Thursday, March 19, 2020

बॉक्‍स ऑफिसवर एकापेक्षा एक मराठी सिनेमे!


यंदाची दिवाळी खर्‍या अर्थाने मराठी चित्रपटसृष्‍टीला शुभ ठरली आहे. त्‍याचं कारण असयं की, गेल्‍या काही दिवसांमध्‍ये मराठी बॉक्‍स ऑफिसवर आलेल्‍या चित्रपटांनी सिनेरसिकांची मने जिंकून घेतली आहेत. तर आगामी मराठी चित्रपटांची प्रतीक्षा देखील सिनेप्रेमींना लागून राहिली आहे.  


१०० कोटींचा गल्‍ला जमवून 'सैराट'ने काही हिंदी चित्रपटांनाही मागे टाकले आहे. मराठी चित्रपट आता मागे पडलेत, असा कांगावा करणार्‍यांसाठी या चित्रपटाने सडेतोड उत्तर दिले. आता मराठी बॉक्‍स ऑफिसवर आलेला '...आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' हा चित्रपट उत्तम उदाहरण आहे. काशीनाथ घाणेकर आणि हिंदी सिनेमा 'ठग्‍ज ऑफ हिंदोस्‍तान' मोठ्‍या पडद्‍यावर झळकले. हिंदी सिनेरसिकांनी 'ठग्‍ज' पाहिल्‍यानंतर त्‍यांची निराशाच झाली. परंतु, 'काशीनाथ' पाहणार्‍यांनी 'काशीनाथ घाणेकर' हा उत्तम चित्रपट असल्‍याच्‍या प्रतिक्रिया दिल्‍या. 
यंदाच्‍या दिवाळीच्या मुहूर्तावर आलेला '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटाने बॉलिवूडच्या 'ठग्स ऑफ हिंदोस्‍तान'सारख्या चित्रपटाला मागे टाकले. नोव्‍हेंबर महिन्‍यात अनेक मराठी चित्रपटांनी हिंदी सिनेमांना मागे टाकले. हिंदी चित्रपटांपेक्षा बॉक्‍स ॲफिसवर मराठी चित्रपटांची यादी मोठी होती. 
Image result for movie thugs of hindustan
‘आणि..काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाला दुसऱ्या आठवड्यात प्राईमटाईमला जास्त स्क्रीन्स मिळाल्या. या चित्रपटाचे राज्‍यासह संपूर्ण भारतात शोज सुरू आहेत. 
Image result for kashinath ghanekar movie
दुसरीकडे, 'सैराट'फेम नाराज मंजुळेचा नाळ चित्रपट. सुरुवातीलाच नाळ चित्रपटाच्‍या टीझरनेच सर्वांची उत्‍कंठा वाढवली होती. मराठीतला 'काशीनाथ घाणेकर' आणि 'नाळ'च्‍या शोजने थिएटर्सच्‍या थिएटर्स फुल्‍ल झाले. 
Image result for marathi movie naal
'नाळ' चित्रटातल्‍या 'मला जाऊ दे नवं' या गाण्‍याला तर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
Related image
दरम्‍यान, 'माझ्‍या नवर्‍याची बायको' ही टीव्‍ही मालिका सोडल्‍यानंतर शनाया अर्थातच रसिका ही 'गॅटमॅट' मराठी चित्रपटात दिसली. गॅटमॅट हा कॉलेज विश्‍वातला तरुणाईवर आधारलेला चित्रपट. शनाया या चित्रपटातली आकर्षणाची केंद्रबिंदू ठरली. दरम्‍यान, हिंदीतला 'बधाई हो' या चित्रपटाने १०० कोटींची कमाई केली. विशेष म्‍हणजे, सान्‍या मल्‍होत्रा आणि आयुषमान खुराना यासारख्‍या कलाकारांनी महानायक अमिताभ बच्‍चन, कॅटरिना कैफ आणि आमिर खान यासारख्‍या तगड्‍या कलाकारांना कमाईच्‍याबाबतीत मागे टाकले. अमिताभ बच्‍चन, आमिर खान स्‍टारर 'ठग्‍ज ऑफ हिंदोस्‍तान'ने थिएटर्सच्‍या थिएटर्स मोकळे टाकले. या चित्रपटाने सोशल मीडियावर नकारार्थी प्रतिक्रिया आणि समीक्षकांची नापसंती दर्शवली. 
Related image
'नाळ' हा देखील उत्तम चित्रपट ठरताना 'एक सांगायचयं' चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर येऊन धडकला. नवनवीन आशय, विषयांची मांडणी घेऊन चित्रपट तयार होत असताना मराठी चित्रपटांमध्ये दाखल झालेला आणखी एक चित्रपट म्‍हणजे 'एक सांगायचंय.... UNSAID HARMONY' . अभिनेता लोकेश विजय गुप्ते दिग्दर्शित 'एक सांगायचंय.... UNSAID HARMONY' या चित्रपटातून प्रसिद्ध अभिनेता के. के. मेनन याने मराठीत पदार्पण केलंयं. 
'व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अॅण्ड चॉकलेट’ हा नवा चित्रपट. व्हॅनिला ही कुत्री आहे. चित्रपटाच्‍या केंद्रस्थानी व्‍हॅनिलाच आहे. व्‍हॅनिलाची आणि तेजूची अर्थातच जानकी पाठकची केमिस्ट्री दाखवण्‍याचा प्रयत्‍न या चित्रपटात दाखवण्‍यात आलाय. तेजूची आई म्‍हणजेच राजश्री निकम आणि वडील (रवी काळे) यांचा अभिनय उत्तम केलाय. चित्रपटाची इतर अंगेही ठीक आहेत. 
Image result for vanilla strawberry and chocolate movie
महाराष्ट्राचे कुलदैवत आणि स्फूर्तिस्थान असलेल्या श्री विठ्ठलावर आधारित 'विठ्ठल ' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटातील श्रेयस तळपदेवर चित्रीत करण्‍यात आलेले गाणे 'विठ्ठला विठ्ठला' रिलीज झाले आहे.  सचित पाटील, अशोक समर्थ, दीप्ती धोत्रे, भाग्यश्री मोटे आणि हर्षदा विजय हे नवीन चेहरे या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.  
या अध्‍यात्‍मिक चित्रपटाबरोबर एक भयपट देखील येतोय. 'होरा' असे त्‍या चित्रपटाचे नाव आहे. 'होरा' हा स्पॅनिश शद्ब असून त्‍याचा अर्थ 'वेळ' असा आहे. रात्रीच्‍या वेळी रस्‍ता चुकलेल्‍या एका वाटसरूची कथा, रहस्यमय आणि विचित्र सावल्यांचा खेळ आणि अडकलेल्‍या त्‍या वाटसरूची घालमेल....अशी चित्रपटाची थरारक कथा आहे. या थ्रीलर चित्रपटात काहीतरी नवीन असणार, हे नक्‍की. 
Image result for marathi movie hora
'वन वे तिकीट' व '३१ दिवस' यांसारख्या चित्रपटांमधून दिसलेला अभिनेता शशांक केतकर आगामी मराठी चित्रपट ‘आरॉन’मध्‍ये दिसणार आहे. त्‍यात नेहा जोशीची देखील मुख्‍य भूमिका आहे. विशेष म्‍हणजे, नेहा आणि शशांक पहिल्‍यांदाच एकत्र या चित्रपटाच्‍या माध्‍यमातून प्रेक्षकांसमोर येत आहेत. चित्रपटातील शशांकची  भूमिका देखील एकदम वेगळी आहे. 
नशिबाच्या संकल्पनेवर आधारीत असलेला एक नवाकोरा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सर्वांचा आवडता विनोदवीर भाऊ कदम नव्‍या वर्षात या चित्रपटाच्‍या माध्‍यमातून सर्वांसमोर येत आहे. उदय प्रकाश लिखित 'दिल्ली की दीवार' या कथेवर आधारीत असलेला 'नशीबवान' हा चित्रपट नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ११ जानेवारी २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात मिताली जगताप वराडकर आणि नेहा जोशी यांची देखील मुख्य भूमिका आहेत.
Related image

