Thursday, June 8, 2023

'लगान'@20 Years : ब्रिटीश काळातील गाववाले आणि क्रिकेट, २ चित्रपट फ्लॉप होऊनही आशुतोष गोवारीकरांनी आणलेला सुपरहिट चित्रपट


 

बॉलिवूडमधील आयकॉनिक चित्रपट लगानला १५ जून रोजी २० वर्षे पूर्ण होत आहेत. तुम्हाला माहिती आहे का,आमिर खानने हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. कारण, 'लगान'चे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचे आधीचे दोन्ही चित्रपट फ्लॉप ठरले होते. २० वर्ष पूर्ण हाेत असल्‍याने 'लगान' विषयी या खास गोष्टी जाणून घेऊया. 

बॉक्स ऑफिसवर १५ जून २००१ रोजी लगान आणि गदर एक प्रेमकथा हे चित्रपट रिलीज झाले होते. एकाच दिवशी दोन्ही चित्रपट आमने-सामने आले. तरीही दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले होते. परंतु, कमाई करण्यात चित्रपट ‘गदर एक प्रेमकथा’ने बाजी मारली होती. 

आशुतोष गोवारीकरांना काय म्हणाला होता ? 

'हे लगान भरणे आणि क्रिकेट खेळण्याच्या आयडियामध्ये मला इंटरेस्ट नाही. एक मित्र म्हणून मी तुला एकच सल्ला देईन की, यावर वेळ घालवू नको. आधीचं तुझे दोन चित्रपट पडले आहेत, यावेळी तू कुणीतरी सुरक्षित किंवा जो ट्रेंडमध्ये आहे, असा विषय घेऊन चित्रपट बनव. ब्रिटिश काळातले गाववाले आणि क्रिकेट? कोणत्या दुसऱ्या निर्मात्याला हे ऐकवूदेखील नको', असे स्‍पष्‍ट करत आमिर खान याने आशुतोष गोवारीकर यांना  चित्रपट करण्यास नकार दिला होता. त्या काळी या जोडीचे आलेले दोन्ही चित्रपट पहला नशा आणि बाजी दोन्ही पडले होते. पण, आशुतोष यांना असा एक चित्रपट काढायचा होता, तो या दोन्ही फ्लॉप चित्रपटांचे नुकसान भरून काढेल. 


GandhiJayanti : महात्मा गांधी यांच्‍या विषयी हे ८ चित्रपट तुम्ही पाहिले का?



GandhiJayanti – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज २ ऑक्‍टोबरला जयंती. महात्मा गांधी यांच्‍या आयुष्‍यावर अनेक चित्रपट आले. या चित्रपटांच्‍या माध्‍यमातून प्रेक्षकांना गांधी यांच्‍याविषयी जाणून घेता आले. त्‍यांच्‍या जीवनावरील या महत्त्‍वाच्‍या चित्रपटांविषयी जाणून घेऊया. (GandhiJayanti)

गांधी यांच्‍या आयुष्‍यावर सर्वात महत्त्‍वाच्‍या चित्रपटाची निर्मिती रिचर्ड एटनबरो यांनी केली. १९८२ मध्‍ये ‘गांधी’ हा चित्रपट रिलीज झाला होता. चित्रपटात हॉलिवूड कलाकार बेन किंस्ले यांनी गांधीजी यांची व्‍यक्‍तीरेखा साकारली होती. ‘गांधी’ चित्रपटाला ऑस्कर ॲवॉर्ड देखील मिळाला होता.

श्याम बेनेगल यांनी महात्‍मा गांधी यांच्‍या आयुष्‍यावर ‘द मेकिंग ऑफ गांधी’ चित्रपट साकारला. चित्रपटात गांधीजींची व्‍यक्‍तीरेखा रजित कपूर यांनी केली होती. चित्रपटात मोहनदास करमचंद गांधी ते महात्‍मा बनण्‍यापर्यंतचा प्रवास दाखवण्‍यात आला. १९९६ मध्‍ये हा चित्रपट रिलीज झाला होता.

२००७ मध्‍ये फिरोज अब्बास मस्तान यांच्‍या दिग्‍दर्शनाखाली ‘गांधी माय फादर’ रिलीज झाला. या चित्रपटात दर्शन जरीवाला महात्‍मा गांधी यांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट गांधी आणि त्‍यांचा मुलगा हरीलाल यांच्‍या नात्‍यांवर आधारित होता.

गांधी यांच्‍या हत्येच्‍या प्रसंगावर कमल हासन यांनी ‘हे राम’ चित्रपट बनवला.

चित्रपट २००० मध्‍ये रिलीज झाला होता. चित्रपटात नसीरुद्दीन शाह यांनी भूमिका साकारली होती.

