Friday, August 24, 2018

आयुष्‍यात पुन्‍हा उभा राहणारा नागराज मंजुळे


मराठी सिनेसृष्‍टीत यशस्‍वी दिग्दर्शक म्‍हणून नागराज मंजुळे यांना ओळखले जाते. एक निर्माता आणि पटकथा लेखक असणारे नागराज पोपटराव मंजुळे यांचा आज वाढदिवस. आयुष्‍यात येणार्‍या चढ-उतारांना मात करत यशाची उंची गाठणार्‍या नागराज यांच्‍याबद्‍दल थोडक्‍यात जाणून घेऊयात. 


'फँड्री,' 'सैराट' आणि त्‍यांचा पहिला लघु चित्रपट फिल्म 'पिस्तुल्या' यासारखे मराठी सिनेसृष्‍टीला आशयघन चित्रपट देणारे नागराजच आहेत. 'सैराट' हा मराठीतील पहिला १०० कोटी कमाई केलेला चित्रपट आहे. त्‍यात आर्ची अर्थातच रिंकू राजगुरू आणि परशा म्‍हणजेच आकाश ठोसर या नव्‍या चेहर्‍यांना संधी देण्‍यात आली होती. या नव्‍या कलाकारांनी संधीचं सोनं करून दाखवलं. 'फँड्री' या चित्रपटापेक्षाही 'सैराट'ने नागराज यांचं नाव एका वेगळ्‍या उंचीवर नेलं.  
नागराज हे सोलापूर जिल्‍ह्‍यात करमाळा तालुक्यातील जेऊर गावचे आहेत. त्‍यांच्‍या समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यंत कमी होते. नागराज यांना शिक्षणाची ओढ होती. शाळा बुडवून ते चित्रपट पहायला जायचे. नागराज यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण जेऊर येथे झाले. पुढील शिक्षणासाठी ते पुणे विद्यापीठात शिकायला गेले. मराठी विषयात एम. ए. केलं. एम.फिल करत चित्रपटाचे वेड त्‍यांच्‍या डोक्यात घट्ट बसलेलं होतं.
नगराज मंजुळे १८-१९ वर्षांचे होते, त्‍यावेळी ते विवाहबद्ध (१९९७) झाले.  त्यावेळी ते बारावीमध्ये शिकत होते. नंतर त्‍यांनी घटस्‍फोट घेतला. 
नागराज पोपटराव मंजुळे यांचा 'उन्हाच्या कटाविरुद्ध' हा काव्य संग्रह देखील आहे.
पहिला लघुपट आणि चित्रपट 
'पिस्तुल्या' हा त्यांचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार विजेता लघुपट आहे. तर त्यांचा पहिला मराठी चित्रपट फँड्री फेब्रुवारी २०१४ मध्ये रिलीज झाला होता. यानंतर आलेला सैराट या मराठी चित्रपटाची ६६व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्‍सवासाठी निवड झाली होती. सैराटमधील गाणीही प्रेक्षकांच्‍या मनात रुंजी घालणारी होती. आजही सैराटमधल्‍या आर्ची-परशाचं वलय कायम आहे. त्‍यांचं स्‍टारडम अजूनही कमी झालेलं नाही. 
पावसाचा निबंध 
दरम्‍यान, 'सैराट' चित्रपटाच्‍या उत्तुंग यशानंतर दिग्‍दर्शक नागराज मंजुळेंनी नवी शॉर्टफिल्‍म 'पावसाचा निबंध' आणली. या शॉर्टफिल्‍मचा टीझर यु-ट्‍यूबवर रिलीज झाला होता. 'आटपाट प्रॉडक्‍शन्‍स'ची निर्मिती असलेल्‍या या शॉर्टफिल्‍मची कहाणी नागराज यांनीच लिहिली आहे. नागराज मंजुळे यांनी या शॉर्टफिल्‍मबद्‍दलची माहिती फेसबुकवरून दिली होती. 'खूप दिवसांपासून ही गोष्ट सांगायची होती पण काही कारणांनी पुढे ढकलली जात होती,’ अशी पोस्‍ट लिहित त्‍यांनी शॉर्टफिल्‍मचा टीझर शेअर केला होता.
नागराज यांचा येतोय नवा सिनेमा?
मध्‍यंतरी नागराज यांनी सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून एक व्‍हिडिओ पोस्‍ट केला होता. हा व्‍हिडिओ आटपाट प्रोडक्‍शनच्‍या यू-ट्‍यूब चॅनलवरदेखील अपलोड करण्‍यात आला होता. या व्‍हिडिओत 'फँड्री', 'सैराट'चा उल्‍लेख आहे आणि शेवटी 'लवकरच...' असा उल्‍लेख करण्‍यात आला आहे. हा व्‍हिडिओ नागराज यांनी फेसबुक पेजवरही पोस्‍ट केला होता. या व्‍हिडिओने प्रेक्षकांची उत्‍कंठा वाढवली. कारण, नागराज यांनी व्‍हिडिओतून नव्‍या चित्रपटाबद्‍दल सांगायचा प्रयत्‍न केला होता. तसा इशारा त्‍यांनी या व्‍हिडिओच्‍या माध्‍यमातून दिला होता. त्‍यामुळे नागराज नवं काही तरी घेऊन येणार, याची फॅन्‍सना प्रतीक्षा लागून राहिलीय.  

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...