अशोक सराफ वाढदिवस विशेष
मराठी चित्रपटसृष्टीत मैत्रीचा संदर्भ आला की, अशोक शराफ, सचिन पिळगावकर, महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे या कलाकारांची नावे समोर येतात. नव्वदच्या दशकात या कलाकारांची मैत्री चित्रपटाच्या माध्यमातून आपण पाहिलीच आहे. लक्ष्या, सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ, या त्रिकूटालाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. 'अशी ही बनवाबनवी,' 'भूताचा भाऊ', 'आयत्या घरात घरोबा' अशा अनेक चित्रपटात या त्रिकूटाची धम्माल पाहायला मिळाली. ‘अशी ही बनवाबनवी’ वर प्रेक्षक अक्षरश: फिदा झाले. या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. लक्ष्मीकांत बेर्डेबरोबरची त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि या जोडगोळीने 'अशी ही बनवाबनवी', 'धूमधडाका' यासारख्या चित्रपटांमार्फत धमाल उडवून दिली.
धुमधडाका
कधी अशोक-लक्ष्मीकांत-महेश तर कधी अशोक-लक्ष्मीकांत-सचिन पिळगावकर अशा मैत्रीचा त्रिकोण अनेक चित्रपटांमध्ये दिसला. धुमधडाका चित्रपटामध्ये अशोक, महेश आणि लक्ष्याची अफलातून जोडी जमली. धुमधडाका चित्रपटामध्ये निवेदिता, सुरेखा आणि प्रेमाकिरण त्याचबरोबर शरद तळवलकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. महेश आणि अशोक यांची घट्ट मैत्री यामध्ये दाखवण्यात आली आहे. अशोक आपला प्रिय मित्र महेशसाठी त्याचा श्रीमंत उद्योजक बाप बनून शरद तळवलकरांच्याकडे जातो. तेथे महेशची प्रेयसी अर्थातच निवेदिता जोशी आणि अप्रत्यक्षपणे त्याला त्याची प्रेयसी सुरेखा भेटते. महेशच्या वृध्द बापाची भूमिका साकारून वख्या विखी वूखू हा डायलॉग प्रचंड गाजला.
या चित्रपटाची आणखी एक खासियत अशी की, या चित्रपटासाठी लक्ष्याने केवळ १ रुपया मानधन घेतला होता. महेश कोठारे आपला पहिलाच चित्रपट दिग्दर्शन करत होते. चित्रपटासाठी त्यांच्याकडे फारसे पैसेही नव्हते. त्यांनी धुमधडाका चित्रपटातील पात्रासाठी लक्ष्याशी बोलल्यानंतर खिशातून एक रुपया काढून लक्ष्याला दिला. लक्ष्याला भूमिका मिळाली आणि महेश कोठारेंना लक्ष्या मिळाला.
गंमत जंमत
'गंमत जंमत'मध्ये अशोक-सचिन पिळगावकर आणि वर्षा उसगावकरने धुमाकूळ घातला. अशोक यांनी फाल्गून आणि सचिन यांनी गौतमची भूमिका साकारलेली आहे. एखा उद्योजकाची कन्या कल्पना (वर्षा उसगावकर) हिला पैशांसाठी किडनॅप केलं जातं. पण, तिला पळवून आणणं या दोघांना महागात पडतं. कल्पना ही एक स्मार्ट, बिनधास्त आणि धीट मुलगी असते. तिला 'पळवून आणण्यात आलेय' हे कळल्यावर रडण्या-घाबरण्याऐवजी तिला खूप गंमत वाटते आणि असले काहीतरी सनसनाटी 'थ्रील' तिला हवेच होते असे ती सांगते. भरीस भर म्हणजे त्यांनी मागितलेल्या रकमेतील काही वाटा तिला हवा असेही, ती त्यांना सुनावते. यानंतर अशोक आणि सचिन यांना तिला सांभाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. या विनोदी चित्रपटातील एकापेक्षा एक गाण्यापैकी अशोक आणि अभिनेत्री चारुशिला साबळेंवर चित्रीत करण्यात आलेले अश्विनी ये ना हे गाणे रसिकांच्या ओठी आजही कायम आहे.
अशी ही बनवा बनवी
२३ सप्टेंबर, १९८८ रोजी हा चित्रपट रुपेरी पडद्यावर आला होता. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि सिध्दार्थ (शंतनू) यांच्या चौकट जोडीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. हा चित्रपट ‘बीवी और मकान’ या हृषिकेश मुखर्जी यांच्या प्रसिद्ध चित्रपटाचा रिमेक आहे. अनेक उपद्व्यापानंतर शेवटी घरमालकाने घरातून हाकलून दिल्यावर नवीन जागा भाड्याने मिळवण्यासाठी चार मित्रांना काय काय प्रताप करावे लागले, याची मजेदार गोष्ट म्हणजे 'अशी ही बनवाबनवी'. या चित्रपटातील सर्व कलाकार हे उत्तम विनोदी अभिनेते असल्याने हा चित्रपट खूप विनोदी ठरला. याच चित्रपटातील हृदयी वसंत फुलताना, ही दुनिया मायाजाल, अशी ही बनवाबनवी, कुणीतरी येणार येणार गं अशी सुंदर गाणीहीही लोकप्रिय ठरली.
आयत्या घरात घरोबा
आयत्या घरात घरोबा चित्रपट आजदेखील टीव्हीवर दाखवला तरी चाहते आवर्जुन हा चित्रपट पाहतात. इतक्या वर्षांनंतरही या चित्रपटाची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. चित्रपटात अशोक सराफ यांच्यासोबत सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, राजेश्वरी सचदेव यांच्या मुख्य भूमिका होत्या. रस्त्यावरील एक साधा माणूस उद्योजक सचिन पिळगावकरचा गोपू काका होऊन मोठ्या बंगल्यात प्रवेश करतो. तेथे गोपू काका होऊन सर्वांना कामाला लावतो. पण, शेवटी आपलं मूळ आयुष्य जसं आहे, तसं जगण्याचा संदेश ते देतात. हा चित्रपट त्या काळी प्रचंड गाजला होता.
आम्ही सातपुते
आम्ही सातपुते या अलिकडच्या चित्रपटात अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांनी अनुक्रमे सासरा आणि जावयाची भूमिका साकारली आहे. सुप्रिया पिळगावकर, स्वप्निल जोशी, अतुल परचुरे यांच्याही यामध्ये महत्त्वाच्या भूमिका होत्या.

No comments:
Post a Comment