Monday, May 14, 2018

देवळातल्‍या 'देवी'ची संवेदनशील कथा

'नाना परीट,' 'पांगरी' या शॉर्ट फिल्ममुळे अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वाहव्‍वा मिळवलेला कोल्‍हापूरचा तरुण दिग्दर्शक नीरज नारकर आणि त्‍याचा भाऊ निखिल नारकर सातासमुद्रापार पोहोचलेले आहेत. एका छोट्‍या गावातील संवेदनशील कथा शॉर्टफिल्‍मच्‍या माध्‍यमातून जगभरात दाखवली जाणार आहे. निखिल नारकर आणि नीरज नारकर यांची 'देवी' ही शॉर्टफिल्‍मची निवड आंतरराष्‍ट्रीय महोत्‍सवात झाली आहे. २० मे रोजी या शॉर्टफिल्‍मचे स्‍क्रिनिंग टोरँटो, कॅनडा येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आशियाई चित्रपट महोत्सवात होणार आहे. सातासमुद्रापार पोहोचलेली 'देवी' ही शॉर्टफिल्‍म कशी साकारली? याबाबत 'देवी'चा निर्माता निखिल नारकरशी 'पुढारी ऑनलाईन'ने विशेष बातचीत केली.  


कोल्‍हापूरचे दोन तरुण निखिल नारकर आणि नीरज नारकर हे सख्‍खे भाऊ. नीरजला लहानपणापासूनच कथा, गोष्‍टी लिहिण्‍याचा छंद आहे. तो सुरूवातीपासूनच सुंदर कथा लिहितो. नीरजने 'देवी'ची कथा स्‍वत:च्‍या कल्‍पनेतून साकारली. निमशहरी, किंवा ग्रामीण जीवन जवळून बघितल्‍याने तेथे कोणत्‍या समस्‍या असू शकतात, तिथलं वास्‍तव जीवन नारकर बंधुंनी अनुभवलय. 'देवी'ची कथाही त्‍यातूनच साकारली गेली. याचं संपूर्ण श्रेय नीरजला जातं. 

देवीची संकल्‍पना नीरज नारकरची
देवीची कथा, संकल्‍पना ही नीरज नारकरची होती. 'देवी'चा निर्माता या नात्‍याने निखिल नारकरने या शॉर्टफिल्‍मला वैचारिक दिशा देण्याची जबाबदारी घेतली. पांगरी, नाना परीट यासारख्‍या शॉर्टफिल्‍मसमध्‍ये देखील निखिलची महत्त्‍वाची भूमिका होती.  


देवीची कथा वास्‍तव प्रसंगावर आधारित आहे. पण, ते प्रसंग जसंच्‍या तसं आहे. असं नाही. पण, आम्‍ही जे अनुभवलं, पाहिलं आहे, ते शॉर्टफिल्‍मच्‍या माध्‍यमातून समोर आणण्‍याचा आम्‍ही प्रयत्‍न केला आहे, असे निखिलने सांगितले. छोट्‍या गावात एखाद्‍या दंगलीनंतर काय काय घडू शकतं आणि लोकांच्‍या आयुष्‍यात काय उलथापालथ होऊ शकतं, हे दाखवण्‍याचा प्रयत्‍न नीरजने केला आहे. नीरज नारकर सध्‍या जर्मनीत काम करतो. काम करून जे काही पैसे साठवले जातात, त्‍या पैशांतून शॉटफिल्‍म बनवली आहे. कुठलीही स्‍पॉन्‍सरशीप मिळवलेली नाही, असेही निखिल म्‍हणाला. 

नीरज हा निखिलपेक्षा दोन वर्षांनी लहान आहे. दोघांनाही लहानपणासून जे ज्ञान मिळालं, जे वाचलं आणि घरातलं जे वातावरण होतं, त्‍यातून समाजाकडे बघण्‍याचा एक दृष्‍टिकोण मिळाला. हा दृष्‍टिकोण अंमलात आणायचा असेल तर कलेसारखं दुसरं माध्‍यम नाही, असं निखिल म्‍हणाला. 


कथा लिहून ती साकारेपर्यंतचा ८ महिन्‍यांचा कालावधी लागला. एक दोन ड्राफ्‍ट तयार गेले आणि त्‍यानंतर फायनल कथेचा ड्राफ्‍ट तयार केला गेला. कलाकार कुठले असावेत, सिनेमॅटोग्राफर, एडिटर, साऊंड डिझायनर कोण असावं, हे ठरवलं गेलं. मग, शूटिंगला सुरूवात झाली. संकलन करण्‍यासाठी दोन ते तीन महिन्‍यांचा कालावधी लागला. 

देवीची कथा देवळात घडली
कोल्‍हापुरातल्‍या गिरगावात देवीचं शूटिंग झालं. 'देवी' ही १३ मिनिटांची शॉर्टफिल्‍म आहे. शॉर्टफिल्‍मच्‍या टायटलवर बरीच चर्चा झाली. गावातला एक म्‍हातारा पुजारी, त्‍याचा एक नातू आणि एक मुलगी यांच्‍या जीवनात एका घटनेमुळे काय होतं. ही घटना मंदिरात घडते. या शॉर्टफिल्‍ममध्‍ये पुजारीची मध्‍यवर्ती भूमिका आहे. वैचारिकदृष्‍ट्‍या आपल्‍या समाजात, आयुष्‍यात देवांचं काय स्‍थान आहे, हा कथेचा मूळ गाभा आहे. ही घटना घडते देवीच्‍या देवळात म्‍हणून 'देवी' हे नाव शॉर्टफिल्‍मला दिलं गेलं.


आर्थिक अडचण
शॉर्टफिल्‍म तयार करण्‍यासाठी सर्वांत मोठी आर्थिक समस्‍या उद्‍भवली. तंत्रज्ञ मंडळींना एकत्र आणून काम करणं, त्‍यांची वेळ जमवून शूटिंग सुरू करणं मुश्‍किल होतं. पण, या सर्वांवर मात करत निखिल आणि नीरज बंधुंनी वाटचाल सुरूच ठेवली.  सिनेमॅटोग्राफर सुमन साहू आणि साऊंड डिझायनर शिषिर चौसाळकर हे तंत्रज्ञ हिंदी सिनेसृष्‍टीत काम करणारे आहेत. त्‍यांनीही वेळात वेळ काढून या फिल्‍मसाठी काम केल्‍याच निखिल म्‍हणाला.  

पावसाचा व्‍यत्‍यय 
'देवी'च शूटिंग रात्रीच्‍यावेळी सुरू असताना पावसाला सुरूवात झाली. जेव्‍हा जेव्‍हा पाऊस थांबेल, तेव्‍हा-तेव्‍हा शूटिंग करावं लागलं. गावातल्‍या काही लोकांच्‍या घरातून वीजेचे कनेक्‍शन घेऊन रात्रीच शूटिंग पार पाडलं. संध्‍याकाळी सात वाजल्‍यापासून मध्‍यरात्री दोन अडीचपर्यंत शूटिंग सुरू असायचं. यासाठी  गिरगावकरांनी मोलाची मदत केली, असेही निखिल म्‍हणाला. 


