Thursday, June 8, 2023

आता कुठं जायचं? मग, आंबोळगडला जा ना!



तुम्ही रत्नागिरी, साखरपा, गणपतीपुळे, आरेवारे, दापोलीला पर्यटनाला गेला असाल. पण, कधी आंबोळगडाला गेलाय का? तुम्ही म्हणाल, येथे आहे तरी काय? ही पुढील माहिती वाचल्यानंतर येथे जायला तुम्हाला नक्की आवडेल. तर मग, चला आंबोळगडला!...  

आंबोळगड हे नाव आपल्या फारसं परिचयाचं नसलं तरी रत्नागिरी जिल्ह्यातील हे प्रसिध्द ठिकाण आहे. निखळ खळखळणारा अर्धचंद्राकृती समुद्रकिनारा, घेरायशवंतगड, गगनगिरी महाराजांचं मठ, ध्यानकेंद्र, मुसाकाजी बंदर, आंबोळगडचा किल्ला आणि बरंच काही,  जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पही या ठिकाणाजवळचं आहे. आंबोळगडाला लागून असलेला अथांग पसरलेला अरबी सुमद्र पर्यटकांना खुणावतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात दोन किनारी दुर्ग आहेत, ते म्हणजे आंबोळगड व यशवंतगड. राजापूर तालुक्यातील नाटे गावाजवळ यशवंतगडावरून सरळ थेट रस्ता आंबोळगडाला जातो. आंबोळगडापर्यंतच्या प्रवासात तुम्हाला काजू आणि आंब्याच्या बागा, फणसाची झाडे आणि दुतर्फा झाडांनी नटलेला निसर्ग पाहता येतो.   

आंबोळगडाला जाताना जी गावे लागतात, तिथे तुम्हाला प्रवासात फार वस्ती, वाहने दिसणार नाहीत. येथील गावेही शांत असलेली तुम्हाला दिसतील. गावातील कर्ते पुरुष हे कामानिमित्त बाहेरगावी असलेले दिसतात.

आंबोळगडचा समुद्रकिनारा -

नेहमी आपल्य़ाला समुद्रकिनारी पिवळी, सोनेरी वाळू दिसते. पण, आंबोळगडच्या समुद्रकिनारी पांढरी आणि काळी वाळू पाहायला मिळते. येथे छोट्या-मोठ्या नौका, होड्यादेखील पाहायला मिळतात. मासेमारीसाठी या होड्य़ा वापरल्या जातात. छोटा समुद्रकिनारा लाभला असला तरी, येथील शांतता मनाला समाधान देऊन जाते. नितळ, स्वच्छ पाणी, भिरभिरणारं वारं आणि सुंदर समुद्रकिनारा तुम्हाला मोहात पाडतो. 

यशवंतगड -

कोकणातील राजापूर तालुक्यातील नाटे गावात श्री किल्ले घेरायशवंत गड नावाचा किल्ला आहे. नाटे गावातून सरळ पुढे चालत गेल्यानंतर डाव्या बाजूला एक भक्कम बुरूज आणि त्याच्या कडेने खंदक असलेलं पाहायला मिळतं. दोन भक्कम बुरुंजामघ्ये प्रवेशद्वार लपलेलं दिसतं. गडावर काही अवशेष, कोरडी विहीर आणि कोठारे पाहायला मिळतात. जैतापूर खाडीच्या काठावर हा किल्ला वसलेला आहे.

गगनगिरी महाराजांचे आश्रम-

एका बाजूला विस्तीर्ण जांभ्याच्या पठारावर श्री गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे. आणि दुसऱ्या बाजूला समुद्र. अगदी नीरव शांतता असणारं हे ठिकाण. परंतु, समुद्राच्या लाटा या परिसरातील शांतता भंग करतात. आंबोळगडाच्या या आश्रमात सुंदर दत्तमंदिर आहे. आश्रमाच्या खालील बाजूस समुद्राकडे जाणाऱ्या जांभा दगडांच्या पायऱ्या आहेत. समोरचं लक्ष वेधून घेणारा निळाशार समुद्र आहे. 

येथे गगनगिरी महाराजांनी तपश्चर्या गुहा आहे. येथे भाविक, पर्यटकांना जाता येतं. गगनगिरी महाराजांनी येथे तपश्चर्या केल्याचं सांगितले जातं. येथे ध्यानकेंद्र देखील आहे. या आश्रमाच्या जवळचं आंबोळगडाचा किल्ला आहे. 

आंबोळगडचा किल्ला-

आंबोळगडावर पाहण्यासारखं म्हणजे तुटलेली तोफ, तटबंदीचे काही अवशेष आहेत. वाड्याचे काही अवशेषही इथं शिल्लक आहेत. किल्ल्याच्या दक्षिणेस समुद्र आहे. आणि उत्तर-पश्चिमेस खंदक आहे. किल्ल्यात एक चौकोनी विहीर आहे. 