मुस्लिम मराठी साहित्य संमेलन २१ मेपासून


 | Updated: 14 May 2016, 03:00:00 AM

मुस्लिम बोर्डिंगतर्फे आयोजित मुस्लिम-मराठी साहित्य संमेलन कोल्हापुरात २१ व २२ मे रोजी केशवराव भोसले नाट्यगृहात होणार आहे.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
मुस्लिम बोर्डिंगतर्फे आयोजित मुस्लिम-मराठी साहित्य संमेलन कोल्हापुरात २१ व २२ मे रोजी केशवराव भोसले नाट्यगृहात होणार आहे. प्रायोगिक रंगभूमीवरील नाटककार शफाअत खान संमेलनाचे अध्यक्ष असतील. संमेलनाचे स्वागताध्यक्षपद मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष छत्रपती श्रीमंत शाहू महाराज भूषविणार आहेत. तर उदघाटन डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या संमेलनाच्यानिमित्ताने दोन दिवस सांस्कृतिक व साहित्यिक कार्यक्रमांची पर्वणी कोल्हापूरकरांना मिळणार आहे. संमेलनासाठी राज्यातून सातशेहून अधिक साहित्यिक सहभागी होणार आहेत. उदघाटनसत्रानंतर दुपारी अडीच वाजता ‘वर्तमान वास्तव आणि मुस्लिम मराठी साहित्य’ या विषयावरील परिसंवाद होणार आहे. मैनुद्दिन मुतवल्ली, फारुख तांबोळी, पांडुरंग कद, आरिफ शेख, डॉ. गिरीश मोरे, फारूख शेख आदी सहभागी होणार आहेत. दुपारी चार वाजता प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली ‘पर्यावरण विषयक प्रश्नांना आजचे साहित्य ​भिडते का ?’ या ​विषयावर परिसंवाद होणार आहे. पाशा पटेल, विलास सोनवणे, महेंद्र कदम आणि डॉ. एम. सी. शेख आदी परिसंवादात सहभागी होणार आहेत. सायंकाळी सात वाजता हिंदी गीतकार समीर यांच्याशी रियाज शेख यांचा संवाद हा कार्यक्रम आहे. तर रात्री कवी सय्यद अल्लाउद्दीन यांच्या अध्यक्षतेखाली काव्यमैफल रंगणार आहे. यामध्ये मुबारक शेख, फातीमा मुजावर, डी. के. शेख, श्रीराम प​चिंद्रे, प्रसाद कुलकर्णी, एकनाथ पाटील, फरजाना डांगे, साबीर शोलापुरी यांच्यासह नवोदित कवी सहभागी होणार आहेत.

रविवारी (ता. २२ मे) सकाळी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या अध्यक्षतेखाली ‘मुस्लिम समाज आणि प्रसार माध्यमे’ याविषयार परिसंवाद होणार आहे. यामध्ये गणी पटेल, जयदेव डोळे, जावेद आनंद, इब्राहिम अफगाण, खालीद मुल्ला आणि जयसिंग पाटील विवेचन करणार आहेत. दुपारी ज्येष्ठ मुस्लिम मराठी लेखिका नसीमा हुरजूक आणि आशा आपराद यांची प्रकट मुलाखत अनुराधा कदम आणि स्वालिया शिकलगार घेणार आहेत.

वयापेक्षा मोठा पार्टनर...'बडे अच्‍छे लगते हैं'


प्रेम न बाडी उपजै, प्रेम न हाट बिकाय।
राजा परजा जेहि रूचै, सीस देइ ले जाय।।

संत कबीर यांच्‍या या दोह्‍याने प्रेमाचा खरा अर्थ लक्षात येतो. प्रेम न कुठल्‍या शेतात उगवते न कुठल्‍या बागेत, हा तर तो खजिना आहे जो कुण्‍या व्‍यक्‍तीला आवडला तर ती व्‍यक्‍ती राजा असो वा प्रजा, तो आपल्‍या जीवापेक्षाही अधिक मिळवण्‍यासाठी तत्‍पर असतो. प्रेमाची कोणती सीमा असते ना वय. त्‍यामुळेच आपले प्रेम मिळवण्‍यासाठी इतर कुणाचाही विचार केला जात नाही. कोण काय म्‍हणेल, याची पर्वा त्‍यांना नसते. मग, ती व्‍यक्‍ती वयाने मोठी असो वा लहान. प्रेमामध्‍ये त्‍यांचे वय कधीच आड येत नाही. 

बॉलिवूडमध्‍ये अशा अनेक अभिनेते/अभिनेत्री आहेत, ज्‍यांना 'बडे अच्छे लगते हैं'. आपल्‍यापेक्षा कितीतरी वयाने मोठ्‍या किंवा लहान अभिनेते/अभिनेत्रींशी त्‍यांनी विवाह केला आहे. प्रेमात लोक वेडे होतात. लग्‍न करण्‍यासाठी येथे कोणतेही स्‍टेटस पाहिले जात नाही, पैसे पाहिले जात नाही, धर्म, जात-पात पाहिली जात नाही. येथे केवळ प्रेम पाहिलं जातं. वय लहान असो वा मोठे येथे त्‍याला अजिबात महत्त्‍व दिलं जात नाही. आपल्‍या वयापेक्षा मोठं अथवा लहान अभिनेते/अभिनेत्रींशी विवाह करणे हे अलिकडे वाढल्याचे दिसत असले तरी हा आजचाच ट्रेंड नाही तर जुन्‍या जमान्‍यातही हा ट्रेंड होता.  

अर्जुन कपूर आणि मलायका 

सध्या चर्चेत असलेली हॉट जोडी म्हणजे अर्जुन कपूर आणि मलायका. दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत, अशी चर्चा मध्‍यंतरी सुरू होती. अर्जुन कपूर ३३ वर्षांचा आहे तर मलायका ४५ वर्षांची. अर्थात मलायका अर्जुनपेक्षा १२ वर्षांनी मोठी आहे. मलायकाने अरबाज खानशी घटस्‍फोट घेतला. त्‍यानंतर अर्जुन आणि मलायकाची जवळीक वाढली. दोघे अनेकदा एकत्र स्‍पॉट झाले आहेत.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस 
प्रियंका चोप्रा आणि निक जोनस जोधपूरमध्‍ये लग्‍नबंधनात अडकले. प्रियांका ३६ वर्षांची आहे तर निक २६ वर्षे. म्‍हणजेच दोघांच्‍या वयात १० वर्षांचे अंतर आहे. दोघांची भेट पहिल्‍यांदा मेट गाला २०१७ च्‍या इव्‍हेंटमध्‍ये झाली होती. 

मिलिंद सोमन आणि अंकिता 

प्रेम आंधळं असतं, असं म्‍हटलं जातं. प्रेमाच्‍या आड कोणतीच गोष्‍ट येत नाही. मॉडेल मिलिंद सोमणचेदेखील तसेच झाले आहे. त्‍याच्‍यापेक्षा वयाने अर्ध्या असलेल्या अंकिता कोनवारसोबत मिलिंद सोमणने विवाह केला. मिलिंद सोमणचे वय ५२ तर अंकिता २४ वर्षांची आहे. 

