शून्यातून गरूडझेप घेणारे उद्योजक मधवा आचार्य
एखादा उद्योजक यशाचे शिखर गाठण्यामागे अपार मेहनतच नाही तर सहनशीलताही खूप महत्त्वाची असते. एखादे ध्येय साध्य करण्यासाठी जीवतोड मेहनत करावी लागते. तेव्हा कधी खूप सारे दु:ख आणि संकटांचं ओझं घेऊन काट्यांवरून चालावे लागते. कधी कधी खूप मोठ्या नुकसानीलाही सामोरे जावे लागते. पण, त्याचवेळी आनंदाचा 'गोल्डन पिरीयड' कधी सुरू होईल, हे सांगता येत नाही. अशाच कष्टाळू उद्योजकाची कहाणी, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. उद्योग जगतात उतरणे इतकी सोपी गोष्ट नाहीये. पण, उद्योगाच्या जगतात आपला ठसा उमटवणारे बेळगावातील यशस्वी उद्योजक म्हणजे मधवा आचार्य. त्यांनी आपल्या कष्टाच्या पंखांना बळ देऊन आकाशी मोठी झेप घेतली. कधी कधी लोकांच्या रोषालाही सामोरे जावे लागले. पण, मधवा यांनी हार मानली नाही. नेटाने उद्योग पुढे नेण्यासाठी आयुष्यातील सर्व चढ-उतार पार केले. मधवा आचार्य हे कर्नाटकातील प्रसिध्द उद्योजक, ज्यांच्या हाताखाली सध्या सहाशे-सातशे कामगार कार्यरत आहेत. इतका मोठा उद्योजक असूनही जमिनीवर आपले पाय रोवणारे मधवा आचार्य म्हणून त्यांची ख्याती आहे.
मधवा नरसिंह आचार्य हे बेळगावातील प्रसिध्द उद्योजक आहेत. कष्टातून उभारलेल्या एका इंडस्ट्रीचे रुपांतर आता ५ वेगवेगळ्या प्लँटमध्ये झाले आहे. नरंसिंह कृष्णा आचार्य हे त्यांचे वडील होते. तेही एका राईस मिलचे मालक होते. पण, वाईट काळाने झडप घातली आणि एका दिवसात वडिलांच्या उद्योगाचे होत्याचे नव्हते झाले. एका व्यक्तीकडून त्यांची फसवणूक करण्यात आली. तेथून पुन्हा नव्या आयुष्याचा प्रवास सुरू झाला...
मधवा यांचा जन्म अथणी येथे झाला. मुळचे गाव धारवाड जिल्ह्यातील आहे. सध्या ते बेळगाव येथे स्थायिक आहेत. मधवा यांचे दहावीपर्यंत शिक्षण अथणीमध्ये झाले. पुढे पदवीचे शिक्षण बेळगावात झाले. पदवीनंतर नोकरी न करता त्यांनी उद्योग करायचे ठरवले. हातात फारसे भांडवल नसतानाही मधवा यांनी एक यशस्वी उद्योजकापर्यंत जी मजल मारली आहे, ती वाखाणण्याजोगे आहे.
१९८० मध्ये त्यांच्या भावाने मदत केल्यानंतर १९८१ मध्ये एखादा उद्योग सुरू करावा असा विचार आला. घाम गाळून मोठ्या कष्टातून त्यांनी आतापर्यंत फौंड्री, मशीनिंग (सीएनसी), हिट ट्रीटमेंट असे कारखाने उभारले आहेत. त्यांचा मुलगा प्लँटचे सर्व काम पाहतो.
