Wednesday, September 8, 2021

गुन्हेगारी विश्वातील नाट्यमय घडामोडींची साक्षीदार 'डॅडी'ची दगडी चाळ



मुंबई जगातील सर्वात मोठं शहर. येथील ब्रिटिशकालीन वास्तू पर्यटकांना आजही भूरळ घालतात. पण, आपण लोकवस्तीचा आढावा घेतल्यानंतर दाटीवाटीने राहणाऱ्या घरांची एक चाळ संस्कृती निर्माण झालेली दिसते. चाळ म्हणजे मध्यमवर्गीयांच राहण्याचं एक हक्काचं ठिकाण झालं. येथेच पु. लं. ची बटाट्याची चाळ असो वा अनेक महाराष्ट्रातील संस्कृतीचा कार्यक्रम असो, या चाळींना महत्त्व आलं. मुंबईतील अनेक चाळींपैकी महत्त्वाची एक दगडी चाळ होय.

'मुंबईमधील दगडी चाळ पाडणार' अशी बातमी जेव्हा प्रसिध्द झाली, तेव्हा या लक्षणीय चाळीचं एक वेगळचं आकर्षण झालं होतं. आता दगडी चाळ पाडणार म्हटल्यावर ही चाळ पुन्हा प्रकाशझोतात आली आहे. ही चाळ पाडून तेथे म्हाडा  ४० मजली दोन टॉवर उभारण्यात येणार आहेत. गँगस्टर अरुण गवळीचं मुंबईतील निवास्थान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दगडी चाळीचा पुनर्विकास केला जाणार आहे. यामधील आठ इमारती अरुण गवळीच्या मालकीच्या आहेत. गुन्हेगारी विश्वातील अनेक नाट्यमय घडामोडींची साक्षीदार असलेली दगडी चाळ नेमकी काय आहे? याचा घेतलेला हा मागोवा.

मुंबईत झाकोळल्या गेलेल्या अनेक चाळी आहेत. पण, अशा काही चाळी आहेत, ज्या मराठी आणि हिंदी चित्रपटाच्या निमित्ताने प्रकाशझोतात आल्या. त्यापैकी एक आहे दगडी चाळ. आताच्या पिढीला दगडी चाळ ही चित्रपटांमधून समजली. 'डॅडी' अर्थातचं अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी आणि दगडी चाळ हे बनलेलं समीकरण चित्रपटांमधून दाखवलं गेलं. अरुण गवळीमुळे दगडी चाळ प्रसिध्द झाली...
मुंबईत जिथे जिथे मिल (गिरणी) उभी राहायची, त्याच्या आजूबाजूलाचं कामगारांची चाळ उभी राहायची. तेथून कामगार एकत्र कामाला जायचे. अरुण गवळी त्यापैकी एक होता. तो खटाव मिलमध्ये कामाला होता आणि तो ज्या चाळीत राहायचा, ती 'खटाव मिलवाल्यांची चाळ' म्हणून ओळखली जायची. ती पुढे 'दगडी चाळ' म्हणून प्रसिध्द झाली.  

दगडी चाळ नेमकी काय आहे?

मुंबईतील कामगारांच्या चाळींसमोर एक मोठे प्रवेशद्वार असायचे. या प्रवेशद्वारामुळे चाळीतील लोक सुरक्षित राहायचे. प्रत्येक चाळीच्या गेटवर प्रत्येक मिलचं नाव लिहिलेलं असायचं. दगडी चाळचं गेट हे दगडांबासून बनवलेलं आणि प्रश्स्त होतं, त्यावरून चाळ हे नामकरण झालं. या चाळीसमोर एक सिमेंटची चाळ होती. दुसऱ्या बाजूला 'लाल विटांची चाळ' ओळखली जायची. लाल विटांच्या चाळीत रमा नाईक राहायचा. (रमा नाईक स्मगलिंगच्या धंद्यात होता.) खटाव मिल उभी राहिल्यानंतर तेथील कामगार भायखळाच्या आजूबाजूला ज्या चाळी होत्या, तेथे राहायचे.

साधारणपणे १९८० -८१ नंतर मुंबईचं आणि गुन्हेगारी विश्वाचं चित्र बदलत गेलं. त्याआधी करीमलाला असेल, हाजीमस्तान असेल, युसूफ पटेल असेल आपापसांत त्यांच्यामध्ये स्मगलिंगवरून वगैरे वाद व्हायचे. त्यावेळी दगडी चाळ एवढी प्रसिध्द नव्हती.