मिलिंदची दुसरी पत्नी अर्थात अंकिता ही आसामची असून तिचे खरे नाव सुनकुस्मीता कोणवार असे आहे. मिलिंद सोमनने अंकिताशी २२ एप्रेल २०१८ ला महाराष्‍ट्रीयन पद्‍धतीने लग्‍न केले होते. मिलिंद सोमन आणि अंकिता यांच्‍या वयात २५ वर्षाचे अंतर आहे. अंकिता मिलिंदपेक्षा लहान आहे. या कारणावरुन या जोडीला ट्रोल करण्‍यात आले होते. याआधी मिलिंद सोमनने २००६ मध्‍ये फ्रान्‍समधील अभिनेत्री मिलिन जैम्पेनोई हिच्‍याबरोबर लग्‍न केले होते. त्‍यांचे हे लग्‍न फार काळ टिकू शकले नाही. तीन वर्षांतच ते वेगळे झाले. 

शाहिद कपूर-मीरा राजपूत 

शाहिद आणि मीराचे लग्‍न २०१५ मध्‍ये झाले होते. आणि त्‍यावेळी मीरा २१ वर्षांची होती तर शाहिद ३४ वर्षांचा. दोघांच्‍यामध्‍ये १३ वर्षांचे अंतर आहे.  मीरा राजपूतने आपल्‍या इ्‍स्‍टाग्राम चॅटमध्‍ये फॅन्‍सनी विचारलेल्‍या प्रश्‍नांना उत्तर देताना म्‍हटले होते, मी लग्‍नापूर्वी काही वर्षे आधी शाहिदला भेटले होते. त्‍यावेळी माझे वय ६ होते. एक फॅन म्‍हणून मी त्‍याला भेटले होते. 

सैफ अली खान-करीना कपूर 

सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांची जोडी मोठ्‍या पडद्‍यावर सुपरहिट राहिली. रिअल लाईफमध्‍येही या दोघांची जोडी हिट आणि नेहमीच चर्चेत राहिली आहे. करीना कपूर सैफ अली खानपेक्षा ११ वर्षांनी लहान आहे. सैफ करीनावर इतके प्रेम करत होता की, त्‍याने आपल्‍या हातावर करीनाचे नाव गोंदवले आहे. विशेष म्‍हणजे, सैफ विवाहित होता, त्‍याला दोन मुले आहेत. हे माहिती असतानाही करीना सैफशी विवाहबध्‍द झाली. 
सैफचा विवाह अभिनेत्री अमृता सिंहशी झाला होता. त्यांच्याही वयात खूपच अंतर होते. हे अंतर तब्बल १२ वर्षांचे होते. अमृता सैफपेक्षा तब्बल १२ वर्षांनी लहान होती. म्हणजे सैफच्या दोन बायकांच्यामध्ये तब्बल २४ वर्षांचे अंतर आहे हा एकप्रकारचा विक्रमच म्हणावा लागेल. सैफ आणि अमृताला सारा अली खान आणि इब्राहीम ही दोन मुले आहेत. broken heartअमृतापासून वेगळे झाल्‍यानंतर सैफने करीनाशी विवाह केला. सैफ-करीनाला एक मुलगा तैमूर आहे. विशेष म्‍हणजे सैफची दुसरी बायको करीना, सैफ आणि अमृता सिंगच्‍या विवाहात उपस्‍थित होती. 

रितेश देशमुख आणि जेनेलिया 

रितेश देशमुख आणि जेनेलियाची केमिस्‍ट्री मोठ्‍या पडद्‍याबरोबरच रिअल लाईफमध्‍येही जुळली. तुझे मेरी कसम या चित्रपटात दोघे एकत्र आले ते कायमचेच. खर्‍या आयुष्‍यातही ते दोघे फेब्रुवारी २०१२ मध्‍ये एकमेकांचे झाले. रितेश जेनेलियापेक्षा ९ वर्षांनी मोठा आहे. पण म्हणतात ना प्रेमाला वयाची काय कशाचीच मर्यादा बांधून ठेऊ शकत नाही.  

संजय दत्त-मान्‍यता दत्त 

मुन्ना भाई अर्थातच संजय दत्तने मान्यता दत्तशी तिसरा विवाह केला होता. मान्‍यता संजयला लग्‍नाआधी ९ वर्षांपासून ओळखत होती. संजय दत्तचे अनेक अफेअर्सही होते. संजय मान्‍यतापेक्षा १९ वर्षांनी मोठा आहे. तरीही मान्‍यताने संजय दत्तशी २००८ मध्ये विवाह केला. 

संजय दत्तची पहिली पत्नी ऋचा शर्मा हिचे कॅन्सरने १९९६ मध्ये निधन झाले. यानंतर संजयने रिया पिल्लई हिच्याशी लग्न केले होते. पंरतु, संजय दत्त आणि त्याचे संबंध बिघडल्याने २००८ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर संजय यांनी मान्यतासोबत विवाह केला.  

आमिर खान आणि किरण राव 

आमिर खान आणि किरण राव ही चर्चित जोडी. कारण आमिर खानने एक अभिनेता म्‍हणून नाव कमावले तर आमिर-किरण आपल्‍या विविध सामाजिक कामांमुळे चर्चेत राहिले आहेत. आमिर किरण रावपेक्षा ९ वर्षांनी मोठा आहे. 

आमिरने किरण रावसाठी आपले पहिले प्रेम सोडले. 'लगान' चित्रपटाने आमिरची पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ दोन्‍ही बदलले. लगान चित्रपटाच्‍या शूटिंगवेळी आमिर आणि किरणची पहिली भेट झाली होती. heart या चित्रपटात किरण शामिन देसाई यांची असिस्टंट होती. किरणलाही आमिर आवडायचा. लगानच्‍या सेटवर आमिरने किरणकडे तिच्‍या कानातील बाली (ईअररिंग्‍ज) मागितले होती आणि तेथूनच दोघांची लव्‍हस्टोरी सुरू झाली होती. २००५ मध्‍ये आमिरने किरणशी विवाह केला. आमिरने २००२ मध्‍ये आपली पहिली पत्नी रीना दत्ताशी घटस्‍फोट घेतला. घटस्‍फोटानंतर आमिरला रिनाला जवळपास ५० कोटी रुपये द्‍यावे लागले होते. 

आमिर आणि रीना दत्ताचे लव्‍ह मॅरेज होते. त्‍यांनी आपल्‍या आई-वडिलांच्‍या मर्जीविरुध्‍द जाऊन लग्न केले होते. अनेक दिवस त्‍यांनी आपले लग्‍न लपवून ठेवले होते. आमिर-रीना दत्ताचे लग्‍न झाले, त्‍यावेळी रीना विद्‍यार्थिनी होती. आमिर त्‍यावेळी 'कयामत से कयामत तक' चित्रपटाचे शूटिंग करत होता. 

फराह खान आणि शिरीष कुंदर

फराह खान शिरीषपेक्षा १० वर्षांनी मोठी आहे. त्‍यांना तीन मुले आहेत. दोघे ९ डिसेंबर, २००४ रोजी लग्नगाठीत अडकले. शिरीषचा जन्म २४ मे, १९७३ रोजी मंगळूरु, कर्नाटकात झाला. तर फराहचा जन्म ९ जानेवारी, १९६५ रोजी मुंबईत झाला. लग्नानंतर जवळजवळ चार वर्षांनी शिरीष आणि फराह तिळ्या मुलांचे आई-वडील झाले. अन्या आणि दीवा ही मुलींची तर जार हे त्यांच्या मुलाचे नाव आहे.