जब्बार पटेल यांनी २००० मध्‍ये ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ चित्रपट आणला. चित्रपटात बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आणि गांधी यांच्‍यासोबत असलेलं त्‍यांचं नातं दर्शवण्‍यात आलं होतं. मोहन गोखले यांनी गांधीजींची व्‍यक्‍तिरेखा साकारली होती.

राजकुमार हिरानी यांनी २००६ मध्‍ये ‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपट आणला. प्रेक्षकांच्‍या पसंतीस उतरलेल्‍या या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनी गांधीजींची व्‍यक्‍तिेरखा साकारली होती.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्‍या आयुष्‍यावर आधारित ‘सरदार’ चित्रपटाची निर्मिती १९९३ मध्‍ये केतन मेहता यांनी केली होती.

चित्रपटात गांधी आणि सरदार पटेल यांचं नातं कसं होतं, हे दर्शवण्‍यात आलं.

गांधीजींची व्‍यक्‍तिरेखा अन्नू कपूर यांनी साकारली होती. तर सरदार पटेल यांची व्‍यक्‍तिरेखा परेश रावल यांनी साकारली होती.

‘मैंने गांधी को नहीं मारा’ या चित्रपटात अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका होती.

आपणच गांधीजींची हत्‍या केली आहे, असे त्‍या व्‍यक्‍तीला (अनुपम) वाटत असते, अशी कथा चित्रपटात दाखवण्‍यात आली आहे. २००५ मध्‍ये जहनु बरुआने हा चित्रपट आणला होता.


Exclusive : दुर्गम भागातून थेट 'उमेद'च्या वसतीगृहात! कोल्हापुरात वानरमारी समाजातील पहिलाच मुलगा दहावी पास



कोल्हापूर जिल्ह्यातील वानरमारी समाजातील यापूर्वी कोणीही दहावी पास झाले नाही. पण यंदाच्या दहावी परीक्षेत याच समाजातील परसु पोवार या विद्यार्थ्याने यश मिळवलं आणि दहावी परीक्षा उत्तीर्ण केली. जंगल खोऱ्यातून राहणारा हा समाज आहे. शिक्षणापासून दूर असलेल्या या समाजातीलच परसूची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. शिक्षण घेणे तर दूरचं; पोटासाठी मिळेल ते काम करून अर्थाजन करणाऱ्या या समाजातील परसु पोवार या मुलाने मिळवलेले यश वाखाणण्याजोगे आहे.

परसु पोवार हा शाहूवाडी तालुक्यातील आयरेवाडी गावातला रहिवासी आहे. तो २०२३ च्या दहावीच्या परीक्षेत ४८.२० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला. श्रीराम हायस्कूल, भाग शाळा कोपार्डे येथे तो शिकत आहे. पुढे व्यावसायिक शिक्षण घेण्याची इच्छा मनाशी बाळगून परसूची वाटचाल सुरु आहे.

२०१९ पासून उमेद फौंडेशनच्या वसतीगृहात तो आणि त्याची ३ भावंडे राहतात. सांगरुळ येथील उमेद फौंडेशनने त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. मुलांचे शिक्षण पूर्ण होऊन ते स्वावलंबी होऊपर्यंत ह्या मुलांची जबाबदारी उमेद फौंडेशन उचलते. शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी उमेद फौंडेशन कार्यरत आहे.

दरम्यान, उमेद फौंडेशन आणि या फौंडेशनचे सदस्य दशरथ आयरे यांनी पोवार भावंडांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य केले आहे. दशरथ आयरे यांच्या गावातील वानरमारी समाजातील ही मुले होती. उमेद २०१५ पासून या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करत असे. त्यावेळी ही मुले घरीच होती. उमेदचे वसतीगृह सुरु झाल्यानंतर या भावंडांना उमेद फौंडेशनच्या वसतीगृहात प्रवेश देण्यात आला, अशी माहिती उमेद फौंडेशनचे अध्यक्ष प्रकाश कृष्णात गाताडे यांनी दिली आहे.

दुर्गम भागात राहणारा, फिरस्ती असणारा हा समाज शाहूवाडीच्या जंगलामध्ये स्थायिक झालाय. पक्की घरे नाहीत; पण झोपड्यांमध्ये राहणारा, अगदी कमी बोलणाऱ्या आणि संख्येने तुरळक असणाऱ्या या समाजापर्यंत ‘परसू पवार पास झालाय’, ही आनंदाची बातमी अद्याप पोहोचलेली नाही. कारण, जंगलात राहणाऱ्या या समाजापर्यंत संदेश पोहोचवणाऱ्या माध्यमांचा तसा अभाव आहे. त्यामुळे जेव्हा परसुच्या कुटुंबीयांना ही आनंदाची बातमी कळेल, तेव्हा त्यांचा आनंद गगनात न मावणारा असेल, हे नक्की!

Friday, May 19, 2023

Prarthna Behere | जेव्हा मराठी अभिनेत्री मोनोकिनी घालतात, बिघडतं कुठं?