मुसाकाजी बंदर -

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात जुन्या बंदरांपैकी एक असलेलं हे मुसाकाजी बंदर होय. स्वच्छ परिसर असलेलं हे बंदर अप्रतिम आहे. राजापूर तालुक्यातील नाटे गावाजवळील यशवंतगडाकडून ३ किमी. अंतरावर आंबोळगडाच्या डावीकडील रस्त्यावर हे लहानसे बंदर आहे. समुद्राचे निळेशार पाणी आणि मऊ वाळू पर्यटकांचे चटकन लक्ष वेधून घेतात. येथे फारशी वर्दळ नसते. बंदरावर छोट्या-छोट्या होड्या निदर्शनास पडतात. 

शिमगोत्सव -

अप्रतिम शिमगोत्सव येथे पाहायला मिळतो. विशिष्ट पध्दतीच्या पगड्या, एकसारखा वेष, पालखी, हातात वाद्ये आणि एका तालात नृत्य हे नाटे आणि शेडभूच्या परिसरात आम्ही अनुभवलेला शिमगोत्सव होता. तसं पाहिलं तर कोकणात प्रादेशिकरित्या विविध संस्कृती, चालीरीती पाहायला मिळतात. येथील शिमगोत्सवाचे स्वरूपही वेगवेगळे असते. 

आणखी काय पाहाल? 

रत्नागिरी जिल्ह्यात कणकादित्य मंदिर (कनकादित्य हे सूर्यमंदिर असल्यामुळे या मंदिरात रथसप्तमीचा मोठा उत्सव साजरा केला जातो), महाकाली मंदिर, गोडवणे बीच, आर्यादुर्गा मंदिर आणि कातळशिल्पे ही ठिकाणेही पाहता येतील.  

कसे जाल? 

कोल्हापूर-शाहूवाडी मार्गे रत्नागिरी- आडीवरे-नाटे-आंबोळगड 

कोल्हापूर -राजापूर-नाटे-शेडभू-आंबोळगड  

तुम्हाला निवांतपणा, शांतता हवी असेल तर आंबोळगडच्या बीचवर जा. येथे तुम्हाला फारशी वर्दळ दिसणार नाही. पण, समुद्रालगत बरीच वस्ती आहे. काही हॉटेल्स आणि रूम्सदेखील उपलब्ध आहेत. येथे राहण्याची आणि खाण्याची सोयदेखील उत्तम आहे. मासे, सोलकडी, अंडाकरी, चिकनकरी असे घरगुती पध्दतीच्या जेवणाची चवदेखील येथे चाखता येते. दोन दिवसांत तुम्हाला आंबोळगडाचा प्रवास करून परत येता येते. विविध समुद्रकिनारी तुम्ही अनुभवलेल्या नेहमीच्या ट्रीपपेक्षा आंबोळगडचा अनुभव तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरेल...

पीएमएस म्हणजे काय गं ताई? मासिक पाळीच्या आधी...


वाढत्या वयानुसार, प्रत्येक मुलीत हॉर्मोनल चेंजेस येतात. त्यामुळे प्रीमेन्स्ट्रुअल सिन्ड्रोम (PMS) ची समस्यादेखील वाढते. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्स जर्नल PLosONE मध्ये सन २०१७ रोजी पीएमएसवर एक रिसर्च पब्लिश करण्यात आले होते. यामध्ये म्हटले होते की, जवळपास ९० टक्के महिला पीएमएसच्या अनुभवातून जातात. तर ४० टक्के महिला या काळात तणावात असतात. तर २ ते ३ टक्के लोक तणावाचे शिकार होतात. त्याचा परिणाम त्यांच्या सामान्य जीवनशैलीवर होतो. मेन्स्ट्रूअल सिंड्रोम किंवा पीएमएस काय आहे? एखाद्या महिलेच्या मासिक पाळीच्या काही दिवस आधी शरीरात, भावनात्मक आणि मानसिकरित्या बदल घडतात. जसे स्तन दुखणे, कठीण होणे, पायात गोळे येणे, पेटके येणे, मनःस्थिती बदलणे आणि डोकेदुखी होणे यासारखी लक्षणे दिसतात. जीवनशैलीतील बदल आणि औषधे घेऊन पीएमएसपासून मुक्त होण्यास मदत होते.  मासिक पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे. महिलांच्या आयुष्यातील हा एक महत्त्वाचा भाग असून जेव्हा मासिक पाळी जवळ येते, तेव्हा काही लक्षणे महिलांमध्ये आढळतात. खासकरून महिलांच्या स्तनांमध्ये काही बदल दिसतात. पाळी झाल्यानंतर काही दिवस बहुतांशी महिलांसाठी कठीण काळ असतो. हे जर तुमच्यासोबत होत असेल तर हे प्रीमेंस्ट्रुअल सिंड्रोम (PMS) असू शकते. जर तुम्ही पीएमएस अनुभवत असाल तर यासाठी काही उपायदेखील आहेत.