श्रीदेवी आणि बोनी कपूर

बोनी कपूर श्रीदेवी यांच्‍यापेक्षा ८ वर्षांनी मोठे आहेत. श्रीदेवी यांच्‍याशी विवाह केला, त्‍यावेळी बोनी कपूर  दोन मुलांचे बाप होते. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांना जान्‍हवी आणि खुशी या दोन मुली आहेत. 

बोनी कपूर हे त्‍यांचा भाऊ अनिल कपूर आणि श्रीदेवी यांना घेऊन  'जुदाई' चित्रपट बनवत होते. त्‍याचदरम्‍यान, श्रीदेवी यांची आई राजेश्वरी यांची तब्‍येत बिघडली. त्‍यांना उपचाराकरता अमेरिकेला घेऊन जावे लागले. त्‍यावेळी श्रीदेवी बोनी कपूर यांना आपल्‍यासोबत घेऊन गेल्‍या. श्रीदेवी यांच्‍या आईच्‍या उपचारावेळी बोनी कपूर यांनी त्‍यांना पाठिंबा दिला. परंतु, श्रीदेवी यांच्‍या आईचे निधन झाले. बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्‍या आईवर चुकीच्‍या पध्‍दतीने उपचार झाल्‍याचा आरोप करत कोर्टात खटला दाखल केला आणि संघर्ष करून मोबदला वसूल केला. श्रीदेवी यांनी अनुभवले की, बोनी कपूर नि:स्वार्थ भावनेने हे सर्व करत होते. बोनी विवाहित आहेत, हे माहिती असतानादेखील श्रीदेवींना बोनी कपूर यांच्‍याशी जवळीक वाटून प्रेम झाले. 'जुदाई' या चित्रपटाच्‍या निर्मितीवेळी बोनी कपूरही श्रीदेवीच्‍या प्रेमात पडले होते. त्‍यानंतर बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्‍याशी दुसरा विवाह केला. त्‍यावेळी बोनी कपूर यांना आपल्‍या कुटुंबीयांकडून नाराजीचा सामनादेखील करावा लागला. बोनी यांचा दुसरा विवाह असल्‍याने त्‍या काळात हे प्रकरण खूप वादग्रस्‍त ठरले होते. 

धर्मेंद आणि हेमा मालिनी 

आणखी एक हिट जोडी म्‍हणजे धर्मेंद आणि ड्रीम गर्ल हेमा मालिनी. 'शोले'च्‍या सेटवर हेमा यांच्‍याशी धर्मेंद्र यांना प्रेम झालं. मग काय, धमेंद्र आधीपासूनच विवाहित असतानाही हेमा यांनी त्‍यांचं प्रेम स्‍वीकारलं. आपल्‍यापेक्षा १३ वर्षांनी मोठे असणारे धर्मेंद्र यांच्‍याशी हेमा यांनी विवाह केला. धर्मेंद्र हे हेमा यांच्‍यावर इतके प्रेम करत होते की, हेमा यांच्‍याशी लग्‍न करण्‍यासाठी त्‍यांनी आपला धर्म बदलला होता. 

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी १९७० मध्‍ये पहिल्‍यांदाच मोठ्‍या पडद्‍यावर दिसले होते. 'शराफत' आणि 'तुम हसीन मैं जवां' या चित्रपटांनंतर दोघांमध्‍ये जवळीक निर्माण झाल्‍याची चर्चा सुरू झाली होती. याशिवाय, लग्‍नानंतर देखील पहिली पत्‍नी प्रकाश आणि मुलांना मी सोडू शकत नाही. माझा परिवार स्‍वीकारावा लागेल, अशी अट धर्मेंद्र यांनी हेमा यांच्‍यासमोर ठेवली होती. हेमा यांनी ती अट स्‍वीकारली आणि दोघांनी १९७९ मध्‍ये विवाह केला.  

धर्मेंद्र यांच्‍या पहिली पत्‍नीचे नाव प्रकाश कौर असे आहे. त्‍यांना चार मुले- सनी, बॉबी, अजिता आणि विजिता आहेत. तर धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी यांच्‍या दोन मुली ईशा आणि अहाना आहेत.

दिलीप कुमार आणि सायरा बानो 

दिलीप कुमार आणि सायरा बानो या जोडीने एक काळ गाजवला. ही  जोडी त्‍यावेळची फेमस जोडी. १९६६ मध्‍ये २२ वर्षांच्या सायरा बानोला दिलीप कुमार आवडायचे. दिलीप यांचे त्यावेळी वय होते ४४ वर्षे. परंतु, प्रेमापोटी आपल्‍या वयापेक्षा दुपटीने असलेल्‍या दिलीप यांच्‍यासोबत विवाह करण्‍याचं धाडस सायरा यांनी केलं होतं. १९८० मध्‍ये त्‍यांच्‍या नात्‍यात काही काळासाठी दुरावा आला होता. परंतु, काही काळानंतर दोघे पुन्‍हा एकत्र आले. 
एज-डिफरन्‍स लव्‍ह 

एकेकाळी वयात इतके अंतर म्‍हटलं की, भुवया उंचवायच्‍या. आपल्‍यापेक्षा ५-७ वर्षांनी मोठ्‍या असणार्‍या व्‍यक्‍तीबरोबर लग्‍न करायचे म्‍हणजे, जगातील दहाव्‍या आश्‍चर्याप्रमाणे असायचं. परंतु, अशा प्रकारची नाती तेव्‍हाही बनायची आणि आताही तो सिलसिला कायम आहे.  बॉलिवूडमध्‍ये अशा नात्‍यांना नेहमीच मान्‍यता दिली गेली. आता बॉलिवूडमध्‍ये ऐज-डिफरन्‍स लव्‍ह कॉमन गोष्‍ट बनली आहे. 

सलमान खान

तरी बरं सल्‍लू भाईने आपल्‍या लग्‍नाचा विषय ड्रॉप केला आहे. जर सलमान आणि कॅटरीनाचं प्रेम पक्‍क झालं असतं तर येथे १९ वर्षांचं अंतर पाहायला मिळालं असतं. एवढेच नाही तर जर लुलियासोबत त्याने लग्न करायचे ठरवले तर दोघांमध्ये १५ वर्षांचे अंतर असेल. 

वयातील अंतर या कपल्‍सच्‍या आयुष्‍यात गौण आहे. त्‍यामुळेच या जोड्‍या जीवनाता यथासांग आनंद घेत आहेत. लग्नामध्ये एज गॅप हा विषय आता कॉमन झाला आहे. म्‍हणजेच जर तुमचे लग्‍नाचे वय होऊन गेले आहे आणि घरचे स्‍थळ शोधत असतील तर जरा पेशन्‍स ठेवा. तुम्‍हालाही कदाचित अगदीच कमी वयाचा किंवा खूपच एजेड मॅच्युअर्ड पार्टनरही मिळू शकतो. आताच्या ट्रेंडचे विचाराल तर आजची तरुणाई गुणगुणत आहे... 'बडे अच्‍छे लगते हैं'.

Wednesday, March 11, 2020

...तरीही सिंदूर लावते रेखा

Image result for rekha


ज्या अभिनेत्रीनं पिढ्यानपिढ्या आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर अधिराज्य गाजवलं. साठी उलटूनही तिच्‍या सौंदर्याची जादू आजही कमी झालेली नाही. अशी अभिनेत्री रेखाचा १० ऑक्टोवरला वाढदिवस. सिनेसृष्टीत जिच्या काळातील अभिनेते-अभिनेत्रींची मुलं अभिनय क्षेत्रात आली तरीही तिचे रसिक तसूभरही कमी झाले नाहीत. आजदेखील टॉपच्‍या सुंदर अभिनेत्रींमध्‍ये सदाबहार रेखाचं नाव घेतलच जातं. प्रत्‍येकाला भावणारी, सुंदर, प्रतिभावान आणि आपल्‍या कमलनयनांनी खूप काही सांगणारी रेखा. तिच्‍या सौंदर्याचं कौतुक करावं तितकं थोडंच! अन्‌ ते पिढ्यान्‌पिढ्या सुरूच आहे.