पिढ्यानपिढ्या कामगार चाळीत राहायचे. सात रस्ता या भागात गिरणी कामगार राहायचे. तेथे युनायटेड मिल आणि अन्य मिल्स होत्या. येथील कामगारांची आसपासच्या चाळीत वस्ती असायची. मिलमधील आंदोलने, यावेळी सर्व मिलमधील कामगार एकत्र यायचे.  

खटाव मिल जेव्हा बंद झाली, तेव्हा खटाव मिलच्या मालकाने काही गुन्हेगार माणसं आणली. तेव्हा मालकाकडून आमच्यावर अन्याय होतो, या भावनेने कामगारांचा संताप उफाळायचा. यातून उभा राहिला तो अरुण गवळी. आपल्यावर अन्याय होतो, मग गिरणी मालकाला मारलं पाहिजे, यातून गुन्हेगारी टोळीयुध्द सुरू झालं. यामध्ये अरुण गवळी, रामा नाईक खेचले गेले. रामा नाईक आधीपासूनचं गुन्हेगारी विश्वात होता. अरुण गवळीने स्वत:ची एक गँग उभी केली. (रमा नाईक हा स्मगलिंग आणि बाबू रेशीम हा दारूचा अड्डा चालवायचा.)

मुंबईत ज्यावेळी गिरण्या मोठ्या प्रमाणात सुरू होत्या. त्यावेळी पगारवाढीसाठी असेल, एखाद्यावर अन्याय झाला असेल, तेव्हा गिरण्यांचे संप व्हायचे. संप फोडण्यासाठी गिरणी मालक ज्या लोकांना आणायचा, ते लोक मारामाऱ्या करायला चाळीत घुसायचे. सोडा वॉटरच्या बॉटल्स, दगडे घेऊन चाळीवर हल्ला चढवायचे. पण, चाळीचा मुख्य दरवाजा बंद केल्यानंतर आतील कामगार, माणसं सुरक्षित राहायची.

अनेक चाळींपैकी महत्त्वाच्या दगडी चाळीचा मुख्य दरवाजा इतर चाळींपेक्षा प्रशस्त होता. त्यामुळे त्यावेळी अरुण गवळीने कुठलेही गुन्हे केल्यानंतर किंवा त्याच्या साथीदारांना लपण्यासाठी ही दगडी चाळ सुरक्षित ठरली. अनेक गुप्त दरवाजे, खोल्या काढल्या गेल्या. अनेक खोल्या नव्याने बांधल्या गेल्या. या ठिकाणी लपून बसण्यासाठीची ही सुरक्षित जागा ठरली.

अरुण गवळी - कामगार, आमदार आणि अंडरवर्ल्ड डॉन चाळीतचं!

गिरणी कामगार ते अंडरवर्ल्ड डॉन आणि आमदारापर्यंतचा अरुण गवळीचा प्रवास या चाळीतचं झाला. या चाळीतूनचं डॉनची सूत्रे हालत होती. अनेक मारामाऱ्या, खून, खंडणीची प्रकरणे या चाळीतून घडली. अनेक नाट्यमय चकमकी चाळीत घडल्या. त्यामुळे दगडी चाळीची दहशत पसरली. (मुंबईमध्ये अनेक नामवंत इमारती आहेत, पण दगडी चाळ विशेष प्रसिध्द झाली.)

याचं चाळीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण चकमकी झाल्या. त्यामुळे संपूर्ण अंडरवर्ल्ड हादरलं. तेथून जे अंडरवर्ल्डचं बस्तान होतं, ते हळूहळू कमी झालं. पण, तरीही दगडी चाळ ही 'दगडी चाळचं' राहिली. रोजचं गँगवॉर, पोलिसांशी होणारी चकमक हे आजही आठवून लोकांना आजही अंगावर शहारे येतात. य़ेथे राहणाऱे लोक या घडामोडींचे साक्षीदार आहेत.  

जेव्हा एन्काऊंटर स्पेशालिस्ट विजय साळस्कर अरुण गवळीला अटक करायला दगडी चाळीत घुसला, तेव्हा तेथे घडलेल्या प्रसंगामुळे दगडी चाळ अधिक प्रकाशझोतात आली. अरूण गवळी म्हटलं की 'दगडी चाळ आणि दगडी चाळ म्हटलं की अरुण गवळी' हे समीकरण ठरलं. विजय साळस्करांची एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख होती. गँगस्टर अमर नाईकला मारल्यानंतर गुन्हेगारांमध्ये साळस्करांची प्रचंड दहशत निर्माण झाली होती.

