
अशोक कुमार जन्मदिन आणि किशोर कुमार स्मृतिदिनानिमित्त
अशोक कुमार, किशोर कुमार आणि मधुबाला यांचं सिनेजगतात आणि रिअल लाईफमध्ये अतूट नातं. दिलीपकुमार, राज कपूर आणि देव आनंद हे सुपरस्टार होण्यापूर्वी १५ वर्षे आधी अशोककुमार हे सुपरस्टार होते. या सुपरस्टारबद्दल कुणालाही आकर्षण वाटावे, असे अशोककुमार यांचे व्यक्तिमत्त्व होते. मधुबालाही त्याला अपवाद नव्हती. तिच्यासारखी सुंदर, मनमोहक अदानी घायाळ करणारी अदाकारा, आपल्या मादक अदानी आणि मदमस्त नयनांनी, सुंदर हास्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी मधुबाला. तिने आणि अशोक कुमार यांनी एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
असे म्हटले जाते की, 'महल'चा सुटाबुटातील अशोककुमार मधुबालालाही भावला. मधुबालाने एकदा अशोक कुमार यांना प्रेमपत्र आणि लाल गुलाब देऊन प्रेम व्यक्त केले होते. परंतु, अशोक कुमार हे अभिनेत्री नलिनी जयवंतच्या प्रेमात होते. त्यामुळे मधुबाला यांचे पत्र बालिशपणा म्हणून त्यांनी सोडून दिले होते.
अशोकुमार आणि नलिनी यांचे 'संग्राम' आणि 'समाधी' हे दोन चित्रपट तुफान गाजले होते. 'समाधी'मधील 'गोरे गोरे बाँके छोरे,' 'कभी मेरी गली आया करो' हे दोन गाणी प्रचंड लोकप्रिय झाले होते. त्यांनी 'शेरू,' 'नौबहार,' 'सलोनी,' 'जलपरी,' 'नाझ' आणि 'मिस्टर एक्स' या चित्रपटांत एकत्र काम केले. दोघेही खर्या खुर्या आयुष्यात प्रेमात होते. अशोककुमार यांचे याआधीच लग्न झाले होते. पुढे नलिनी-अशोक कुमार दोघे लग्नही करणार होते. परंतु, त्यांचे लग्न होऊ शकले नाही.
अशोकुमार आणि मधुबाला
'महल' हा चित्रपट सुपरडुपर हिट झाल्यानंतर अशोकुमार आणि मधुबाला यांचे तीन चित्रपट हिट झाले. १९५० साली 'निशाणा' हा चित्रपट आला. त्यानंतर तब्बल सात वर्षांनी 'एक साल' हा चित्रपट आला. या चित्रपटातील ओ. पी. नय्यरच्या संगीताने धूम माजवली. या चित्रपटातील 'आईये मेहरबाँ, बैठीए जानेजा, शौकसे लिजिए जी इश्क के इम्तेहान' हे सुंदर रोमँटिक गाणे मधुबालाने आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम नृत्य आणि अदाकारी पेश केली आहे. तिच्या या अदानी प्रेक्षकांना घायाळ केले.
असं मिळालं 'मधुबाला' नाव
'महल' चित्रपटाच्यावेळी अशोककुमार ३८ वर्षांचे होते. तर मधुबाला १६ वर्षांची होती. एकेकाळची 'बॉम्बे टॉकिज'ची मालकीण देविका राणी हिचा नायक म्हणून अशोककुमार यांनी काम केले होते. याच देविका राणी यांनी 'बेबी मुमताज' यांचे नाव 'मधुबाला' असे केले होते.
किशोर कुमार आणि मधुबाला
गायक किशोर कुमार यांचा विवाह १९५० मध्ये बंगाली चित्रपटांची प्रसिध्द अभिनेत्री आणि गायिका रूमा गुहा ठाकुरताशी झाला. त्यांना एक बाळ झालं. त्याचं नाव अमित कुमार असं ठेवलं. रूमा आणि किशोर कुमार १९५८ मध्ये वेगळे झाले. पुढे रूमा यांनी लेखक-दिग्दर्शक अरूप गुहा ठाकुरताशी विवाह केला. यानंतर किशोर कुमार आणि मधुबाला यांच्या लव्ह स्टोरीला सुरूवात झाली.
पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर किशोर कुमार एकटे पडले होते. किशोर कुमार यांच्या विनोदी स्वभावाने अभिनेत्री मधुबालाला त्यांच्याशी प्रेम झाले. किशोर यांनी ज्यावेळी लग्नासाठी मधुबालाला प्रपोज केले होते, त्यावेळी ती आजारी होती आणि उपचारासाठी लंडन जात होती. मधुबालाच्या ह्रदयाला छिद्र होते. दोघांनी १९६० मध्ये कोर्ट मॅरेज केलं.
'किस्मत' हा १९४२ ला आलेल्या चित्रपटाने अशोककुमार यांना प्रचंड प्रसिध्दी मिळवून दिली. याच चित्रपटाच्या शूटिंगवेळी बेबी मुमताज (मधुबाला) 'बॉम्बे टॉकिज'मध्ये यायची. त्यावेळी ती ९ वर्षांची होती. अशोक कुमार यांचा लहान भाऊ किशोरकुमार आणि विनोदी अभिनेता मुमताज अलीचा मुलगा मेहमूद त्यावेळी बॉम्बे टॉकिजमध्ये खेळत असायचा. मधुबाला आणि किशोरकुमार हे भातुकलीचा खेळ खेळणारे खर्याखुर्या जीवनात पती-पत्नी बनले. मधुबालाचे प्रेम नाकारणारे अशोककुमार मोठे दीर बनले.
सून म्हणून मधुबाला मान्य नव्हती...
किशोर कुमार आणि मधुबाला यांच्या लग्नाने अशोककुमार यांची आई प्रचंड संतापली. सून म्हणून मधुबाला त्यांना मान्य नव्हती. परंतु, अशोककुमार यांनी आपल्या आईची समजूत घातली आणि मधुबालाला सन्मानाने सून म्हणून घरात घ्यायला लावले.
अशोक कुमार यांचे ३०४ चित्रपटांमध्ये काम
अशोक कुमार यांनी ३०४ चित्रपटांमध्ये काम भूमिका केल्या. हिमांशू यांचा मृत्यू झाल्यानंतर 'बॉम्बे टॉकिज' ही चित्रपटनिर्मिती संस्था कर्जात बुडाली. अशोककुमार यांनी बॉम्बे टॉकिजला कर्जातून बाहेर काढले. असे म्हटले जाते की, त्यावेळचे ३५ लाख रुपयांचे बॉम्बे टॉकिजचे कर्ज अशोक कुमार यांनी फेडले होते.
अशोक कुमार-नलिनी जयवंत
नलिनी जयवंत आणि अशोक कुमार यांचे नाते फार काळ टिकले नाही. नलिनी आणि अशोककुमार चेंबूरच्या युनियन पार्क कॉलनीमध्ये समोरासमोरच्या बंगल्यात राहत असे. मृत्यूपर्यंत ते तेथेच राहिले होते.
No comments:
Post a Comment