बिकिनी वा मोनोकिनी घालून बोल्ड फोटोशूट करणं, हे काही नवीन गोष्ट राहिली नाहीये. तमाम कलाकार जेव्हा बोल्ड फोटोशूट करतात, तेव्हा त्यांची चर्चा होतचं राहते. चर्चेत येण्याचं हे एक माध्यम आहे, असं म्हटलं जातं. पण, एखाद्या मराठी (Prarthna Behere) अभिनेत्रीने असं काही केलं तर मात्र वेगळं घडतं. जणू काही तरी जगावेगळं केलं आहे, असं लोक बोलू लागतात. पण, जेव्हा मराठी अभिनेत्री बिकिनी, मोनोकिनी घालतात, तेव्हा बिघडतं कुठं? (Prarthna Behere)

नुकताच प्रार्थना बेहरेने मोनोकिनी बाथिंग सूटमध्ये हॉट फोटोशूट केल्याने तिची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होतेय. अनेक जण तिला संस्कृतीबद्दल बोलताना दिसत आहेत. तर चाहत्यांनी तिचे समर्थन केले आहे. काहींनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. ट्रोलिंग सामोरे जाणारी प्रार्थना ही पहिली अभिनेत्री नाही. ती एक मराठमोळी अभिनेत्री म्हणून तिला अशा प्रकारे टीकेला सामोरे जावे लागत आहे.

याआधी सई ताम्हणकर, पूजा सावंत, रसिका सुनील, शिकारी फेम नेहा खान या अभिनेत्रींचेही मोनोकिनी, बिकिनीतील फोटो सर्वांसमोर आले होते. मग, प्रार्थनाने केलं म्हणून काय बिघडलंय? उलटपक्षी, बॉलिवूड वा टॉलिवूडमध्ये अभिनेत्री मोनोकिनीमध्ये सर्रास दिसत असतात. तेव्हा त्यांचे गोडवे पाहायला मिळतातचं की!

 

मोनोकिनी ही बिकिनीसारखाचं प्रकार असतो. मोनोकिनीला वनपीस स्वीम वियर असेही म्हटले जाते. जगभरात मोनोकिनीला पसंती आहे. बाजारात अनेक प्रकारच्या मोनोकिनी, वेगवेगळ्या डिझाईन्स आणि रंगामध्ये उपलब्ध होते. अभिनेत्री हॉल्टर, त्रिकोणी, ब्राझिलियन, कटआऊट इत्यादी मोनोकिनी परिधान केलेल्या दिसतात. आतात तर नव्या फॅशन ट्रेंडनुसार बाथिंग सूट फ्रिल, कशीदाकारी मोनोकिनी, प्लीटेड मोनोकिनी, रफल्ड टॉप, साईड-कटआउट, प्रिंटेड मोनोकिनी सहज उपलब्ध होतात. त्यामुळेच जगभरात मोनोकिनीची मागणी इतकी आहे की, त्याचा पुरवठा अनेक इंडस्ट्री करतात. तुम्हाला त्या बाजारात सहजरित्या विकत घेता येतात.

 
मोनोकिनीचा पहिला प्रकार हा बाथिंग सूट होता. रुडी गर्नेरिचने १९६४ मध्ये मोनोकिनी बनवली होती. पण, ती फॅशनसाठी नव्हती. असो.
मोनोकिनीमध्ये महिलांची बोल्ड काया दिसते. त्यालाच लोक 'अंगप्रदर्शन' असं म्हणतात. पण, मुळात अंगप्रदर्शन करणं ही संकल्पनाच वेगळी आहे. ती वेगवेगळ्या कारणांसाठी असू शकते. येथे बोल्ड फोटोशूट केलं, म्हणजे अंगप्रदर्शन केलं असा अर्थ होत नाही. किंवा यात अश्लिलता दिसण्यासारखे काहीचं नाही. मादक दिसणं या मोनोकिनीच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य आहे, असे म्हणता येईल. मोनोकिनी हे त्या-त्या अभिनेत्रीच्या किंवा महिलेच्या बाह्य सौंदर्यात भर टाकण्याचं काम करतं, असंही म्हणायला हरकत नाही.

ज्या महिला बिकिनी परिधान करू शकत नाहीत, त्यांना मोनोकिनी एक उत्तम पर्याय आहे, असंही म्हटलं जातं. फॅशनच्या ट्रेंडमध्ये सातत्य ठेवणे, यासाठी एक उत्तम स्वीमसूट म्हणून मोनोकिनी वापरली जाते. जगभरातील फॅशन डिझायनर मोनोकिनीच्या विविधांगी फॅशनसाठी काम करताना दिसतात. मागणीनुसार, या मोनोकिनीचं स्ट्रक्चर स्टाईल बनवलं जातं. लोकप्रिय स्विमिंग सूट्सपैकी फुल-स्लीव्ह स्पोर्टी दिसणारी मोनोकिनी तर खासकरून अनेक दिवांसाठी बनवली जाते.

