Thursday, September 29, 2022

Travel Destination : कपलसाठी फिरायला बेस्ट आहेत 'ही' ५ ठिकाणे



दिवाळी आली की सुट्ट्यांचा हंगाम सुरू होतो. दसरा दिवाळी संपली की, लोक ट्रीपचे प्लॅनिंग करतात. (Travel Destination) यामध्ये कपल्सदेखील मागे नाहीत. कपल्सना वेध लागतात ते टूरचे. फार गोंधळ, गोंगाट नसलेली जागा कपल शोधतात, असे मिश्किलपणे म्हणायला हरकत नाही. त्यांना एकांत हवा असतो. आपण महाराष्ट्रातील काही ठिकाणे पाहिल्यास जिथे पर्यटक अगदी तुरळक असतात. तर काही ठिकाणे गर्दीची असतात. पण, कपल्ससाठी काही बेस्ट ठिकाणे आपल्याकडे आहेत. ही ठिकाणे तुम्ही एकदा फिरून याच! (Travel Destination)


आंबोळगड -

तुम्हाला निवांतपणा, शांतता हवी असेल तर आंबोळगडच्या बीचवर जा. येथे तुम्हाला फारशी वर्दळ दिसणार नाही. पण, समुद्रालगत बरीच वस्ती आहे. काही हॉटेल्स आणि रूम्सदेखील उपलब्ध आहेत. येथे राहण्याची आणि खाण्याची सोयदेखील उत्तम आहे. मासे, सोलकडी, अंडाकरी, चिकनकरी असे घरगुती पध्दतीच्या जेवणाची चवदेखील येथे चाखता येते.


दोन दिवसांत तुम्हाला आंबोळगडाचा प्रवास करून परत येता येते. आंबोळगड - कोल्हापूर-शाहूवाडी मार्गे रत्नागिरी- आडीवरे-नाटे-आंबोळगड तसेच कोल्हापूर -राजापूर-नाटे-शेडभू-आंबोळगड असे जाता येईल. आंबोळगडचा समुद्रकिनारा, यशवंतगड, गगनगिरी महाराजांचे आश्रम, आंबोळगडचा किल्ला, मुसाकाजी बंदर अशी विविध ठिकाणे तुम्हाला पाहता येईल, येथील शिमगोत्सव ही पारंपरिक आणि मोठ्या उत्साहात असतो. विविध समुद्रकिनारी तुम्ही अनुभवलेल्या नेहमीच्या ट्रीपपेक्षा आंबोळगडचा अनुभव तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरेल.


वेंगुर्ला-चिवला -

तुम्ही रत्नागिरी, साखरपा, गणपतीपुळे, आरेवारे, दापोलीला पर्यटनाला गेला असाल. तसेच तारकर्ली, सिंधुदुर्ग, देवबाग वगैरे ट्रीप देखील केली असेल. पण, वेंगुर्ला-चिवला बीचवर गेलाय का? इतर समुद्र किनाऱ्यांप्रमाणे हे बीच तसे फारसे वर्दळीचे नाही. नीरव शांतता येथे अनुभवायला मिळेल. तसेच अनेक रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि कॉटेजेस राहण्यासाठी उत्तम आहेत.

येथे ताजे सुरमई, बोंबील, कोळींबीदेखील ताव मारता येतो. मच्छीमार्केटमध्ये नानाविध प्रकारचे माशांचा होणार लिलाव डोळ्यांनी पाहता येतो. स्वच्छ समुद्र किनारे आणि रम्य संध्याकाळी सोनेरी वाळूत बसून तुम्हाला चहा पिण्याचा आनंद घेता येतो. जवळचं वेंगुर्ला बंदर, लाईट हाऊस, मानसीश्वर मंदिर, पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. येथून जवळच शिरोड्याला जाण्यासाठी मार्ग आहे. येतून मोचेबीड आणि सागरेश्वर बीचलादेखील जाता येते.

लोणार -

लोणार हे नाव औरंगाबाद जिल्ह्यातील एका तलावावरून पडले आहे. पृथ्वीवर उल्का पडल्यावर हा तलाव तयार झाला. हा तलाव पर्यटकांना खूप आवडतो. जाताना औरंगाबादचं पर्यटनदेखील तुम्हाला करता येईल. त्याशिवाय दैत्यसुदन मंदिर, कमलजा देवी मंदिर , गोमुख मंदिर येथेही जाता येतं.