मग कलाकारांची निवडीचा विषय होता. अत्‍यंत छोट्‍या मुलाची जी गोष्‍ट आहे, ती संवेदनशील कथा आहे. 
केवळ सामाजिक संदेश देणारी कथा नाही. तर मला असं वाटतं की, आज लोकांना एक चांगला सिनेमा बघण्‍याची सवय लागली आहे. लोकांना काहीतरी नवीन हवं असतं. अशावेळी जे कलावंत मनापासून काम करत असतात. आपल्‍या समाजाशी जोडून घेणार्‍या कथा सांगत असतात, ते लोकांना मनापासून पाहायला आवडतात. अगदी स्‍थानिक पातळीवरची कथा असते, पण, ते जागतिक दर्जाचं असतं. एक चांगली कलाकृती म्‍हणून पाहायला देवीची कथा आवडेल. 

आपल्‍याकडे फिल्‍म फेस्‍टिवल होतात. त्‍यात लघुपट दाखवले जातात. लोक ते उत्‍साहाने पाहतात. असा आमचा अनुभव आहे. हे लघुपट बघावेत. काही लोकांनी असे लघुपट पाहायला आवडतात, अशी इच्‍छा बोलून दाखवली. 
कॅनडा टोरँटो येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय आशियाई चित्रपट महोत्सवासाठी ही शॉर्टफिल्‍म पाठवण्‍यात आली. आणि 'देवी' सिलेक्‍ट झाला. टोरँटोमधला हा महत्त्‍वाचा फिल्‍म फेस्‍टिवल मानला जातो. कारण, दक्षिण आशियाई देशातले बहुतांशी दिग्‍दर्शक, निर्माते फिचर फिल्‍म्‍स, शॉर्टफिल्‍म्‍स, कलाकृती या फिल्‍म फेस्‍टिव्‍हलसाठी पाठवत असतात. देवीचं स्‍क्रिनिंग २० मे ला होणार आहे. भारतातही काही फिल्‍म फेस्‍टिव्‍हलला ही शॉर्टफिल्‍म पाठवण्‍यात आलीय. तिथे 'देवी' सिलेक्‍ट होईल, अशी आशा निखिलने बोलून दाखवली. 


अत्‍यंत आनंदाचा क्षण 
याच चित्रपट महोत्‍सवात २०१६ मध्ये 'नाना परीट,' 'पांगरी'चे स्‍क्रिनिंग करण्‍यात आलं होतं. या दोन्‍ही शॉर्टफिल्‍म्‍सना आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्‍सव - बंगलोर आणि मुंबईमध्‍ये (२०१५) दोन पुरस्‍कारही मिळाले होते. त्‍यामुळे टोरँटोत देवीचं सिलेक्‍शन होईल, असं वाटत होत. ज्‍यावेळी समजलं की, 'देवी' सिलेक्‍ट झाली, त्‍यावेळी तो क्षण आनंदाने भरलेला होता. अपेक्षापूर्ती झाल्‍यानं आनंदापेक्षा समाधान मोठं होतं. कारण, आपल्‍या गिरगावामध्‍ये शूट झालेली ही फिल्‍म कॅनडामध्‍ये पोहोचतेय. आपल्‍या लोकांची कलाककृती, कष्‍ट जगासमोर आलं, याच एक विलक्षण समाधान होतं, अशी प्रतिक्रिया निखिलने दिली.  

कलाकारांची निवड अशी झाली 
याच चित्रपटामध्‍ये अभिनेता किरण खेबुडकर यांनी पुजारीची भूमिका केलीय. किरण खेबुडकर यांच्‍याशी नारकर यांची जुनी ओळख होती. परंतु, ओळख आहे म्‍हणून त्‍यांनी ही भूमिका खेबुडकर यांच्‍याडे दिली असं नाही तर ते उत्‍कृष्‍ट कलाकार आहेत. शिवाय, 'देवी'च्‍या कथेला साजेशी असणारी पुजार्‍याची भूमिका अत्‍यंत चांगल्‍या पध्‍दतीने खेबुडकरच करू शकतील, म्‍हणून त्‍यांची निवड करण्‍यात आली. खेबुडकर यांनीही उत्‍कृष्‍टपणे ती भूमिका कॅमेर्‍यासमोर मांडली. दुसरे म्‍हणजे, अभिनेते स्वप्निल राजशेखर यांची कन्या अभिनेत्री कृष्णा भूतकर. मुलीच्‍या भूमिकेसाठी अनेक कलाकारांना भेटलो, अभिनेत्रींची भेट घेतल्‍याचे निखिलने आठवण सांगितली. शेवटी कृष्‍णाशी बोलल्‍यानंतर 'देवी'तल्‍या मुलीची भूमिका कृष्‍णाच करू शकेल, असे नारकर बंधुंना वाटलं. कारण, 'देवी'त मुलीच्‍या भूमिकेसाठी (कृष्‍णा भूतकर) डायलॉग्‍ज नाहीत. केवळ हावभाव करून ती भूमिका सादर करायची होती. हे कृष्‍णा भूतकरने ओळखलं. यात तिची छोटी भूमिका आहे. परंतु, प्रभावीपणे तिच्या भूमिकेचं सादरीकरण करण्‍यात आल्‍याचं निखिल म्‍हणाला.

'देवी' आपण कुणाला म्‍हणावं?, एका मुलीवर शारिरीक अत्‍याचार झाल्‍यानंतर देवीचा काय रोल आहे. हे त्‍या मुलीने आपल्‍या डोळ्‍यांतून सांगावं आणि हावभावातून ते कळावं, अशी ती कथा आहे. 

अथर्व गुरव याने बालकलाकाराची भूमिका साकारलीय. नारकर यांच्‍या आधीच्‍या शॉर्टफिल्‍ममध्‍येदेखील त्‍याने काम केलं. अथर्व हा पांगरी गावात राहतो. त्‍याला चित्रपटात काम करायची आवड आहे. त्‍याने आमच्‍या एका डॉक्‍युमेंट्रीमध्‍येही काम केलयं. साहित्‍य ॲकॅडमीसाठी ही डॉक्‍युमेंट्री तयार करण्‍यात आली होती. म्‍हणून 'देवी'साठी अथर्वची निवड करण्‍यात आली. 

मुली, महिलांकडं बघताना माणूस म्‍हणून पाहा 
आपल्‍या समाजात मुली, स्‍त्रियांना माणूस म्‍हणून कधी समजून घेतलं जात नाही. स्‍त्रियांकडं माणूस म्‍हणून बघा, असा संदेश देणारी ही कथा आहे. देवीच्‍या कथेत पुजार्‍याची भूमिका महत्त्‍वाची आहे. पुजार्‍याचा जो काही विश्‍वास आहे, त्‍या विश्‍वासाला कसा तडा जातो. माणुसकीच दर्शन त्‍याला घडतं, याबद्‍दलची कथा 'देवी'त दाखवण्‍यात आलीय. 

'देवी' आणि तिचा पुजारी यांच्या भावनिक नात्याचा विषय नीरजने त्‍यात मांडलाय. बलात्कार पीडित एक मुलगी मंदिरात आणल्‍यानंतर तेथील एक वृध्‍द पुजारी आणि त्याचा वयात येणारा मुलगा जग्गू यांचे त्या मुलीशी कशा पध्‍दतीने वर्तन करतात, या आशयाभोवती ही कथा फिरते. नाजूक आणि संवेदनशील कथा मांडणार्‍या नीरज नारकरची देवी कथाही अत्‍यंत संवेदनशील मांडण्‍यात आलीय. 