वडिलांची राईस मिल होती. चौघे भाऊ आणि दोन बहिणींचा सांभाळ वडिलांनी खूप कष्टातून केला. वडिलांना उद्योगधंद्यात एक व्यक्तीने फसवणूक केली. एका दिवसात हातातील उद्योग गेला. म्हणून मधवा यांचे वडील ते मंत्रालयम या गावी गेले. मंत्रालयम हे रायचूर जिल्ह्यातील आंध्र प्रदेशच्या सीमेवरील एक गाव आहे. राघवेंद्र स्वामींचा य़ेथे मठ आहे. मंत्रालयम येथे मधवा यांच्या वडिलांना अथणी या गावात जाण्यास सांगण्यात आले. त्यानुसार, मधवा यांचे वडील अथणी गावातील मठामध्ये चार- पाच महिने राहिले. त्यानंतर भाड्याने घर घेऊन पुन्हा जीवन सुरू केलं. पण, पुढे काय करायचे, असा प्रश्न समोर आवासून उभा होता. येथे मधवा यांचा जन्म झाला. अथणीत आल्यानंतर माणुसकीचे दर्शन घडले. इथे मुलांना जेवण दिलं, राहायचा व्यवस्था केली. मुलांचं चांगल व्हावं, यासाठी मदत केली आणि आशीर्वादही दिले. अथणीच्या लोकांनी शिक्षणासाठी पैसे दिले. शाळेची फी भरली, पुस्तके दिली. शिकता शिकता मधवा यांच्या भावाने एमबीबीएसचे शिक्षण घेतले.
बालपणापासून वेद शिकण्याचे मिळाले धडे
मधवा यांनी वयाच्या ९ व्या वर्षांपासून वेद शिकायला सुरुवात केली होती. त्याआधी इतर मोठ्या भावांनी वेद शिकले होते. ते वेद अध्ययन करत होते. त्यामुळे घरोघरी ते पूजेला जायचे. त्यातून मिळणाऱ्या पैशांतून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा.
वेदमध्ये स्त्रोत्र, मंत्र असत. मुंज, होम हवन, लग्नाच्या विधी भावांनी शिकले होते. मधवा यांनी वेगवेगळे स्त्रोस्त्र आत्मसात केले. आपल्या आई-वडिलांमुळे आपण शिकलो, मोठे झालो, असे सांगताना मधवा भावूक झाले.
मधवा यांनी बीएससीचे शिक्षण घेतल्यानंतर जे. एम. कुलकर्णी नावाच्या गृहस्थाच्या घरी शिकायला जात असत. तेथे ते पूजा करायचे, जेवायचे आणि नंतर कॉलेजला जायचे. सलग २८ वर्षे कुलकर्णींनी चौघा भावांना जेऊ-खाऊ दिलं. जे. एम. कुलकर्णी हे तहसीलदार ऑफिसमध्ये क्लार्क म्हणून काम करायचे. नंतर ते तहसीलदार होऊन निवृत्त झाले.
भलामाणूस डॉक्टर
एका डॉक्टरांना स्मरून तर माधव यांनी आपली आठवण अद्यापपर्यंत जपलीय. एक डॉक्टर अनंतराव देशपांडे होते, त्यांनी एक पैसाही न घेता फुकटमध्ये उपचार केले होते. त्या भल्यामाणसाचे ऋण अद्यापपर्यंत आपल्यावर असल्याचे मधवा म्हणतात.
आणखी एका डॉक्टरांबद्दलची आठवण मधवा य़ांनी सांगितली. घरामध्ये भांडी घसायला एक बाई डॉक्टरांकडे कामासाठी यायची. ती एकदा रडत आली आणि म्हणाली की, माझा मुलगा आजारी आहे. तो तुच्याकडे येऊ शकत नाही. डॉक्टर साधे होते. ते सायकलवरून तिच्या घरी गेले. त्यांनी तिच्या मुलाला अंडी देण्यास सांगितले. त्यावेळी ती म्हणाली, माझ्याकडे इतके पैसे नाहीत, की मी त्याला चांगलं जेवण देऊ शकेन. यावर डॉक्टर म्हणाले, माझ्या दवाखान्यात येऊन कम्पाऊंडरकडून रोज आठ आणे घेऊन जा. यानंतर ती रोज महिला रोज आठ आणे घेऊन जायची. १५ दिवसांनंतर जाऊन डॉक्टरांनी पाहिलं तर त्या मुलाच्या प्रकृतीत काही सुधारणा झाली नव्हती. डॉक्टरांनी तिला विचारल्यानंतर ती सुरुवातीला खोटे बोलली की, तिने मुलाला अंडे दिलं आहे. पण, नंतर कबूल केले की, तिने अंड्याचे पैसे अन्य ठिकाणी खर्ची केले आहेत. डॉक्टर संतापले. ती महिला पाया पडू लागली की, असं करू नका. माझ्या मुलाला काही करून वाचवा. ते पुन्हा तिच्या घरी गेले. त्या मुलावर उपचार केले आणि त्या मुलाचे प्राण वाचवले. इतका दयाळू डॉक्टर त्याकाळी मधवा यांनाही भेटला. इतकं मोठं मन करून डॉक्टरांनी माणूसकी दाखवली. या देवमाणूस डॉक्टराची आणि मधवा यांची मैत्री असणं भाग्यचं.
