढलं आहे, ज्याठिकाणी पर्यटकांना सोईसुविधा मिळतात; त्याचठिकाणी कचरा जास्त पाहायला मिळतो. किल्ले रायगड पर्यटनाच्या दृष्टिने अत्यंत महत्त्वाचा आहे. येथे पर्यटकांचीही संख्या वाढत आहे. पर्यटकांनी आपली जबाबदारी म्हणून स्वच्छतेकडे लक्ष द्यायला हवे. रायगडावर जाताना तिथला परिसर अस्वच्छ होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. तरच गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि संरक्षण खर्या अर्थाने होईल.