शॉर्टफिल्‍मचं जे प्रिमीयर आहे, व्‍हिडिओच्‍या सुरूवातीला एका दगडावर देवीचे चित्र रेखाटलेले दिसते. हे चित्र कोल्‍हापुरातल्‍याच दिनकर कुंभार या आर्टिस्‍टने रेखाटलयं.    

आगामी प्रोजेक्‍ट 
नीरजने एक कथा लिहिली होती. त्‍या कथेची निवड झाली होती. सन डान्‍स ॲकॅडमी नावाची अमेरिकेत संस्‍था आहे. ज्‍यांची कथा त्‍या संस्‍थेला आवडते, अशा भारतातल्‍या सहा लोकांना बोलावले जाते. त्‍यात नीरजची निवड झाली होती. आता त्‍यावर लवकरच काम सुरू होईल, असे निखिल म्‍हणाला.  आपली जी काही कला आहे, ती जागतिक दर्जाची कला व्‍हावी आणि त्‍यादृष्‍टीने प्रयत्‍न करावेत, असं नीरज आणि निखिलला लहानपणापासून वाटतं होतं. त्‍याचदृष्‍टीने त्‍यांची वाटचाल सुरू आहे. 

Thursday, April 19, 2018

'शिकारी'ने मराठीत सोडलाय बोल्ड करंट! (

'पिंजरा'पासून 'श्वास'पर्यंत आणि 'श्वास'पासून 'गुलाबजाम'पर्यंत अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांनी वेगवेगळे विषय आणि आशयाचे चित्रपट आणले. पण, आता त्याच्याही एक पाऊल पुढे जावून मराठी चित्रपट बोल्ड होतोय. त्याचचं एक उदाहरण म्हणजे चर्चेत असलेलं शिकारी चित्रपट. शिकारी चित्रपटाची मुख्य अभिनेत्री हिना खान हिच्या पहिल्याचं टीझरपासून उत्कंठा वाढवलीय. शिकारी चित्रपटाच्या ट्रेलरला तर यू-ट्यबवर लाखो हिट्स मिळालेत आणि असा बोल्ड अवतार मराठी चित्रपटात पहिल्यांदा येतोय. त्यामुळे शिकारी चित्रपटाबद्दल सगळ्यांनाचं उत्सुकता लागलीय की, शिकारीनं काय बदललयं. 


दाक्षिणात्य चित्रपटात ज्या पद्धतीने चित्रपटांचं प्रेझेंट केलं जातयं, जसं सुंदर लोकेशन्स, बोल्ड हिरोईन त्या पध्दतीचा ट्रेंड शिकारीतून मराठीत येतोय. मराठी चित्रपटांचा क्राऊडही प्रेक्षकांना काय हवयं, हे धरूनच सुरू आहे. विनोदी, सामाजिक आशयाचे चित्रपट आणि वास्तव मांडणाऱ्या चित्रपटांबरोबरच मराठी सिनेमात बोल्डनेस आणला जात आहे. सिंगल स्क्रिनबरोबरच मल्टिप्लेक्सचा रिच क्लासदेखील त्याकडे आकर्षित होईल, असा सिनेमाचा कंटेन्ट असणारा, वेगळ्या धाटणीचे चित्रपट इंडस्ट्रीत आणले जात आहेत. जसे दाक्षिणात्य चित्रपट किंवा हिंदी चित्रपट असतात, मराठी चित्रपटांची मांडणीही त्याच पध्दतीने केली जात आहे. 
पारंपरिक चौकटींना छेद देणाऱ्या मराठी चित्रपटांच्या कथेचा नवा आशय देखील अलीकडे हिंदी चित्रपटांसारखाच दर्जेदार करण्यावर भर दिला जातोय. विशेष म्हणजे बोल्डनेस आणला जातोय. यंग जनरेशनला देखील आकर्षण वाटावे, प्रेक्षक त्या चित्रपटाकडे खेचावीत, अशा दृष्टीकोनातून हे चित्रपटाचे विषय निवडले जात आहेत. याप्रकारच्या चित्रपटातून सेक्स कॉमेडी, सेक्स हॉरर कॉमेडी असा ट्रेंड दाखवला जातोय. 

मराठी चित्रपटांच्या नावांचा जसा बदलता ट्रेंड आहे, तशा चित्रपटांचे विषय-आशय देखील बदलत आहेत. दिग्दर्शक, लेखक त्या चित्रपटांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहेत. अभिनेते दादा कोंडके यांचे बोल्डनेसच्या जवळ जाणारे डायलॉग्ज सोडले तर इतर चित्रपट मनोरंजन आणि सामाजिक संदेश देणारे असायचे. नंतरच्या काळात मात्र, थोडसं ग्लॅमर चित्रपटांमध्ये दिसला. विशेष सांगायचं झालं तर सई ताम्हणकरचा 'नो एन्ट्री - पुढे धोका आहे' चित्रपटात आपल्या अदाकारीने बोल्डनेस आणला. 


शिकारी २० एप्रिल २०१८ ला रिलीज होतोय. 'शिकारी' चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने यांनी 'गोजिरी' आणि 'ती रात्र' यासारखे चित्रपट दिग्दर्शित केलेत. गेल्या काही दिवसांपूर्वी विजू माने यांनी सोशल मीडियावर एक बोल्ड पोस्टर शेअर केला होता. त्या पोस्टरमध्ये एका तरुणीचे पाय दाखवण्यात आले होते. मात्र, त्या चित्रपटाचे नाव सांगण्यात आले नव्हते. पोस्टरमध्ये बोल्ड पोझ देणारी ती अभिनेत्री नेहा खान आहे आणि त्या चित्रपटाचे नाव 'शिकारी' असल्याचं समोर आलं. मराठी इंडस्ट्रीबरोबरच सिनेरसिकांनाही मराठीत असा चित्रपट येतोय, म्हटल्यावर त्याची जोरदार चर्चाही झाली. 

पोस्टरमध्ये ग्लॅमरस दिसणारी नेहा खान आणि ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता सुव्रत जोशी हे 'शिकारी' या चित्रपटातून मराठीत डेब्यू करत आहेत. याआधी नेहाने हिंदी, मल्याळम चित्रपटांत काम केले आहे. त्याचबरोबर या चित्रपटात काश्मिरा शाह, प्रसाद ओक, मृण्मयी देशपांडे, सिद्धार्थ जाधव, भारत गणेशपुरे आणि भाऊ कदम यांच्याही भूमिका आहेत. यातून मृण्मयी देशपांडे पहिल्यांदाच वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

Monday, April 16, 2018

बार्शीच्‍या 'म्होरक्या'ने गाजवली दिल्‍ली

'म्होरक्या' असं म्हटलं की कसं वाटतयं? आहे की नाही नावात दम! होय, 'म्होरक्या' या चित्रपटात खरचं दम आहे. कारण, 'म्होरक्या' चित्रपटाला ६५ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. हा चित्रपट अमर देवकर यांनी दिग्दर्शित केला आहे आणि त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. १३ एप्रिलचा तो दिवस अमर देवकर यांच्यासाठी आनंदोत्सवाचा ठरला. 'म्होरक्या'ला सर्वोत्कृष्ट बालचित्रपट म्हणून घोषित करण्यात आले. पहिल्याच चित्रपटात राष्ट्रीय स्तरावर अमर देवकर यांनी मिळवलेलं यश खरचं उल्लेखनीय आहे. याचनिमित्ताने 'पुढारी ऑनलाईन'ने लेखक, दिग्दर्शक अमर देवकर यांच्याशी खास संवाद साधला. पाहुया, 'म्होरक्या' कसा घडला? 