पीएमएस असा एक समूह आहे, जे अनेक स्तरावर आपल्यावर परिणाम करतं. हे परिणाम शारीरिक, भावनात्मक किंवा स्वाभाविक असू शकते. पाळी येण्याच्या १ ते २ आठवडे आधी हे बदल घडून येतात. पाळी आल्यानंतर हे बदल दिसणं तत्काळ बंद होतं.

काय आहे पीएमएस?

प्रीमेंस्ट्रुअल स्ट्रेसमध्ये कोणत्याही महिलेला मासिक पाळी सुरु होण्याच्या ४ ते ५ दिवसआधीचा वेळ असतो. या सिन्ड्रोमने त्रस्त महिलेच्या वर्तणुकीत बराच बदल होतो. काही महिलांना काहीतरी खाण्याची तीव्र इच्छा होते. किंवा खूप राग आणि चिडचिड होते. अनेकदा तर महिलांच्या मनात आत्महत्यासारखे विचारदेखील येऊ लागतात. याविषयी डॉक्टर्स म्हणतात की, महिलांच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलामुळे पीएमएस होत असल्यास त्यांना शरिरात वेदना होतात. खासकरून स्तन किंवा पोटात या वेदना असतात. तर अनेक मुलींचे मूड अचानक बदलतात. त्या कधी कधी खूप रागात असतात. तर कधी कधी छोट्या गोष्टीवर हसतात. 

लक्षणे -

प्रत्येक महिन्याला किमान एक लक्षण तरी पाळी येण्यापूर्वी दिसू शकते. पण, प्रत्येकालाचं हे अनुभव येतील, असे नाही. काही जणींना पाळी येण्यापूर्वी आणि आल्यानंतरही अतिशय ओटी-पोटात दुखणे, कंबर-पाठीत कळा येणे, चक्कर येणे, पाय दुखणे असे प्रकार होतात. पण, काही जणींना फार त्रास जाणवत नाही. तर काही स्त्रियांना अजिबात दुखणे होत नाही. काही लक्षणे वगळता काही स्त्रिया खूप सहजपणे वावरतात किंवा पाळी झाल्यानंतरदेखील त्यांना त्रास होत नाही. जसे आपण मोठे होऊ, तसे हे बदल बदलत जातात. कधी भावनिकरित्या काही स्त्रिया माासिक पाळी येण्यापूर्वी निराश होतात. काही वेळा तणावात  असलेल्या दिसतात. हे बदल भावनात्मक पातळीवर होतात. पण, पाळी येण्यापूर्वी अगदी कमी लक्षणे दिसल्यास हे पीएमएस आहे की नाही, ओळखणे कठीण जाते.  

हे बदल नियमित आपल्या आयुष्यात येतात का?

पीएमएसमुळे कामावर किंवा कुटुंबात किंवा मित्रांमध्ये वावरताना अडचणी येतात का? असा प्रश्नही पडतो. जर आपण 'होय' असे उत्तर दिले तर ते कदाचित पीएमएस असू शकेल. पीएमएस जाणून घेण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे तुमच्या पाळीच्या कालावधीच्या ५ दिवस आधी सलग ३ महिने ही लक्षणे दिसल्यास पीएमएस असेल.  

पीएमएसच्या अनुभवातून जात असताना अनेक जणी गोड पदार्थ- जसे चॉकलेट वगैरे आणि खारट पदार्थ खातात. पण, यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहेत. या काळात अन्य महिलांना भूख लागत नाही. किंवा त्यांचे पोट खराब होऊ शकते. तसेच सूज येणे किंवा बध्दकोष्ठता यासारखे प्रकारदेखील घडू शकतात. 

पीएमएसमधून सुटकेसाठी अनेक मार्ग आहेत. तुम्ही तुमच्या आहारात बदल घडवू शकतात. पूर्ण झोप आणि व्यायाम करू शकता. तुम्ही तुमचे मन आणि शरिराला आराम देण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी याविषयी चर्चादेखील करू शकता.

पीएमएस अनेक पध्दतीने दिसून येते. भावनिक, शारिरीक पातळीवर असे त्याचे स्वरूप असू शकते. परंतु, बहुतांशी महिलांमध्ये याची काहीचं लक्षणे आढळतात. सर्वच लक्षणे आढळत नाहीत. पीओमएसमध्ये पाळी येण्याआधी स्तन कोमल होणे, पायात गोळे येणे, पेटके, मनःस्थिती बदलणे आणि डोकेदुखी अशा गोष्टींचा समावेश आहे. अशावेळी जीवनशैलीत बदल करून आणि योग्य ऐषधे घेतल्यास पीएमएसपासून सुटका मिळू शकते.