इगतपुरी –

हे ठिकाण समुद्रसपाटीपासून उंच आहे. त्यामुळे येथे वर्षभर चांगले वातावरण असून आल्हाददायक हवामान असते. पावसाळ्यात जाणे म्हणजे स्वर्गाहून सुख. इगतपुरीत हिरवळ, जंगल आणि जलसंपदा आहे. निसर्गाची देणगी म्हणजे काय असते, हे याठिकाणी पाहायला मिळते. भातसा नदीचे पात्र डोळ्यांना सुखावणारं आहे. आर्थर तलावदेखील तुम्हाला पाहता येईल. अमृतेश्वर मंदिर, धम्मगिरी विपश्यना केंद्र, कळसुबाई शिखर, गिरीसागर फॉल्स, कॅमल व्हॅली, त्रिनगलवाडी फोर्ट, भावली धरण, थाल घाट, म्यानमार गेट, भावली डॅम, अशोका फॉल्स, घाटनदेवी माता मंदिर ही ठिकाणे इगतपुरीचे आकर्षण आहे.

पाचगणी –

महाराष्ट्राचे हिल स्टेशन म्हणून पाचगणीला म्हटले जाते. थंड ठिकाण आणि प्रमुख पर्यटन स्थळांच्या यादीत पाचगणीचा समावेश होतो. सह्याद्रीच्या रांगांमधील पाच टेकड्यांमुळे या स्थळाला पाचगणी असे नाव दिले जाते. येथे कमलगडचा किल्ला आणि धाम धरण तलाव पाहण खूप मनमोहक आहे. नयनरम्य दृश्य पाहून तुम्हीही सुखावून जाल.









Travel Tour : कोकण फिरताय? 'या' सुंदर बीचवर कधी गेलाय का?




कोकण म्हणजे माडाची झाडं, पोफळीच्या बागा, सुपारी बागा आणि सुंदरबन त्याचबरोबर अथांग समुद्र आणि झुळझुळ वाहणारं समुद्री वारं, त्यात माशाचं कालवण म्हणजे क्या बात है! काय, आला ना डोळ्यांसमोर समुद्र. कोकणात तुम्ही अनेकदा गेला असाल किंवा एखादा बीच कदाचित बघायचा राहूनही गेला असेल. तारकर्ली, सिंधुदुर्ग, कुणकेश्वर, देवबाग, निवती, भोगवे (Travel Tour) याचबरोबर, गणपतीपुळे, आरेवारे यासारख्या ठिकाणी तुम्ही गेला असाल. ही ठिकाणे तशी वर्दळीची आहेत. पण, तुम्हाला माहितीये का? महाराष्ट्रात एक सुंदर बीच आहे... ज्याला 'महाराष्ट्राचं बटरफ्लाय बीच' म्हटलं जातं. तो समुद्र आहे तरी कुठे, तेथे कसं जाता येईल, यासाठी ही खास माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. ही माहिती शेवटपर्यंत वाचा. (Travel Tour) Travel Destination 

सुट्टीच्या दिवशी एखाद्या ट्रीपचा प्लॅन करायचा म्हटलं तर १० ठिकाणांची नावे डोळ‍्यासमोर येतात. मग घरातील मंडळींचं प्रत्येकाचं मत वेगळं. कुणाला कोकणात जायचं असत, तर कुणाला थंड हवेच्या ठिकाणी. मग सर्वांना एकत्र घेऊन जाण्यासाठी एक स्वच्छ आणि सुंदर, नितळ पाणी असलेल्या बीचवर तुम्हाला नक्कीच जायला आवडेल. रागवू नका हं...पण, कपलसाठी तर एकदम परफेक्ट असणारं हे बीच आहे.  या बीचचे नाव 'कशेळी बीच' किंवा 'देवघळी बीच' (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) असं आहे. कशे‍ळी हे रत्नागिरीच्या पश्चिमेकडे असणारे शेवटचं गाव आहे. या गावातूनच देवघळीचा रस्ता जातो. 

काय काय पहाल?  