अमर देवकर यांच्या ‘म्होरक्या’ चित्रपटाला याआधीही पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) विविध पुरस्कार मिळाले आहेत. स्वस्तिक प्रिती फिल्म प्रोडक्शन आणि अमर चित्रवाणी निर्मित 'म्होरक्या' चित्रपटात बालकलाकार म्हणून रमण देवकर याने भूमिका साकारलीय. तर चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी गिरीष जांभळीकर यांनी केलीय. 'पिफ'मध्ये रमण देवकरला उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आणि गिरीष जांभळीकर यांना उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार मिळाला होता. 'पिफ'नंतर आता राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे 'म्होरक्या'चं चौफेर यश वाखाण्याजोगं आहे. 
सोलापूरच्या बार्शीचा 'म्होरक्या
सोलापुरातील बार्शीसारख्या दुष्काळी भागातील अमर देवकर यांनी जिद्द मनात कायम ठेवून राष्ट्रीय पातळीवर आपलं नाव कमावलं. अमर देवकर यांचा चित्रपट दिग्दर्शन, अभिनयातील प्रवास तसा खडतर आहे. त्यांनी शिवाजी महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ललित कला विभागात  देवकर यांनी प्रवेशासाठी पर्यत्न केला. पण त्यांना यश मिळाले नाही. म्हणून त्यांनी मास कम्युनिकेशनसाठी प्रवेश घेतला. दरम्यानच्या कालावधीत त्यांनी ८२ लघुपट तयार केले. 

मनातल्या गोष्टी मोठ्या पडद्यावर 
एक नाट्य कलावंत, हौशी कलावंत म्हणून गेल्या १३-१४ वर्षांपासून काम करत आलेले दिग्दर्शक अमर देवकर यांना चित्रपट काढावा, अशी इच्छा होतीच. परंतु, त्यासाठी लागणारं आर्थिक बळ, तंत्रज्ञानाशी संबंधित गोष्टी आणि विशेष म्हणजे चित्रपट काढण्यासाठी कौशल्याची गरज होती. म्हणून अमर देवकर यांनी ॲकॅडमिक प्रशिक्षण घेण्याचं ठरवलं आणि थेट पुणे गाठलं. २०११-१२ मध्ये पुणे विद्यापीठात डिपार्टमेंट ऑफ स्टडिजमधून फिल्म मेकिंगमध्ये मास्टर डिग्री पूर्ण केली आणि तेथूनचं त्यांच्या सिनेसृष्टीच्या करिअरला दिशा मिळाली. चित्रपटांचा अभ्यास करत असताना कोठेतरी त्यांच्या मनात सलत होतं की, आपण काहीतरी करायला हवं. मनातल्या गोष्टी पडद्यावर आणाव्यात आणि त्याचदृष्टीने अमर देवकर यांचा प्रवास सुरू झाला. 
असा घडला म्होरक्याचा प्रवास
अमर देवकर म्हणाले, 'चित्रपटाच्या माध्यमातून मनातले विचार व्यक्त होण्याची इच्छा होती. त्याचदृष्टीने माझी बौद्धिक, मानसिक, शारीरिक ताकद, पात्रता तयार होत गेली. हे करत असताना २०१४ मध्ये 'म्होरक्या'ची गोष्ट सूचली. दोन -अडीच वर्षे अभ्यास करून म्होरक्याचं स्क्रिप्ट मी स्वत: लिहिलं. ज्या ज्या गोष्टी लागतात, त्या उभ्या केल्या आणि निर्मात्याचा शोध घेणं सुरू झाला. अनेक अडचणींचा सामना करत 'म्होरक्या'चा प्रवास सुरू झाला आणि आज 'म्होरक्या'ला तब्बल ६ पुरस्कार मिळाले. ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये उल्लेखनीय कामगिरी आणि सर्वोत्कृष्ट बालचित्रपट या पुरस्काराने गौरवण्यात आले.' 

एक चित्रपट अभ्यासक, दिग्दर्शक म्हणून काम करत असताना स्वत:च्या आणि बाहेरच्या-अवतीभोवतीच्या सगळ्याचं गोष्टींकडे एका सृजनात्मक दृष्टीकोनातून, संवेदनशीलपणे आपण पाहत असतो. अशा असंख्य गोष्टी पाहत त्याची नोंद डायरीमध्ये घेत असतो. मग, त्यातल्या कोणत्या गोष्टी भक्कमपणे, दर्जेदारपणे मांडता येईल याचा विचार करताना मला जवळची वाटलेली म्होरक्याची कथा मी निवडली. चित्रपटसृष्टीत ज्यावेळी आपण पाऊल टाकतो. तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने येणाऱ्या ज्या खर्चिक बाबी आहे, आर्थिक बाबी त्या उपलब्ध करण्यासाठी माझ्यासाठी शक्यच नव्हते. माझ्यासारख्या एका कलाकाराला इतकी मोठी रक्कम उभी करणे, परवडणारं नव्हतं. त्यामुळे अनेक निर्मात्यांशी डिल करण्याचा, बोलण्याचा प्रयत्न केला. पण, सकारात्मक उत्तर मिळालं नाही, असं त्यांनी सांगितलं. 
शेती गहाण ठेऊन उभारला पैसा 
अमर यांना हा चित्रपट काढण्यासाठी मामाची शेती गहाण ठेवून पैसा उभा करावा, असं वाटलं होतं. परंतु, मामाची शेती गहाण ठेवली नाही. 'आयडेंटिटि'च्या पुरस्काराची रक्कम जमा झाली होती. त्यातून मग, सहकाऱ्यांना घेऊन चित्रपटाच्या पूर्वी जी तयारी असते, ती करण्यास तीन-चार महिने सुरूवात केली होती. योगायोगाने त्यांना सोलापूरच्या स्वस्तिक प्रिती फिल्म प्रोडक्शनशी भेट झाली होती. त्या प्रोडक्शन टीमने त्यांच्या हातातला प्रोजेक्ट बाजूला ठेऊन 'म्होरक्या'वर लक्ष दिलं. आर्थिक पाठिंबा देण्यासाठीची जबाबदारी त्या प्रोडक्शनने घेतली. त्याप्रमाणे चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं. चित्रपटाच्या अंतिम टप्प्यासाठी अमर देवकर यांनी त्यांची स्वत:ची दोन एकर शेती विकून पैसा उभा केला.  