शारिरीक लक्षणे - Physical signs

पोट फुगणे 

पेटके येणे

स्तन दुखणे

भूक लागणे किंवा कमी होणे

डोकेदुखी

स्नायू वेदना

सांधे दुखी

हात पाय सुजणे

मुरुम येणे

वजन वाढणे

बद्धकोष्ठता किंवा अतिसार

भावनिक लक्षणे - Emotional signs

तणाव किंवा चिंताग्रस्त

उदास राहणे

रडणे

मूड स्विंग्ज

झोप न लागणे

एकटे राहण्याची इच्छा होणे

भावूक होणे

संतप्त होणे, राग येणे

स्वाभाविक बदल - Behavioral signs 

विसराळूपणा

लक्ष कमी होणे

कंटाळा येणे

कारणे -

पीएमएस सामान्य गोष्ट आहे. पण, तुम्ही जर या पुढील गोष्टी पाळल्या नाहीत तर पीएमएस अधिक प्रभावी ठरू शकते. यामध्ये धुम्रपान करणे, खूप तणावात असणे, व्यायाम न करणे, पूर्ण झोप न घेणे, खूप मद्यपान करणे, मीठाचा अधिक वापर, लाल मांस, वा साखरचे अधिक सेवन करणे, या गोष्टींचा समावेश आहे.

तुम्ही यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करू शकता?

पीएमएस नियंत्रणात आणण्यासाठी अनेक मार्ग आहेत. यासाठी तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत.

- ३० मिनिटे व्यायाम करणे

- सकस आहार घ्यावा. जसे-सर्व कडधान्ये, फळे आणि भाज्या

- अन्नांमधून कॅल्शियम मिळवण्याचा प्रयत्न करा. (डेअरी, हिरव्या पालेभाज्या)

- मीठ, कॅफिन आणि अल्कोहोल टाळा.

- धूम्रपान करू नका.

- भरपूर झोप घ्या.

- तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करा.

- आपली मनस्थिती आणि लक्षणे जाणून घ्या.

काही महिला फॉलिक ॲसिड, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी -६, व्हिटॅमिन ई, आणि कॅल्शियमसह व्हिटॅमिन डी घेतात. जर आपण हे विटॅमिन्स घेत असाल तर आपण आपल्या डॉक्टरांना विचारून सुनिश्चित करा की, हे विटॅमिन्स अथवा सप्लिमेंट किती सुरक्षित आहेत.

'लगान'@20 Years : ब्रिटीश काळातील गाववाले आणि क्रिकेट, २ चित्रपट फ्लॉप होऊनही आशुतोष गोवारीकरांनी आणलेला सुपरहिट चित्रपट


 

बॉलिवूडमधील आयकॉनिक चित्रपट लगानला १५ जून रोजी २० वर्षे पूर्ण होत आहेत. तुम्हाला माहिती आहे का,आमिर खानने हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. कारण, 'लगान'चे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचे आधीचे दोन्ही चित्रपट फ्लॉप ठरले होते. २० वर्ष पूर्ण हाेत असल्‍याने 'लगान' विषयी या खास गोष्टी जाणून घेऊया. 

बॉक्स ऑफिसवर १५ जून २००१ रोजी लगान आणि गदर एक प्रेमकथा हे चित्रपट रिलीज झाले होते. एकाच दिवशी दोन्ही चित्रपट आमने-सामने आले. तरीही दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले होते. परंतु, कमाई करण्यात चित्रपट ‘गदर एक प्रेमकथा’ने बाजी मारली होती. 

आशुतोष गोवारीकरांना काय म्हणाला होता ? 

'हे लगान भरणे आणि क्रिकेट खेळण्याच्या आयडियामध्ये मला इंटरेस्ट नाही. एक मित्र म्हणून मी तुला एकच सल्ला देईन की, यावर वेळ घालवू नको. आधीचं तुझे दोन चित्रपट पडले आहेत, यावेळी तू कुणीतरी सुरक्षित किंवा जो ट्रेंडमध्ये आहे, असा विषय घेऊन चित्रपट बनव. ब्रिटिश काळातले गाववाले आणि क्रिकेट? कोणत्या दुसऱ्या निर्मात्याला हे ऐकवूदेखील नको', असे स्‍पष्‍ट करत आमिर खान याने आशुतोष गोवारीकर यांना  चित्रपट करण्यास नकार दिला होता. त्या काळी या जोडीचे आलेले दोन्ही चित्रपट पहला नशा आणि बाजी दोन्ही पडले होते. पण, आशुतोष यांना असा एक चित्रपट काढायचा होता, तो या दोन्ही फ्लॉप चित्रपटांचे नुकसान भरून काढेल. 


GandhiJayanti : महात्मा गांधी यांच्‍या विषयी हे ८ चित्रपट तुम्ही पाहिले का?



