Tuesday, April 10, 2018

'पॅड'च हितावह

काही दिवसांपूर्वी कोल्‍हापुरातील स्‍त्री-रोगतज्‍ज्ञ डॉ. शर्वरी निरगुंडे यांच्‍याशी भेट झाली. बोलता बोलता पॅडमॅन या सिनेमाचा विषय निघाला. नुकताच रिलीज झालेल्‍या पॅडमॅन सिनेमाने महिलांच्‍या मासिक पाळीत सॅनिटरी नॅपकिन किती महत्त्‍वाचं आहे, हे दाखवून दिलं.  त्‍यानिमित्ताने महिलांच्‍या मासिक पाळीचा देशभर व्‍यापक प्रमाणात चर्चिला जातोय. ही चांगली गोष्‍ट आहे. पॅडवर आमच्‍या गप्‍पाही रंगल्‍या. डॉक्‍टरांशी चर्चा झाल्‍यानंतर मनात काही प्रश्‍न उभे राहिले. 
एक गोष्‍ट प्रकर्षाने जाणवली की, आजही काही तरुणी, महिला मासिक पाळीत सॅनिटरी नॅपकिन वापरत नाहीत. मासिक पाळीत सॅनिटरी नॅपकिनचा वापर प्रत्‍येक महिलेने करायला पाहिजे. पण, असे होत नाही. आजही काही महिला कापडच वापरतात, जे आरोग्‍याला हानिकारक आहे.   हाच मुद्‍दा धरून जर विचार केला तर आपल्‍या देशात महिलांच्‍या आरोग्‍याच्‍या प्रश्‍न आजही गंभीर आहे.  पण, वास्‍तविक पाहता त्‍याकडे म्‍हणावं तसं लक्ष दिलं गेलेलं नाही. विशेष म्‍हणजे, महिलांच्‍या मासिक पाळी समस्‍या आणि आरोग्‍याचा विषय अजूनही दुर्लक्षित आहे. त्‍यातला त्‍यात म्‍हटलं तर मासिक पाळीतील स्‍वच्‍छता हा अतिशय महत्त्‍वाचा विषय आहे. 
देशातील एकूण परिस्‍थिती पाहता ग्रामीण असो वा शहरी महिलांच्‍या आरोग्‍याचे अनेक प्रश्‍न आहेत. या प्रश्‍नांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्‍याने अनेक तरूणी, महलांना वेगवेगळ्‍या आजार, विकारांना सामोरे जावे लागते. त्‍यात पाळीसारखा संवेदनशील विषय असल्‍याने उघडपणे बोलायला धजत नाहीत. अशावेळी जनजागृती हा उत्तम उपाय आहे. तसेच महिलांना स्‍वस्‍तात सॅनिटरी नॅपकिन उपलब्‍ध करून देण्‍यासाठी सरकारने योजना आणाव्‍यात. जर महिलांचं स्‍वास्‍थ्‍य जपणं खूप गरजेच आहे. 
हल्‍ली नवव्‍या-दहाव्‍या वर्षीच मुलींना पाळी येण्‍यास सुरूवात होते. त्‍याची कारणेही वेगळी असू शकतात. पण, आता हे नैसर्गिकपणेच घडत असल्‍याचं चित्र आहे. त्‍यात महत्त्‍वाचं म्‍हणजे शालेय पातळीवर मुलींना सॅनिटरी नॅपकिनबाबत सांगितले पाहिजे. आज टीव्‍हीवरून सॅनिटरी नॅपकिनच्‍या जाहिराती दाखवल्‍या जातात. पण, तरीही काही मुली कापड वापरण्‍यावरच भर देतात. या संदर्भामध्‍ये पालकांनी आपल्‍या मुलींना सांगितलं पाहिजे. त्‍यात पाळी येणं म्‍हणजे विटाळ असा समज आपल्‍याकडे आहे. पाळी येण्‍याची प्रक्रिया ही नैसर्गिक आहे. त्‍यात शुभ-अशुभ असं काही नसतं. हा अंधश्रध्‍देचा भाग आहे, हे समजावून सांगितलं पाहिजे. 