ही प्रतिभावान ६५ वर्षांची अभिनेत्री अदाकारी करीत ज्‍यावेळी पडद्‍यावर येते, त्या प्रत्येक वेळी तिचं सौंदर्य खुललेलं दिसतं. तिच्‍या वैयक्‍तिक आयुष्‍यातील चढ-उतारांप्रमाणेच तिच्‍या करिअरनेदेखील अनेक वळणे घेतली. तिच्या आयुष्यातही चढ-उतार आले. मात्र, ती डगमगली नाही, खचली नाही स्‍वाभिमानानं अन्‌ आपल्या सौंदर्यावर आणि मनमोहक अदांवर या मायावी वाटणार्‍या वास्‍तव दुनियेत निर्विवादपणे आपली हुकमत गाजवल राहिली. रेखाकडे नेमकं काय आहे, जे आजच्‍या अभिनेत्रींमध्‍ये नाही?


तिच्या सौंदर्याची अदा भुरळ जसं बॉलिवूडला आहे तसेच हॉलिवूडलाही आहे. या अशा सौंदर्यवतीच्या सौंदर्याबद्‍दल वर्षानुवर्षे सांगितलं जातं आणि संपूर्ण जग वेडं आहे, ते तिच्या सौंदर्याच्या अदावर. अशा रेखाच्‍या सौंदर्याचं रहस्‍य काय आहे? हे सौंदर्य त्‍यांना लहानपणापासून मिळालं आहे? की काळानुरूप तिनं स्‍वत:लाच इतकं सुदंर बनवलं? तिच्या साड्या, साजशृंगार ते केसांच्या भांगेत अजुनही सिंदूर लावणं...या प्रश्‍नांची उत्तरं जाणून घ्यायचीच असतील तर तिच्या चित्रपटांचा चढता आलेखच पाहणं गरजेचं आहे. आजही रेखाला पाहिल्‍यानंतर तिचे वय लक्षात येणं अशक्‍यचं!

... तरीही सिंदूर लावते रेखा

रेखाच्या आयुष्यातील उत्‍सुकता प्रत्येकालाच आहे. ती राहते कशी ते तिचं लग्न झालं आहे का?, झालं तर नवरा कोण? आणि वैवाहिक आयुष्य नेमकं आहे तरी कसं? अशा एक ना अनेक गोष्टी रेखाच्‍या वैयक्‍तिक आयुष्‍याबद्‍दल सांगितल्या जातात. परंतु, रेखाला त्‍याच्‍याशी काही देणंघेणं नाही. रेखाच्‍या पतीचे निधन झालं आहे, तरीही ती सिंदूर लावते. ती सिंदूर का लावते या गोष्‍टीवर अनेकदा चर्चाही झाल्‍या आहेत. कदाचित, रेखाचा हा अंदाज आहे, जो मायानगरीत केवळ टिकलाच नाही तर तिची एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली. आयुष्‍यातील अगणित घडामोडी तिची बायोग्राफी ‘रेखा-ॲन अनटोल्ड स्टोरी’मध्‍ये पाहायला मिळू शकतात. यामध्ये तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा झालेला आहे. 


रेखाच्‍या सौंदर्याचं रहस्‍य जाणून घेण्‍यासाठी आजचा रसिक उत्‍सुक आहे. साठी पार केल्‍यानंतरही तिने स्‍वत:ला अगदी नवतारुण्य लाभलेल्या तरुणीला लाजवेल यापेक्षा फिट ठेवलं आहे. आजदेखील रेखा एखाद्‍या पार्टीला जाते, त्‍यावेळी रसिकांच्या नजरा तिच्‍यावरून हटता हटत नाहीत. मग तो कार्यक्रम असो वा ॲवॉर्ड फंक्‍शन असो नाही तर कुणाचा विवाह समारंभ असो...त्‍याठिकाणी रेखा आपल्‍या अदाकारीने सर्वांच लक्ष वेधून घेते, आणि तितक्‍याच नम्रपणे ती सामोरी जाते. 

डार्क लिपस्‍टिक आणि साजशृंगार

रेखाचं नाव घेताच डोळ्‍यासमोर येतो तो मोहवणारा तिचा लूक. केसात गजरा, केसातल्‍या भांगामध्ये ठसठशीत भरलेला सिंदूर आणि ओठांवर गडद रंगांचे लिपस्‍टिक. हे सगळं असलं तरी तिचे बोलके डोळे कुणाच्या नजरेतून सुटत नाहीत. त्या बोलक्या नितळ डोळ्यात काळं गडद काजळ असतं तेव्‍हा ती राजकन्येपेक्षाही अधिक सौंदर्याची खाण वाटत असते. आताचा जमाना शॉर्ट, मिनी स्‍कर्टचा असला तरी रेखाची साडी मात्र वर्षानुवर्षे मोहून टाकणारी असते. रेखाचं कौतुक करताना अनेक शब्द सापडनेसे होतात. तेव्‍हा त्यांच्या तोंडून एकच शेर येतो तो म्‍हणजे 'रेखा तो बस रेखा ही हैं'.


अजूनही फिट आहे रेखा

या इंडस्‍ट्रीजमध्ये अनेक अभिनेते-अभिनेत्री आल्या गेल्या मात्र काळावर अधिराज्य गाजवत राहिलं ते एकच नाव ते म्‍हणजे रेखा.  रेखाचं सांगायचं झालं तर तिने आपला फिटनेस कायम ठेवला आहे. फिटनेसबद्‍दल ती नेहमीच सजग असते. तिने 'माईंड ॲण्‍ड बॉडी टेम्‍पल' नावाने एक व्‍हिडिओ शेअर केला होता. ज्‍यात ती चिरतरुण राहण्‍याचं रहस्‍य होतं. क्‍लींजर, टोनिंग, माईस्‍चॉरायझिंग आणि मेकअप रिमूव्‍ह करण्‍याबराबरच रेखा ठेवण्‍यासाठी अरोमा थेरेपी आणि स्‍पा ट्रीटमेंट देखील घेते. त्‍यामुळेच तिचा चेहरा इतका ग्‍लो करतो.


आहाराबाबतही रेखा खूप काळजी घेते. ती साडेसात वाजताच जेवते. ज्‍यामुळे तिला हलकं वाटतं आणि त्‍यानंतर ती फ्रेश ज्‍यूस पिते. त्‍याचबरोबर खूप पाणीदेखील पिते. रेखाने एका मुलाखतीत म्‍हटले होते की, ती फक्‍त शाकाहारी जेवणच घेते. ताज्‍या भाज्‍या आणि दही, सॅलडचा नियमितपणे खाते. परंतु, रेखा भात खात नाही. 

उंची साड्‍या आणि गोल्‍डन शाईन

रेखाच्‍या कांजीवरम साड्‍या फेव्‍हरेट आहेत. गोल्‍डन शाईन असलेल्‍या लाल, पांढर्‍या आणि इतर रंगांच्‍या साड्‍या नेसणं, तिला आवडतं. साडीसोबत ट्रॅडिशनल ज्वेलरी घालणे, बोल्ड लिप शेड्स लिपस्‍टिक लावणे हे नित्‍याचचं.

