कुठलाही सिनेमा असो, पडद्यावरील कलाकारांना प्रसिध्दी मिळतेच. पण, पडद्यामागच्या कलाकारांची भूमिका महत्त्वाची असली तरी, ते चेहरे सर्वांसमोर येत नाहीत. अशीच एक जोडी आहे, ज्यांनी पडद्यामागे राहूनही आपलं नाव कमावलं. ही जोडी आहे, सुरेंद्र शिवराम साळवी आणि जितेंद्र शिवराम साळवी या दोन भावांची. चर्चेतला चित्रपट 'संजू'मधल्या अभिनेता रणबीर कपूरला लुक्स देणारी ही जोडी आहे. संजूचे आठ लूक्स डिझाईन करणारे, रणबीर कपूरला संजय दत्त बनवण्यात ज्यांचं योगदान आहे, त्याचे शिल्पकार म्हणून सुरेंद्र आणि जितेंद्र यांचं नाव घेतलं जातं. याच निमित्ताने 'पुढारी ऑनलाईन'ने जितेंद्र साळवी यांच्याशी केलेली खास बातचीत.
सुरेंद्र साळवी आणि जितेंद्र साळवी हे मूळचे कवी केशवसुत यांचे स्मारक असलेले मालगुंड ( गणपतीपुळे, रत्नागिरी) इथले. साळवी बंधुंचे वडिल शिवराम साळवी हे मुंबईत नोकरीसाठी आले. दादरला त्यांनी नोकरी करण्यास सुरूवात केली. लहानपणापासूनच जितेंद्र साळवीही मुंबईत आहेत. साळवी बंधु बरीच वर्षे बॉलिवूड इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. सुरेंद साळवी ३८ ते ४० वर्षे तर जितेंद्र साळवी २० वर्षे या इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. 'संजू'च्या प्रमुख स्टार कास्टसाठी या बंधुंनी वीग डिझाईन केले आहेत. 'संजू' चित्रपटात रणबीरसोबतच परेश रावल, सोनम कपूर, अनुष्का शर्मा यांचा लूक खुलवण्यामागेसुध्दा सुरेंद्र-जितेंद्र या भावांचा सिंहाचा वाटा आहे. जितेंद्र यांचे मोठे भाऊ सुरेंद्र साळवी यांनी सुनील दत्त यांच्याबरोबर काम केलं आहे. तसेच किशोर कुमार, शम्मी कपूर यांच्यासोबतही काम केलं आहे.
संजूच्या लुकसाठी रणबीरने रोज पाच तास घालवले
चित्रपट 'संजू'मधील रणबीरला विग लावल्यानंतर आणि पुन्हा मेकअप झाल्यानंतर ते परफेक्ट सेटअपसाठी १ तास लागायचा. संजूचं शूटिंग सुरू झाल्यानंतर जितेंद्र स्वत: सेटवर जाऊन हेअरस्टाईलकडे लक्ष द्यायचे.
रणबीरचा लूक पाहून संजयला स्वत:ला आरशात पाहिल्याचा भास झाला!
'संजू'च्या सेटवर एक दिवस संजय दत्त आल्यानंतर त्यांनी रणबीरचा लूक पाहून ‘क्षणभर मी स्वत:ला आरशात पाहिल्याचा मला भास झाला’ असं म्हटलं आणि आम्हांला आमच्या कामाची पोचपावती मिळाली, असे जीतेंद्र साळवी म्हणाले. रणबीर खूप चांगला माणूस आहे. एवढा मोठा स्टारकिड असून कुठल्याही त्याला प्रकारचा गर्व नाही. धम्माल करत, मजेत आम्ही रणबीरसोबत काम करत होतो. त्याच्याशी खास बॉन्डिंग असल्याचेही जितेंद्र म्हणाले.