तीन दिवसाच्या ट्रीपमध्ये तुम्ही देवघळी-जाकादेवी मंदिर-पूर्णगड-कनकादित्य मंदिर-धुतपापेश्वर-पावस अशा ठिकाणांना भेट देता येईल. देवघळी बीच- कशेळी गावातून तुम्ही पोहोचल्यानंतर देवघळी बीचपर्यंत जाण्यासाठी रस्ता आहे. टू-व्हिलर, फोर व्हिलर गाड्यादेखील बीचपर्यंत जाऊ शकतात. खरंतरं बीचच्या वरच्या बाजूस विस्तीर्ण पठार आहे. येथे तुम्ही गाड्या पार्किंग करू शकता. येथे भूरळ पाडणारा नीरव शांतता असणारा समुद्र किनारा आहे. येथे पोहोचल्यानंतर येथील अथांग समुद्र डोळ्य़ांचे पारणे फेडणारा आहे. समुद्राच्या वरच्या बाजूस टेबल पॉईंट आहे. टेबल पॉईंटवरूनदेखील निळ्याशार समुद्राचे विहंगम दृश्य बघता येते. या टेबल पॉईंटवरून खाली उतरून गेल्यानंतर छोटेखानी बीचवर जाता येते. पांढऱ्या रंगाच्या वाळूत जांभा खडकाने बनलेले अनेक दगड वाळूत रुतलेले दिसतात. त्याचबरोबर या दगडांवर लाटा येऊन धडकताना काही शिंपले चिकटलेले दिसतात.

याची सुंदर नक्षी बीचच्या सौंदर्यात भर टाकते. येथे एक घळी आहे. याच घळीतून कनकादित्य मंदिरातील देवाची मूर्ती सापडल्याचे स्थानिक सांगतात. कनकादित्य मंदिर - देवघळी बीचपासून काही अंतरावर कनकादित्य मंदिर आहे.  गावात दोन मंदिरे आहेत. एक कनकादित्य मंदिर आणि दुसरे जाकादेवी मंदिर. कानकादित्य मंदिरातील मूर्ती ही देवघळीच्या गुहेत सापडली होती, असे सांगण्यात येते. ज्या घळीत कनकादित्याची मूर्ती आढळली, ती घळ देवघळी नावाने ओळखली जाते. कनकादित्याचे मंदिर खूप सुंदर अशून ते पाहण्यासारखे आहे. मंदिराच्या बांधकाम कोकणी शैलीचे आहे. लाकूड आणि जांभा दगडाचा वापर करून कोरीव रेखीव मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. गाभागृहाच्या दोन्हीकडे द्वारपाल आहेत. गर्भगृहात कनकादित्याची मूर्ती असून मूर्तीच्या डोक्यावरील मुकूट हे दाक्षिणात्य पध्दतीचे आढळते.

जाकादेवी मंदिर - 

कनकादित्य मंदिरापासून काही अंतरावर जाकादेवी मंदिर आहे. पूर्ण मंदिराचे बांधकाम जुने आणि पारंपरिक पध्दतीचे आहे. अशी फार कमी मंदिरे आहेत, जी अद्यापही मूळ स्थितीत टिकून आहेत. 

देवघळीत राहताना-  

देवघळीत राहण्याची सोय नाही. पण तिथे टेंट भाड्याने मिळतात. तसेच ज्यांच्याकडून टेंट भाड्याने घेणार आहेत, तोच व्यक्ती तुम्हाला नाश्ता, चहा, जेवण बनवून देईल. तिथे मासे अथवा मटण, चिकन हवे असल्यास, सोबत जाताना घेऊन जायला लागेल. सोबत तुम्हाला पिण्यासाठी पाणीदेखील घेऊन जावे लागेल. देवघळी किंवा कशेळीत कुठलेही मच्छी मार्केट नाही. त्यामुळे राजापुरातून जाताना सोबत घेऊन जावे लागेल. देवघळीत राहायचं असेल तर रात्रीच्या वेळी पठारावर समुद्रांच्या लाटांचा आवाज ऐकत टेंटमध्ये झोपणे, हा एक अविस्मरणीय अनुभव असेल. येथील ग्रामपंचायतीचे टॉयलेट, बाथरूमचा वापर करता येतो. जर फक्त बीचला भेट देऊन परत यायचं असेल तर एका दिवसात देवघळी बीच बघता येतो. 

कसे जाल देवघळीला- 

कोल्हापूर-शाहूवाडी-मलकापूर -आंबा-साखरपा-पुनास-पावस-पूर्णगड-कशेळी-देवघळी बीच 

कोल्हापूर- पोर्ले तर्फ ठाणे-वाघवे-नांदारी-करंजफेण-अनुस्कुरा घाट-पाचाळ-सौंडाळ-धुतपापेश्वर-आडिवरे-कशेळी-देवघळी बीच 

कोल्हापूर-बालिंगे-असळज-खारेपाटण-राजापूर-खालची भंडारवाडी-आडिवरे-कशेळी-देवघळी बीच  कोल्हापूरपासून जायचे असल्यास तुम्ही वरील तिन्हीपैकी एक मार्ग निवडू शकता.

