प्रिय अमृता,
नावाप्रमाणेच गोड असणारी अमृता. तुझ्या नावातचं अमृत. म्हणून तुझ्या अभिनयालाही अमृताचा गोडवा. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत तू आपलं नाव कमावलंस. सगळ्यात आधी तुला (अभिनेत्री अमृता खानविलकर) वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अमृता तुझे मराठीतले अनेक चित्रपट हिट ठरले. नटरंग, कट्यार काळजात घुसली, बाजी याचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. परंतु, अमृता खानविलकर म्हटलं की, आठवते ती, हिंदीतील राजीमधील अस्खलित उर्दू बोलणारी पाकिस्तानी गृहिणी. याच चित्रपटात मुनिराची म्हणजेच आलियाची मोठी जावेची भूमिका साकारून तू प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलीस.
बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणं तितकं सोप्पं नाही. चमचमत्या दुनियेतले सर्व अडथळे दूर करून तू सिनेसृष्टीत आपली एक खास ओळख बनवलीस. 'राजी', 'सत्यमेव जयते' हे सुपरहिट चित्रपट आणि 'डेमेज्ड' या वेबसीरीजमधून तू बॉलिवूडमध्ये नवी छाप सोडलीस.
तू एक सुंदर अभिनेत्री, एक उत्तम नृत्यांगना आणि एक सुशील गृहिणीदेखील आहेस. संसारात रमताना मात्र तू आपला अभिनय सोडला नाहीस. एकीकडे प्रपंच आणि दुसरीकडे करिअर यांची योग्य सांगड तू घातलीस. हिमांशु मल्होत्राशी असलेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तो पंजाबी असतानादेखील तू धर्म मध्ये कुठेच आणू दिला नाहीस आणि म्हणूनच तब्बल १० वर्षे एकमेकांनी डेट केल्यानंतर लग्नगाठ बांधलीस. हिमांशूदेखील छोट्या पडद्यावरचा अभिनेता. हिंदी मालिकांमध्ये त्याने आपली खास ओळख बनवलेली. तब्बल १५ वर्षे एकत्र असलेली तुमची जोडी आजही नव्याने प्रेमात पडल्यासारखी भासते.
अभिनयाबरोबरच कुठल्याही शोचं सूत्रसंचालन करणं तुला अवघड गेलं नाही. हे तू मराठी लाफ्टर शो कॉमेडी एक्सप्रेसमधून दाखवून दिलंस. चित्रपटांच्या वलयाभोवती फिरत असताना तू डिजीटल विश्वाकडेही लक्ष दिलेस. भविष्यातील करिअरची गती ओळखलीस आणि वेब सीरिजमध्ये काम करण्याचा निर्णय घेतलास. वेब सीरिजमध्ये काम करून तू स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करून लोकप्रिय होण्याची किमया साधलीस.
वेबसीरिजबरोबरच तू एका नव्या मराठी चित्रपटात दिसणार असल्याने तुला पाहण्यासाठी उत्कंठा लागून राहिली आहे.
अमृता या यशस्वी वाटचालीमध्ये तुझ्या चाहत्यांचीदेखील तुला मोलाची साथ आहेच.
- तुझी चाहती
स्वालिया


No comments:
Post a Comment