घरच्या मंडळींचा पाठिंबा 
अमर यांना चित्रपट निर्मितीसाठी घरच्या मंडळींचा पाठिंबा होता. त्यासाठी तीन-चार महिन्यांपासून त्यांचं काम सुरू होतं. त्यांचं काम, आत्मविश्वास पाहून घरच्यांनी शेती विकण्यास परवानगी दिली. 'म्होरक्या' साकारायला मित्र-परिवाराचाही पाठिंबा मिळाला. आई-वडिल, भाऊ, बहिण यांचे तसेच १५-२० वर्षांपासून असलेले जिवलग मित्र, गुरूजन, गावकरी, निर्माते यांनी अमर यांच्या कामावर विश्वास ठेवून मदत केली. 
'म्होरक्या'ची कहाणी 'नेतृत्वा'ची 
'म्होरक्या'ची कथा सांगताना अमर म्हणाले, 'या चित्रपटाच्या माध्यमातून नेतृत्व कसं असावं, हे मांडण्याचा मी प्रयत्न केला. मेंढ्या राखण्याचं काम करावा लागणारा एक १३-१४ वर्षांचा मुलगा असतो. शाळेमध्ये त्याचं नाव आहे. परंतु, त्याला मेंढ्या राखाव्या लागतात. मग, अचानक त्याला शाळेत जावं लागतं. शाळेत २६ जानेवारीसाठीची वर्गमित्रांची तयारी तो पाहतो आणि २५ मुलं त्याच्या मागे उभे राहतात. त्यांचा लीडर म्हणून तो मुलगा उभा राहतो. त्याच्या आधी तो मुलगा मेंढ्या राखताना २०-२५ मेंढ्यांच्या पुढे चालत असतो. त्याला साधी गोष्ट वाटत असते की, मेंढ्या नाही ही २५ मुलं माझ्या मागे आली पाहिजेत. तसा त्या मुलाचा स्ट्रगल सुरू होतो. स्वत:ला आपण कसं लीड करावं, कुटुंबाला कसं लीड करावं, पुढाकार घेऊन समाजाचं नेतृत्व कसं करावं, त्यातलं तत्वज्ञान या सर्व संदर्भांना स्पर्श करत चित्रपट पूर्णत्वाकडे जातो.' 
'म्होरक्या' नाव सूचलं असं...
'म्होरक्या' हे नाव कसं सूचलं, यावर अमर म्हणाले, 'ज्या विषयावर चित्रपट बनवत होतो. त्याविषयाला अनुसरून नावं दिलं.' नेतृत्वाची माझी संकल्पना, अस्सल ग्रामीण शब्द म्होरक्या, तो सगळ्यांना पुढे घेऊन जाणारा म्होरक्या...म्हणून म्होरक्या असं चित्रपटाला नावं दिलं. 
आगामी चित्रपट
आगामी चित्रपटांचे स्क्रिप्ट, त्याचा अभ्यास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. आगामी चित्रपटासाठी लागणारी साधनसामुग्री उभारणे गरजेच आहे. या सगळ्या गोष्टी मी एकटा करू शकत नाही. तर त्यासाठी सर्वांचं सहकार्य मिळणे आवश्यक असतं. या चित्रपटाची निर्मिती ही माझ्या एकट्याची नाही. ती माझी अभिव्यक्ती आहे, ती संपूर्ण टीमने दृक-श्राव्य माध्यमातून पडद्यावर साकारलीय. त्यासाठी सर्वांची मेहनत कामी आली. ग्रामीण भागात खूप टॅलेंटेड लोक आहेत. ते समोर येत नाही किंवा त्यांना तसं व्यासपीठ मिळत नाही. चित्रपट करताना मी त्या-त्या भागातील, परिसरातील लोकांना अभिनयासाठी प्राधान्य देतो. ग्रामीण जीवनशैली, मी अनुभवलेल्या, प्रत्यक्ष पाहिलेल्या घटकांवर भविष्यात चित्रपट होऊ शकेल. म्होरक्यासारख्या कथेसारखी, तशा आशयाच्या चित्रपटांच्या पलीकडे जाऊनही चित्रपट होऊ शकेल, असंही ते म्हणाले.  
पुरस्काराची घोषणा होताच जल्लोष... 
मी माझ्या घरी कुटुंबासोबत होतो. टीव्हीवर ६५ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा होत होती. सगळ्यांनाच हूरहूर लागली होती आणि अचानक घोषणा झाली की, स्पेशल मेन्शनमध्ये 'म्होरक्या'ला पुरस्कार. यानंतर सगळ्यांनी एकच जल्लोष केला. लगेचच सर्वोत्कृष्ट बालचित्रपट -म्होरक्या अशीही घोषणा ऐकू आली. त्यावेळी मन भरून आलं. माझा आनंद गगनात मावेना, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. 
वडिलांचं स्वप्न साकारलं 
एक कलावंत होण्याच माझ्या वडिलांचं स्वप्न साकारलं. त्यांनी प्रत्येक वेळी मला पाठिंबा दिला. म्हणूनचं हे यश आता माझ्या हाती पडलं आहे. 
                                                                                                                                                                                                                                                                                    - दिग्दर्शक अमर देवकर

