Cannes चित्रपट महोत्सवाबद्दल माहितीये ना? या महोत्सवातील ऐश्वर्य तुम्ही पाहिलं असेल. परंतु, तुम्हाला माहितीये का की, कान्स (Cannes) असं जरी म्हटलं जात असलं तरी त्याचा उल्लेख 'कान' असा केला जातो. या महोत्सवात फोटोज, बॉलिवूड अभिनेत्रींशी संबंधित अनेक वृत्त वाचली असतील. परंतु, या महोत्सवाला 'कान' हे नाव कसं पडलं, कदाचित तुम्हाला माहिती नसेल. तर जाणून घेऊयात या महोत्सवाला कान (Cannes) हे नाव कसं पडलं. त्याचबरोबर बी-टाउनच्या ब्युटी क्वीन्स या महोत्सवासाठी काय तयारी करत आहेत?
फ्रान्समध्ये प्रत्येकवर्षी होणारा कान चित्रपट महोत्सव यंदा १४ मे २०१९ ते २५ मे २०१९ पर्यंत सुरू राहणार आहे. यंदाचं कानचं हे ७२वं वर्ष आहे. येथे जगभरातून लोक रेड कार्पेटवर नव्या अंदाजात पोहोचतात. हॉलिवूड ते बॉलिवूडपर्यंत सेलेब्स 'कान'ला हजेरी लावतात.

कान फेस्टिव्हलच्या नावाचं कोडं अनेकांना पडलेलं असतं. याचं नाव एखाद्या पेपरमध्ये कान असं येतं. तर दुसऱ्या एखाद्या पेपरमध्ये कान्स असं येतं. मग प्रश्न पडतो ही भानगड तरी काय आहे. वास्तविक कोल्हापूरचे ते कोल्हापूरकर, पणजीचे ते पणजीकर तसेच इंग्रजीमध्ये कोल्हापूरर्स, पणजीज तसेच कानचे कान्स झाले. पण मराठीमध्ये थेट कान महोत्सव असेच म्हटले पाहिजे.. असो ते म्हणतात ना, नावात काय आहे...
कोठून आला हा शब्द
'कान' हा एक फ्रेंच शब्द आहे. कान शहरात चित्रपट महोत्सव आयोजित केला गेला. म्हणून या महोत्सवाला 'कान चित्रपट महोत्सव' असे नाव पडले.
प्रारंभ कधी झाला
१९३२ मध्ये फ्रान्सचे शिक्षण मंत्री जीन जे यांनी पहिल्यांदा या महोत्सवाबद्दल विचार केला होता. परंतु, पैशांच्या अभावामुळे हा महोत्सव होऊ शकला नाही. २० सप्टेंबर १९४७ मध्ये या महोत्सवाची सुरूवात झाली आणि जगभरात कान महोत्सव प्रसिध्द झाला.

कसं आहे हे शहर
कान हे फ्रान्सच्या भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर व इटलीच्या सीमेजवळ वसलेले एक सुंदर शहर आहे. समुद्रकिनार्यावरील सोनेरी बीच, अपमार्केट बूटीक्स आणि अनेक प्रसिध्द हॉटेल्स येथे आहेत. ज्यावेळी या शहरात हा महोत्सव सुरू होतो, त्यावेळी जगभरातून सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार येथे येतात आणि आपल्या अदाकारीने सर्वांची मने जिंकतात.
इतिहास
या शहराला प्राचीन इतिहास आहे. मात्र याची भरभराट इ.स. १८३० च्या पुढेच झाली. काही ब्रिटिश अधिकारी इटलीला जाताना येथे राहात होते, त्यांना हे शहर आवडले. तसेच अनेक धनवान व अधिकारी फ्रेंच लोकांनी येथे आपले सुटीचे घर बांधले. येथे कान चित्रपट महोत्सव सुरू झाल्यानंतर हे शहर आंतरराष्ट्रीय नकाशावर आले.
देशाचं प्रतिनिधीत्व करायला जागतिक व्यासपीठ
हॉलिवूडबराबेरच अनेक बॉलिवूड कलाकारही या महोत्सवाला हजेरी लावतात. बॉलिवूड कलाकारांना जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करण्यासाठी हे व्यासपीठ मानाचे मानले जाते. हॉलिवूडमध्ये चित्रपट करणाऱ्या अभिनेत्रींची संख्या वाढती असली तरी तिथे जाऊन विविध व्यासपीठावरून देशाचे प्रतिनिधीत्व करणे वाखाणण्याजोगे आहे. म्हणूनच 'कान' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभाग घेणार्या अभिनेते-अभिनेत्री या महोत्सवात येऊन आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करतात.