संजय दत्तला सेम कॉपी करणं आव्हानात्मक
रणबीरला संजूचा लुक करायचा होता. पहिला दिवस होता. गेट अप रणवीर ट्राय करायच होतं. पहिली ट्रायल ठरली. संजू तुरुंगातून बाहेर आल्यानंतरचा जो लुक आहे. तो खरचं कायमचा लक्षात राहण्यासारखा आहे. तो लुक पाहून दिग्दर्शक राजू हिरानी हेदेखील आश्चर्यचकित झाले. कारण, या लुकसाठी आम्ही प्रचंड मेहनत घेतली होती, असे जितेंद्र म्हणाले. रणबीरचा लुक पाहून सर्वच टीमने टाळ्या वाजवून 'ग्रेट' अशी रिॲक्शन दिली. संजय दत्तला सेम कॉपी कारण आमच्यासाठी आव्हानात्मक असल्याचेही जितेंद्र म्हणाले. चित्रपटात संजूचे लुक्स जे होते, त्यानुसार, विग तयार करण्यात आले होते. प्रत्येक वेळेला विविध सेटअप होते. प्रत्येक लुकवर काम करत गेलो. त्यानुसार, दाढी-मिशा आणि केसाचं रणबीरवर ट्रायल घेत होतो. त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. १५-२० विग्ज रणवीरवर ट्राय करणं, मग ते फायनल करणं आणि शूटिंगला सुरूवात करणं, हे म्हणावं तसं सोपं नव्हतं. रात्री एक-एक, दीड वाजता स्टडी करून कुठे चुकतयं, हे पाहून ट्रायल घेतली जायची. राजू हिरानी यांच्या टीमचेही त्यात कष्ट आहेत, असे जितेंद्र यांनी सांगितले. संजूमधील अनुष्का शर्मा, परेश रावल, सोनम कपूर, मनिषा कोईराला यांचेही हेअरस्टाईल, विग डिझाईन लुक्स जितेंद्र यांनीच केले आहेत.
चारशेहून अधिक चित्रपटाकरिता काम
जितेंद्र साळवी यांनी ४००-५०० हून अधिक चित्रपट आतापर्यंत केले. हिंदी चित्रपटसृष्टीबरोबरच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतल्या स्टार्ससोबत जितेंद्र यांनी काम केलं आहे. शिवाय, हॉलिवूड चित्रपटासाठी काम केल्याचे त्यांनी सांगितलं. बिग बी अमिताभ बच्चन यांचं नाव त्यांनी आवर्जुन घेतलं. बिग बी यांच्या अनेक जाहिरातींमध्ये त्यांची हेअरस्टाईल, त्यांचा लुक,दाढी-मिशांचं सेटअप हे त्यांनी डिझाईन केलं आहे. सुरेंद्र आणि जितेंद्र साळवी यांनी 'कुली,' 'खुदा गवाह,' 'बाजीराव-मस्तानी,' '3-इडियट्स,' 'अग्निपथ,' 'बाहूबली,' 'पद्मावत,' '102 नॉट आऊट', 'पीके', 'मुन्नाभाई' अशा चारशेहून अधिक चित्रपटासाठी वीग डिझाईन केले आहेत. 'पद्मावत'मधील रणवीर सिंगची अल्लाउद्दीन खिलजीसाठीची हेअरस्टाईल तसेच शाहिद कपूरसाठी विग डिझाईन असो वा '102 नॉट आऊट' मधील अमिताभजी आणि ऋषी कपूर यांचा हेअर लुक असो, हे लुक्स करण्यात साळवी बंधुंचा मोठा वाटा आहे. बॉलिवूडच्या ९५ टक्के चित्रपटांसाठी वीग डिझाईन जितेंद्र यांनी केले आहेत. 'कुली' चित्रपटांपासून सुरू झालेला हा सिलसिला आता 'संजू'पर्यंत अविरतपणे सुरू आहे. हेअरस्टाईल, परफेक्ट विग डिझाईन करणे, तसा त्या-त्या भूमिकेप्रमाणे वा व्यक्तिरेखाप्रमाणे लुक देणे तसेच विग नॅच्युरल दिसणे हे मोठं कौशल्याचे काम असल्याचे जितेंद्र म्हणतात.
राजकुमार हिरानी यांच्याशी खास नातं
ज्यावेळी ट्रेलर लॉन्च झाला. त्यावेळी साळवी यांनीही लॉन्च सोहळ्याला हजेरी लावली. हिरानी यांची भेट घेतल्यानंतर साळवी यांना पाहूत ते खूश झाले. 'बाळा आपका काम दिख रहा है' अशी प्रतिक्रिया हिरानी यांनी साळवींना दिली. जितेंद्र यांना हिरानी नेहमी 'बाळा' नावाने हाक मारतात.) सुरुवातीला हिरानी यांनी साळवींना मिटिंगकरिता बोलावल्यानंतर संजूच्या लुक्सविषयी चर्चा करण्यात आली होती. संजूचा लुक खूप बारिकाईने करायचा होता. त्यात हिरानी यांनी १५ दिवसांत विग करण्यास सांगितले. १५ दिवसांत ३ दिवसांत तयार करण्यात आले. आठ लुक्ससाठी विग डिझाईन करण्यात दोन-अडीच महिन्यांच्या कालावधी लागला, असे जितेंद्र यांनी सांगितले.
आगामी चित्रपट
'पानीपत,' 'समशेरा,' 'पु. ल. देशपांडे,' 'भारत' या आगामी चित्रपटांची कामे साळवी यांच्याकडे आहे. त्यातील मुख्य भूमिकांसाठी साळवी बंधूंची मेहनत सुरू आहे.


No comments:
Post a Comment