मादुकरी ते उद्योजक अथांग प्रवास
मधवा यांना विष्णू (उद्योजक), वामन (डॉक्टर), सुभद्रा आणि गौरी असे बहिण-भावंडे आहेत. सुरुवातीला माधव मादुकरी होते. (मादुकरी म्हणजे-मुंज झाल्यानंतर ब्राह्मणांच्या घरी जाऊन ओम भिक्षांदेही म्हणून भिक्षा मागायची असते)
दु:खाचे प्रसंग कधीही नाही विसरू शकत
आचार्य कुटुंबाला एका शेजाऱ्याने एका स्टीलच्या भांड्यातून एक पदार्थ घालून दिला होता. ते भांडे त्या शेजाऱ्याला परत केले गेले पण, त्या शेजाऱ्यांनी म्हटले की, तुम्ही स्टीलचे भांडे परत दिले नाही. तेव्हा वडिलांनी घरातील स्वत:चे स्टीलचे भांडे विकून त्या शेजाऱ्याला नवे भांडे आणून दिले. वडिलांचा स्वाभिमान त्यावेळी दिसून आला.
जीवनामध्ये इतकी चांगली माणसे लाभली
मधवा हे तहसीलदार ऑफिसचा किस्सा सांगतात. तहसीलदार ऑफिसमध्ये जेव्हा वडील गेले, तेव्हा ते अगदी साध्या कपड्यांमध्ये (पंजा घालून) गेले होते. तासभर बाहेर बसल्यानंतर तेथील एका पदावरील जी. एम. कुलकर्णी यांनी येऊन वडिलांना विचारले. तुम्ही कुठून आला? काय काम आहे? वडील म्हणाले, मला माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी उत्पन्नाचा दाखला हवाय. त्यानंतर तेवढी ओळख ठेवून वडिलांना घराकडे बोलावलं. ते म्हणाले, तुमच्या मुलाला माझ्याकडे ठेवा आणि गावाकडे जावा. तेव्हापासून ते जवळचे झाले. जीवनामध्ये इतकी चांगली माणसं लाभली.
करिअरचे मार्गक्रमण
जिऑलाजीमध्ये बीएससी केलेले मधवा आचार्य हे मुंबईत आपल्या मोठ्या भावाकडे गेले. वाडा येथे त्यांचे भाऊ मेडिकलची प्रॅक्टिस करायचे. तिथे भावाने काहीतरी उद्योग सुरू कर, असे सांगितले आणि त्यासाठी २५ हजार अनामत रक्कमही दिली. गावाकडे जाऊन मधवा यांनी लेथ मशीन खरेदी केलं. १९८१ ला २५ हजार रुपये म्हणजे त्या काळी मोठी रक्कम होती. मधवा यांचा एक मित्र होता. त्याचेही लेथ मशीनवर काम सुरू होते. मित्रासोबत मधवा यांनीही लेथ मशीन घेतले. पण, कालांतराने, लक्षात आले की, या उद्योगात काही नफा, प्रगती नाही, हे समजल्यावर फौंड्री सुरू करण्याचे ठरविले. भाड्याने फौंड्री घेऊन सुरुवातीला काही कामगार हाताखाली घेतले आणि काम सुरू केलं. कष्टाला फळ मिळालं. फौंड्रीत घाम गाळल्यानंतर पुढे मधवा यांनी स्वत:ची फौंड्री घेतली.