Tuesday, April 10, 2018

'तिहेरी तलाक' कायद्याने न सुटणारा प्रश्न

सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या महत्त्‍वपूर्ण निकालानंतर आणि सरकारने तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर करून घेतले. त्यानंतर मुस्‍लिम समाजातील काही मंडळींनी याला विरोध करण्‍यास सुरुवात केली आहे. हे विधेयक रद्‍द करण्‍यात यावे, अशी मागणी या मंडळींकडून होताना दिसत आहे. कालच नाशिकमधील मालेगाव शहरातील हजारो मुस्‍लिम महिलांनी मोर्चा काढला. सरकारने तीन तलाक विधेयक मागे घ्‍यावे, मुस्‍लिम महिला शरियतच्‍या बाजूने असून त्‍यात सरकारने हस्‍तक्षेप करू नये, अशा मागण्‍यांसह या महिला रस्‍त्‍यावर उतरल्‍या होत्‍या. यापूर्वीही निपाणी येथेही असाच मोर्चा काढण्‍यात आला होता. म्हणजेच अजूनही या कायद्‍याचा मुस्‍लिम महिलांसाठी कितपत उपयोग होणार? याबाबत महिलांमध्येच संभ्रमावस्‍था आहे.
मुळात जेव्‍हा पुरूषांकडून महिलेला तलाक दिला जातो, त्‍या महिलेचा आणि तिच्‍या मुलांचा विचार केला जातोच असे नाही. काही वेळा तिच्‍या माहेरचे लोकदेखील तिला आधार देत नाही, अशा वेळी ती महिला एकटी पडते. तिच्‍यासमोर उभ्‍या आयुष्‍याचा प्रश्‍न उभा राहतो. मग, काही धाडसी महिला असतील तर त्‍या न्‍यायालयात धाव घेतात. सर्वच महिला हा मार्ग स्वीकारतील, असे नाही.
शाहबानोपासून सायराबानोपर्यंत हेच निदर्शनास आलं आहे. या महिलांनी न्‍यायालयात याचिकेद्‍वारे तिहेरी तलाक तत्‍काळ रद्‍द करण्‍याची मागणी केली होती. हिंदू-मुसलमान आणि इतर जाती-जमाती या सर्वांचे सर्वच कायदे भिन्‍न भिन्‍न नाहीत. भारतातील सर्वच जाती-जमातींना फौजदारी, दिवाणी कायदे, राज्‍यघटनेचे कायदे समान लागू आहेत. फरक आहे तो केवळ व्‍यक्‍तिगत कायद्‍यांमध्‍ये. त्‍यामध्‍ये विवाह, घटस्‍फोट, स्‍त्रियांच्‍या वारसा हक्‍कांचे कायदे यांचा समावेश होतो. खरंतरं तीन तलाकच्‍या बाजूने आणि विरोध करणारे असे दोन गट निर्माण झाले आहेत. पण, ज्‍या महिलांसाठी हा संघर्ष सुरू आहे, मुळात त्‍याच दुर्लक्षित राहिल्‍याचे चित्र सध्‍या दिसत आहे.  
तलाकविषयक कायद्‍यांमध्‍ये महिलेच्‍या एकंदर परिस्‍थितीचा विचार होताना दिसत नाही. बहुतेक कायदे हे पुरूषप्रधान असल्‍याचे महिलांना प्रकर्षाने जाणवते. एक तर तिहेरी तलाकला विरोध आहेच. दुसरीकडे काही महिलांनी मोर्चा काढला म्‍हणजे तमाम मुस्‍लिम महिलांनी तलाक विरोधी कायद्याला विरोध केला, असं नाही. अजूनही दबला गेलेला, अशिक्षित वर्ग, असा एक मोठा वर्ग आहे जो भरडला जातोय, हा वर्ग उघडपणे विरोध करू शकत नाहीत, अशी स्‍थिती आहे. मुळात बहुतांशी महिलांना कायद्‍याची माहिती नाही. याची माहिती त्‍यांना करून देणं महत्त्‍वाचं आहे. त्‍यांच्‍यात कायदेविषयक जागृती करणे महत्त्‍वाचे आहे. कुणाच्‍या सांगण्‍यावरून ते विरोध करत आहेत की जाणीवपूर्वक मोर्चे काढले जात आहेत, हे तपासणे गरजेचे आहे. या मोर्चांमागील सूत्रधार कोणीतरी वेगळा असण्‍याचीही शक्‍यता नाकारता येत नाही.
या विधेयकात तिहेरी तलाक देणार्‍या व्‍यक्‍तीला शिक्षेची तरतूद करण्‍यात आली आहे. शिक्षेने तिहेरी तलाकचा प्रश्‍न सुटणारा नाही. तो सामोपचारानेच मिटवला गेला पाहिजे. कायदे हे दुर्बल महिलांच्‍या बाजूने पाहिजेत. महिलांना शक्‍ती देणारा, संरक्षण देणारा कायदा सरकारने केला पाहिजे. तिहेरी तलाक अवैध ठरवणार्‍या विधेयकात महिला न्‍यायालयाकडे दाद मागू शकते, अशी तरतूद आहे. शिवाय तीन तलाक देणार्‍या व्‍यक्‍तीसाठीही शिक्षाही सांगण्‍यात आली आहे. पण, या कायद्‍यामुळे तीन तलाकचा प्रश्‍न मिटणार आहे का? हा खरा प्रश्‍न आहे.
तलाक पीडित महिलेने जरी न्‍यायालयात दाद मागितली तरी एक-दीड वर्षांच्‍या काळात त्‍या महिलेची जबाबदारी कोण उचलणार? शिवाय पोटगी जरी मिळाली तरी पोटगीची रक्‍कम ही अत्‍यल्‍प असते. अशा परिस्‍थितीत कोर्ट-कचेर्‍या करेपर्यंतच्‍या काळात त्‍या महिलेला कोणाचा आधार नसतो. त्‍यामुळे कोर्टाचा निकाल लागूपर्यंत त्‍या महिलेच्‍या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण होतो. शिवाय तलाक दिलेल्‍या, सोडून दिलेल्‍या महिलांना आधार मिळेल, अशी कुठलीही व्‍यवस्‍था समाजात सध्‍यातरी दिसत नाही. त्‍यामुळे महिलांना न्‍याय मिळावा, संरक्षण मिळावे, यादृष्‍टिने सरकारने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. बहुसंख्‍य लोकांच्‍या व्‍यापक हिताच्‍यादृष्‍टिने सरकारने कायदे कार्यवाहित आणले पाहिजेत. महिलांच्‍या हिताच्‍यादृष्‍टिने सरकारने काही योजना राबवल्‍या पाहिजेत. कायदेशीर संरक्षणाबरोबरच पीडित महिलांना आर्थिक मदत आणि उपजीविकेचे साधन उपलब्‍ध करून देणे गरजेचे आहे. तसे झाले तरच हा कायदा महिलांच्‍या हिताचा ठरू शकेल. अन्‍यथा त्‍याचे अस्‍तित्‍व केवळ कागदोपत्रीच राहील.
यासंदर्भात बोलताना सामाजिक कार्यकर्त्या रजिया पटेल म्‍हणाल्‍या, ‘मुळात सरकारने नवीन विधेयक आणण्‍याची तशी गरजच नव्‍हती. न्‍यायालयाने म्‍हटल्‍यानुसार, तीन तलाकचं प्रकरण कौटुंबिक हिसाचार विरोधी कायद्‍याखाली हाताळलं जाणार होतं. मग, कायदे करून हा प्रश्‍न सुटणारा नाही. ते प्रकरण कौटुंबिक हिसाचार विरोधी कायद्‍याखाली सामोपचाराने मिटवता आलं असतं. पण, तसं झालं नाही. कायद्‍याचा प्रश्‍न मोर्चेंनी सुटत नाही, हे आपण शाहबानोच्‍या वेळी पाहिलं आहे. मुस्‍लिम स्‍त्रियांना न्‍याय मिळावा म्‍हणून कायदे केले पाहिजेत. पण, सरकारने जे विधेयक आणलं आहे, त्‍या विधेयकाचं स्‍वरूप असं नाहीये. त्‍यामुळे मुस्‍लिम महिलेच्‍या न्‍यायाचा प्रश्‍न अतिशय महत्त्‍वाचा आहे.’