GandhiJayanti – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज २ ऑक्‍टोबरला जयंती. महात्मा गांधी यांच्‍या आयुष्‍यावर अनेक चित्रपट आले. या चित्रपटांच्‍या माध्‍यमातून प्रेक्षकांना गांधी यांच्‍याविषयी जाणून घेता आले. त्‍यांच्‍या जीवनावरील या महत्त्‍वाच्‍या चित्रपटांविषयी जाणून घेऊया. (GandhiJayanti)

गांधी यांच्‍या आयुष्‍यावर सर्वात महत्त्‍वाच्‍या चित्रपटाची निर्मिती रिचर्ड एटनबरो यांनी केली. १९८२ मध्‍ये ‘गांधी’ हा चित्रपट रिलीज झाला होता. चित्रपटात हॉलिवूड कलाकार बेन किंस्ले यांनी गांधीजी यांची व्‍यक्‍तीरेखा साकारली होती. ‘गांधी’ चित्रपटाला ऑस्कर ॲवॉर्ड देखील मिळाला होता.

श्याम बेनेगल यांनी महात्‍मा गांधी यांच्‍या आयुष्‍यावर ‘द मेकिंग ऑफ गांधी’ चित्रपट साकारला. चित्रपटात गांधीजींची व्‍यक्‍तीरेखा रजित कपूर यांनी केली होती. चित्रपटात मोहनदास करमचंद गांधी ते महात्‍मा बनण्‍यापर्यंतचा प्रवास दाखवण्‍यात आला. १९९६ मध्‍ये हा चित्रपट रिलीज झाला होता.

२००७ मध्‍ये फिरोज अब्बास मस्तान यांच्‍या दिग्‍दर्शनाखाली ‘गांधी माय फादर’ रिलीज झाला. या चित्रपटात दर्शन जरीवाला महात्‍मा गांधी यांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट गांधी आणि त्‍यांचा मुलगा हरीलाल यांच्‍या नात्‍यांवर आधारित होता.

गांधी यांच्‍या हत्येच्‍या प्रसंगावर कमल हासन यांनी ‘हे राम’ चित्रपट बनवला.

चित्रपट २००० मध्‍ये रिलीज झाला होता. चित्रपटात नसीरुद्दीन शाह यांनी भूमिका साकारली होती.

जब्बार पटेल यांनी २००० मध्‍ये ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ चित्रपट आणला. चित्रपटात बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आणि गांधी यांच्‍यासोबत असलेलं त्‍यांचं नातं दर्शवण्‍यात आलं होतं. मोहन गोखले यांनी गांधीजींची व्‍यक्‍तिरेखा साकारली होती.

राजकुमार हिरानी यांनी २००६ मध्‍ये ‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपट आणला. प्रेक्षकांच्‍या पसंतीस उतरलेल्‍या या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनी गांधीजींची व्‍यक्‍तिेरखा साकारली होती.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्‍या आयुष्‍यावर आधारित ‘सरदार’ चित्रपटाची निर्मिती १९९३ मध्‍ये केतन मेहता यांनी केली होती.

चित्रपटात गांधी आणि सरदार पटेल यांचं नातं कसं होतं, हे दर्शवण्‍यात आलं.

गांधीजींची व्‍यक्‍तिरेखा अन्नू कपूर यांनी साकारली होती. तर सरदार पटेल यांची व्‍यक्‍तिरेखा परेश रावल यांनी साकारली होती.

‘मैंने गांधी को नहीं मारा’ या चित्रपटात अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका होती.

आपणच गांधीजींची हत्‍या केली आहे, असे त्‍या व्‍यक्‍तीला (अनुपम) वाटत असते, अशी कथा चित्रपटात दाखवण्‍यात आली आहे. २००५ मध्‍ये जहनु बरुआने हा चित्रपट आणला होता.


Exclusive : दुर्गम भागातून थेट 'उमेद'च्या वसतीगृहात! कोल्हापुरात वानरमारी समाजातील पहिलाच मुलगा दहावी पास



कोल्हापूर जिल्ह्यातील वानरमारी समाजातील यापूर्वी कोणीही दहावी पास झाले नाही. पण यंदाच्या दहावी परीक्षेत याच समाजातील परसु पोवार या विद्यार्थ्याने यश मिळवलं आणि दहावी परीक्षा उत्तीर्ण केली. जंगल खोऱ्यातून राहणारा हा समाज आहे. शिक्षणापासून दूर असलेल्या या समाजातीलच परसूची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. शिक्षण घेणे तर दूरचं; पोटासाठी मिळेल ते काम करून अर्थाजन करणाऱ्या या समाजातील परसु पोवार या मुलाने मिळवलेले यश वाखाणण्याजोगे आहे.

