Sunday, September 22, 2019

अभिनेत्री दुर्गा खोटे यांच्‍यासारखं धाडस कुणी केलं नव्‍हतं!



एकेकाळी सिनेजगतात महिलांनी काम करायचं धाडस कुणी केलं नाही. परंतु, अभिनेत्री दुर्गा खोटे यांनी पडद्‍यावर एक महिला म्‍हणून अभिनयाला सुरूवात केली. त्‍यामुळे चित्रपटसृष्‍टीत अभिनेत्री येऊ शकल्‍या. असंख्‍य तरुणींना, महिलांना इंडस्‍ट्रीची कवाडे उघडली. पद्मश्री सन्‍मानित अभिनेत्री दुर्गा खोटे यांची आज पुण्‍यतिथी.

दुर्गा खोटे ज्‍यावेळी सिनेजगतात आल्‍या, त्‍यावेळी पुरुषचं स्‍त्री पात्राची भूमिका साकारायचे. दुर्गा खोटे यांच्‍यावर अशी वेळ आली की, त्‍यांनी धाडस दाखवून सिनेइंडस्‍ट्रीत पाऊल ठेवलं. आणि महिलांना अभिनय क्षेत्राचा दरवाजा उघड केला. 

१४ जानेवारी १९०५ रोजी दुर्गा यांचा जन्‍म मुंबईत झाला. कॅथ्रेडल हायस्कूल आणि सेंट झेवियर्स कॉलेजमध्‍ये शिक्षण घेऊन पुढे त्‍यांनी बी.ए.ची पदवी घेतली. मूक चित्रपटांतून त्‍यांनी आपल्‍या सिनेकरिअरला सुरुवात केली होती. दुर्गा यांनी १९३१ मध्‍ये प्रभात फिल्‍म कंपनीचा मूक चित्रपट 'फरेबी जाल'मध्‍ये एक छोटीशी भूमिका केली होती. त्‍यानंतर दुर्गा खोटे यांनी व्‍ही. शांताराम यांचा मराठी चित्रपट 'अयोध्‍येचा राजा' (१९३२) मध्‍ये काम केलं. या चित्रपटात दुर्गा खोटे यांनी राणी तारामतींची भूमिक साकारली होती. या यशस्‍वी चित्रपटामुळे दुर्गा खोटे प्रसिध्‍दीच्‍या झोतात आल्‍या. प्रभात फिल्‍म कंपनीने १९३२ मध्‍ये 'माया मछिन्‍द्र' चित्रपट आणला. त्‍यात दुर्गा यांनी एका धाडसी योध्द्‍याची भूमिका केली होती. योध्‍द्‍याच्‍या भूमिका साकारताना त्‍याप्रकारची वेशभूषा करणं, हातात तलवार वगैरे, हे त्‍याकाळी अचंबित करणार होतं.

१९३४ मध्‍ये कलकत्ता ईस्‍ट इंडिया कंपनीचा 'सीता' चित्रपट प्रदर्शित झाला. त्‍यात मुख्‍य भूमिकेत दुर्गा खोटे आणि पृथ्‍वीराज कपूर होते. एक उत्तम अभिनेत्री ओळख मिळाली ती, १९३६ मध्‍ये प्रदर्शित झालेला चित्रपट 'अमर ज्‍योती.' प्रभात फिल्‍म कंपनीने देवकी कुमार बोस दिग्‍दर्शित अमर ज्‍योती चित्रपट आणला. त्‍यातील त्‍यांची सौदामिनीची भूमिका आजही आठवणीत राहणारी आहे. चित्रपटातील दमदार अभिनयाने त्‍यांची गणना शीर्ष अभिनेत्रींमध्‍ये होऊ लागली.

वयाच्‍या २६ व्‍या वर्षी पतीचे निधन

दुर्गा खोटे यांचं सुरूवातीचं जीवन सुखकर होतं. परंतु, त्‍या २६ वर्षांच्‍या असताना त्‍यांचे पती विश्‍वनाथ खोटे यांचे निधन झाले. त्‍यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी दुर्गा यांच्‍यावर आली. त्‍यामुळे सिनेजगतात पाऊल ठेवण्‍याचा निर्णय त्‍यांनी घेतला. दरम्‍यान, त्‍यांचा लहान मुलगा हरिन याचा मृत्‍यू झाला.

दोनशे चित्रपटांत अभिनय

दुर्गा खोटे यांनी मराठी आणि हिंदी मिळून एकूण २०० चित्रपटांत काम केले. अनेक हिंदी चित्रपटात त्‍यांनी आईची भूमिका पार पाडली. त्‍याचबरोबर अनके नाटकांतही काम केले. मराठी रंगभूमीवर अनेक वर्षे त्‍या सक्रिय राहिल्‍या. मुंबई मराठी साहित्‍य संघासाठी त्‍यांनी अनेक नाटकांत काम केले. शेक्‍सपिअरचे प्रसिध्‍द नाटक 'मॅकबेथ' हे व्‍ही. व्‍ही. शिरवाडकर लिखित राजमुकुट नाटकात (मराठी) दुर्गा यांनी 'लेडी मॅकबेथ' यांची भूमिका साकारली. शिवाय, त्‍यांनी त्‍यांची कंपनी फॅक्‍ट फिल्‍म्‍स आणि नंतर दुर्गा खोटे प्रोडक्‍शन्‍सच्‍या बॅनर अंतर्गत ३० वर्षांहून अधिक कालावधीपर्यंत अनेक लघु चित्रपट, जाहिराती आणि मालिकांची निर्मिती केली. 'वागले की दुनिया' ही छोट्‍या पडद्‍यावरील त्‍यांची मालिका लोकप्रिय बनली होती.

विजय भट्‍ट यांचा क्‍लासिक चित्रपट 'भरत मिलाप' (१९४२) मध्‍ये त्‍यांनी कैकयीची भूमिका साकारली. दिग्‍दर्शक के. आसिफ यांचा बहुचर्चित चित्रपट 'मुगल-ए-आजम'मध्‍ये (१९६०) सलीमची आई जोधाबाईची भूमिका साकारली होती. या अभिनयाने त्‍यांच्‍या करिअरला चारचाँद लावले.

'चरणों की दासी', 'मिर्जा गालिब', 'बॉबी', 'विदाई', 'चाचा भतीजा', 'जय बजरंगबली', 'शक', अभिमान, 'बावर्ची', 'पापी', 'कर्ज', 'पहेली', 'चोर सिपाही', 'साहेब बहादुर', 'राजा जानी' यासारखे त्‍यांनी एकापेक्षा एक चित्रपट केले.

दादासाहेब पुरस्‍काराने सन्‍मानित

भारतीय चित्रपटात योगदान दिल्‍याबद्‍दल दुर्गा यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्‍मानित करण्‍यात आलं होतं. १९६८ मध्‍ये दुर्गा यांना पद्मश्री पुरस्‍काराने गौरवण्‍यात आले. १९५८ मध्‍ये त्‍यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला. चित्रपट 'विदाई'मध्‍ये उत्‍कृष्‍ट अभिनय केल्‍याबद्‍दल त्‍यांना १९७४ मध्‍ये सहाय्‍यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.

मराठीत आत्‍मचरित्र

त्‍यांनी मराठीत 'मी दुर्गा खोटे' हे आत्‍मचरित्र लिहिलं होतं. हिंदी आणि मराठी चित्रपटांशिवाय त्‍यांनी रंगभूमीसाठी दिलेले योगदान अमूल्‍य आहे. दुर्गा खोटे यांनी २२ सप्‍टेंबर १९९१ रोजी जगाचा निरोप घेतला.

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...