विजय साळस्कर यांनी गवळीला अटक केल्यानंतर काही गँगस्टर दगडी चाळीत लपून बसण्यासाठी जाऊ लागले. तेव्हा दगडी चाळ कुप्रसिध्द झाली. त्याआधी 'खटाव मिल वाल्यांची चाळ' म्हणून 'दगडी चाळ' ओळखली जायची. खटाव नावाच्या मिलच्या मालकाची ही गिरणी होती. गिरण्यांचा संप झाल्यानंतर खटाव मिल मालकाचा खून झाला. खून करणारी जी मुले होती, त्या मुलांचा गुन्हेगारी विश्वाशी संबंध नव्हता. पण, ही मुले दगडी चाळीतील होती. 

मिल बंद झाल्यानंतर मुले बेरोजगार होती, अनेकांच्या घरात खाण्याचे वांदे होते. त्यामुळे येथील जनजीवनचं विस्कळीत झालं होतं. १९८२ चा गिरणी संप झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळे वळण लागले. त्याच्या अनेक केंद्रबिंदूपैकी एक केंद्रबिंदू होती 'दगडी चाळ'. त्यामुळे गुन्हेगारी जगताला मोठं वलय प्राप्त झालं, असं दुर्दैवाने म्हणावं लागेल.

अरुण गवळीला सर्वात सुरक्षित ठिकाण ही चाळ होती. तो आमदार झाला तो या दगडी चाळीतचं! त्याच्या विरोधात त्यावेळी निवडणुकीला उभी राहिलेल्यांना प्रचंड दहशत निर्माण झाली होती.

या चाळीतील नवरात्रौत्सवही मुंबईकरांना परिचित आहे. चाळीतील मंदिरामागे अरुण गवळीचं मोठं ऑफिसही होतं. नवरात्राची पूजा तो मोठ्या दणक्यात करायचा.  

दगडी चाळीचं चित्रपटसृष्टीलाही आकर्षण

पूर्वी चित्रपटसृष्टीमध्ये गुन्हेगारी विश्वाचे चित्रण दाखवायला बहुतांशी मुंबईतील स्टुडिओमध्ये सेट उभारले जायचे. पण, ९० च्या दशकांनंतर काही दिग्दर्शकांनी सेट प्रत्यक्ष लावण्याऐवजी 'दगडी चाळी'मध्ये प्रत्यक्ष जाऊन शूटिंग करायला सुरुवात केली. (ते ही गुन्हेगारी विश्वाचा बोलबाला असतानाही रिस्क घेऊन दिग्दर्शक तिथे चित्रीकरणासाठी जायचे.) वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी ही दगडी चाळ आणि कॅमेरामॅननी एक वेगळ्या पध्दतीने दाखवल्यामुळे प्रेक्षकांना ही 'दगडी चाळ' काय आहे, हे कळालं. 

अनेक अंडरवर्ल्डचे शूट, गुन्हेगारी विश्वावरील सिनेमांचे शूटिंग हे दगडी चाळीत केलं गेलं. त्यामुळे दगडी चाळीला विशेष महत्त्व आलं. अरुण गवळीवर अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट आले. या चित्रपटांमध्ये अनेक मकरंद देशपांडे, विवेक ओबेरॉय अशा कलाकारांनी गवळीची भूमिका साकारली. 'एक थी बेगम', 'डॅडी', 'शूट आऊट ॲट लोखंडवाला', 'दगडी चाळ' अशा सिनेमा, सीरीजमधून त्याच्या गुन्हेगारी विश्वातील चित्रण सर्वांसमोर आणलं गेलं.

अरुण गवळीच्या मुलीचं अभिनेत्याशी लग्न

गँगस्टर अरूण गवळी यांची मुलगी योगिता गवळी आणि अभिनेता अक्षय वाघमारे यांनी लग्न केले. योगिता ही सिनेनिर्माती असून तिने दगडी चाळ या सिनेमाची निर्मिती केली आहे. तसेच ती एक स्वयंसेवी संस्थाही चालवते. शिवाय ती नगरसेविकाही होती. तर अक्षय वाघमारे ('यूथ' फेम) हा आघाडीचा अभिनेता मूळचा पुण्याचा आहे.

मुंबईत मोठमोठ्या वास्तू या जतन केल्या जातात. आलेल्या पिढीला आणि तेथून लहानाच्या मोठ्या झालेल्या पिढीला, ज्यांनी दगडी चाळ पाहिली आहे, त्यांच्यासाठी ही एक केवळ आठवण म्हणून राहील. दगडी चाळीच्या जागी गगनचुंबी इमारत उभी राहिलही; पण त्याची आठवण आता ही केवळ सिनेमाच्या इतिहासामध्ये मर्यादित राहील.  