दीपिकाची जबरदस्त तयारी
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने यंदाच्या कान महोत्सवाची जोरदार तयारी केली आहे. हेअरस्टायलिस्ट क्लेराबेल सल्दान्हाने सोशल मीडियावरून दीपिका पदुकोणचे काही फोटोज शेअर केले होते. त्यामध्ये हेअर कट आणि कलर्ड हेअरचे फोटो शेअर करण्यात आले होते.
या फोटोजमध्ये दीपिका पदुकोणची स्किन ग्लो करत आहे. परंतु, तिची हेअर स्टाईल आपणास आकर्षित करेल, अशी आहे. २०१९ चा कान महोत्सव १४ मे ते २५ मे पर्यंत सुरू राहणार आहे. गेल्या वर्षी कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिने अवघ्या फॅशन विश्वाचं लक्ष आपल्याकडे वेधले होते. तिच्यासाठी २०१९ हे वर्षे देखील खास ठरणार आहे.

मागच्या वर्षी ७१ व्या कान चित्रपट महोत्सवात सिल्वर स्क्रीनवर दिसणार्या हुमा कुरेशी, कंगना राणावत, गायिका रवीना मेहता, मल्लिका शेरावत या अभिनेत्रींनी रेड कार्पेटवर आपल्या अदांनी सर्वांना घायाळ केले होते. आता २०१९ च्या कानमध्ये बी-टाऊनच्या कोणकोणत्या अभिनेत्री आपली फॅशन स्टाईल घेऊन रेड कार्पेटवर उतरतात, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
आंतरराष्ट्रीय चित्रपटांसमोर मराठीची चलती
जागतिक पातळीवर चित्रपट क्षेत्रात सर्वात मानाचा असा ‘कान’ (Cannes) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ओंकार शेट्टी यांचा ’आरॉन’ची वर्णी लागली आहे. या महोत्सवासाठी ‘आरॉन’सोबत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे आणि सुमित्रा भावे यांचा 'दिठी' त्याचबरोबर मिलींद लेले यांचा 'बंदिशाला' या चित्रपटांचीही निवड झाली आहे. हे तिन्ही चित्रपट अधिकृतरित्या फ्रान्समधील ‘कान’ चित्रपट महोत्सवात सहभागी होतील.

‘आरॉन’ हे एक फ्रेंच नाव आहे आणि या चित्रपटाचा संबंध फ्रान्सशी आहे. इतकेच नव्हे तर या मराठी चित्रपटाचा संबंध एकूण सहा देशांशी आहे. फ्रान्स रोमेनिया, इस्राएल, कॅनडा, हंगेरी आणि अर्थातच इंडिया. या चित्रपटाचा डीओपी आहे हंगेरीचा, क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे इस्राएलचा, आर्ट डिरेक्टर आहे रोमेनियाचा. त्याचप्रमाणे बहुतांश पॅरिसमध्ये चित्रित झालेल्या या चित्रपटामध्ये कॅनेडियन, फ्रेंच आणि इंडियन कलाकार आहेत.‘आरॉन’ या मराठी चित्रपटाची कथा युरोप मधील पॅरिस या रोमँटिक आणि नयनरम्य शहरात घडते. या चित्रपटाचे जवळपास ८०% चित्रण फ्रान्स मध्ये झाले असून उर्वरित भाग भारतातील लहानशा गावात चित्रित झाला आहे.

जगाच्या कानाकोपऱ्यातून चित्रपटप्रेमी तिथे येत असतात. त्यामुळे हॉलिवूडपटांबरोबरच मराठी चित्रपटाचाही डंका येथे वाजणार आहे. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांबरोबरच प्रेक्षक, सिनेरसिकांचे लक्ष मराठी चित्रपटांकडे असते. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय कान चित्रपट महोत्सवासाठी निवड झालेला मराठी चित्रपट आरॉन फ्रान्समध्ये कशी कामगिरी करतो, याकडे संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीच्या नजरा आहेत.
No comments:
Post a Comment