Friday, September 2, 2022

Maratha Armar : छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवली होती सागरी सुरक्षेची मुहूर्तमेढ



सेना, घोडदळाबरोबरच शत्रूंनाही घाम फोडणारे आरमार आणि दुर्ग निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती काय वर्णावी. छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि कौशल्याच्या बळावर समुद्र सुरक्षिततेचे महत्तव ओळखून २४ ऑक्टोबर, १६५७ रोजी मराठा आरमार दलाची (इंडियन नेव्ही) स्थापना केली. भारतीय नाविक दल छत्रपती शिवाजी महराजांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' मानते. शिवरायांनी १६५७ मध्ये भारतातील पहिले जहाज निर्माण करून सागरी सुरक्षेची मुहुर्तमेढ रोवली. खंबायतच्या आखातापासून त्रावणकोर, कोचीनपर्यंतची सागरी सत्ता काबीज करून मराठ्यांचे वर्चस्व स्थापित करणारे शूरवीर स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज होते. 

''ज्याचे आरमार त्याचा समुद्र'' ही कृती लक्षात घेऊन समुद्रावर आपलं स्वत:च वर्चस्व निर्माण करायचं असेल आणि समुद्र जिंकायचं असेल तर आरमाराची आवश्यकता असल्याचे छत्रपतींना वाटले. पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्दी यांच्या आक्रमणांपासून हिंदुस्थानला वाचवायचे असेल तर स्वतःचे आरमार हवे, हे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या वेळीच ओळखले होते.  मध्ययुगात कोणत्याही राजाने एत्तदेशीय आरमार बांधले नव्हते. बहमनी तर होतेतच. पण, कुणालाही वाटले नव्हते की, अशा प्रकारे चांगले आरमार बांधावे. मुघलांनाही ते जमले नाही. खांदेरीचा किल्ला मात्र जिंकण्याचा प्रयत्न मुघलांनी केला. मात्र, तो त्यांच्या कधीच हाती आला नाही. दूरदृष्टी, नियोजन आणि व्यापाराची दृष्टी समोर ठेवून प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार यशस्वीपणे बांधले आणि त्याला भक्कम साथ दिली ती जलदुर्गांनी!

सिंधुदुर्ग किल्ला

इंग्रजांनाही धडकी भरवणारी घटना म्हणजे, मराठा आरमारान इंग्रजांच्या बारा जहाजांवर हल्ला चढविला. दर्यासारंग आणि त्याचबरोबर दौलत खान यांच्यासारखे अनेक मुस्लिम अधिकारी छ. महाराजांच्या आरमारात होते. दर्यासारंग यांच्या नेतृत्वाखाली दौलत खान, सिद्दी मिस्त्री, मायनाक भंडारी यांनी इंग्रजांची ५ जहाजे बुडविली तसेच त्यांचे एक  जहाज पकडले आणि त्यावर 'स्वराज्या'चे निशाण लावले. ही दर्यासारंग यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस होता. इंग्रजांना मराठा आरमाराचा मोठा दणका मिळाला होता. इतकेच नाही तर, महाराजांच्या आरमाराला कमी लेखणाऱ्या ठेवणाऱ्या ब्रिटीशांनीही कालांतराने मराठा आरमाराची स्तुती केली. आपल्याकडे मराठ्यासारख्या युद्ध नौका हव्या, असे ब्रिटिशांचे म्हणणे होते, असा संदर्भ पोर्तुगीजांच्या पत्रातून सापडतो. 

