आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता प्रियदर्शन जाधव मूळचा कोल्हापूरचा. तो उत्तम कलाकार, अभिनेता आहे. टाईमपास २ सारखा हिट चित्रपट देणारा प्रियदर्शनला आता कोल्हापुरात येऊन चित्रपट बनवायचायं. विशेष म्हणजे कोल्हापुरातील कलाकारांना घेऊन कोल्हापुरातचं चित्रपट बनवण्याचं त्याचं स्वप्न आहे. या त्याच्या ड्रीम प्रोजेक्टबद्दल 'पुढारी ऑनलाईन'ने मराठमोळा अभिनेता प्रियदर्शन जाधवशी विशेष संवाद साधला.
कोल्हापूरशी असलेलं नातं प्रियदर्शनने जपयलं. त्याचा जन्म कोल्हापुरात झाला आणि आपण कोल्हापुरचं काहीतरी देणं लागतो, या भावनेतून तो चित्रपटाची निर्मिती करणार आहे. सुरूवातीपासूनच प्रियदर्शनला दिग्दर्शक व्हावं असं वाटत होतं. आणि त्याचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो प्रयत्न करत आहे.
प्रियदर्शन म्हणाला, 'मी कोल्हापुरात लहानाचा मोठा झालो. कोल्हापूर या शहराला घेऊन काही करता येईल का? या शोधात मी होतो. आणि ती गोष्ट मला मिळाली आहे. कोल्हापुरातले लोक, कलाकार, तंत्रज्ञ, मेकअप आर्टिस्ट घेऊन चित्रपट करावा असं मला वाटतयं आणि मी तो लवकरच करेन.'
प्रियदर्शन दिश्दर्शनाकडे कसा वळला, याबाबत त्यानं सांगितलं की, 'जरी मी मुंबईत राहत असलो तरी कोल्हापूरशी नातं मी जपलयं. माझं जन्मस्थान कोल्हापूर आहे. कोल्हापूरसाठी काहीतरी करायचं होतं. मला दिग्दर्शन आणि अभिनय दोन्हीही करता येतं. माझ्या अखत्यारित मला जे काही करता येईल, ते मी करणार. त्यामुळे या चित्रपटातून कोल्हापुरातल्या कलाकारांचं टॅलेंट समोर येईल. कोल्हापुरात उत्तम सिनेमा होऊ शकतो, हे करून दाखवायचं आहे. सिनेमाची कथा लिहायचं सुरू आहे. सध्या चित्रपट निर्मात्यांचा शोध घेणंही सुरू आहे. कोल्हापुरात खूप चांगले कलाकार आहेत. नाट्यसंस्था आहेत, नाटक, एकांकिका पातळीवर कलाकार काम करताहेत. त्यांच्यासाठी कोल्हापूर हे उत्तम व्यासपीठ आहेच. फक्त मदत घ्यावी लागेल ती, तंत्रज्ञानाची. कॅमेर्याशी निगडित तंत्रज्ञान, गोष्टी आहेत, ते मुंबईतून मागवावे लागतील. कोल्हापुरात एडिटर, कॉस्ट्यूम डिझायनर मिळतील, मेकअप आर्टिस्ट मिळतील, प्रोडक्शन असेल, असिस्टंट डायरेक्टर उपलब्ध होतील. त्या सगळ्या गोष्टी घेऊनच चित्रपट बनवायचा आहे. यासाठी मुंबईचा एखादा निर्माता घेऊन चालणार नाही. तर कोल्हापूर जाणणारा आणि कोल्हापूरची सगळी माहिती असणारा निर्माता हवा आहे. कोल्हापुरातल्या लोकांनी एकत्र येऊन केलेला हा सिनेमा असणार आहे.'
चित्रनगरीसह संपूर्ण कोल्हापुरात चित्रपटाचं शूटिंग करणार असल्याचं त्यानं सांगितलं. गेली १८ वर्षे तो मुंबईत दिग्दर्शन क्षेत्रात आहे. जवळपास ११ व्यावसायिक नाटकांचं दिग्दर्शन प्रियदर्शनने केलं आहे. 'टाईमपास' या चित्रपटाची पटकथाही प्रियदर्शनने लिहिली होती. तसचं 'टाईमपास २' मध्ये त्याने काम केलं आहे. शिवाय, पटकथादेखील त्यानेच लिहिली होती. भरत जाधवचा 'जत्रा' चित्रपटाचे संवाद लेखनही प्रियदर्शनने केलं होतं. त्यामुळे आता त्याचं दिग्दर्शनाकडे पडलेलं पाऊल स्वागतार्ह आहे. दिग्दर्शन आणि अभिनय दोन्हीही सुरुच ठेवणार असल्याचं प्रियदर्शनने सांगितलं.
खंबीर निर्मात्याची गरज
चित्रपटासाठी फायनान्सर शोधण्यापासून सुरुवात झाली आहे. खंबीर निर्मात्याची आवश्यकता असून त्याबाबतचं आवाहन त्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं आहे. निर्माता मिळाला की चित्रपटाचे शूटिंग सुरू करू, त्याबद्दलची माहिती सोशल मीडियावरून दिली जाईल, असेही त्याने यावेळी सांगितले.
कोल्हापूरच्या कलाकारांना सुवर्णसंधी
प्रियदर्शन जाधवच्या या चित्रपटात काम करण्यासाठी कोल्हापूरच्या कलाकारांना सुवर्णसंधी मिळणार आहे. कोल्हापुरातील कलाकारांना आपलं कौशल्य, अभिनय सर्वांसमोर आणता येणार आहे. हे जर प्रत्यक्षात साकारलं तर कोल्हापूरनगरी खर्या अर्थाने चित्रनगरी होईल.
प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित 'मस्का'
लवकरच प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित 'मस्का' हा विनोदी चित्रपट १ जून २०१८ ला रिलीज होतोय. त्यात अभिनेत्री प्रार्थना बेहरे, अनिकेत विश्वासराव हे प्रमुख भूमिकेत असून पुरुषोत्तम पाटील, धनंजय साठे, चिन्मय मांडलेकर, शशांक शेंडे, प्रणव रावराणे यांच्याही भूमिका आहेत. प्रार्थना बेहरे आणि अनिकेत ही जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. 'मस्का' चित्रपटात तीन गाणी असून चिनार-महेश यांनी संगीत दिलं आहे.
No comments:
Post a Comment