
स्मिता पाटील : जन्मदिनानिमित्त
स्मिता पाटील ही जागतिक कीर्तीची अभिनेत्री खर्या अर्थाने महाराष्ट्राची अस्मिता. शाळेत असताना स्मिताने नाटकात छोट्या-मोठ्या भूमिका केल्या होत्या. आई-वडिलांमुळे तिने राष्ट्र सेवा दलात काम केले. नंतर तिने थिएटर ॲकॅडमीच्या 'बीज' या नाटकात तसेच, वसंत बापट यांच्या 'भारत दर्शन' या सांस्कृतिक कार्यक्रमातही भाग घेतला होता. भारत दर्शनचे बर्याच ठिकाणी प्रयोग झाले. सई परांजपे यांच्या 'वासनाकांड' या नाटकासाठी स्मिताने काम केलं होतं. पण, त्याचा अवघा एकच प्रयोग झाला. पुण्याला भावे हायस्कूलमध्ये शिकणारी स्मिता पुढे मुंबईला आली. मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये एफवायबीए करत असताना एक दिवस अचानक ती वृत्तनिवेदिका म्हणून मुंबई दूरदर्शनच्या पडद्यावर झळकली. दूरदर्शनच्या छोट्या पडद्याने स्मिताला अलगद रुपेरी पडद्यावर आणलं.

फिल्म इन्सिटट्यूटच्या अरुण खोपकर यांची डिप्लोमा फिल्म 'तीव्र मध्यम,' श्याम बेनेगल यांचा लहान मुलांचा चित्रपट 'चरणदास चोर,' 'मधली राणी,' 'राजा शिवछत्रपती' मधील सईबाई असं करता करता स्मिता श्याम बेनेगल यांच्या 'निशान्त'पर्यंत पोहोचली. श्याम बेनेगल यांच्या 'मंथन'मधल्या भूमिकेसाठी स्मिताला 'फिल्म वर्ल्ड'चं आणि 'बेंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन'चं 'बेस्ट ॲक्ट्रेस ॲवॉर्ड' आणि 'फिल्मफेअरचं बेस्ट ॲक्ट्रेस-स्पेशल ॲवॉर्ड' मिळाला. 'निशान्त,' 'मंथन,' 'भूमिका' हे तिन्ही चित्रपट निरनिराळ्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात दाखवले गेल्यामुळे करिअरच्या सुरुवातीलाच, एक अभिनेत्री म्हणून स्मिताला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली.

जब्बार पटेल यांच्या 'सामना'मध्ये स्मिताने एक छोटीशी भूमिका केली होती. 'या टोपीखाली दडयलं काय' या गाण्यात 'आप्पा' असं म्हणत धावणारी मुलगी स्मिताच होती. तिने जब्बार पटेल यांचा 'जैत रे जैत' आणि 'उंबरठा' हा मराठी चित्रपट केला. पुढे 'उंबरठा' हाच हिंदीमध्ये 'सुबह' या नावाने आला. दोन्ही मराठी, हिंदी चित्रपटात तिनेच काम केलं. या दोन्ही चित्रपटांतील सुलभा महाजन ही व्यक्तिरेखा रंगवताना स्मिताच्या डोळ्यासमोर तिची आई होती. स्मिताने मोजकेच मराठी चित्रपट केले. या चित्रपटांतील त्यांची भूमिका लक्षात राहण्यासारख्या आहेत. 'सामना,' 'जैत रे जैत' आणि 'उंबरठा' तसेच तिने रामदास फुटाणे यांच्या सर्वसाक्षी आणि चंद्रकांत जोशी यांच्या सूत्रधार या चित्रपटात काम केलं होतं.
तिने 'ॲलेक पद्मसीं'च्या 'रिक्वेस्ट कॉन्सर्ट' या नाटकांत काम केलं. मूळ 'रिक्वेस्ट कॉन्सर्ट' या जर्मन नाटकाचं ते मराठी रुपांतर होतं. त्यात एकही संवाद नव्हता. आणि पूर्ण वेळ एकटी स्मिताच रंगमंचावर असायची. पूर्ण ताकदीने त्यांनी ही भूमिका रंगवली होती.
'उंबरठा'साठी स्मिताला 'ऑल इंडिया क्रिटिक्स असोसिएशन'चं 'बेस्ट ॲक्ट्रेस ॲवॉर्ड' मिळाला होता. 'जैत रे जैत'साठी महाराष्ट्र राज्य सरकारचं उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. 'जर्नालिस्ट असोसिएशन'चं 'बेस्ट ॲक्ट्रेस'चं 'दिशारी ॲवॉर्ड' मिळालं होतं. तर सईद मिर्झाच्या 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है' या चित्रपटातल्या छोट्याश्याच पण, महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी कोलकाताच्या रविंद्र सदनचं उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. श्याम बेनेगल यांच्या भूमिका चित्रपटातील स्मिताची भूमिका हंसा वाडकर या अभिनेत्रीच्या जीवनाशी मिळती-जुळती होती. या भूमिकेसाठी स्मिताने खूप मेहनत घेतली होती. या चित्रपटासाठी तिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.

व्यावसायिक चित्रपटांमध्ये 'भीगी पलके,' 'शक्ती,' 'बाजार,' 'अर्थ,' 'मंडी,' 'दर्द का रिश्ता,' 'आज की आवाज,' 'पेट,' 'प्यार और पाप,' 'दिलवाला,' 'अमृत,' 'आखिर क्यों,' 'अंगारे,' 'नजराना,' 'आवाम,' 'वारिस,' 'ठिकाना' यासारख्या चित्रपटांमध्ये स्मिताने उत्कृष्ट अभिनय केला. तर 'अर्धसत्य,' 'सद्गी,' 'तरंग,' 'गिध,' 'सुबह,' 'मिर्च मसाला' यांसारखे ऑफबीट चित्रपटसुध्दा आपल्या अभिनयाने अजरामर करून ठेवले.

अन्य भाषेतील चित्रपट
स्मिताने 'अनुग्रहम' हा तेलगू, 'भवानी भवाई' हा गुजराती, 'अकालेर,' 'देवशिशू' आणि 'अश्वमेधेर घोडा' हे बंगाली चित्रपट केले. 'अन्वेषणे,' 'कोडुरा' या चित्रपटात आणि 'चिदंबरम' या मल्याळम चित्रपटातही तिने काम केले होते.

मराठी चित्रपट
'सामना,' 'राजा शिवछत्रपती,' 'जैत रे जैत,' 'सर्वसाक्षी,' 'उंबरठा,' 'सूत्रधार' इ.

'या' सुपरस्टारसोबत अधिक चित्रपट
स्मिताने राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन या दोन्ही सुपरस्टार्ससोबत काम केले. राजेश खन्नासोबत 'नजराना,' 'आखिर क्यों' आणि 'अमृत' असे तीन चित्रपट केले. तर अमिताभ यांच्यासोबत त्यांनी 'शक्ती' आणि 'नमक हलाल' असे दोन चित्रपट केले.
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित
२६ जानेवारी, १९८५ रोजी भारत सरकारने 'पद्मश्री' देऊन स्मिताचा गौरव केला. एवढा सन्मान, पैसा, प्रसिध्दी, ग्लॅमर मिळूनही स्मिताने माणुसकी कधी विसरली नाही. तिने 'वूमेन्स सेंटर'तर्फे दु:खी, कष्टी, पीडित महिलांसाठी खूप काम केले.
No comments:
Post a Comment