Monday, May 19, 2025

आऊट ऑफ बॉक्स थिंकिंग भारतातील 'नवलाईची हायड्रोपोनिक शेती'


मातीविना शेतीची नवी क्रांती : अक्षय थोरात यांचा प्रेरणादायी प्रवास


आजच्या धकाधकीच्या युगात, शिक्षण घेतल्यानंतर चांगली नोकरी मिळवणे, आणि ती सांभाळत आयुष्य काढणे हीच तरुणांची ठरलेली वाट आहे. मात्र, काही धाडसी आणि दूरदृष्टी असलेले तरुण या चौकटीबाहेर विचार करून स्वतःचा वेगळा मार्ग निवडतात. वाळवा (जि. सांगली) येथील अक्षय रामचंद्र थोरात हा असाच एक तरुण, ज्याने मातीशिवाय शेती करून कृषी क्षेत्रात नाव कमावले आहे.

अक्षय थोरातचा जन्म वाळव्याच्या अहिर गल्लीत एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांनी हुतात्मा किसन अहिर विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण करून, इस्लामपूरमधील विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजमध्ये विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. पुढे त्याने संजय घोडावत युनिव्हर्सिटीमधून बी.टेक पदवी प्राप्त केली. शिक्षणाच्या काळात उद्योगपती संजय घोडावत यांची व्याख्याने ऐकून ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचारसरणी त्याच्या मनात खोलवर रुजली.

परदेशातून मागवल्या जातात विविध बिया 

पदवी घेतल्यानंतर अक्षयने टीसीएस कंपनीत नोकरी स्वीकारली. मात्र, ही नोकरी त्याच्या मनातील विचारांना पुरेशी वाटली नाही. त्याला काहीतरी वेगळं करायचं होतं. याच दरम्यान त्याला ‘हायड्रोपोनिक शेती’ म्हणजेच मातीविना शेती विषयी माहिती मिळाली. या आधुनिक शेतीत मातीऐवजी पाण्यात पोषकद्रव्यांच्या साहाय्याने भाजीपाला, फळे, आणि औषधी वनस्पतींचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये अक्षय lettuce (लेट्युस) जे सलाडमध्ये वापरतात आणि curly kail  - (कर्ली केल) - ब्युटी प्रोडक्ट वापरतात, याचे उत्पन्न घेतात. यासाठी विविध बिया परदेशातून मागवल्या जातात आणि त्याची रोपे याठिकाणीचं स्वत: तयार केली जातात. या शेतीसाठी घरातील सदस्यच राबतात. 

हायड्रोपोनिक शेती भारतात अजूनही नवलाईची गोष्ट 

हायड्रोपोनिक शेती ही भारतात अजूनही नवलाईची गोष्ट आहे, विशेषतः ग्रामीण भागात. पण अक्षयने धाडसी निर्णय घेतला. मु. पो. बावची, ता. वाळवा, (जि. सांगली) येथे त्याच्याकडे असलेल्या वडिलोपार्जित जमिनीपैकी १५ गुंठे जमीनीत पॉलिहाऊस उभारण्याचे ठरवले. एकूण ३०-३५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. यासाठी त्याने ‘हुतात्मा बँक’ आणि काही मित्रांकडून मदत घेतली. आर्थिक आव्हानांवर मात करत त्याने २०२४ मध्ये शेतीत पहिले पाऊल टाकले. 

सर्व तांत्रिक बाबी समजून घेतल्या 

सकाळ मीडिया समूहाच्या माध्यमातून पुण्यातील "लँड क्राफ्ट ऍग्रो" कंपनीशी संपर्क साधून अक्षय घोरपडे यांच्या मदतीने पूर्ण तांत्रिक माहिती मिळवली. यानंतर त्याने आपल्या पॉलिहाऊसमध्ये २७ रॅक्स उभे केले आणि भाजीपाला उत्पादनास सुरुवात केली. विशेष बाब म्हणजे, त्याने आधी बाजारपेठ निश्चित केली आणि मग उत्पादन सुरू केलं – जे पारंपरिक शेतीपेक्षा वेगळं आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून योग्य होतं.

हार कधीच मानली नाही 

वाळवा, आष्टा आणि इस्लामपूर येथून फारसा प्रतिसाद न मिळाल्याने अक्षयने थेट मुंबई, पुणे आणि गोवा येथील मोठमोठ्या मॉलना भेटी दिल्या. त्याने “जय किसान हायड्रोपोनिक” या नावाने स्वतःचा ब्रँड तयार केला आणि नामवंत मॉल्समध्ये उत्पादन पोहोचवलं. मायक्रो ग्रीन्स, मशरूम, आणि केमिकल फ्री भाजीपाला यासारख्या उत्पादनांना चांगली मागणी मिळू लागली. वेळोवेळी आई जयश्री, वडील - रामचंद्र थोरात आणि पत्नी रुचिता यांची मदत आणि पाठिंबा मिळाला आहे. 

महिन्याला सव्वा ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न 

आज अक्षय हायड्रोपोनिक शेतीतून दर महिन्याला सव्वा ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. एक भाजीपाला उगवण्यासाठी ४५ दिवस लागतात. असे २७ सायकल निर्माण केल्याने दररोज विशिष्ट असे उत्पादन मिळते. हे उत्पनेन भाजीपाला योग्य पद्धतीने पॅकिंग करून तो पुणे, मुंबई, गोवा याठिकाणी पाठवला जातो.

हायड्रोपोनिक शेतीचे प्रशिक्षण 

जर या शेतीची कुणाला आवड असेल तर त्याला प्रशिक्षणही देण्याचे उत्तम काम अक्षय थोरात करतात.

 अक्षयचा प्रवास केवळ आर्थिक यशापुरता मर्यादित नाही. त्यांनी पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी अन्ननिर्मितीचा ध्यास घेतला आहे. विषमुक्त आणि नैसर्गिक उत्पादन देण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. आज अनेक तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत वेळ घालवत असताना, अक्षयने स्वावलंबनाचा मार्ग निवडून इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे. सकस आहार किट तयार करून ते देश-विदेशात निर्यात करण्याच्या विचारात अक्षय आहे. २०२४ मध्ये त्याने १५ लाखांचे  उत्पन्न मिळवले आहे. आता येत्या वर्षात कर्ज फेडून १ कोटींचा बिझनेस करण्याचे उद्दिष्ट अक्षय थोरातने ठेवले आहे. 

- अक्षय थोरात. मो. क्र- ९८६०७१८१६२ 


No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...