लांबसडक काळेभोर केस

रेखाचे काळेभोर केस तिच्‍या सौंदर्याला चारचाँद लावतात. ती केसांत दही, मध आणि अंड्‍यातील पांढरा भागाचा बनवलेला पॅक लावते. ती हेअर ड्रायरचा वापर कधीच करत नाही. किंवा केसांवर कुठलाही रासायनिक द्रव्‍यांचा वापर करीत नाही. आयुर्वेदाचा वापर ती नेहमी करते. म्‍हणून आजही तिच्या लांबसडक केसांचं रहस्‍य सर्वांना भुरळ घालणारं आहे.

स्‍टाईल काय असते, हे रेखाकडून शिकावं. या वयातही ती आजच्‍या अभिनेत्रींना स्‍टायलिंग टिप्‍स देते. २०१७ मध्‍ये प्रसिध्‍द फोटोग्राफर डब्‍बू रतनानीच्‍या कॅलेंडर लॉन्‍चप्रसंगी रेखा पोहचली, त्‍यावेळी तिच्‍या स्‍टाईलने चाहता वर्ग घायाळ झाला होता. ब्‍लॅक ॲण्‍ड व्‍हाईट आऊटफिट, डार्क रेड लिपस्‍टिक, डोक्‍यावर बांधलेला वेगळ्‍या अंदाजातील स्‍कार्फ आणि काळा गॉगल घालून रेखा हॉट दिसत तर होतीच. पण, कार्यक्रमाचं मुख्य आकर्षणही रेखाच झाली होती.

अशोक कुमार, किशोर कुमार आणि मधुबाला



अशोक कुमार जन्मदिन आणि किशोर कुमार स्मृतिदिनानिमित्त


अशोक कुमार, किशोर कुमार आणि मधुबाला यांचं सिनेजगतात आणि रिअल लाईफमध्ये अतूट नातं. दिलीपकुमार, राज कपूर आणि देव आनंद हे सुपरस्‍टार होण्‍यापूर्वी १५ वर्षे आधी अशोककुमार हे सुपरस्‍टार होते. या सुपरस्‍टारबद्‍दल कुणालाही आकर्षण वाटावे, असे अशोककुमार यांचे व्‍यक्‍तिमत्त्‍व होते. मधुबालाही त्‍याला अपवाद नव्‍हती. तिच्‍यासारखी सुंदर, मनमोहक अदानी घायाळ करणारी अदाकारा, आपल्‍या मादक अदानी आणि मदमस्‍त नयनांनी, सुंदर हास्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी मधुबाला. तिने आणि अशोक कुमार यांनी एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केले. 


असे म्‍हटले जाते की, 'महल'चा सुटाबुटातील अशोककुमार मधुबालालाही भावला. मधुबालाने एकदा अशोक कुमार यांना प्रेमपत्र आणि लाल गुलाब देऊन प्रेम व्‍यक्‍त केले होते. परंतु, अशोक कुमार हे अभिनेत्री नलिनी जयवंतच्‍या प्रेमात होते. त्‍यामुळे मधुबाला यांचे पत्र बालिशपणा म्‍हणून त्‍यांनी सोडून दिले होते. 

अशोकुमार आणि नलिनी यांचे 'संग्राम' आणि 'समाधी' हे दोन चित्रपट तुफान गाजले होते. 'समाधी'मधील 'गोरे गोरे बाँके छोरे,' 'कभी मेरी गली आया करो' हे दोन गाणी प्रचंड लोकप्रिय झाले होते. त्‍यांनी 'शेरू,' 'नौबहार,' 'सलोनी,' 'जलपरी,' 'नाझ' आणि 'मिस्‍टर एक्‍स' या चित्रपटांत एकत्र काम केले. दोघेही खर्‍या खुर्‍या आयुष्‍यात प्रेमात होते. अशोककुमार यांचे याआधीच लग्‍न झाले होते. पुढे नलिनी-अशोक कुमार दोघे लग्‍नही करणार होते. परंतु, त्‍यांचे लग्‍न होऊ शकले नाही. 

अशोकुमार आणि मधुबाला   

'महल' हा चित्रपट सुपरडुपर हिट झाल्‍यानंतर अशोकुमार आणि मधुबाला यांचे तीन चित्रपट हिट झाले. १९५० साली 'निशाणा' हा चित्रपट आला. त्‍यानंतर तब्‍बल सात वर्षांनी 'एक साल' हा चित्रपट आला. या चित्रपटातील ओ. पी. नय्‍यरच्‍या संगीताने धूम माजवली. या चित्रपटातील 'आईये मेहरबाँ, बैठीए जानेजा, शौकसे लिजिए जी इश्‍क के इम्‍तेहान' हे सुंदर रोमँटिक गाणे मधुबालाने आपल्‍या आयुष्‍यातील सर्वोत्तम नृत्‍य आणि अदाकारी पेश केली आहे. तिच्‍या या अदानी प्रेक्षकांना घायाळ केले. 

असं मिळालं 'मधुबाला' नाव 

'महल' चित्रपटाच्‍यावेळी अशोककुमार ३८ वर्षांचे होते. तर मधुबाला १६ वर्षांची होती. एकेकाळची 'बॉम्‍बे टॉकिज'ची मालकीण देविका राणी हिचा नायक म्‍हणून अशोककुमार यांनी काम केले होते. याच देविका राणी यांनी 'बेबी मुमताज' यांचे नाव 'मधुबाला' असे केले होते. 

किशोर कुमार आणि मधुबाला

गायक किशोर कुमार यांचा विवाह १९५० मध्ये बंगाली चित्रपटांची प्रसिध्द अभिनेत्री आणि गायिका रूमा गुहा ठाकुरताशी झाला. त्यांना एक बाळ झालं. त्याचं नाव अमित कुमार असं ठेवलं. रूमा आणि किशोर कुमार १९५८ मध्ये वेगळे झाले. पुढे रूमा यांनी लेखक-दिग्दर्शक अरूप गुहा ठाकुरताशी विवाह केला. यानंतर किशोर कुमार आणि मधुबाला यांच्या लव्ह स्टोरीला सुरूवात झाली. 

पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर किशोर कुमार एकटे पडले होते. किशोर कुमार यांच्या विनोदी स्वभावाने अभिनेत्री मधुबालाला त्यांच्याशी प्रेम झाले. किशोर यांनी ज्यावेळी लग्नासाठी मधुबालाला प्रपोज केले होते, त्यावेळी ती आजारी होती आणि उपचारासाठी लंडन जात होती. मधुबालाच्या ह्रदयाला छिद्र होते. दोघांनी १९६० मध्ये कोर्ट मॅरेज केलं. 

'किस्‍मत' हा १९४२ ला आलेल्‍या चित्रपटाने अशोककुमार यांना प्रचंड प्रसिध्‍दी मिळवून दिली. याच चित्रपटाच्‍या शूटिंगवेळी बेबी मुमताज (मधुबाला) 'बॉम्‍बे टॉकिज'मध्‍ये यायची. त्‍यावेळी ती ९ वर्षांची होती. अशोक कुमार यांचा लहान भाऊ किशोरकुमार आणि विनोदी अभिनेता मुमताज अलीचा मुलगा मेहमूद त्‍यावेळी बॉम्‍बे टॉकिजमध्‍ये खेळत असायचा. मधुबाला आणि किशोरकुमार हे भातुकलीचा खेळ खेळणारे खर्‍याखुर्‍या जीवनात पती-पत्‍नी बनले. मधुबालाचे प्रेम नाकारणारे अशोककुमार मोठे दीर बनले. 

सून म्‍हणून मधुबाला मान्‍य नव्हती...

किशोर कुमार आणि मधुबाला यांच्‍या लग्‍नाने अशोककुमार यांची आई प्रचंड संतापली. सून म्‍हणून मधुबाला त्‍यांना मान्‍य नव्‍हती. परंतु, अशोककुमार यांनी आपल्या आईची समजूत घातली आणि मधुबालाला सन्‍मानाने सून म्‍हणून घरात घ्‍यायला लावले. 