'पॅड'च हितावह

काही दिवसांपूर्वी कोल्‍हापुरातील स्‍त्री-रोगतज्‍ज्ञ डॉ. शर्वरी निरगुंडे यांच्‍याशी भेट झाली. बोलता बोलता पॅडमॅन या सिनेमाचा विषय निघाला. नुकताच रिलीज झालेल्‍या पॅडमॅन सिनेमाने महिलांच्‍या मासिक पाळीत सॅनिटरी नॅपकिन किती महत्त्‍वाचं आहे, हे दाखवून दिलं.  त्‍यानिमित्ताने महिलांच्‍या मासिक पाळीचा देशभर व्‍यापक प्रमाणात चर्चिला जातोय. ही चांगली गोष्‍ट आहे. पॅडवर आमच्‍या गप्‍पाही रंगल्‍या. डॉक्‍टरांशी चर्चा झाल्‍यानंतर मनात काही प्रश्‍न उभे राहिले. 
एक गोष्‍ट प्रकर्षाने जाणवली की, आजही काही तरुणी, महिला मासिक पाळीत सॅनिटरी नॅपकिन वापरत नाहीत. मासिक पाळीत सॅनिटरी नॅपकिनचा वापर प्रत्‍येक महिलेने करायला पाहिजे. पण, असे होत नाही. आजही काही महिला कापडच वापरतात, जे आरोग्‍याला हानिकारक आहे.   हाच मुद्‍दा धरून जर विचार केला तर आपल्‍या देशात महिलांच्‍या आरोग्‍याच्‍या प्रश्‍न आजही गंभीर आहे.  पण, वास्‍तविक पाहता त्‍याकडे म्‍हणावं तसं लक्ष दिलं गेलेलं नाही. विशेष म्‍हणजे, महिलांच्‍या मासिक पाळी समस्‍या आणि आरोग्‍याचा विषय अजूनही दुर्लक्षित आहे. त्‍यातला त्‍यात म्‍हटलं तर मासिक पाळीतील स्‍वच्‍छता हा अतिशय महत्त्‍वाचा विषय आहे. 
देशातील एकूण परिस्‍थिती पाहता ग्रामीण असो वा शहरी महिलांच्‍या आरोग्‍याचे अनेक प्रश्‍न आहेत. या प्रश्‍नांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्‍याने अनेक तरूणी, महलांना वेगवेगळ्‍या आजार, विकारांना सामोरे जावे लागते. त्‍यात पाळीसारखा संवेदनशील विषय असल्‍याने उघडपणे बोलायला धजत नाहीत. अशावेळी जनजागृती हा उत्तम उपाय आहे. तसेच महिलांना स्‍वस्‍तात सॅनिटरी नॅपकिन उपलब्‍ध करून देण्‍यासाठी सरकारने योजना आणाव्‍यात. जर महिलांचं स्‍वास्‍थ्‍य जपणं खूप गरजेच आहे. 
हल्‍ली नवव्‍या-दहाव्‍या वर्षीच मुलींना पाळी येण्‍यास सुरूवात होते. त्‍याची कारणेही वेगळी असू शकतात. पण, आता हे नैसर्गिकपणेच घडत असल्‍याचं चित्र आहे. त्‍यात महत्त्‍वाचं म्‍हणजे शालेय पातळीवर मुलींना सॅनिटरी नॅपकिनबाबत सांगितले पाहिजे. आज टीव्‍हीवरून सॅनिटरी नॅपकिनच्‍या जाहिराती दाखवल्‍या जातात. पण, तरीही काही मुली कापड वापरण्‍यावरच भर देतात. या संदर्भामध्‍ये पालकांनी आपल्‍या मुलींना सांगितलं पाहिजे. त्‍यात पाळी येणं म्‍हणजे विटाळ असा समज आपल्‍याकडे आहे. पाळी येण्‍याची प्रक्रिया ही नैसर्गिक आहे. त्‍यात शुभ-अशुभ असं काही नसतं. हा अंधश्रध्‍देचा भाग आहे, हे समजावून सांगितलं पाहिजे. 
कापड वापरणार्‍या तरूणी, महिलांना भविष्‍यात अनेक समस्‍यांना तोंड द्‍यावे लागते. त्‍यात जंतुसंसर्ग, त्‍वचाविकार, गुप्‍तांगाला खाज येणं यासारख्‍या विकारांना सामोरे जावे लागते. एकतर मासिक पाळीत कापडाची घडी कमीत कमी सहा तासांनी बदलली जाते. कामाच्‍या घाईत त्‍याकडे लक्ष दिले जात नाही किंवा बदललं जात नाही. यावेळी जंतुसंसर्ग होण्‍याची शक्‍यता असते. जे कापड असतं ते सुती असावं लागतं. शिवाय स्‍वच्‍छ धुवून उन्‍हात वाळवले गेले पाहिजे. तसेच तते वारंवार न वापरता किमान दोन ते तीन महिन्‍यांनंतर नवीन कापड वापरायला हवं लागते. पण, अशा कापडांमुळे काही वेळा जंतुसंसर्ग होणे, गुप्‍तांगाला खाज होणे, फंगल इन्‍फेक्‍शन यासारख्‍या समस्‍या उद्‍भवतात. त्‍यामुळे सॅनिटरी नॅपकिनच वापरणं हितावह आहे.
दुसरी एक बाजू अशी की, सॅनिटरी नॅपकिनमध्‍ये डायऑक्‍झिन नावाचा घटक असतो. नॅपकिनमध्‍ये हे घटक अधिक असतील तर कॅन्‍सरसारखे आजार होतात, असं म्‍हटलं जातं. पण, याबाबत अद्‍याप अनभिज्ञता आहे. पीरियडमध्‍ये डायऑक्‍झिन फ्री पॅड्‍स वापरावे लागतात. हे पॅड्‍स खर्चिक असले तरी आरोग्‍याच्‍या दृष्‍टिने ते चांगले असतात. आज कमी किमतीचेही पॅड बाजारात उपलब्‍ध आहेत. पण, हे पॅडदेखील खरेदी करणे काही महिलांना परवडत नाही. बर्‍याचदा सर्वसामान्‍य कुटुंबातील मुलींना पॅड खरेदी करणे परवडत नाही. गरीब कुटुंबात एक वेळचं जेवण मिळणेही मुश्‍किल आहे, त्‍यांनी काय करायचं? महिलांसाठी ही गरजेची बाब आहे, यासाठी सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत. 
आता काही शाळांमध्‍येही पॅड मशिन बसवण्‍यात आले आहेत. काही शाळांमध्‍ये पॅडचं मोफत वितरण केलं जातंय. शिवाय, याबद्‍दल कार्यशाळा भरवून मार्गदर्शनही केलं जातं. पण, याचंबरोबर वापरलेले पॅड तसेच न टाकून देता ते विल्‍हेवाट कसे करावे, यासाठी मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. 
सरकार अनेक योजना राबवत आहे. महिलांसाठी स्‍वस्‍त दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्‍ध करून देण्‍यासाठी सरकारने गांभीर्याने विचार करायला पाहिजे. महिलांसाठी पॅड ही गरज आहे त्‍यामुळे सरकारने पॅडवरील जीएसटी रद्‍द करावा, अशी अनेक महिला संघटनांची मागणी आहे. तसेच शाळेतून पॅड डिस्‍पोजल मशीन्‍स बसवण्‍यात यावेत, अशीही मागणी होऊ लागली आहे. सेवाभावी संस्‍थाही यात सहभागी झाल्‍या तर पॅड डिस्‍पोझल मशीन बसवणे सहज शक्‍य आहे. त्‍या-त्‍या परिसरातील सेवाभावी संस्‍थानी जर सहकार्य केलं तर त्‍या योजनेसाठी सरकारवर अवलंबून राहावं लागणार नाही. मशीन उपलब्‍ध झाली तर हा प्रश्‍न सुलभ होईल. शिवाय पर्यावरणाची निगा राखली जाईल. कारण, पॅड नष्‍ट व्‍हायला बरीच वर्षांचा कालावधी लागतो, असे म्‍हटले जाते. त्‍यामुळे पर्यावरणाच्‍या संरक्षणाच्‍या दृष्‍टीनेही याचा गांभीर्याने विचार व्‍हायला पाहिजे. 