(माहिती - sources)

Tuesday, September 7, 2021

#BodyPositivity वनिता खरात म्हणते- नको झिरो फिगर, अस्सल फिगर...झक्कास!


वनिता खरात ही मराठमोळी अभिनेत्री. एका फोटोमुळे प्रसिध्दीच्या झोतात आली. शाहिद कपूर स्टारर हिंदी चित्रपट कबीर सिंहमध्ये वनिताने घरकाम करणाऱ्या मोलकरीणची भूमिका साकारली होती. 'कबीर सिंग' या चित्रपटात शाहिद कपूर मोलकरणीच्या मागे पळत असल्याचं दृश्य आहे. तो जिच्या मागे धावताना दिसला होता, ती अभिनेत्री वनिता खरात. त्यावेळी तिची इतकी चर्चा झाली नाही. मात्र, तिने इंडस्ट्रीचं लक्ष वेधून घेतलं. आता ती सर्वांच्या नजरेत आली आहे. कारण आहे-वनिताचे न्यूड फोटोशूट. तिचा हा फोटो पाहिल्यानंतर ट्रोलर्सनी तिच्यावर निशाणा साधण्यास सुरू केले आहे. आता प्रश्न उरतो तो की, जाडजूड व्यक्तींनी फोटोशूट करू नये का? स्लिम ट्रीम अभिनेत्रींनी फोटोशूट, शॉर्ट ड्रेस फोटोशूट, बिकिनी फोटोशूट केलेलं चालतं. मग, जाड व्यक्तींच फोटोशूट स्वीकारलं का जात नाही? 

वनिताने न्यूड फोटोशूट केले आहे. तिचा न्यूड फोटो व्हायरल झाल्यानंतर तिच्या फोटोशूटची एकच चर्चा सुरू झाली. वनिताने स्वत: हा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. आतापर्यंत १४ हजार ४८२ लोकांनी पाहिला आहे. तर १ हजार १०० जणांनी कमेंट्स दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी तिचं भरभरून कौतुक केलंय. तर काहींनी तिला ट्रोल केलं आहे. तिने रावण फ्युचर प्रॉडक्शन्ससाठी हे फोटोशूट केलं आहे. दिग्दर्शक अभिजित पानसे, ॲडगुरू-अभिनेता भरत दाभोळकर आणि फोटोग्राफर तेजस नेरूरकर यांची ही संकल्पना आहे. 

वनिता सोनी मराठीवरील कॉमेडी शो महाराष्ट्राची हास्यजत्रामधून लोकप्रिय झाली होती. ती या शोची विजेतीही ठरली होती.

काय आहे वनिताच्या फोटोमध्ये? 

वनिताने एका हातात निळ्या पतंगाचा आडोसा घेत न्यूड फोटोसाठी पोझ दिली आहे. तिने हा फोटोशूट एका कॅलेंडरसाठी केले असून फोटोग्राफर तेजस नेरुरकर यांनी हा फोटो काढला आहे. शिवाय #BodyPositivity असा हॅशटॅग वापरत हा फोटो शेअर करण्यात आला आहे. 

वनिताने आपल्या फोटोबरोबर एक पोस्टही लिहिली आहे की, 'मला माझ्या प्रतिभेचा अभिमान आहे. माझी आवड, माझा आत्मविश्वास आणि मला माझ्या शरीराचा अभिमान आहे. कारण, मी मी आहे.' (I am proud of my talent, my passion, my confidence, I am proud of my body... because I am ME...!!!”) त्याचबरोबर, बॉडी पॉझिटिव्हीटी चळवळीत सहभागी व्हा. अशीही कॅप्शन या फोटोला देण्यात आली आहे. (Let's get together to join this Body Positivity Movement) तिचा न्यूड फोटो आणि दिसून येणारा स्थूलपणा अनेकांच्या पचनी पडलेला नाही. ट्रोल करणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. पण, तिचे कौतुक मात्र सोशल मीडियावर होताना दिसतेय. 

