Friday, July 19, 2024

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पहा भक्तिमय चित्रपट

आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर, अल्ट्रा झकास मराठी ओटीटी आपल्या प्रेक्षकांसाठी विठुरायाचे खास भक्तिमय चित्रपट घेऊन येत आहे. आषाढी एकादशी हा दिवस महाराष्ट्रात विशेष महत्त्वाचा मानला जातो, जिथे भक्तगण विठ्ठल मंदिरात जाऊन आणि आपआपल्या घरात भजन, किर्तन आणि प्रार्थना करतात. या विशेष प्रसंगी, अल्ट्रा झकास मराठी ओटीटीने आपल्या प्रेक्षकांसाठी पाच अत्यंत लोकप्रिय भक्तिपूर्ण चित्रपट उपलब्ध करून दिले आहेत.



संत गोरा कुंभार

संत गोरा कुंभार या चित्रपटात भगवान विठ्ठलाचे परमभक्त असलेल्या आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक थोर संत यांची कथा आहे. त्यांच्या भक्तीची आणि निष्ठेची अद्भुत कहाणी या चित्रपटात पाहायला मिळेल. 1967 साली प्रदर्शित झालेल्या आणि राजा ठाकूर दिग्दर्शित या चित्रपटात अनेक नामांकित कलाकारांनी काम केले आहे. सुलोचना, उमा, लिला गांधी, काला दीक्षित, कुमार दिघे, प्रसाद सावकर यांच्या उत्कृष्ट अभिनयाने सजलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहे. सुधीर फडके यांच्या संगीताने प्रत्येक गाण्याला भक्तीमय रंग दिला आहे, ज्यामुळे प्रेक्षकांचे हृदय पांडुरंगाच्या भक्तीत रंगून जाते.

देवाचिये द्वारी

संत ज्ञानेश्वर यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाचा व भक्ती चळवळीत घेतलेल्या भूमिकांचा उलगडा करतो. जयश्री गडकर, बाळ धुरी आणि मधु कांबीकर यांच्या अभिनयानं सजीव झालेला हा चित्रपट एक विशेष अनुभव देतो.


संत निवृत्ती ज्ञानदेव

मधुकर पाठक दिग्दर्शित हा चित्रपट संत निवृत्ती आणि संत ज्ञानदेव यांच्या जीवनातील संघर्ष आणि त्यांच्या शिकवणींचा प्रभाव दाखवतो. या चित्रपटात भारतीय अध्यात्मावर त्यांचा ठसा अधोरेखित केला आहे.

ढ लेकाचा


पुरस्कारप्राप्त "ढ लेकाचा" या चित्रपटात  विठ्ठलाचे भक्त अण्णा यांच्या भक्तीचे दोन गाणी आहेत. पहिलं गाणं म्हणजे ‘मन धावतया चंद्रभागे काठी’ जे देवाच्या दर्शनाची उत्सुकता आणि दुसरं गाणं ‘ऐलतिरी एकला मी’ भक्तीचे स्वरूप दर्शवते.

माहेर माझे हे पंढरपूर

मिलिंद स्वामी दिग्दर्शित या चित्रपटात भगवान पांडुरंगावर दृढ श्रद्धा असलेल्या मुलीची कथा आहे. तिच्या श्रद्धेच्या जोरावर तिच्या जीवनात घडणाऱ्या चमत्कारांची ही कहाणी आहे. समीर धर्माधिकारी, बाळ धुरी आणि आशाताई वाबगावकर यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाने अनेक प्रेक्षकांना भक्तीचा अर्थ समजावला आहे.
 
अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणतात, “आम्हाला आनंद आहे की आम्ही आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्या प्रेक्षकांसाठी या विशेष चित्रपटांचा संग्रह आणू शकलो.”

आषाढी एकादशीच्या निमित्ताने, अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर या भक्तिमय चित्रपटांचा आनंद घ्या आणि आपल्या श्रद्धेला नवी दिशा द्या.




Saturday, July 13, 2024

'निळू फुलेंना पाहताच बायका बोटं मोडायच्या'; पण खरा स्वभाव होता तरी कसा?


बोलण्याची विशेष लकब, भारदस्त आवाज आणि अभिनयातील वेगळेपण अशा तिहेरी गुणांमुळे निळू फुलेंचं नाव अजरामर ठरलं. आजदेखील त्यांचं नाव उच्चारलं की, चेहऱ्यावर स्मित हास्य येऊन जातं. बऱ्याच चित्रपटांमध्ये त्यांच्या भूमिका अशा ठरल्या की, त्यांना छोट्या पडद्यावर पाहिलं की, बायका बोटं मोडायच्या. कारण, एक कलाकार म्हणून त्यांच्या ज्या भूमिका होत्या, त्या खलनायकी स्वरुपातील होत्या. राजकारण गेलं चुलीत, सूर्यास्त अशी नाटके तर चोरीचा मामला, बिनकामाचा नवरा, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी, थापड्या, सामनान, पिंजरा, सिंहासन, एक गाव बारा भानगडी असे कितीतरी चित्रपट गाजले आणि त्या-त्या चित्रपटातील त्यांच्या भूमिकाही तितक्याच गाजल्या. 