परसु पोवार हा शाहूवाडी तालुक्यातील आयरेवाडी गावातला रहिवासी आहे. तो २०२३ च्या दहावीच्या परीक्षेत ४८.२० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला. श्रीराम हायस्कूल, भाग शाळा कोपार्डे येथे तो शिकत आहे. पुढे व्यावसायिक शिक्षण घेण्याची इच्छा मनाशी बाळगून परसूची वाटचाल सुरु आहे.

२०१९ पासून उमेद फौंडेशनच्या वसतीगृहात तो आणि त्याची ३ भावंडे राहतात. सांगरुळ येथील उमेद फौंडेशनने त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. मुलांचे शिक्षण पूर्ण होऊन ते स्वावलंबी होऊपर्यंत ह्या मुलांची जबाबदारी उमेद फौंडेशन उचलते. शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी उमेद फौंडेशन कार्यरत आहे.

दरम्यान, उमेद फौंडेशन आणि या फौंडेशनचे सदस्य दशरथ आयरे यांनी पोवार भावंडांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य केले आहे. दशरथ आयरे यांच्या गावातील वानरमारी समाजातील ही मुले होती. उमेद २०१५ पासून या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करत असे. त्यावेळी ही मुले घरीच होती. उमेदचे वसतीगृह सुरु झाल्यानंतर या भावंडांना उमेद फौंडेशनच्या वसतीगृहात प्रवेश देण्यात आला, अशी माहिती उमेद फौंडेशनचे अध्यक्ष प्रकाश कृष्णात गाताडे यांनी दिली आहे.

दुर्गम भागात राहणारा, फिरस्ती असणारा हा समाज शाहूवाडीच्या जंगलामध्ये स्थायिक झालाय. पक्की घरे नाहीत; पण झोपड्यांमध्ये राहणारा, अगदी कमी बोलणाऱ्या आणि संख्येने तुरळक असणाऱ्या या समाजापर्यंत ‘परसू पवार पास झालाय’, ही आनंदाची बातमी अद्याप पोहोचलेली नाही. कारण, जंगलात राहणाऱ्या या समाजापर्यंत संदेश पोहोचवणाऱ्या माध्यमांचा तसा अभाव आहे. त्यामुळे जेव्हा परसुच्या कुटुंबीयांना ही आनंदाची बातमी कळेल, तेव्हा त्यांचा आनंद गगनात न मावणारा असेल, हे नक्की!

Friday, May 19, 2023

Prarthna Behere | जेव्हा मराठी अभिनेत्री मोनोकिनी घालतात, बिघडतं कुठं?



बिकिनी वा मोनोकिनी घालून बोल्ड फोटोशूट करणं, हे काही नवीन गोष्ट राहिली नाहीये. तमाम कलाकार जेव्हा बोल्ड फोटोशूट करतात, तेव्हा त्यांची चर्चा होतचं राहते. चर्चेत येण्याचं हे एक माध्यम आहे, असं म्हटलं जातं. पण, एखाद्या मराठी (Prarthna Behere) अभिनेत्रीने असं काही केलं तर मात्र वेगळं घडतं. जणू काही तरी जगावेगळं केलं आहे, असं लोक बोलू लागतात. पण, जेव्हा मराठी अभिनेत्री बिकिनी, मोनोकिनी घालतात, तेव्हा बिघडतं कुठं? (Prarthna Behere)

नुकताच प्रार्थना बेहरेने मोनोकिनी बाथिंग सूटमध्ये हॉट फोटोशूट केल्याने तिची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होतेय. अनेक जण तिला संस्कृतीबद्दल बोलताना दिसत आहेत. तर चाहत्यांनी तिचे समर्थन केले आहे. काहींनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. ट्रोलिंग सामोरे जाणारी प्रार्थना ही पहिली अभिनेत्री नाही. ती एक मराठमोळी अभिनेत्री म्हणून तिला अशा प्रकारे टीकेला सामोरे जावे लागत आहे.

याआधी सई ताम्हणकर, पूजा सावंत, रसिका सुनील, शिकारी फेम नेहा खान या अभिनेत्रींचेही मोनोकिनी, बिकिनीतील फोटो सर्वांसमोर आले होते. मग, प्रार्थनाने केलं म्हणून काय बिघडलंय? उलटपक्षी, बॉलिवूड वा टॉलिवूडमध्ये अभिनेत्री मोनोकिनीमध्ये सर्रास दिसत असतात. तेव्हा त्यांचे गोडवे पाहायला मिळतातचं की!