पश्चिम समुद्रकिनारा हा परकीय आरमारी सत्तांच्या ताब्यात होता. पोर्तुगीज, डच, इंग्रज, जंजिरेकर सिध्दी होते. त्यावेळी जो व्यापार चालायचा तो खुष्कीच्या मार्गाने कमी आणि समुद्रमार्गाने अधिक चालायचा. भारतातून जी आयात - निर्यात व्हायची ती समुद्रमार्गाने व्हायची. ती प्रामुख्याने पश्चिम समुद्र किनारपट्टीच्या मार्गाने व्हायची. व्यापाराच्या संरक्षणासाठी आरमारी अतिआवश्यकता होती. ही गोष्ट शिवाजी महाराजांसारख्या कुशल सेनानीने ओळखलं होतं. अनेक वर्षे समुद्र पार करणं हे पाप आहे, अशा पध्दतीची त्यावेळी धारणा होती. ती मोडीत काढण्याचे काम महाराजांनी केले. त्यामुळे ठराविक अंतर सोडून समुद्रात जाण्याचे धाडस कुणी केले नाही. समुद्रात संचार करणं, आरमार बांधणं आणि समुद्रात संचार करण्यासाठी लागणांर जे तंत्रज्ञान होतं, नौका प्रमुख, शिडांचं ज्ञान, वाऱ्याच्या दिशांचं ज्ञान हे आपल्याकडे उपलब्ध नव्हतं. आरमार उभारणीसीठीच्या ज्या नौका लागतात मछवा, पाल त्यावेळी वेगवेगळ्या पध्दतीच्या नौका आरमारासाठी लागायच्या. आपल्याकडे तसे कारागीर नव्हते. म्हणून, शिवाजी महाराजांनी हेदुर्गाडी खाडी आहे, तेथे पहिल्यांदा बाहेरचे (पोर्तुगीज) कारागीर घेऊन आरमार बांधण्यास सुरुवात केली. येथील कारागीरांना त्यांच्याकडून शिकून घ्यायला सांगितले. २४ ऑक्टोबरला त्यांनी आरमारी बेडा बनवला आणि ते समुद्रात सोडण्यात आले. म्हणून आपण 'मराठा आरमार दिन' साजरा करतोय.                                                                                    

शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं जे आरमार आहे, ते कान्होजी आंग्रेंच्या काळात संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर सबळ आरमार ठरलं. आणि पश्चिम किनारपट्टीवर मराठ्यांचं वर्चस्व निर्माण झालं. शिवाजी महाराज केवळ आरमार, नाविक दल करून थांबले नाहीत तर त्यांनी जलदुर्गांची साखळी निर्माण केली. आरमार सुरक्षित राहण्यासाठी नाविक तळ शिवाजी महाराजांनी तयार केले. खांदेरीपासून कुलाबा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग असे अनेक जलदुर्ग शिवाजी महाराजांनी समुद्रात तयार केले. संपूर्ण किनारपट्टीचा व्यापार, सैन्य समृध्द होण्यामध्ये याचा उपयोग  झाला. दर्यावर्दी सत्तांना हरवण्याची ताकद आपल्याकडे होती. तशा लढायाही झाल्या. ब्रिटिशांचा आणि जंजीरेकर सिद्दीचा पूर्ण विरोध असताना मुंबईत खांदेरीचा किल्ला बांधला आणि तो आपल्या ताब्यात ठेवला. कोणालाही हा किल्ला जिंकता आला नाही. (समुद्रात बेटावर हा जवळपास ३ किमी. आत हा खांदेरीचा किल्ला आहे.) किल्ला बांधायला लागणारे साहित्य हे आरमारातूनच नेण्यात आले होते. 

शिवाजी राजेंच्या काळात जर समुद्रात संचार करायचा असेल तर इंग्रज, पोर्तुगीजांचा परवाना घ्यायला लागायचा. परंतु, नंतर इंग्रज, डच, पोर्तुगीजांनाही अरबी समुद्रात संचार करायचे असेल तर मराठ्यांची परवानगी घ्यायला लागली, इतका दरारा त्याकाळात शिवरायांनी निर्माण केला होता. Padmadurg: Of fort and fortitude

पद्मदुर्ग

आजही काही जलदुर्ग वर्षानुवर्षे ज्वलंत इतिहास आणि पराक्रमाची साक्ष देत उभी आहेत. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग याची उदाहरण सांगता येईल. अरबी समुद्रातील कुरटे बंदरावर सिंधुदुर्ग किल्ला बांधला गेला. त्यावेळी महाराज त्यास 'सिंधुसागर' म्हणायचे. याच किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. ते शिवपुत्र राजाराम महाराजांनी बांधलं होतं. त्यास शिवराजेश्वर मंदिर (शिवमंदिर स्मारक) म्हणूनही ओळखलं जातं. तर सिंधुदुर्ग किल्ल्याला 'शिवलंका' म्हटलं गेलं.   

शिवरायांनी आरमार विकसित करून स्वराज्य रक्षणाचा जो पाया रचला, त्यावर कळस चढवण्याचे कार्य शिवरायांचा आदर्श ठेवून इंडियन नेव्ही यशस्वीपणे करत आहे. 

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...