Tuesday, October 1, 2024

कोल्हापूरची सुवर्ण कारागिरी जगात भारी



कोल्हापूरच्या पारंपरिक सुवर्ण दागिन्यांचे ग्लोबल ब्रँण्डिंग


 
कोल्हापूरची सुवर्ण कारागिरी ही फक्त दागिने बनवण्याची कला नाही, तर ती एक अनेक पिढ्यांनी जपलेली नाजुक नक्षीदार हस्तकला परंपरा आहे. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या टीमने कोल्हापूर मध्ये अनेक दिवस वास्तव्य करून या कलेचे चित्रीकरण त्याचे लघुपट आणि रिल्स तयार केले आहेत. या माध्यमातून कोल्हापूरच्या या कलेचे ग्लोबल ब्रॅण्डींग सुरु झाले आहे. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलने या कार्यक्रमांतर्गत यापूर्वी भारतात फक्त एकाच ठिकाणी म्हणजे आसाम मधील सुवर्णकलेवर असा प्रकल्प पूर्ण केला आहे.

शतकांचा इतिहास असलेल्या कोल्हापूरच्या सुवर्ण कारागिरीला कोल्हापूर अधिपती राजर्षी शाहू महाराज यांनी प्रोत्साहन दिले. स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन देऊन तसेच राजस्थानी सुवर्णकारागिरांना खास निमंत्रित करून त्यांनी कोल्हापूरात गुजरी स्थापण केली तेव्हापासून कलापूर असलेल्या कोल्हापूरात सुवर्ण कारागिरीची ही परंपरा रुजली.

कोल्हापूर सराफ व्यापारी संघाने या कलेला जागतिक पातळीवर ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या टीमला कोल्हापूरमध्ये आमंत्रित केले आणि त्यांना कोल्हापूरी सुवर्ण कारागिरीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी दिली. इंडियन बुलियन ॲन्ड ज्वेलरी असोसिएशन (आयबीजेए) चे विजय लष्करे यांनी या प्रयत्नांना सहकार्य केले.

कोल्हापूरच्या दागिन्यांना जगभरात मागणी

काळ बदलला असला तरी, कोल्हापूरच्या अतिसुक्ष्म कारागिरीला जगात तोड नाही. अनेकांनी प्रयत्न केले पण कोल्हापूरच्या तोडीचे आणि कमी सोने वापरुन केलेले नाजूक दागिने तयार करणे कुणाला जमलेले नाही.

कोल्हापुरी दागिन्यांची अद्वितीय वैशिष्ट्ये

अतिशय पातळ सोन्याचे पत्रे: कोल्हापूरच्या विशेष वातावरणामुळे इथे सोन्याचे अत्यंत पातळ पत्रे तयार करता येतात. हाताने बनवलेले मणी: दोन अर्धवर्तुळाकृती पत्रे जोडून हाताने मणी तयार केले जातात. एक ग्रॅम सोन्यामध्ये २०० मणी तयार करण्याची किमया कोल्हापूरचे कारागिर करतात. विविध प्रकारचे दागिने: ठुशी नेकलेस, बुगडी, कॅस्केडींग लंबट मणी असे विविध प्रकारचे दागिने कोल्हापूरमध्ये बनवले जातात.



अतिशय नाजुक नक्षीकामाची बुगडी: एका बुगडीमध्ये २२५ छोटे तुकडे जोडले जातात आणि ही सारी कला एक ग्रॅम सोन्यात सामावली जाते.इतर ठिकाणी हे प्रयत्न झाले पण त्यासाठी किमान ४ ग्रॅम सोने लागले. संपूर्ण हस्तकलेने बनलेले चिताक- चिताक हा कोल्हापूरचा खास दागिना आहे. एका अखंड सोन्याच्या तुकड्यात बनलेल्या या दागिन्याला कुठेही जोड नसतो. हा संपूर्ण हस्तकलेने बनलेले असते. कमीत कमी ४० ग्रॅमचे चिताक असते. मुख्यतः जुन्या पिढीतील महिला हा दागिना वापरतात, परंतू तो नव्या पिढीने वापरावा यासाठी चिताक, पुतळी हार या दागिन्यांचे रिब्रॅण्डींग करण्यात आले आहे.

ब्रॅण्डींगमध्ये समाविष्ट दागिने

कोल्हापूरी साज, ठुशींचे विविध प्रकार, बुगडी, पुतळी हार, चिताक, चंद्रहार, लंबट मणी, गोल लाखी मणी.

हेरिटेज ठिकाणांची निवड

चित्रीकरणासाठी अंबाबाई मंदीर, खिद्रापूर मंदीर, दसरा चौक, न्यू पॅलेस, पन्हाळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, शाहू महाराज पुतळा अशा आयकॉनिक आणि हेरिटेज ठिकाणांची निवड करण्यात आली.



"वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या टीमने कोल्हापूरमध्ये अनेक दिवस वास्तव्य करून या कलेचा अभ्यास केला आणि त्याचा एक लघुपट तयार केला. गुजरी तसेच लक्षतिर्थ वसाहतीतील सुवर्ण कारागिरांना भेटी देऊन त्यांच्या मुलाखती तसेच प्रत्यक्ष कामाचे चित्रीकरण केले. त्यातून कोल्हापूरच्या नाजुक नक्षीकाम असलेल्या सुवर्णकारागिरीचा आता जागतिक डंका वाजतो आहे."
- राजेश राठोड, अध्यक्ष कोल्हापूर सराफ व्यापारी संघ

राजेश राठोड संपर्क क्रमांक- 9422792000

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...