संकुचित विचार ठेवणारे मात्र आपल्या संस्कृतीबद्दल भरभरून बोलत असतात आणि लोक काय म्हणतील, हा प्रश्नचं मुळात मागे पडला आहे. त्यामुळे कितीही टीका झाली तरी उलट हा फॅशन ट्रेंड वाढत राहणार, हे एकूणचं बदलेल्या परिस्थितीतून दिसतं.

 https://pudhari.news/soneri/523027/marathi-actress-wear-monokini-shared-photos-on-social-media/ar

Jiah khan Verdict : हकनाक गेली जिया खान; प्रेम फुलण्याआधीच कोमजलं




स्वप्नांच्या पंखावर स्वार होऊन चित्रपट इंडस्ट्रीत उतरलेल्या एक निरागस अभिनेत्री जिया खानचा बळी गेला. तिच्या आयुष्यात असं काय घडलं होतं की, तिला आपले जीवन संपवावे लागले. एखादी मोठी घटना घडल्याशिवाय, इतके मोठे टोकाचे पाऊल ती उचलणार नाही! (Jiah khan Verdict ) जिया खानने जून २०१३ रोजी स्वत:चे जीवन संपवले होते. या प्रकरणी तिचा तथाकथित बॉयफ्रेंड सूरज पांचोलीला पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी जिया आणि सूरज लिव्‍ह इन रिलेशनशीपमध्‍ये होते, असे म्हटले जात होते. आज जवळपास १० वर्षे कोर्टात सुरु असलेल्या जिया खान मृत्यूच्या प्रकरणात सूरज पांचोली निर्दोष सुटला आहे. पण, तिचा मृत्यू झाला तर तो कुणामुळे झाला? हा प्रश्न येथे रहस्यमय बनून राहिला आहे. (Jiah khan Verdict )

कुणीही आपले आयुष्य असं सहजासहजी संपवत नाही. आयुष्यात काहीतरी गंभीर घटना घडली असेल तर असे पाऊल उचलले जाते. आज तिच्या नसण्याने एका सुंदर अभिनेत्रीला गमावल्याचं दु:ख तर आहेच. शिवाय तिच्यासोबत तिचं इंडस्ट्रीत आपलं नाव कमावण्याचं सुंदर स्वप्नदेखील मातीमध्ये विरून गेलं.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बनण्याचं स्वप्न विरून गेलं

जिया खानचा जन्म २० फेब्रुवारी १९८८ रोजी न्यू-यॉर्कमध्ये झाला होता. न्यू-यॉर्कमध्ये न राहता जियाने आपली पावले सातासमुद्रापार भारतात बॉलिवूडकडे वळवली. तिने चित्रपट अभिनय आणि इंग्रजी साहित्याचे शिक्षण घेतले. तिचे चेहऱ्यावरचे भावच सर्वकाही सांगून जायचे. कुरळे केस, छोटे आकर्षित करणारे डोळे, मोठं कपाळ आणि लांब नाकामुळे जियाला ग्लॅमर मिळवणं सोपं होतं. 

वयाच्या १६ व्या वर्षी जियाला तुमसा नहीं देखा चित्रपट ऑफर झाला होता. परंतु, तिच्या लूकमुळे तिच्या जागी दिया मिर्जाला रिप्लेस करण्यात आलं. दोन वर्षांनंतर जियाला २००७ मध्ये राम गोपाल वर्माचा चित्रपट 'नि:शब्द' मिळाला. ज्यामध्ये अमिताभ बच्चन मुख्य नायक म्हणून होते. आपल्या वयापेक्षा तिप्पट अभिनेत्यासोबत तिने किसिंग सीन दिले. हा चित्रपट फ्लॉप झाला. पण फिल्मफेअरमध्ये बेस्ट डेब्यूसाठी ती नॉमिनेट झाली होती. लवकरच तिला २००८ आमिर खानच्या गझनी चित्रपटात संधी मिळाली. बिग बी अमिताभ बच्चन यांनी तिच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं. तिचा अभिनय सहज सुंदर होता ते गझनी चित्रपटातून आपण पाहिलचं आहे. छोट्या करिअरमध्ये ग्लॅमर मिळवणारी अभिनेत्री म्हणून जियाला प्रसिद्धी मिळाली होती.

पुढे जिया खानने कॉमेडी जॉनरमध्ये पाऊल ठेवलं. दिग्दर्शक साजिद खानचा चित्रपट हाउसफुलमध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती. यामध्ये ती अक्षय कुमारसोबत झळकली. अभिनयाशिवाय, जिया ट्रेन्ड सिंगर आणि डान्सरदेखील होती. जिया बालपणापासून उर्मिलाची फॅन होती. 'दिल से' मध्ये जियाने बाल कलाकाराची भूमिका केली होती.