सध्यस्थितीत वेगवेगळे युनिट आहेत. अनंतराम हा त्यांचा मित्र होता. त्यांचे भाऊ कराड (सातारा) उद्योजक होते. त्यांच्याकडील कामे त्यांनी मधवा यांना दिली. पण, प्रगती काहीच नाही. त्यामुळे ते हळूहळू क्षेत्र बदलत फौंड्री क्षेत्रात आले. टेक्नॉलॉजीची ओळख करून घेऊन फौंड्रीसाठी लागणारी नवी टेक्नॉलाजी, सीएनसी मशीन घेऊन काम सुरू केलं. बेळगावला फौंड्री उद्योग सुरू केला. आता या फौंड्रीमध्ये साडे सहाशे कामगार आहेत. चाळीस वर्षांच्या काळात हा उद्योग उभारणे खरोखरचं वाखाणण्याजोगे आहे.
कृष्णा धामणेकर यांची साथ
फौंड्रीतील कामे कशी करायची हे काहीचं माहिती नसल्यामुळे सुरुवातीला अडचणी आल्या. पण, कृष्णा धामणेकर हे फौंड्रीत कामगार म्हणून काम करायचे. कृष्णा म्हणाले की, साहेब तुम्ही काही काळजी करू नका, मी सर्व काही करून देतो. पण, धाडसाने एक फौंड्री भाड्याने घेण्याचा सल्ला दिला. त्याकाळी एक फौंड्री भाड्याने घेतली. कृष्णा यांनी फौंड्रीसाठी अधिक काम केलं. त्याच्यामुळे मधवा यांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आता अलिकडेच दोन वर्षांपूर्वी कृष्णा यांनी सेवानिवृत्ती घेतलीय. पण, कृष्णाच्या अनुभवामुळे एक मार्ग मिळाला.
प्रत्येक वर्षी जसे झेपेल तशी जमीन घेतली. सुरुवातीला साडेचार एकर आणि नंतर साडेपाच एकर जागा घेऊन प्लँटसाठी जमीन घेण्यात आली. जर पुढच्या भविष्य काळात जर प्रगती झाली, तर तेथे नवा प्लँट उभा करण्याचा मानस आहे. काही उत्पादने साऊथ आफ्रिकेतील कंपनीला निर्यात होतात. तर बेंगलोरमधील बॉश, कमिन्स लोकल कंपन्या आहेत, त्यांच्याकडेही उत्पादने निर्यात होतात.
आता उद्योगात इतकी पारदशर्शकता, नियमितता, इन्फ्रास्ट्रक्चर आणि परफेक्शन आलं आहे की, गेलेला माल कधीच परत येत नाही. मालाची गुणवत्ता इतकी चांगली आहे की, कुठल्याही कंपनीने माल परत पाठवलेला नाही. त्याचबरोबर मधवा यांची विश्वासर्हता उत्तम ठरलीय. उद्योग नेटाने पुढे नेण्यासाठी प्रत्येक वर्षी आपल्या उद्योगात नाविन्यता आणली जाते.
'नवंनवं तंत्रज्ञान आत्मसात केलं जातं. मी धाडसाने निर्णय घेतो. मी स्वत: या कंपनीचं नेतृत्व करत असल्यामुळे मला घाबरून चालत नाही. कारण या कंपनीवर अवलंबून अनेक कामगार, स्टाफ आहे. मी जर घाबरलो तर कंपनी ढासळेल,' असे मधवा म्हणतात.
कोरोना काळ आव्हानांचा
अनेक कंपन्यांनी कोरोना महामारीच्या काळात अनेक कामगारांना कामावरून कमी केलं. तर कामगारांच्या पगाराची रक्कम कमी केलेली दिसते. पण मधवा यांचे नियोजन इतकं उत्तम होतं की, सर्व कामगारांचे पूर्ण पगार काढण्यात आले. कोरोना काळातही कंपनी तग धरून राहण्यासाठी आधीपासूनचं केलेलं नेटनेटकं नियोजन महामारीच्या काळात उपयोगी ठरलं.