झगमगत्या विश्वात काय घडत नाही? जे काही घडेल, ते नवेच असते आणि ते आपण अगदी सहज स्वीकारतोही. सेलिब्रिटी कसले कसले फोटोशूट करतात! स्वीमिंग पूल फोटोशूट, ब्रायडल फोटोशूट, हनीमून फोटोशूट, प्री-वेडिंग फोटोशूट, बेबी शॉवर फोटोशूट आणि बरचं काही...! तर मग, वनिताने फोटोशूट केलं म्हणून कुठं बिघडलं? ती एक कॉमेडी स्टारदेखील आहे. उत्तम अभिनयाचे कौशल्यदेखील तिच्याकडे आहे. एक मराठमोळी अभिनेत्री विनोदाच्या मंचावरून अख्ख्या महाराष्ट्रात ओळखली गेली. आता तर ती एका फोटोमुळे मिनिटात स्टार झाली आहे. 

बोल्ड काया असणं गुन्हा आहे का? 

तिची बोल्ड काया असणे हा काय तिचा गुन्हा नव्हे. बोल्ड काया असणाऱ्या अनेक मराठी आणि हिंदी अभिनेत्रींना आपण स्वीकारलंय. यामध्ये अभिनेत्री अलका कुबल, निर्मिती सावंत, किशोरी अंबिये, आरती साळुंखे रात्रीस खेळ चाले फेम शेवंता अर्थातच अपूर्वा नेमळेकर, पछाडलेला फेम पूर्णिमा अहिरे, देवमाणूस फेम मंजुळा अर्थातच प्रतीक्षा जाधव आणि आता अण्विता फलटणकर (आगामी मालिका येऊ कशी तशी मी नांदायला) या सेलेब्सचा समावेश आहे. तर हिंदी चित्रपटांमध्ये आयेशा टाकिया, सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन, शिल्पा शिरोडकर, साथ निभाना साथिया फेम कोकिलाबेन अर्थातच रूपल पटेल अशा काही सुंदर अभिनेत्री अतिशय उत्तमपणे अभिनय साकारतात. मग, तिथे त्यांचं वजन पाहिलं जात नाही. कारण, प्रेक्षकांनीचं त्यांना स्वीकारलेलं असतं. मग, वनिताने वेगळं काय केलं? किती जाड आहे, किती ढोबळी आहे, असे कमेंट या दिग्गज अभिनेत्रींना सहसा मिळालेले दिसले नाहीत. दिसलं ते त्यांच्या अभिनयातलं कौशल्य.  



सौंदर्याची व्याख्या कशी करणार? 

पूर्वी, अभिनेत्री म्हणजे सुडौल बांधा किंवा झिरो फिगर उंचपुऱ्या तरूणी, दिसायला देखण्या असं समीकरणचं होतं. कालांतराने हे चित्र बदललं. अंगाने जाडजूड असणाऱ्या, फारशा सुंदर नसणाऱ्या पण, नाका-डोळ्याने देखण्या असणाऱ्या अभिनेत्री अनेक मालिका, चित्रपटांमध्ये आल्या. त्यांच्यावर टीका करण्यासारखं काहीचं नव्हतं. मग, वनिताच्या सौंदर्याची व्याख्या कशी करणार? तिने स्वत:च्या शरिरावर प्रेम केलं, आपल्या मनाचं ऐकलं. बॉडी पॉझिटिव्हीटी काय असते, हे दाखवून देण्यासाठी तिने केलेला प्रयास, धाडस नक्कीचं वाखाणण्याजोगी आहे. बिनधास्त, बोल्ड वनिता खरेची प्रतिमा एक कॉमेडियन स्टार असण्याबरोबरचं बोल्डदेखील झाली आहे.        

काय म्हणावं 'या' ट्रोलर्सना? 

टीका करणं हे ट्रोलर्सचं कामचं आहे. काही नेटकऱ्यांनी वनिताला खरंखोटं का ऐकवावं? ट्रोलर्सनी आपली मानसिकता बदलायला हवी.  

बिनधास्त वनिताला सईचा पाठिंबा 

बिनधास्त, बोल्ड आणि झिरो फिगर, सौंदर्याची व्याख्या मोडून काढणाऱ्या वनिताला अभिनेत्री सई ताम्हणकर, उर्मिला कोठारेने समर्थन दर्शवले आहे. उर्मिलाने 'सौंदर्याला वजनाची मर्यादा नाही' (There is No weight limit on Beauty) असे म्हटलं आहे. तर सईनेदेखील वनिताचा तो फोटो शेअर करत 'हे वर्ष पूर्णपणे आपलं आहे, खरोखर आणि निर्भयपणे! हा विचार कीर्तीवंत आहे.' (This year is about owning you, entirely, truly and fearlessly! Kudos for this amazing thought) अशी कमेंट दिली आहे. 


R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...