कलाकार निळू फुले यांचा आज १३ जुलैला स्मृतिदिन आहे. रंगभूमीवर 'सूर्यास्त,' 'घरंदाज,' 'रण दोघांचे,' 'सखाराम बाईंडर,' 'जंगली कबुतर' आणि 'बेबी' ही त्यांची नाटके तर 'पुढारी पाहिजे,' 'कोणाचा कोणाला मेळ नाही,' 'कथा अकलेच्या कांद्याची,' 'लवंगी मिरची – कोल्हापूरची,' 'राजकारण गेलं चुलीत' ही त्‍यांची प्रमुख लोकनाट्ये गाजली. निळकंठ कृष्णाजी फुले उर्फ निळू फुले यांचा जन्म १९३० मध्ये  पुण्यात झाला होता. त्‍यांचे वडील लोखंडी सामान व भाजीपाला विकत होते. त्‍यांचे दुकानही होते. निळूभाऊंचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते.  



निळू फुलेंची कन्या गार्गी काय म्हणते? 

निळूभाऊंची खलनायक ही ओळख आहेच. पण, 'अभिनेता' यापेक्षाही 'मोठा माणूस' अशी त्यांची ओळख आहे. एका कार्यक्रमात त्यांची कन्या गार्गी फुले यांनी आपले वडील पडद्यामागे कसे होते, याबद्दल सांगितले होते. शिवाय ती वेळोवेळी सोशल मीडियावर पोस्ट टाकत असते. आपल्या बाबांबद्दल भावना व्यक्त करत असते. पडद्यावरील खलनायक व पडद्यामागचा मोठा माणूस असे निळू फुले शांत स्वभावाचे, मोजके बोलणारे आणि प्रेमळ होते, असे गार्गी तिच्या वडिलांविषयी बोलते. ते खूप सारी पुस्तके वाचायचे, असे गार्गी फुलेने एकदा म्हटले होते. 

निळू फुलेंना अभिनयाची आवड पहिल्‍यापासूनच होती. सुरूवातीला नाटकातून आणि नंतर अभिनय क्षेत्रात त्‍यांनी आपला ठसा उमटवला. १९५७ मध्ये त्यांनी 'येरागबाळ्याचे काम नोहे' या लोकनाट्‍यात पहिल्‍यांदा काम केले. पु. ल. देशपांडे यांच्या 'पुढारी पाहिजे' या नाटकातून त्यांच्या 'रोंगे' या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले. 'कथा अकलेच्या कांद्याची' या वगनाट्‍यातून त्यांना प्रसिध्‍दी मिळाली. तर सुर्यास्त या नाटकामुळे ते अधिक लोकप्रिय झाले. 


रंगभूमीवरून ते सिनेजगतात जाताना त्‍यांच्‍यातील कलाकाराने आपली विविध रूपे मराठी सिनेसृष्‍टीला दाखवली. त्‍यांनी 'एक गाव बारा भानगडी' चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्‍टीत पाऊल ठेवले. 

निळूभाऊंचे मराठी चित्रपट

'सामना,' 'पिंजरा,' 'सोबती,' 'प्रतिकार,' 'पुत्रवती,' 'सहकार सम्राट,' 'शापीत,' 'हर्‍या नार्‍या,' 'पैज,' 'कळत नकळत,' 'जैत रे जैत,' 'पैजेचा विडा.' 

निळूभाऊंचे हिंदी चित्रपट

इतकेच नाही तर निळू यांनी हिंदी चित्रपटातही काम केलं होतं. 'जरासी जिंदगी,' 'रामनगरी,' 'नागीन-२,' 'मोहरे,' 'सारांश,' 'मशाल,' 'सूत्रधार,' वो सात दिन,' 'नरम गरम,' 'जखमी शेर,' 'कुली' आदी चित्रपटांतूनही आपली वेगळी प्रतिमा तयार केली. निळु फुले यांना महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार तीन वेळा मिळाला होता. अनंतराव भालेराव पुरस्कार, संगीत नाटक अकादमी आदी पुरस्कारही त्यांना मिळाले होते. 


'कुली' मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत तर मशालमध्ये 'दिलीपकुमार'सोबतही त्यांनी काम केले होते. त्यांच्या खलनायकी भूमिका विशेष गाजल्या. खर्‍या आयुष्यात मात्र ते समाजाला दिशा दाखवणारे नायकच होते. २००९ मध्ये वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी जगाच्या रंगभूमीवरून एक्झिट घेतली होती.


R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...