कापड वापरणार्‍या तरूणी, महिलांना भविष्‍यात अनेक समस्‍यांना तोंड द्‍यावे लागते. त्‍यात जंतुसंसर्ग, त्‍वचाविकार, गुप्‍तांगाला खाज येणं यासारख्‍या विकारांना सामोरे जावे लागते. एकतर मासिक पाळीत कापडाची घडी कमीत कमी सहा तासांनी बदलली जाते. कामाच्‍या घाईत त्‍याकडे लक्ष दिले जात नाही किंवा बदललं जात नाही. यावेळी जंतुसंसर्ग होण्‍याची शक्‍यता असते. जे कापड असतं ते सुती असावं लागतं. शिवाय स्‍वच्‍छ धुवून उन्‍हात वाळवले गेले पाहिजे. तसेच तते वारंवार न वापरता किमान दोन ते तीन महिन्‍यांनंतर नवीन कापड वापरायला हवं लागते. पण, अशा कापडांमुळे काही वेळा जंतुसंसर्ग होणे, गुप्‍तांगाला खाज होणे, फंगल इन्‍फेक्‍शन यासारख्‍या समस्‍या उद्‍भवतात. त्‍यामुळे सॅनिटरी नॅपकिनच वापरणं हितावह आहे.
दुसरी एक बाजू अशी की, सॅनिटरी नॅपकिनमध्‍ये डायऑक्‍झिन नावाचा घटक असतो. नॅपकिनमध्‍ये हे घटक अधिक असतील तर कॅन्‍सरसारखे आजार होतात, असं म्‍हटलं जातं. पण, याबाबत अद्‍याप अनभिज्ञता आहे. पीरियडमध्‍ये डायऑक्‍झिन फ्री पॅड्‍स वापरावे लागतात. हे पॅड्‍स खर्चिक असले तरी आरोग्‍याच्‍या दृष्‍टिने ते चांगले असतात. आज कमी किमतीचेही पॅड बाजारात उपलब्‍ध आहेत. पण, हे पॅडदेखील खरेदी करणे काही महिलांना परवडत नाही. बर्‍याचदा सर्वसामान्‍य कुटुंबातील मुलींना पॅड खरेदी करणे परवडत नाही. गरीब कुटुंबात एक वेळचं जेवण मिळणेही मुश्‍किल आहे, त्‍यांनी काय करायचं? महिलांसाठी ही गरजेची बाब आहे, यासाठी सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत. 
आता काही शाळांमध्‍येही पॅड मशिन बसवण्‍यात आले आहेत. काही शाळांमध्‍ये पॅडचं मोफत वितरण केलं जातंय. शिवाय, याबद्‍दल कार्यशाळा भरवून मार्गदर्शनही केलं जातं. पण, याचंबरोबर वापरलेले पॅड तसेच न टाकून देता ते विल्‍हेवाट कसे करावे, यासाठी मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. 
सरकार अनेक योजना राबवत आहे. महिलांसाठी स्‍वस्‍त दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्‍ध करून देण्‍यासाठी सरकारने गांभीर्याने विचार करायला पाहिजे. महिलांसाठी पॅड ही गरज आहे त्‍यामुळे सरकारने पॅडवरील जीएसटी रद्‍द करावा, अशी अनेक महिला संघटनांची मागणी आहे. तसेच शाळेतून पॅड डिस्‍पोजल मशीन्‍स बसवण्‍यात यावेत, अशीही मागणी होऊ लागली आहे. सेवाभावी संस्‍थाही यात सहभागी झाल्‍या तर पॅड डिस्‍पोझल मशीन बसवणे सहज शक्‍य आहे. त्‍या-त्‍या परिसरातील सेवाभावी संस्‍थानी जर सहकार्य केलं तर त्‍या योजनेसाठी सरकारवर अवलंबून राहावं लागणार नाही. मशीन उपलब्‍ध झाली तर हा प्रश्‍न सुलभ होईल. शिवाय पर्यावरणाची निगा राखली जाईल. कारण, पॅड नष्‍ट व्‍हायला बरीच वर्षांचा कालावधी लागतो, असे म्‍हटले जाते. त्‍यामुळे पर्यावरणाच्‍या संरक्षणाच्‍या दृष्‍टीनेही याचा गांभीर्याने विचार व्‍हायला पाहिजे. 

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...