 

मोनोकिनी ही बिकिनीसारखाचं प्रकार असतो. मोनोकिनीला वनपीस स्वीम वियर असेही म्हटले जाते. जगभरात मोनोकिनीला पसंती आहे. बाजारात अनेक प्रकारच्या मोनोकिनी, वेगवेगळ्या डिझाईन्स आणि रंगामध्ये उपलब्ध होते. अभिनेत्री हॉल्टर, त्रिकोणी, ब्राझिलियन, कटआऊट इत्यादी मोनोकिनी परिधान केलेल्या दिसतात. आतात तर नव्या फॅशन ट्रेंडनुसार बाथिंग सूट फ्रिल, कशीदाकारी मोनोकिनी, प्लीटेड मोनोकिनी, रफल्ड टॉप, साईड-कटआउट, प्रिंटेड मोनोकिनी सहज उपलब्ध होतात. त्यामुळेच जगभरात मोनोकिनीची मागणी इतकी आहे की, त्याचा पुरवठा अनेक इंडस्ट्री करतात. तुम्हाला त्या बाजारात सहजरित्या विकत घेता येतात.

 
मोनोकिनीचा पहिला प्रकार हा बाथिंग सूट होता. रुडी गर्नेरिचने १९६४ मध्ये मोनोकिनी बनवली होती. पण, ती फॅशनसाठी नव्हती. असो.
मोनोकिनीमध्ये महिलांची बोल्ड काया दिसते. त्यालाच लोक 'अंगप्रदर्शन' असं म्हणतात. पण, मुळात अंगप्रदर्शन करणं ही संकल्पनाच वेगळी आहे. ती वेगवेगळ्या कारणांसाठी असू शकते. येथे बोल्ड फोटोशूट केलं, म्हणजे अंगप्रदर्शन केलं असा अर्थ होत नाही. किंवा यात अश्लिलता दिसण्यासारखे काहीचं नाही. मादक दिसणं या मोनोकिनीच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य आहे, असे म्हणता येईल. मोनोकिनी हे त्या-त्या अभिनेत्रीच्या किंवा महिलेच्या बाह्य सौंदर्यात भर टाकण्याचं काम करतं, असंही म्हणायला हरकत नाही.

ज्या महिला बिकिनी परिधान करू शकत नाहीत, त्यांना मोनोकिनी एक उत्तम पर्याय आहे, असंही म्हटलं जातं. फॅशनच्या ट्रेंडमध्ये सातत्य ठेवणे, यासाठी एक उत्तम स्वीमसूट म्हणून मोनोकिनी वापरली जाते. जगभरातील फॅशन डिझायनर मोनोकिनीच्या विविधांगी फॅशनसाठी काम करताना दिसतात. मागणीनुसार, या मोनोकिनीचं स्ट्रक्चर स्टाईल बनवलं जातं. लोकप्रिय स्विमिंग सूट्सपैकी फुल-स्लीव्ह स्पोर्टी दिसणारी मोनोकिनी तर खासकरून अनेक दिवांसाठी बनवली जाते.

संकुचित विचार ठेवणारे मात्र आपल्या संस्कृतीबद्दल भरभरून बोलत असतात आणि लोक काय म्हणतील, हा प्रश्नचं मुळात मागे पडला आहे. त्यामुळे कितीही टीका झाली तरी उलट हा फॅशन ट्रेंड वाढत राहणार, हे एकूणचं बदलेल्या परिस्थितीतून दिसतं.

 https://pudhari.news/soneri/523027/marathi-actress-wear-monokini-shared-photos-on-social-media/ar

Jiah khan Verdict : हकनाक गेली जिया खान; प्रेम फुलण्याआधीच कोमजलं




स्वप्नांच्या पंखावर स्वार होऊन चित्रपट इंडस्ट्रीत उतरलेल्या एक निरागस अभिनेत्री जिया खानचा बळी गेला. तिच्या आयुष्यात असं काय घडलं होतं की, तिला आपले जीवन संपवावे लागले. एखादी मोठी घटना घडल्याशिवाय, इतके मोठे टोकाचे पाऊल ती उचलणार नाही! (Jiah khan Verdict ) जिया खानने जून २०१३ रोजी स्वत:चे जीवन संपवले होते. या प्रकरणी तिचा तथाकथित बॉयफ्रेंड सूरज पांचोलीला पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी जिया आणि सूरज लिव्‍ह इन रिलेशनशीपमध्‍ये होते, असे म्हटले जात होते. आज जवळपास १० वर्षे कोर्टात सुरु असलेल्या जिया खान मृत्यूच्या प्रकरणात सूरज पांचोली निर्दोष सुटला आहे. पण, तिचा मृत्यू झाला तर तो कुणामुळे झाला? हा प्रश्न येथे रहस्यमय बनून राहिला आहे. (Jiah khan Verdict )

कुणीही आपले आयुष्य असं सहजासहजी संपवत नाही. आयुष्यात काहीतरी गंभीर घटना घडली असेल तर असे पाऊल उचलले जाते. आज तिच्या नसण्याने एका सुंदर अभिनेत्रीला गमावल्याचं दु:ख तर आहेच. शिवाय तिच्यासोबत तिचं इंडस्ट्रीत आपलं नाव कमावण्याचं सुंदर स्वप्नदेखील मातीमध्ये विरून गेलं.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बनण्याचं स्वप्न विरून गेलं