बहरत्या करिअर दरम्यान, सूरज पांचोली तिच्या जीवनात आला. पण, तिचं प्रेम फुलण्याआधीच कोमजलं गेलं. दोघांचे प्रेम सर्वश्रुत होते. दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असल्याचे वृत्तही समोर आले होते. पण असं काय घडलं की, जियाने इतक्या धाडसाचे पाऊल उचलले. आपले जीवन संपवण्याआधी जिया आईशी फोनवरून बोलली होती. तिने एक चिठ्‍ठीदेखील लिहिली होती. त्‍यामध्‍ये तिने अनेक मोठे खुलासे केले होते. तिने सूरजचे नाव पत्रात घेतले नव्हते. मी सर्वकाही गमावलं आहे म्हणत तिने पत्रात 'त्याने' आपलं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचेही म्हटले होते.

सूरज पांचोली नेहमीच निर्दोष असल्याचे म्हणत राहिला...

जुलै २०१४ मध्ये उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्‍यात आला होता. याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात जियाला सूरजने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे म्हटले गेले होते. सीबीआयने सूरजला ताब्‍यात घेऊन चौकशीही केली होती. सूरजने पॉलीग्राफी आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्‍यास नकार दिला होता. सूरजने तुरूंगातून बाहेर आल्यानंतर मीडियाला सांगितले होते की, जिया करिअरविषयी डिप्रेशनमध्ये होती. तिच्या मित्रांनी तिची साथ सोडली होती. ती प्रत्येक छोट्या गोष्टींवरून फोन करायची, खूपच पझेसिव्ह होती. जियाच्या मृत्ययू प्रकरणी सूरज नेहमीच आपण स्वत: निर्दोष असल्याचे म्हणत होता.

जिया खानने वयाच्या २५ व्या वर्षी आत्‍महत्‍या केली होती. जियाचा मृत्‍यू आजदेखील न सुटलेले कोडे आहे. एक अशी अभिनेत्री जिने आपल्या करिअरमध्ये सर्व काही मिळवलं. यश, प्रसिद्धी, ग्लॅमर मिळवणाऱ्या जियाचं दु:ख शेवटपर्यंत जगापासून लपून राहिलं.

Friday, January 13, 2023

Best Christmas Destinations : ख्रिसमस साजरा करा 'या' ८ सुंदर ठिकाणी


 

https://pudhari.news/special-news/404892/best-christmas-destinations-during-festival-season/ar

ख्रिसमस फीवर सुरू झाला आहे. आपण यावेळी भारतातील अशा शहरात जाऊ, जिथे डबल आनंद मिळेल. मग ती कोणती ठिकाणे आहेत, ठाऊक आहे का? ख्रिसमस काळात फिरण्यासाठी ही परफेक्ट Best Christmas Destinations आहेत. या ठिकाणी तुम्हाला नक्की जायला हवं.  २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस आहे आणि तुमचा व्हेकेशन सेलिब्रेशन मूड असेल तर भारतातील अशी काही शहरे आहेत, जिथे तुम्ही फिरायला जाऊ शकता आणि ख्रिसमस साजरा करू शकता. जवळपास भारतातील सर्वच शहरांमध्ये ख्रिसमसचं सेलिब्रेशन असतं. परंतु, भारतातील काही अशी काही शहरे आहेत, जिथे लोक खास ख्रिसमस साजरा करण्यासाठी जातात. हा ख्रिसमस तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरु शकतो. (Best Christmas Destinations)

गोवा

गोव्यात ख्रिसमसचं सेलिब्रेशन मोठ्या प्रमाणात असतं. तसेच न्यू इअर सेलिब्रेशनसाठी संपूर्ण भारतात गोवा प्रसिद्ध आहे. येथील बीच पार्टीज खूप प्रसिद्ध आहे. यामध्ये डान्स, सी फूड, विद्युत रोषणाई याचा आनंद घेणं एक वेगळीचं मजा आहे. ख्रिसमस काळात घरांमध्ये पारंपरिक मिठाई बनवली जाते. अनेक बेकरी, दुकानांमध्ये चविष्ट आणि सुंदर मिठाई येथे चाखायला मिळते. चर्चबाहेर म्युझिक आणि सुंदर ख्रिसमस ट्री तुम्हाला दुसऱ्या विश्वात घेऊन जातात. १६ व्या शतकातील सर्वात मोठे चर्च Sé Cathedral पाहण्यासारखे आहे. ख्रिसमस काळात तुम्ही चर्चबाहेर डान्सचा आनंद घेऊ शकता. तुम्ही खाण्याचे शौकीन असाल तर टर्की वा चिकनने बनलेल्या अनेक टेस्टी डिशेसची चव चाखू शकता.

