दीपिका पादुकोनचा ‘छपाक’ हा चित्रपट १० जानेवारीला रिलीज झाला. लक्ष्मी अग्रवाल या ॲसिड हल्ला पीडितेच्या आयुष्यावर आधारित असणाऱ्या छपाक चित्रपटात दीपिका ‘मालती’ची भूमिका साकारत आहे. अशा अनेक 'मालती' आहेत, ज्यांना आपल्या आयुष्यात पुन्हा उभे राहण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. लक्ष्मी अग्रवाल, अलिगढमध्ये राहणारी शबनम, डॉली, रूपा आणि बऱ्याच जणी ॲसिड हल्ल्याला बळी पडल्या आहेत. परंतु, हा ॲसिड हल्ला आपण रोखू शकलो असतो तर? ही सल मनात कायम आहे.
महाराष्ट्रात डिसेंबर २०१९ ची ताजी घटना आहे. नागपूरच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिकणाऱ्या एका २० वर्षीय तरूणीवर ॲसिड फेकण्यात आलं होतं. ही दुर्दैवी घटना गोंदिया जिल्ह्यामध्ये घडली होती. याला जबाबदार कोणाला ठरवायचं? ॲसिड हल्ला करणारा, ॲसिड विक्री करणारा? सरकार? की समाज?
ॲसिड हल्ल्याच्या घटना बहुतांशी मानसिक विकृतीतून घडलेल्या आहेत. प्रेम नावाच्या प्रकरणामध्ये अधिक घटना घडलेल्या दिसून येतात. मुलीची इच्छा नाही. परंतु, कोणीतरी मागे लागलेला आहे. आधी ओळख झालेली आहे. पण, 'तिने' नकार दिला असेल. किंवा बिनसल्यानंतर सूड उगवण्याचा जो एक प्रकार आहे त्यातून अथवा 'तिने' रिस्पॉन्स दिला नाही तर; मित्र असेल पण लग्नाला नकार दिला असेल, आधी ओळख झालेली आहे आणि पुढे त्यांच्यामध्ये काहीतरी बिनसले असेल तर आणि एकतर्फी प्रेमातून ॲसिड हल्ल्यामागची कारणे आहेत. बहुसंख्य ॲसिड हल्ल्याची प्रकरणे अशा गोष्टींवरून झाली आहेत. अशा पुरूषी मानसिकतेतून उद्भवणारा प्रकार हा ॲसिड फेक होय. मुलींच्याबाबतीतच हे हल्ले झाले आहेत. तिचं विद्रुपीकरण करणं, ही पुरूषी मानसिक विकृती आहे. 'ॲसिड फेक' हे विकृतीकरणचं प्रकटीकरण आहे.
असे हल्ले थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो? ॲसिड हल्ल्यासारखी विकृती थांबवायची असेल तर दोन मार्ग आहेत. एक प्रबोधन आणि दुसरे म्हणजे मुलांच्या जीवनातील खुलेपणा.
मुलांचे 'प्रबोधन' करणं हा त्यातील एक महत्त्वाची गोष्ट आहे. ज्याप्रकारे पुरूषांना प्रेम करण्याचं स्वातंत्र्य आहे, तसं प्रेम नाकारण्याचे मुलीला स्वातंत्र्य आहे. हा जो समजूतदारपणा आहे, तो मुले किशोरवयीन असल्यापासून यायला हवा. येथे मुलांचे कौंटुबिक पातळीवर प्रबोधन करणे गरजेचे आहे. मुख्यत्वे जी किशोरवयीन मुले आहेत, त्यांच्या भावभावना दडपण्याचा प्रकार काही वेळा होतो. त्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये विविध पातळींवर प्रबोधन होणे आवश्यक आहे.
मुलींच्याबद्दल आकर्षण असो वा सेक्सविषयक, मुलांच्या जीवनात खुलेपणाने यावर चर्चा व्हायला हवी. मग ते कुटुंब असो वा शालेय जीवन. सहशिक्षणाच्या काळात हा खुलेपणा आला किंवा शालेय जीवनातच मुलांना त्यांच्या बोलण्यामध्ये मोकळेपणा आणू दिला तर कदाचित असे प्रकार कमी होण्याची शक्यता आहे.
दुसरं म्हणजे विकृतीला कोणताही इलाज नसतो. त्यामुळे ॲसिड फेकसारख्या विकृतीला कठोर शिक्षा, कठोर कायद्याची अंमलबजावणी हा एक मार्ग आहे. जर आरोपी मोकाट सुटले तर त्यांना अधिक प्रोत्साहन मिळाल्यासारखं होईल. त्यामुळे कायद्याचा धाक, कठोर शिक्षा असायलाच हवी. पण, त्याच्या जोडीला प्रबोधनाचीही गरज आहे. प्रबोधन हे शैक्षणिक पातळीवर असेल, समाज पातळीवर असेल किंवा कौंटुंबिक पातळीवर असेल. विविध प्रकारचे प्रबोधन आणि कायद्याचा धाक या दोन गोष्टींमुळे ॲसिड हल्ल्यासारख्या विकृती कमी होऊ शकतात.
५९ टक्के अविवाहित तरूणींवर, ४१ टक्के विवाहितांवर ॲसिड हल्ले
मध्यंतरी, एक वृत्त वाचनात आले होते. त्यामध्ये एका वेलफेअर टीमने आतापर्यंत शंभर ॲसिड ॲटॅक पीडितांवर सर्व्हे केला होता. त्या अहवालात म्हटले होते-६९ टक्के एकट्या व्यक्तीने तरूणीवर ॲसिड फेकले आहे. २९ टक्के एकाहून अधिक व्यक्तींनी तरूणीवर ॲसिड हल्ला केला आहे. तर २ टक्के लोकांची माहिती अद्याप समोर आलेली नाही. ५९ टक्के अविवाहित तरूणींवर आणि ४१ टक्के विवाहित महिलांवर ॲसिड फेकण्यात आले आहे. यातील काही ६४ टक्के घटना दिवसांत आणि ३६ टक्के घटना रात्री घडल्या आहेत.
ॲसिड ॲटॅकचे एकानंतर एक झालेल्या घटनांनंतर २०१३ मध्ये एक कायदा झाला. त्यानुसार, ॲसिड खरेदीविषयीचे नियम कडक करण्यात आले. सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, ॲसिडच्या बाटल्या विकणाऱ्या दुकानदाराला रजिस्टर ठेवावं लागेल. यामध्ये ॲसिड खरेदी करणाऱ्याचे पूर्ण नाव आणि पत्ता तसेच कोणत्या कामासाठी ॲसिड घेऊन जात आहे, हे सर्व लिहावं लागेल. परंतु, अडचण ही आहे की, या नियमांचे पालन कुठेच करण्यात आले नाही. न ही ॲसिड विकणाऱ्यांनी, न विकत घेणाऱ्यांनी हे नियम पाळले. आजही सर्व नियम मोडीत काढत खुलेआम ॲसिड विकले जाते.
समाजाचा भाग होण्याच्या नात्याने आपण सर्वच जण यावर विचार करूया.

No comments:
Post a Comment