जिया खानचा जन्म २० फेब्रुवारी १९८८ रोजी न्यू-यॉर्कमध्ये झाला होता. न्यू-यॉर्कमध्ये न राहता जियाने आपली पावले सातासमुद्रापार भारतात बॉलिवूडकडे वळवली. तिने चित्रपट अभिनय आणि इंग्रजी साहित्याचे शिक्षण घेतले. तिचे चेहऱ्यावरचे भावच सर्वकाही सांगून जायचे. कुरळे केस, छोटे आकर्षित करणारे डोळे, मोठं कपाळ आणि लांब नाकामुळे जियाला ग्लॅमर मिळवणं सोपं होतं. 

वयाच्या १६ व्या वर्षी जियाला तुमसा नहीं देखा चित्रपट ऑफर झाला होता. परंतु, तिच्या लूकमुळे तिच्या जागी दिया मिर्जाला रिप्लेस करण्यात आलं. दोन वर्षांनंतर जियाला २००७ मध्ये राम गोपाल वर्माचा चित्रपट 'नि:शब्द' मिळाला. ज्यामध्ये अमिताभ बच्चन मुख्य नायक म्हणून होते. आपल्या वयापेक्षा तिप्पट अभिनेत्यासोबत तिने किसिंग सीन दिले. हा चित्रपट फ्लॉप झाला. पण फिल्मफेअरमध्ये बेस्ट डेब्यूसाठी ती नॉमिनेट झाली होती. लवकरच तिला २००८ आमिर खानच्या गझनी चित्रपटात संधी मिळाली. बिग बी अमिताभ बच्चन यांनी तिच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं. तिचा अभिनय सहज सुंदर होता ते गझनी चित्रपटातून आपण पाहिलचं आहे. छोट्या करिअरमध्ये ग्लॅमर मिळवणारी अभिनेत्री म्हणून जियाला प्रसिद्धी मिळाली होती.

पुढे जिया खानने कॉमेडी जॉनरमध्ये पाऊल ठेवलं. दिग्दर्शक साजिद खानचा चित्रपट हाउसफुलमध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती. यामध्ये ती अक्षय कुमारसोबत झळकली. अभिनयाशिवाय, जिया ट्रेन्ड सिंगर आणि डान्सरदेखील होती. जिया बालपणापासून उर्मिलाची फॅन होती. 'दिल से' मध्ये जियाने बाल कलाकाराची भूमिका केली होती.

बहरत्या करिअर दरम्यान, सूरज पांचोली तिच्या जीवनात आला. पण, तिचं प्रेम फुलण्याआधीच कोमजलं गेलं. दोघांचे प्रेम सर्वश्रुत होते. दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असल्याचे वृत्तही समोर आले होते. पण असं काय घडलं की, जियाने इतक्या धाडसाचे पाऊल उचलले. आपले जीवन संपवण्याआधी जिया आईशी फोनवरून बोलली होती. तिने एक चिठ्‍ठीदेखील लिहिली होती. त्‍यामध्‍ये तिने अनेक मोठे खुलासे केले होते. तिने सूरजचे नाव पत्रात घेतले नव्हते. मी सर्वकाही गमावलं आहे म्हणत तिने पत्रात 'त्याने' आपलं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचेही म्हटले होते.

सूरज पांचोली नेहमीच निर्दोष असल्याचे म्हणत राहिला...

जुलै २०१४ मध्ये उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्‍यात आला होता. याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात जियाला सूरजने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे म्हटले गेले होते. सीबीआयने सूरजला ताब्‍यात घेऊन चौकशीही केली होती. सूरजने पॉलीग्राफी आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्‍यास नकार दिला होता. सूरजने तुरूंगातून बाहेर आल्यानंतर मीडियाला सांगितले होते की, जिया करिअरविषयी डिप्रेशनमध्ये होती. तिच्या मित्रांनी तिची साथ सोडली होती. ती प्रत्येक छोट्या गोष्टींवरून फोन करायची, खूपच पझेसिव्ह होती. जियाच्या मृत्ययू प्रकरणी सूरज नेहमीच आपण स्वत: निर्दोष असल्याचे म्हणत होता.

जिया खानने वयाच्या २५ व्या वर्षी आत्‍महत्‍या केली होती. जियाचा मृत्‍यू आजदेखील न सुटलेले कोडे आहे. एक अशी अभिनेत्री जिने आपल्या करिअरमध्ये सर्व काही मिळवलं. यश, प्रसिद्धी, ग्लॅमर मिळवणाऱ्या जियाचं दु:ख शेवटपर्यंत जगापासून लपून राहिलं.

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...