अशोक कुमार यांचे ३०४ चित्रपटांमध्‍ये काम 

अशोक कुमार यांनी ३०४ चित्रपटांमध्‍ये काम भूमिका केल्‍या. हिमांशू यांचा मृत्‍यू झाल्‍यानंतर 'बॉम्‍बे टॉकिज' ही चित्रपटनिर्मिती संस्‍था कर्जात बुडाली. अशोककुमार यांनी बॉम्‍बे टॉकिजला कर्जातून बाहेर काढले. असे म्‍हटले जाते की, त्‍यावेळचे ३५ लाख रुपयांचे बॉम्‍बे टॉकिजचे कर्ज अशोक कुमार यांनी फेडले होते. 


अशोक कुमार-नलिनी जयवंत 

नलिनी जयवंत आणि अशोक कुमार यांचे नाते फार काळ टिकले नाही. नलिनी आणि अशोककुमार चेंबूरच्‍या युनियन पार्क कॉलनीमध्‍ये समोरासमोरच्‍या बंगल्‍यात राहत असे. मृत्‍यूपर्यंत ते तेथेच राहिले होते.    

कोल्‍हापुरच्या कलानगरीतला कौतुक सोहळा आणि लतादीदी



चाळीसच्या दशकापासून ज्यांचा आवाज संगीत क्षेत्रात घुमतो आहे, अशा गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा २८ सप्टेंबरला वाढदिवस. मुलगी गळ्‍यात गंधार घेऊन जन्‍मली आहे. ही फार मोठी होईल. नाव मिळवेल, हे उद्‍गार आहेत लता मंगेशकर यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांचे. ते स्‍वत: अभिजात गायक होते. परवशता पाश दैवी हे त्‍यांचे नाट्‍यगीत अमर कीर्तीचे आहे. त्‍यांची स्‍वत:ची बलवंत कंपनी होती. तसेच चित्रपट संस्‍थाही त्‍यांनी स्‍थापन केली. परंतु, १९३२ च्‍या बोलपटांच्‍या झंझावातात त्‍यांचे नाट्‍यतेज झाकोळले आणि त्‍यांची सिनेमा कंपनीही अयशस्‍वी झाली.

लता, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही भावंडे. १९४१ मध्‍ये सांगलीत दीनानाथ यांचं निधन झालं. त्‍यानंतर मंगेशकर कुटुंब कोल्‍हापुरात आले. कोल्‍हापुरातील खरी कॉर्नरला बाबूराव पेंटर यांच्‍या घराजवळ मंगेशकर कुटुंब राहायचे. लतादिदी काही दिवस भवानी मंडपाजवळील जुन्‍या वाड्‍यातील एमएलजी हायस्‍कूलमध्‍ये शिकत होत्‍या. त्‍यांची अंगकाठी सडपातळ होती. त्‍या कबड्‍डी आणि खो-खो चांगल्‍या खेळायच्‍या. असा संदर्भ बाबुराव धारवाडे यांच्‍या जुनं कोल्‍हापूर या पुस्‍तकात सापडतो.

लताजींना २५ रूपयांचे बक्षीस

त्‍यावेळी कोल्‍हापुरात मास्‍टर विनायक यांची हंस पिक्‍चर्स कंपनी फार्मात होती. मास्‍टर विनायक यांनी लताजींना बोलावून घेतले आणि कंपनीसाठी काम करायची ऑफर दिली. त्‍या मॉबमध्‍ये, मुलींच्‍या मेळ्‍यात, नृत्‍यात आणि गायनाच्‍या स्‍पर्धेतही भाग घ्‍यायच्‍या. १९४१ रोजी पंजाबी चित्रपट खजांची गाणी प्रसिध्‍द होती. गायिका नूरजहाँने ती गायली होती. त्‍या चित्रपटांच्‍या गाण्‍यांची एक स्‍पर्धा राजाराम टॉकीजमध्‍ये आयोजित करण्‍यात आली होती. त्‍यातील 'लौट गई पापन अंधी' असं काही तरी गाणे लोकप्रिय होते. ते लताजींनी खूप सुंदर गायले होते. त्‍यावेळी त्‍यांना २५ रुपयांचे पहिले बक्षीस मिळाले होते.

शमशाद बेगम यांच्या आवाजातल्या गाण्यांनी "खजांची' चित्रपट सुपरहिट ठरला. यातल्या "सावन के नजारे हैं अहा अहा' या गाणं हिट ठरलं होतं. त्यावेळी पुण्यात या चित्रपटाच्या रौप्यमहोत्सवाच्या निमित्तानं ग्लोब थिएटरमध्ये नवोदित कलाकारांसाठी गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत बारा वर्षांच्या लतानं भाग घेऊन 'खजांची'मधील गाणं गाऊन पहिला क्रमांक मिळवला होता.

लता मंगेशकर या ताऱ्याचा उदय होण्यापूर्वी ज्या गायिकांची आपली संगीत कारकिर्द फुलवली होती, त्यापैकी एक शमशाद बेगम होत्या.

पुण्‍यात स्‍थलांतर

दरम्‍यानच्‍या काळात विनायकरावांनी पुण्‍यास स्‍थलांतर केले. तेथे त्‍यांनी आचार्य अत्रे, राजगुरू आदींच्‍या सहकार्याने युग फिल्‍म कंपनी प्रा. लि. ही संस्‍था काढली. दामुअण्‍णा मालवणकर, मीनाक्षी, विष्‍णूपंत जोग, सहाय्‍यक दिग्‍दर्शक दिनकर द. पाटील, माधव शिंदे, वसंत शेळके यांच्‍यासोबत लतादिदींनाही त्‍यांनी पुण्‍यात नेले. तेथे 'सरकारी पाहुणे,' 'पहिली मंगळागौर' हे चित्रपट काढले. त्‍यात लता यांनी 'आम्‍ही वळिखले गं' हे गाणे परकर पोलक्‍यात नाचत बागडत गायले होते. विनायकराव परत कोल्‍हापुरात आले. येथे त्‍यांनी शालिनी स्‍टुडिओत प्रफुल्‍ल पिक्‍चर्स संस्था काढली. त्‍यामुळे लताजी पुन्‍हा कोल्‍हापुरात आल्‍या.

पार्श्वगायनाची संधी

संगीत दिग्‍दर्शक दत्ता डावजेकर यांनी लताजींना पार्श्वगायनाची संधी दिली. विनायकरावांनी पुन्‍हा मुंबईस प्रफुल्‍लचे स्‍थलांतर केले. विनायकरावांनी येथे मोठे चित्रपट काढले. त्‍यांनी आपल्‍या चित्रपटात गोड गळ्‍याची अभिनेत्री नूरजहाँ यांना काम दिले.

लता आणि नूरजहाँ यांचा परिचय

नूरजहाँ आणि लता यांचा परिचय चित्रपटातूनच झाला. पार्श्वगायिका म्‍हणून लताजींना मुंबईत प्रसिध्‍दी मिळाली होती. राजकपूर यांच्‍या 'बरसात'मधील 'हवा में उडता जाये,' 'आवारा'मधील 'घर आया मेरा परदेशी' या गाण्‍यांनी लोकांच्‍या मनावर अधिराज्‍य गाजवले. मेहबूब यांच्‍या 'अंदाज' चित्रपटात संगीत दिग्‍दर्शक नौशाद यांनी लताबाईंच्‍या आवाजाचे सोने करून घेतले होते. तसेच संगीत दिग्‍दर्शक खेमचंद्र प्रकाश यांनी 'महल'मधील 'आयेगा, आयेगा आनेवाला' हे गाणे प्रेक्षकांच्‍या पसंतीस उतरलं. नंतर सी. रामचंद्र यांच्‍याबरोबर काम केले. 'अनारकली' चित्रपटातील 'ए जिंदगी उसी की है'ने सिनेरसिकांना मोहून टाकलं.