मुंबई

ख्रिसमससाठी आणि न्यू ईअरसाठी येथे देश-विदेशातून लोक पोहोचतात. त्यात जुहू चौपाटी म्हटलं तर क्या बात है! जुहू चौपाटीवर रात्री उशीरापर्यंत म्युझिक प्रोग्रॅम आणि पार्टीचं वातावरण राहतं. सेंट मायकल चर्च, मरीन ड्राईव्ह, सेंटा क्लॉजकडून मिळणारी भेट, समुद्राच्या लहरींवर ख्रिसमसचं सेलिब्रेशन अफलातून असतं. गेटवे ऑफ इंडिया, बोरीवली, कोलाबा, बांद्रा वरळी सी लिंक अशा ठिकाणीदेखील पर्यटक सेलिब्रेशनसाठी पोहोचतात.

मसूरी

सेलिब्रेशन आणि हिल स्टेशन मसूरी (Hill Station Mussoorie) चं नाव नाही, असं होऊचं शकत नाही. क्वीन्स ऑफ हिल नावाने प्रसिद्ध मसूरीदेखील Christmas Celebration साठी नहमीचं तयार असतं. डेहराडून जिल्ह्यात वसलेलं मसूरीदेखील एक खूप सुंदर डेस्टिनेशन आहे, हे एक परफेक्ट प्लेस आहे. ख्रिसमस सेलिब्रेशनला आला तर भट्टा फाल, गनहिल, कंपनी गार्डन, माल रोड, क्लाउड अँड, जॉर्ज एव्हरेस्ट, कॅम्पटीला नक्की भेट द्या.

कोलकाता

कोलकातामध्ये ब्रिटिश शासन काळापासून येथे ख्रिसमस मोठ्या धामधुमीत साजरा करण्याचा ट्रेंड आहे. जो अद्यापही जारी आहे. येथे डान्स, गाणी आणि चविष्ट पदार्थांसोबत दंगा मस्ती सुरु असते. पार्क स्ट्रीटचा नजारा तर खूप सुंदर असतो. सेंट पॉल कॅथेड्रल चर्चमध्ये जी गर्दी असते, ती परफेक्ट ख्रिसमसचं फील देते. येथे अनेक जुन्या बेकरीज आहेत. अनेक जुन्या चर्चसमोर ख्रिसमस ईव्हिनिंग तुम्ही एन्जॉय करु शकता.

शिमला

बर्फ आणि हिल स्टेशनच्या ठिकाणी तुम्ही जर ख्रिसमस साजरा करायचा विचार करत असाल तर शिमला हे परफेक्ट डेस्टिनेशन आहे. या सीझनमध्ये शिमलामध्ये खूप पर्यटक येतात. जर ही ट्रिप आणखी रोमँटिक करू इच्छिता तर कालका ते शिमलापर्यंत टॉय ट्रेनमध्ये प्रवास करा. येथे उत्तम रेस्टॉरंट्स आहेत, जेथे तुम्हाला खूप चवदार जेवण मिळू शकते. जर तुम्ही इतिहास प्रेमी असाल तर तमच्यासाठी बोनस पॉईंट हा आहे की, येथे ब्रिटिश काळातील ऐतिहासिक इमारती Viceregal Lodge, Rothney Castle, Gaiety Theatre, Woodville Palace आहेत. तसेच १९ व्या शतकातील क्राईस्ट चर्च देखील आहे. कुफरी, नारकंडा, मशोबरा, नालदेहरा या पर्यटन स्थळी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये नाईट पार्टी आणि डान्सचं आयोजन केलं जातं. काही ठिकाणी कश्मीरी फूड फेस्टिव्हलदेखील भरवलं जातं. त्याचबरोबर पर्यटन नगरी मनालीमध्ये ख्रिसमस दिनी अनेक लोक पोहोचतात. कुल्लू आणि मनाली हेदेखील ख्रिसमससाठी लव्हेबल ठिकाणे आहेत.

हर्षिल (Harisil)

उत्तराखंड येतील हर्षिल हे एक पर्यटन स्थळ आहे. हर्षिल व्हाईट ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी (White Christmas Celebration) ओळखलं जातं. येथील निसर्ग बर्फाच्छादित असतो. सुंदर निसर्गाची रचना असलेल्या हर्षिलमध्ये ख्रिसमसचं सेलिब्रेशन परफेक्ट आहे.

कोची

कोचीमध्ये अनेक जुने चर्च आहेत. येथे ख्रिश्चन बांधवांची संख्याही अधिक आहे, जर तुम्ही ख्रिसमस सीझनमध्ये येथे गेला तर फरची झाडे, सजलेली घरे, दुकाने, सँटा आणि जीजसच्या मूर्ती तुम्हाला जागोजागी दिसतील. रात्री उशारी तुम्ही सेंट फ्रँसिस चर्च जाऊन अविसम्रणीय प्रसंग बनवू शकता. येथे भारतातील सर्वात जुने युरोपियन चर्च आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येथे स्थानिक सण असतात. कोचीन कार्निव्हलमध्ये म्युझिकल फायर वर्क, सजवलेले हत्ती, गेम्स, स्पोर्ट्स सारख्या अनेक मजेशीर ॲक्टिविटीज असतात. चर्च रोडवर पायी चालण्याचा आनंदच वेगळा आहे. अरबी समुद्रावरून येणारी थंड हवा, जुने चर्च, सी फूड, नारळ पाणी (शहाळे) आणि पुर्तगाली, डच स्थापत्यशैली जुन्या इमारती या गोष्टी तुम्हाला एन्जॉय करता येतात.

