एक काळ होता, जेव्हा न्यू पॅलेसच्या कामासाठी कोकणातून खास कारागीर बोलावले. याच प्रवासात भला मेस्त्री हे कोल्हापुरात आले आणि आज त्यांचीच पुढची पिढी 'मेस्त्री बंधू' कोल्हापुरातचं वास्तव्यास असून आजोबा भला मेस्त्री यांचा लाकूड व्यवसायाचा वारसा पुढे चालवत आहेत. एक लाकूड व्यावसायिक म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात त्यांची ख्याती आहे. ग्राहकांना वेगवेगळ्या वस्तू हवी तशी नक्षी, डिझाईनमध्ये करून देण्यात 'मेस्त्री बंधूं'चा हातखंडा आहे.
विजय गुंडोपंत मेस्त्री (वय ६७) यांच्यासह अन्य तिघे भावंडे लाकूड व्यवसायात आहेत. मोठे बंधू रत्नाकर, विजय, सुनील, दिलीप मेस्त्री ही चार भावंडे मूळचे हातखंबा (रत्नागिरी) येथील आहेत. पुढे त्यांनी मोर्वी (पावसच्या पुढे, जि. रत्नागिरी) येथे स्थलांतर केलं. गेले ४० वर्षे विजय मेस्त्री या व्यवसायात आहेत. आज मेस्त्री बंधूंचा 'नावेचा कारखाना' या नावाने लाकूड व्यवसाय सुरु आहे.
विजय यांचे आजोबा भला मेस्त्री यांनी कोकणात लाकूड व्यवसायाला सुरुवात केली. त्यावेळी कोल्हापुरातील न्यू पॅलेसच्या कामासाठी भला मेस्त्री आणि आणखी दोघा-तिघांना कोल्हापुरातून आमंत्रण आलं. त्यावेळी कोकणात लाकडी कामे करणारी माणसे भेटत असत. त्यामुळे २-३ काष्ठशिल्पींना कोल्हापुरात आणण्यात आले आणि न्यू पॅलेसचे नक्षीदार दरवाजे, लाकडी कामे या काष्ठशिल्पींनी केले. त्यानंतर कोल्हापूरमध्ये हे मेस्त्री कुटुंब कायमचे स्थायिक झाले.
'नावेचा कारखाना' म्हणून कोल्हापुरात प्रचलित
विजय यांचे वडील गुंडोपंत यांनी १९५२-५३ च्या जवळपास रत्नाकर बोट अँड फर्निचर वर्क्स नावाने जुना बुधवार पेठ, कोल्हापूर येथे कारखाना उभारला. हाच कारखाना आता 'नावेचा कारखाना' म्हणून ओळखला गेला. मेस्त्री भावंडांचे घर आणि कारखाना एकाच ३ गुंठ्यामध्ये विस्तारले आहे. सुरुवातीला वडील पुराच्या ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या लकडाच्या बोटी बनवत असत. कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून या बोटींना मागणी असायची. तसेच दरवाजे, टेबल, खुर्च्या, किरकोळ फर्निचर ते बनवू लागले. पूर्वी वडील घरोघरी जाऊन फर्निचरची कामे करत होते. १९८६ साली वडिलांचा मृत्यू झाला. त्यांनी ५० वर्षे हा लाकूड व्यवसाय केला.
वडिलांनंतर व्यवसायाची जबाबदारी त्यांचे मोठे भाऊ रत्नाकर यांच्याकडे आली होती. सोबतच छोटी भावंडे देखील व्यवसायात मदत करू लागली. सुरुवातीला लाकूड कितीला आणायचे, वस्तू किती किंमतीला विकायच्या, यात अडचणी आल्या. पण मोठे बंधू हुशार असल्यामुळे त्यांनी जबाबदारी पेलून नेली. रत्नाकर, विजय, सुनील, दिलीप या चार भावंडांनी हा व्यवसाय पुढे नेला. सोबतच त्यांची आई शांताबाई यांची मोलाची साथ मिळाली. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन वयाच्या ११-१२ व्या वर्षांपासून मेस्त्री बंधूंनी लाकूड व्यवसाय करण्यासाठी लागणारे विविध कौशल्य शिकले. काही महिन्यांपूर्वी मोठे बंधू रत्नाकर यांचे निधन झालं होतं. आता विजय, सुनील, दिलीप हे तिघेजण काम पाहतात.
