
बिहारच्या सतराव्या विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यांतील मतदान प्रक्रिया शनिवार दि. ७ रोजी पार पडली आहे. १० नोव्हेंबर निकाल लागणार आहे. कोरोना काळातील बिहारची निवडणूक इतकी महत्त्वाची का आहे? यासंदर्भात निवडणुकीचा थोडक्यात घेतलेला ऊहापोह.
आरजेडी नेते लालुप्रसाद यादव यांनी आतापर्यंत बिहारमध्ये सामाजिक न्यायाचे राजकारण केले आहे. लालुप्रसाद यादव हे पहिल्या टप्प्यातील नेते होते आणि लालू यांनीच घडवलेले विद्यमान मुख्यमंत्री नितिशकुमार हे दुसऱ्या टप्प्यातील होते. हा टप्पा भाजपसाठी सर्वात अवघड होता. या टप्प्यावरती लालुप्रसाद यादवांचं जसं बिहारमधील वर्चस्व दूर करायचं होतं, तसं नितिशकुमारांनाही हटवणं गरजेचं होतं. ही निवडणूक नितिशकुमारांना पदावरून हटवणारी आहे, म्हणून भारतीय राजकारणात बिहार निवडणूक महत्त्वाची आहे. कारण, केवळ नितीशकुमारांनाच नाही तर सामाजिक न्याय संपुष्टात आणणारी ही निवडणूक आहे. लालू यांचा १५ वर्षांचा आणि नितिश यांचा १५ वर्षांचा असा जो तीस वर्षांचा कालावधीचा एक टप्पा होता, तो या निवडणुकीने संपणार आहे. बिहारमध्ये सामाजिक न्यायासाठी असलेल्या राजकारणावर मात करून आता आर्थिक न्यायाचे राजकारण प्रस्थापित करण्याचे प्रयत्न तेजस्वी यादव यांनी सुरू केलेत. लालुंचे सामाजिक न्यायाचे राजकारण यातून संपणार आहे. या निवडणुकीत भाजप सरकार आले नाही तरी ते जिंकले, असे सूत्र राहणार आहे.
या विषयावर राजकीय विश्लेषक प्रकाश पवार यांनी 'पुढारी ऑनलाईन'शी संवाद साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारच्या निवडणुकीत आर्थिक न्याय जिंकला म्हणजे भाजपचा विजय झाल्यासारखे आहे. म्हणून ही निवडणूक एका अर्थाने बिहारला सामाजिक न्यायातून बाहेर काढून आर्थिक न्यायाच्या एका नव्या चौकटीमध्ये प्रवेश करणारी ठरणार आहे. जाणीवपूर्वक घडलेली गोष्ट अशी आहे की, बिहारच्या राजकारणात जोपर्यंत नितिशकुमारांना बाहेर काढलं जात नाही, तोपर्यंत बिहारच्या राजकारणाची संरचनात्मक पुनर्रचना होत नव्हती, यासाठी हे पहिले पाऊल भाजपने उचलले. भाजपने एका बाजूला नितीशकुमारांबरोबर युती केली. परंतु, नितिशकुमारांना पूर्णपणे कसं हटवण्यात येईल, याचा प्लॅनदेखील आखला. या प्लॅननुसार, तेजस्वी यादवांना बहुमत जरी नाही मिळालं, तरीसुध्दा आता ते मुख्यमंत्री होणार नाहीत. फारतर त्यांना दिल्लीत पाठवलं जाईल आणि राज्यात भाजपचा वेगळा मुख्यमंत्री असेल. एका अर्थाने ही निवडणूक मोदींनी बिहारमध्ये भाजपचा शिरकाव करण्यासाठी उघडलेला दरवाजा आहे. यासाठी त्यांनी नियाजनपूर्वक आखलेले हे डावपेच आहेत.
३० वर्षे राज्यात असणारे सामाजिक न्यायाचे राजकारण कुणालाही मोडता येत नव्हते. नितीशकुमारांनी तर थेट पंतप्रधानांना म्हटलं होतं की, ते पंतप्रधान पदासाठी उमेदवार होऊ शकतात. या सर्व पार्श्वभूमीवर विचार केला तर हे समजतं की, सामाजिक न्यायाची चौकट दूर करून आर्थिक न्यायाची चौकट या निवडणुकीने प्रस्थापित होईल. त्यामुळे हा राजकारणातील नवीन प्रयोग ठरणार आहे.
खुद्द लालुप्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव हे सामाजिक न्यायाविरोधात बोलत आहेत. ज्या लालुंनी सामाजिक न्याय आणला, त्याचं पॅटर्नचा पराभव ३१ वर्षांचे युवा तेजस्वी यादवांनी केला. हा मोठा ऐतिहासिक बदल आहे.
प्रकाश पवार यांच्या मतानुसार, पुढे २०-२५ वर्षे आर्थिक न्यायाच्या नव्या चौकटीत राजकारण करण्यामध्ये भाजप यशस्वी होईल, हा इतका मोठा बदल आहे. सामाजिक न्यायाचे नियम काढून तेथे आर्थिक न्यायाचे नियम आणले. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं सूत्र तेजस्वी यादव अबलंबत आहेत. म्हणजे एका अर्थाने तेजस्वी पंतप्रधान मोदींच्या 'सबका साथ, सबका विकास'प्रमाणेच बोलत आहेत.
विरोधकांनी यादवांच्या घराण्यातलाच आताचा म्होरक्या तेजस्वी यांना माध्यम बनवून सामाजिक न्यायाची चौकट मोडित काढण्याचं आणि बिहारमधील राजकारण बदलण्याचं सूत्र वापरलं आहे. भारतीय इतिहासाला कलाटणी देणारा हा टर्निंग पाईंट आहे. सर्वात महत्त्वाचा खिलाडी नितीशकुमार बाजूला गेल्यामुळे यातील राजकारण आर्थिक न्यायावर चालेल. येथून पुढे सर्वांना सोबत घेऊन तेजस्वी यादव राजकारण करतील.
तेजस्वी जर सत्तेत आले तर ते लालुप्रसाद किंवा नितीश कुमार यांच्याप्रमाणे ते बिहारच्या राजकारणात तडजोडीचं राजकारण करणार नाहीत. तेजस्वी यादव कुणाच्या विरोधात न जाता सर्वांना सोबत घेऊन जातील, त्यामुळे बिहारच्या राजकारणाची नवी पार्श्वभूमी येथे आता तयार झाली आहे. तेजस्वी यादवांचं उद्या काय होणार, बिहारच्या राजकारणाची समीकरणे कशी बदलतील, हे उद्याच्या निकालानंतर पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
No comments:
Post a Comment