औली

उत्तराखंडमधील औली हे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथील ख्रिसमस सेलिब्रेशन सुंदर क्षणांनी स्मरणीय ठरेल. चारी बाजूंनी बर्फाची चादर औलीचे सौंदर्य वाढवणारे आहे.

Unexplored Konkan : वालावल, नेरुर अन् निवती खुणावतोय!



https://pudhari.news/maharashtra/426674/unexplored-maharashtra-konkan-travel-hidden-beautiful-places/ar


तोंडवली, तारकर्ली, देवगड फिरल्यानंतर नव्या ठिकाणी जाण्याचे वेध लागतात. वर्षातून एक तरी ट्रीप याठिकाणी असते. पण, सारखं सारखं त्याच त्याच ठिकाणी जायचं म्हटलं की जाम कंटाळा येतो. पण, नेहमी 'कोकणच बरा असा' असंही वाटतंय. सोशल मीडियावर ते फिरणारं वाक्य 'येवा कोकण आपलोचं असा' सारखं सारखं डोळ्यांसमोर येतं. (Unexplored Konkan ) मग, काय पुन्हा गाडी त्याचं दिशेला वळते. जी पर्यटनस्थळे आपल्याला माहिती नाहीत किंवा जिथे फार कमी लोक जातात, अशा ठिकाणांचा शोध सुरु होतो. हा शोध वालावल, नेरुर अन् निवती या ठिकाणी येऊन थांबतो. समोर येतात ही काही सुंदर, अप्रतिम ठिकाणं, जिथे तुम्ही बिनधास्त फिरू शकता. Unexplored Konkan शोधत शोधत वालावल, नेरुर अन् निवतीचे बीच येऊन डोळ्यांसमोर उभे राहते. (Unexplored Konkan )


वालावल-

दक्षिण कोकणात जांभा दगडांमध्ये वसलेलं वालावल गाव. कुडाळ तालुक्यातील, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावल हे निसर्गाने नटलेलं गाव. रुपेरी वाळू, चमचमणारा प्रकाश आणि खळखळत्या समुद्रावर डोकावून पाहणारा सूर्य पाहणे म्हणजे 'व्वा क्या बात है!' बीचवर वाहणारा झुळझुळ वारा, सूर्यास्त होतानाचा होणारा आनंद गगनात मावेनासा होतो. थोडी संध्याकाळ झाली की, वाळूंमध्ये दोन्ही पाय रुतून खळखळणाऱ्या समुद्राकडे शांत पाहत राहावं बस्स इतकाचं काय तो लाभणारं स्वर्गाहून अधिक सुख! हे वाचून डोळ्यांसमोर उभारला ना निसर्ग? असाच निसर्ग वालावल, निवती आणि नेरुरमध्ये भेटणार. वालावलसारखं सुंदर ठिकाण तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. दडलेल्या कोकणाची खरी अनुभूती वालावलमध्ये गेल्यानंतरचं येते. वालावल तसे शांत असणारं ठिकाण, जे नेहमीच पर्यटकांना खुणावणारं आहे. वालावलला 'कोकणातील स्वर्ग' असंही म्हटलं जातं.

वालावल हे दाट जंगलांनी झाकोळलेलं गाव आहे. बाजूला कर्ली नदी वाहते. डोंगर-दऱ्यांमुळे या गावच्या सौंदर्यात आणखी भर पडलीय. याठिकाणी लक्ष्मीनारायण मंदिर आहे. ज्याला प्राचीन इतिहास आहे. मंदिराची बांधणी चालुक्यकालीन असल्याचे म्हटले जाते. तसेच काही अंतरावर श्री रवळनाथाचे मंदिर आहे. शेजारीच खंदरबी देवी ही माहेरवाशिनींची देवी म्हणून ओळखली जाते.

काय काय पहाल - सती मंदिर, कर्ली नदीच्या काठावर वसलेले हे अत्यंत रमणीय असे गाव आहे. कुपीचा डोंगर, अत्यंत सुंदर अशी कर्ली नदी, समोरचे काळसे बेट, लक्ष्मीनारायणाचे सुंदर असे मंदिर अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे हे गाव प्रसिद्ध आहे.

कसे जाल - सावंतवाडीपासून ३५ किमी. अंतरावर हे गाव आहे.

