Wednesday, June 2, 2021

'मी आता मरणार आहे...' चेहऱ्यावर हास्य घेऊन गेलेला इरफान खान

 

जिंदगी का चाक हो ...
याँ कुंमहार का 
जब नचाता है 
तो रचित भी होता है
और घटित भी 

या काव्य पंक्तीप्रमाणे इरफान खानच्या आयुष्यात काहीसं घडलं होतं. मोठ्या अपेक्षा, जगण्याची आस आणि मी पुन्हा ठीक होऊन लवकरचं परत येईन, ही भाबडी आशा घेऊन इरफान रुग्णालयात उपचार घेत राहिला. एक अभिनेता म्हणून मोठ्या पडद्यावर सहजरित्या अभिनय साकारणाऱ्या इरफानचा आज स्मृतिदिन. (२९ एप्रिल २०२० रोजी त्याने जगाचा निरोप घेतला.) मी स्वत: कसा आहे, याचं स्पष्टीकरण तो कधीचं इतरांना द्यायचा नाही. एखाद्याचा अभिनय आवडला तर तो त्याला मनापासून दादही द्यायचा. कुठल्याही गोष्टीला चेष्टेवारीत न नेता त्याचा गंभीरपणे विचार करण्याची ताकद त्याच्याकडे होती. अनेक मुलाखतींच्या मंचावर त्याच्यातील हे गुण समोर आले होते. त्याची पत्नी सुतापाने त्याच्याविषयी सांगितलेली एक चांगली गोष्ट म्हणजे, तो कधीचं खोटं बोलायचा नाही. आयुष्यातील वेदनादायी प्रवास करताना यापेक्षा मोठं दु:ख काय असू शकतं. न्युरो इंडोक्राईनसारखा दुर्मिळ आजार पदरी पडल्यानंतर आपण जगू की मरू, असा विचार क्षणभर त्याच्या मनात आला असेल. पण, मन घट्ट करून आपण, यातून लवकरचं बाहेर पडू, असा विश्वास व्यक्त करून त्याला आपले कुटुंब, आप्तेष्ट आणि चाहत्यांच्या चेहऱ्यावर आशेच्या किरणांचा आनंद पाहायचा होता. मृत्यू जसा जवळ येतो, तसं त्याला कळतं की, आपण आता जगणार नाही. असं म्हणतात की, परमेश्वर हे सर्व घडवून आणत असतो. कदाचित इरफानलाही हे आधीचं समजलं असावं.  



त्या दीर्घ कालावधीतील मरण यातना भोगताना त्याला अनेक संकटं आणि आव्हानांचा सामना करावा लागला. कुटुंबाचा विचार करताना आता आपण आपल्या कुटुंबातील मंडळींसाठी आयुष्यभर पुरणार नाही, असा विचार कदाचित त्याच्या डोक्यात आला असावा. डॉक्टर तर सर्व प्रयत्न करताहेत...त्यांना त्यांचं काम करू द्यावं...माझं जगणं किंवा मरणं आता सर्वस्वी परमेश्वराच्या हातात आहे, असंही कदाचित त्याला वाटलं असावं. 

अखेरच्या क्षणांमध्ये मात्र डोळ्यापुढे कायमचा अंधार दिसत आहे. पण इरफान आपल्या मुलाला जवळ बोलावून शेवटचं मन मोकळं करतो. शेवटच्या क्षणांतही चेहऱ्यावर हास्य घेऊन मी आता मरणार आहे, असं म्हणण्याचं धाडस केवळ इरफानचं करू शकतो. 

'यच्चिन्तितं तदिह दूरतरं प्रयाति यच्चेतसापि न कृतं तदिहाभ्युपैति'

(आपण ज्याची इच्छा करत असतो, ती गोष्ट अगदी लांब पळून जाते आणि जे आपण मनातसुध्दा आणलं नसेल ते समोर येऊन ठेपतं.)  

इरफानबाबतही असचं घडलं. जगण्याची आस असताना आयुष्य मात्र दूर पळून जातयं, असं त्याला दिसत होतं. मी लवकर बरा होईन, अशी भाबडी आशा घेऊन इरफान दवाखान्यात गेला होता. पण, तिथं मृत्यूची चादर त्याच्यासाठी तयार होती. इरफानला जगण्याची इच्छा होती. त्याने वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून जगण्याची आस बोलून दाखवली होती. त्याला मृत्यू आला खरा, पण त्याच्य़ा जगण्याच्या इच्छेपुढे मृत्यूही ओशाळला. स्वप्नांच्या झुल्यावर झुलताना झुल्याची साखळी कधी निसटली ते त्यालाही कळलच नाही. शेवटी हे अचानक कसं आणि का घडलं? हे प्रश्न अनुत्तरीतचं राहिले. 

 

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...