प्रियदर्शन जाधवला बनवायचाय कोल्‍हापूरचा सिनेमा


आपल्‍या सर्वांचा लाडका अभिनेता प्रियदर्शन जाधव मूळचा कोल्‍हापूरचा. तो उत्तम कलाकार, अभिनेता आहे. टाईमपास २ सारखा हिट चित्रपट देणारा प्रियदर्शनला आता कोल्‍हापुरात येऊन चित्रपट बनवायचायं. विशेष म्‍हणजे कोल्‍हापुरातील कलाकारांना घेऊन कोल्‍हापुरातचं चित्रपट बनवण्‍याचं त्‍याचं स्‍वप्‍न आहे. या त्‍याच्‍या ड्रीम प्रोजेक्‍टबद्‍दल ‘पुढारी ऑनलाईन'ने मराठमोळा अभिनेता प्रियदर्शन जाधवशी विशेष संवाद साधला.
कोल्‍हापूरशी असलेलं नातं प्रियदर्शनने जपयलं. त्‍याचा जन्‍म कोल्‍हापुरात झाला आणि आपण कोल्‍हापुरचं काहीतरी देणं लागतो, या भावनेतून तो चित्रपटाची निर्मिती करणार आहे. सुरूवातीपासूनच प्रियदर्शनला दिग्‍दर्शक व्‍हावं असं वाटत होतं. आणि त्‍याचं हे स्‍वप्‍न पूर्ण करण्‍यासाठी तो प्रयत्‍न करत आहे.
प्रियदर्शन म्‍हणाला, 'मी कोल्‍हापुरात लहानाचा मोठा झालो. कोल्‍हापूर या शहराला घेऊन काही करता येईल का? या शोधात मी होतो. आणि ती गोष्‍ट मला मिळाली आहे. कोल्‍हापुरातले लोक, कलाकार, तंत्रज्ञ, मेकअप आर्टिस्‍ट घेऊन चित्रपट करावा असं मला वाटतयं आणि मी तो लवकरच करेन.’
प्रियदर्शन दिश्‍दर्शनाकडे कसा वळला, याबाबत त्‍यानं सांगितलं की, 'जरी मी मुंबईत राहत असलो तरी कोल्‍हापूरशी नातं मी जपलयं. माझं जन्‍मस्‍थान कोल्‍हापूर आहे. कोल्‍हापूरसाठी काहीतरी करायचं होतं. मला दिग्‍दर्शन आणि अभिनय दोन्‍हीही करता येतं. माझ्‍या अखत्‍यारित मला जे काही करता येईल, ते मी करणार. त्‍यामुळे या चित्रपटातून कोल्‍हापुरातल्‍या कलाकारांचं टॅलेंट समोर येईल. कोल्‍हापुरात उत्तम सिनेमा होऊ शकतो, हे करून दाखवायचं आहे. सिनेमाची कथा लिहायचं सुरू आहे. सध्‍या चित्रपट निर्मात्यांचा शोध घेणंही सुरू आहे. कोल्‍हापुरात खूप चांगले कलाकार आहेत. नाट्‍यसंस्‍था आहेत, नाटक, एकांकिका पातळीवर कलाकार काम करताहेत. त्‍यांच्‍यासाठी कोल्‍हापूर हे उत्तम व्‍यासपीठ आहेच. फक्‍त मदत घ्यावी लागेल ती, तंत्रज्ञानाची. कॅमेर्‍याशी निगडित तंत्रज्ञान, गोष्‍टी आहेत, ते मुंबईतून मागवावे लागतील. कोल्‍हापुरात एडिटर, कॉस्‍ट्‍यूम डिझायनर मिळतील, मेकअप आर्टिस्‍ट मिळतील, प्रोडक्‍शन असेल, असिस्‍टंट डायरेक्‍टर उपलब्‍ध होतील. त्‍या सगळ्‍या गोष्‍टी घेऊनच चित्रपट बनवायचा आहे. यासाठी मुंबईचा एखादा निर्माता घेऊन चालणार नाही. तर कोल्‍हापूर जाणणारा आणि कोल्‍हापूरची सगळी माहिती असणारा निर्माता हवा आहे. कोल्‍हापुरातल्‍या लोकांनी एकत्र येऊन केलेला हा सिनेमा असणार आहे.’
चित्रनगरीसह संपूर्ण कोल्‍हापुरात चित्रपटाचं शूटिंग करणार असल्‍याचं त्‍यानं सांगितलं. गेली १८ वर्षे तो मुंबईत दिग्‍दर्शन क्षेत्रात आहे. जवळपास ११ व्‍यावसायिक नाटकांचं दिग्‍दर्शन प्रियदर्शनने केलं आहे. 'टाईमपास’ या चित्रपटाची पटकथाही प्रियदर्शनने लिहिली होती. तसचं 'टाईमपास २’ मध्‍ये त्‍याने काम केलं आहे. शिवाय, पटकथादेखील त्‍यानेच लिहिली होती. भरत जाधवचा 'जत्रा’ चित्रपटाचे संवाद लेखनही प्रियदर्शनने केलं होतं. त्‍यामुळे आता त्‍याचं दिग्‍दर्शनाकडे पडलेलं पाऊल स्‍वागतार्ह आहे. दिग्‍दर्शन आणि अभिनय दोन्‍हीही सुरुच ठेवणार असल्‍याचं प्रियदर्शनने सांगितलं.  
खंबीर निर्मात्‍याची गरज 
चित्रपटासाठी फायनान्‍सर शोधण्‍यापासून सुरुवात झाली आहे. खंबीर निर्मात्‍याची आवश्‍यकता असून त्‍याबाबतचं आवाहन त्‍यानं सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून केलं आहे. निर्माता मिळाला की चित्रपटाचे शूटिंग सुरू करू, त्‍याबद्‍दलची माहिती सोशल मीडियावरून दिली जाईल, असेही त्‍याने यावेळी सांगितले.  
कोल्‍हापूरच्‍या कलाकारांना सुवर्णसंधी 
प्रियदर्शन जाधवच्‍या या चित्रपटात काम करण्‍यासाठी कोल्‍हापूरच्‍या कलाकारांना सुवर्णसंधी मिळणार आहे. कोल्‍हापुरातील कलाकारांना आपलं कौशल्‍य, अभिनय सर्वांसमोर आणता येणार आहे. हे जर प्रत्‍यक्षात साकारलं तर कोल्‍हापूरनगरी खर्‍या अर्थाने चित्रनगरी होईल.
प्रियदर्शन जाधव दिग्‍दर्शित 'मस्‍का’ 
लवकरच प्रियदर्शन जाधव दिग्‍दर्शित 'मस्‍का’ हा विनोदी चित्रपट १ जून २०१८ ला रिलीज होतोय. त्‍यात अभिनेत्री प्रार्थना बेहरे, अनिकेत विश्‍वासराव हे प्रमुख भूमिकेत असून पुरुषोत्तम पाटील, धनंजय साठे, चिन्‍मय मांडलेकर, शशांक शेंडे, प्रणव रावराणे यांच्‍याही भूमिका आहेत. प्रार्थना बेहरे आणि अनिकेत ही जोडी पहिल्‍यांदाच पडद्‍यावर एकत्र दिसणार आहेत. 'मस्‍का’ चित्रपटात तीन गाणी असून चिनार-महेश यांनी संगीत दिलं आहे.

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...