मागणी तसा पुरवठा
विविध वस्तू बनवण्यासाठी टिंबर मार्केटमधून लाकूड आणलं जातं. सर्व वस्तू सागवानमध्ये बनवल्या जातात. क्वचितच किरकोळ वस्तू जंगली लाकडांचा वापर करून केला जातो. सागवान हे टिकाऊ आणि फिनिशिंगसाठी चांगले असते. ऑर्डर येईल तसे काम घेतले जाते. टिंबर मार्केटमध्ये लाकडांची साईज आणि कोणत्या वस्तूसाठी लाकूड हवाई ह्याचं माप दिलं जातं. त्यानंतर लाकूड कटिंग करून मिळते. पुढे त्याची वेगवेगळ्या मशीनवर प्रक्रिया केली जाते. त्यांच्याकडे साधारणतः तीन-चार लाख रुपयांचे रंधा मशीन, टर्निंग मशीन, झिगझॅग मशीन आणि ड्रिल मशीन आहेत, जे गुजरातमधून आणण्यात आले आहेत.
या लाकडी वस्तूंना अधिक मागणी
टेबल, खुर्च्या, पालखी देवघर, डायनिंग टेबल, ऑफिस चेअर, अशा वस्तू तयार केल्या जातात. पालखी आणि देव्हाराला अधिक मागणी आहे. खुर्च्यांचे कुशन, ऑफिस टेबल, सनमाईक लाकडाचे काम करून हवे असेल तर तेही करून दिलं जातं. हवी तशी डिझाईन्समध्ये वस्तू बनवून देणं, हा त्यांचा हातखंडा आहे.
सकाळी साडेनऊ ते दुपारी एक पर्यंत आणि दुपारी अडीच ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत कारखाना सुरू असतो.
अशी केली जाते प्रक्रिया
टिंबर मार्केटमधून हव्या त्या साईचे लाकूड आल्यानंतर पुढे रंधा मशीनवर साईज करावी लागते. त्यानंतर नक्षी किंवा हवे तसे डिझाईन मशीनवर बनवले जाते. पुढे फिटिंग केलं जातं. यासाठी स्क्रू, फेविकॉल, स्पिरिट लाख, पेपर, पॉलिश अशा वस्तू लागतात. पॉलीश दोन कलरमध्ये उपलब्ध असतात. एक लाकडाचा ओरिजनल कलर जो नॅच्युरल असतो आणि दुसरा शिसम. (काळपट रंग) असतो. ग्राहकांना या दोन्हीपैकी जसे हवा तशा कलरमध्ये वस्तू तयार करून दिल्या जातात. कोल्हापूर जिल्हा आणि पंचक्रोशीतून ग्राहक येतात.
एक खुर्ची तयार करायला तीन दिवस लागतात. पालखी दोन महिने. दरवाज्याची चौकट दोन दिवसात तयार होते. जर नक्षीदार दरवाजे असतील तर चार ते आठ दिवस लागतात. देवघर बनवण्यासाठी आठ ते दहा दिवस लागतात. एक देव्हारा १५ ते १७ हजार रु. ना विकला जातो. पालखी २५ ते ३० हजारांच्या पुढे, चौकट ७ ते ८ हजारांच्या पुढे, दरवाजा १० हजारांच्या च्या पुढे, टेबल ८ हजार, एक खुर्ची (ऑफिस) ८ हजार, डायनिंग खुर्च्या ७ ते ८ हजारांना विकले जातात.
व्यवसायात हा ठरला टर्निंग पॉईंट
कोल्हापूर जि. प.ने सागवानाच्या बोटी घेणे बंद केल्यामुळे व्यवसायात वेगळेपण आलं. लाकडाची जागा फायबर आणि प्लायवूडने घेतली. दरवाजे, चौकटी, टेबल, खुर्च्या प्लास्टिकमध्ये मिळत असल्यामुळे हा व्यवसाय कमी झाला. शिवाय, लाकडाच्या किंमती दुप्पट-तिपटीने वाढल्या.
मेस्त्री बंधूंची हिच खासियत
ग्राहकांनी जरी कमी पैसे दिले असले तरी उत्तम लाकूड आणि चांगल्या प्रतीच्या वस्तू तयार करून देणं हीच मेस्त्री बंधूंची खासियत आहे.
- विजय मेस्त्री - ९८२३४३१८३८
No comments:
Post a Comment