अशा काही समस्या आल्या तर कामगारांचे हाल होऊ नयेत म्हणून मधवा हे महिन्या-महिन्याला पैशांचं नियोजन करत राहतात. समजा जर उद्या कंपनीचे बिल आले नाही, कामगारांनी काम बंद केलं तर पडत्या काळात पैसे येणार कुठून यासाठी गोंधळ होऊ नये म्हणून उत्तमपणे नियोजन केले जाते.
अशा काही समस्या आल्या तर कामगारांचे हाल होऊ नयेत म्हणून मधवा हे महिन्या-महिन्याला पैशांचं नियोजन करत राहतात. समजा जर उद्या कंपनीचे बिल आले नाही, कामगारांनी काम बंद केलं तर पडत्या काळात पैसे येणार कुठून यासाठी गोंधळ होऊ नये म्हणून उत्तमपणे नियोजन केले जाते.
कामगारांना सुविधा
कामगारांना कोड, ईएसआय, ग्रॅच्युईटी, बोनस, पीएफ, सेफ्टी ईअर बड्स, मास्क, हेल्मेट, दोन वेळेचा चहा हे मधवा यांच्या कंपनीकडून दिले जाते. 'कामगारांनाही ही माझी कंपनी आहे, अशी भावना व्हावी, यासाठी नातं अतूट ठेवलं जातं. यामध्ये विश्वास जपणंही तितकेच महत्त्वाचे आहे,' असे मधवा म्हणतात.
एका आयएएस अधिकाऱ्याची भेट आणि...
मधवा यांची एक अविस्मरणीय आठवण आहे. एक गोकूळ नावाचे आयएएस अधिकारी होते. त्यावेळी मधवा यांचा छोटा कारखाना होता. अधिकारी गोकूळ यांनी कारखान्याला भेट दिली होती. कर्नाटकाच्या एका वृत्तपत्रातून मधवा यांच्याविषयी अनेक लेख आले होते. मादुकरीपासून ते मारुती कार अशा मथळ्याखाली मधवा यांच्याविषयी भरभरून लिहिण्यात आले होते. गोकूळ यांनी हे लेख वाचून कारखान्याला भेट दिली. एक तरुण माणसाची ही झेप विलक्षण आहे, असे सांगत आयएएस गोकूळ हे मधवा यांना भेटले.
गोकूळ यांनी या कार्याची दखल सरकारपर्यंत पोहोचवली. परिणामी, कष्टाचं फळ कामी आलं. कर्नाटकातील मधवा हे आपल्या वडिलांना घेऊन पुरस्कार स्वीकारण्यासाठी विज्ञान भवनमध्ये गेले. त्यावेळी राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा होते. धोतर घातलेले आणि डोक्याला रुमाल असा पेहराव असणारे माधव यांचे वडील सोबत गेले होते. तिथे गेल्यानंतर आणखी एक तामिळनाडूचा आयएएस अधिकारी उपस्थित होते. त्यांना मधवा यांच्या वडिलांना पाहून काय वाटले कुणास ठाऊक ते जवळ आले आणि थेट साष्टांग नमस्कार घातले. मधवा यांच्या वडिलांना ते ओळखतदेखील नव्हते. इतका मोठा अधिकारी आपल्या वडिलांपुढे नमन झाला ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. तो जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण संस्मरणीय ठरला होता, असे मधवा आपल्या आठवणींना उजाळा देतात.
माधव यांचे लग्न १९८८ साली झाले. त्यांच्या पत्नी गृहिणी आहेत. माधव यांना एक कन्या आणि एक मुलगा. आता फॅक्टीरीची जबाबदारी मुलावर आहे. मुलगी कोल्हापूरला स्थायिक असते.
नव्या उद्योजकांना लाखमोलाचा सल्ला
एखादा उद्योग उभा करायचं म्हटलं की, आर्थिक भांडवल प्राधान्याने येते. त्यामुळे नव्या उद्योजकांना आर्थिक नियोजन, गुंतवणूक आणि सहनशीलता ठेवण्याची फार गरज असल्याचे मधवा म्हणतात.