वालावलच्या जवळची ठिकाणे-

म्हापन, नाईकवाडी, वडगाव, तळेगाव, कुटगाव, नेरूर तर्फ हवेली, नाईकवाडी, काविलगाव, तळेगाव, कुटगाव, नेरूर तर्फ हवेली, चेंदवण, कवठी, गांधीग्राम, नाईकनगर, मुद्याचा कोंड, गाव धज इत्यादी.

कर्ली नदी -

वालावलचे दर्शन घेऊन कर्ली नदीत बोटींगची मजा घेणे कुछ और बात है. या गावात मासेमारीचा आनंद ही तुम्ही घेऊ शकता. बोटींग करताना पाण्यात वाकून पाहणारी माडाची झाड, सभोवताली केवडा, नारळ, सुपारीच्या बागा,ही खरी कोकणातील सहलीचा येणारा अनुभव आयुष्यभर विसरता येणार नाही.

नेरुर गाव -

भाताची शेती, कोकणी पद्धतीची भाताची शेती, तळ्यात पोहणारी बदके आणि फुललेली कमळे असं एक सुंदर तळे याठिकाणी आहे. याठिकाणी एक सुंदर देवालय आहे. दीपमाळा, तळं आणि प्रसन्न करणारं वातारवरण असे नेरुरचं वर्णन करता येईल. श्रीदेव ब्रह्मनाथ मंदिर , महादेवाचं मंदिर येथील कमालीची शांतता आत्मिक समाधान देते. येथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. कलेश्वर देवस्थान हे नेरूर गावची ग्रामदेवता होय.

निवती बंदर -

फारसा लोकप्रिय नसलेलं बंदर आहे. येथे मासेमारीसाठी समुद्रकिनारा आहे. खूप साऱ्या रंगबेरंगी बोटी या समुद्रात पाहायला मिळतात. येथे रोज माशांचा लिलावही भरतो. निवती बंदरावर कौलारू घरे आहेत, जी नारळाच्या झाडांमध्ये लपलेली दिसतात.

 
इथे रम्य संध्याकाळ एकांतात घालवणं म्हणजे स्वर्गाहून अधिक सुख आहे. समुद्रामध्ये असणारे सोन्यासारखे चमकणारे गोल्डन रॉक पाहण्यासाठी तुम्हाला बोटीची सफर करता येते. येथूनचं जवळच असलेल्या निवती सनसेट पॉईंटलादेखील तुम्ही भेट देऊ शकता.

भोगवे बीच-

भोगवे हे वेंगुर्ले तालुक्यातील गाव आहे. स्वच्छ आणि नितळ समुद्रकिनारा या गावाला लाभलेला आहे. भोगवे गावात कर्ली नदी आणि समुद्राचा संगम पाहायला मिळतो. पांढरी वाळू हे या समुद्र किनाऱ्याचे वैशिष्ट्य. नारळी - पोफळीच्या बागांमध्ये उटून दिसणारा समुद्र सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. येथे निवती किल्लादेखील पाहायला मिळतो. कोचरे गावच्या हद्दीत निवतीचा किल्ला आहे.

'डॉल्फिन' मासे पाहण्यासाठी या बीचवर गर्दी होत राहते. डॉल्फिनच्या झुंडी पाहण्यासाठी तुम्हाला बोटींमधून समुद्र सफर करता येते. येथे राहण्यासाठी बीच रिसॉर्टदेखील आहे.

कसे जाल - कुडाळ-वालावल-परूळे मार्गे भोगवे.

जवळची ठिकाणे - निवती बीच १३ किमी आहे. कोंडुरा बीच देखील तुम्हाला पाहता येईल.

कोंडूरा बीच -

हे एक लहान बीच आहे. पांढरी चमकदार वाळू हे या बीचचं वैशिष्ट्य. सर्वात महत्त्वाचं म्हणजे येथील किनारे खूप स्वच्छ आणि नितळ आहेत. शंख-शिपले, गुळगुळीत दगडे या किनाऱ्याच्या सौंदर्यात आणखी भर घालतात.

कलावी बीच - तसे हे शांततेचं ठिकाण आहे.

केळूस बीच -

केळूस हे गाव छोटे असून येथे तुरळक लोकसंध्या आढळते. येथे जाण्यासाठी एसटी बस किंवा कारने जाऊ शकता. येथे एक छोटं बीच असून याठिकाणी जाणे स्मरणीय ठरणारे आहे. सिंधुदुर्गापासून ३५ किमी. अंतरावर हे ठिकाण आहे.

या छोट्या-छोट्या ट्रीपवर जाण्यासाठी तुम्ही या ठिकाणी उत्तम प्लॅन बनवू शकता. येथे फोटोशूट, कॅम्प फायर आणि टेंट कॅम्प लावूनदेखील रम्य संध्याकाळ घालवू शकता. आसपास हरिचरणगिरी, वायंगणी दाभोळी बीच, वेंगुर्ला, श्रीरामवाडी या ठिकाणांनाही भेट देऊ शकता.





R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...