कोल्‍हापुरात कौतुक सोहळा

लताबाईंच्‍या या सर्व यशाचे कोल्‍हापुरकरांना अभिमान वाटला. कोल्‍हापुरकरांनी लताजींना अक्षरश: डोक्‍यावर घेतले. भालजी पेंढारकर यांनी मदनमोहन लोहियांच्‍याकरवी लताजींचा सत्‍कार करायचे ठरवले. लता मंगेशकर यांच्‍या पार्श्वगायनाचा रौप्‍यमहोत्‍सव कलानगरीत करण्‍याचे ठरले. १९६७ चे हे वर्ष. शाहू खासबाग कुस्‍त्‍यांच्‍या मैदानात संध्‍याकाळी सत्‍कार सोहळा झाला. गर्दीने मैदान तुडूंब भरले होते. भाई एम. के. जाधव नगराध्‍यक्ष होते. दिनकरराव यादव जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष, विख्‍यात कादंबरीकार आणि मा. विनायकांच्‍या कुटुंबातले ज्‍येष्‍ठ सदस्‍य वि. स. उर्फ भाऊसाहेब खांडेकर यांच्‍या हस्‍ते सत्‍कार झाला. नगराध्‍यक्षांनी भाषण केले. ते म्‍हणाले, 'लताचा गळा म्‍हणजे ईश्‍वरी लेणे आहे. ते क्‍वचितच कुणाला तरी लाभते. ते त्‍यांना त्‍यांच्‍या पित्‍यांच्‍या वारशाने आणि पुण्‍याईने लाभले आहे. लतादीदींच्‍या आवाजाने सारं कोल्‍हापूर 'लता'मय झाले.'

गौतम राज्‍याध्‍यक्ष आणि फोटोग्राफी



गौतम राजाध्‍यक्ष यांची अनेक प्रख्‍यात मॉडेल्‍स आणि फिल्‍मी जगतातील नामवंत अभिनेत्रींचे फोटो काढणारा ख्‍यातनाम फोटोग्राफर अशीच ओळख राहिली. त्‍यांची देशभरात आणि देशाबाहेरही ख्‍याती राहिली. 

Image result for gautam rajadhyaksha


काजोलपाजसून ते माधुरीपर्यंत अनेक अभिनेत्रींचे त्‍यांनी एकापेक्षा एक फोटोज काढले. त्‍यांनी काढलेले फोटो चांगले गाजले. गौतम राज्‍याध्‍यक्ष यांच्‍या फोटोग्राफीबद्‍दल थोडक्‍यात जाणून घेऊया. 

मृदू बोलणारे आणि गोड स्‍वभावाचे, मैत्रीपूर्ण सौदार्ह आणि दिसायला सुंदर असणारे, साधा झब्‍बा घालणारा माणूस, असे त्‍यांचे व्‍यक्‍तीमत्त्‍व. चमचमणार्‍या दुनियेत असूनही अत्‍यंत साधेपणाने राहणारे अशी गौतम राज्‍याध्‍यक्ष यांची ख्‍याती.  

गौतम राजाध्‍यक्ष फॅशन फोटोग्राफीतील ख्‍यातनाम व्‍यक्‍ती. १६ सप्‍टेंबर १९५०, रोजी मुंबई येथे त्‍यांचा जन्‍म झाला. त्‍यांचे शिक्षण सेंट झेवियर हायस्‍कूल, तर पुढील शिक्षण सेंट झेवियर मुंबई येथे झाले. त्‍यांनी advertising and public relations मध्‍ये डिप्‍लोमा केल्‍यानंतर ते एका कंपनीत नोकरी करू लागले. १९७४ पासून त्‍यांनी आपल्‍या करिअरला सुरूवात केली. बॉलिवूडमधील अनेक प्रख्‍यात अभिनेत्रींना त्‍यांनी आपल्‍या फोटोंच्‍या माध्‍यमातून प्रकाशझोतात आणले. फिल्‍मफेअर आणि इतर मासिकांमध्‍ये त्‍याचे फोटो नेहमी प्रसिध्‍द व्‍हायचे.

१९८०मध्‍ये शबाना आझमी, टिनामुनीम, जॅकी श्रॉफ या हिंदी चित्रपटसृष्‍टीतल्‍या अभिनेत्‍यांची त्‍यांनी काढलेल्या फोटोजना चांगली प्रसिध्‍दी मिळाली. १९८७ साली त्‍यांनी नोकरी सोडली. आणि पूर्णवेळ फोटोग्राफी व्‍यवसाय करण्‍याचा निर्णय घेतला. पुढे त्‍यांनी product, fashion, company आणि portfolio फोटोग्राफी करण्‍यास सुरूवात केली. 

Image result for gautam rajadhyaksha

ते कॉपीराईटर म्‍हणून काम करत होते. नंतर शोभा डे यांच्‍या चुलत भावाच्‍या मासिकासाठी (सेलिब्रिटी) फोटोग्राफी सुरू केले. त्‍यांची एक ग्‍लॅमर फोटोग्राफर म्‍हणून ओळख निर्माण झाली. त्‍याचबरोबर इतर मासिकांसाठी त्‍यांनी कामास सुरूवात केली. काही मराठी मालिका हिंदी चित्रपटांसाठी काम करण्‍यास सुरूवात केली. १९९७ मध्‍ये त्‍यांनी स्‍वत: लिहिलेले coffice table पुस्‍तक प्रकाशित केले. १९९२ साली त्‍यांनी 'भेहेखुदी' चित्रपटासाठी पहिला स्‍क्रिन प्‍ले लिहिला. त्‍यांच्‍या २० वर्षांच्‍या करिअरमध्‍ये काढलेल्‍या फोटोंचे प्रदर्शन २०००ला पुण्‍यात भरवण्यात आले. त्‍यानंतर कोल्‍हापूर, गोवामधून त्‍यांना चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर सॅनफ्रान्‍सेस्‍को, दुबई येथे प्रदर्शन भरवले.

पुण्‍यामध्‍ये त्‍यांनी नवख्‍या फोटोग्राफरसाठी प्रशिक्षण केंद्रही सुरू केले. भारतातील एक उत्तम फोटोग्राफर म्‍हणून राज्‍याध्‍यक्ष ओळखले जाऊ लागले. त्‍याचशिवाय मराठी, हिंदी चित्रपटसृष्‍टीतील उत्तम स्‍टील फोटोग्राफर म्‍हणून त्‍यांची ओळख निर्माण झाली. अनेक मासिकामध्‍ये त्‍यांनी विविध अभिनेत्रींच्‍या काढलेल्‍या फोटोला स्‍थान मिळालं. फिल्‍मी जगतातील अभिनेते-अभिनेत्रींचे असंख्‍य फोटो वेगवेगळ्‍या पोझमध्‍ये काढणे, ही त्‍यांची स्‍पेशालिटी होती.  

Image result for gautam rajadhyaksha bollywood actress photographs


माधुरी, काजोल आणि तत्‍कालीन टॉपच्‍या अभिनेत्रींचे फोटो काढून ते त्‍या फोटोंचे प्रदर्शन भरवायचे. नामवंत मासिके आणि फिल्‍मी मासिकांमध्‍ये त्‍या-त्‍या अभिनेत्रींचे फोटो प्रकाशित व्‍हायची. १३ सप्‍टेंबर २०११ रोजी हृदयविकाराने त्‍यांचे निधन झाले. 

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...