Wednesday, March 11, 2020

अशोक कुमार, किशोर कुमार आणि मधुबाला



अशोक कुमार जन्मदिन आणि किशोर कुमार स्मृतिदिनानिमित्त


अशोक कुमार, किशोर कुमार आणि मधुबाला यांचं सिनेजगतात आणि रिअल लाईफमध्ये अतूट नातं. दिलीपकुमार, राज कपूर आणि देव आनंद हे सुपरस्‍टार होण्‍यापूर्वी १५ वर्षे आधी अशोककुमार हे सुपरस्‍टार होते. या सुपरस्‍टारबद्‍दल कुणालाही आकर्षण वाटावे, असे अशोककुमार यांचे व्‍यक्‍तिमत्त्‍व होते. मधुबालाही त्‍याला अपवाद नव्‍हती. तिच्‍यासारखी सुंदर, मनमोहक अदानी घायाळ करणारी अदाकारा, आपल्‍या मादक अदानी आणि मदमस्‍त नयनांनी, सुंदर हास्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी मधुबाला. तिने आणि अशोक कुमार यांनी एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केले. 


असे म्‍हटले जाते की, 'महल'चा सुटाबुटातील अशोककुमार मधुबालालाही भावला. मधुबालाने एकदा अशोक कुमार यांना प्रेमपत्र आणि लाल गुलाब देऊन प्रेम व्‍यक्‍त केले होते. परंतु, अशोक कुमार हे अभिनेत्री नलिनी जयवंतच्‍या प्रेमात होते. त्‍यामुळे मधुबाला यांचे पत्र बालिशपणा म्‍हणून त्‍यांनी सोडून दिले होते. 

अशोकुमार आणि नलिनी यांचे 'संग्राम' आणि 'समाधी' हे दोन चित्रपट तुफान गाजले होते. 'समाधी'मधील 'गोरे गोरे बाँके छोरे,' 'कभी मेरी गली आया करो' हे दोन गाणी प्रचंड लोकप्रिय झाले होते. त्‍यांनी 'शेरू,' 'नौबहार,' 'सलोनी,' 'जलपरी,' 'नाझ' आणि 'मिस्‍टर एक्‍स' या चित्रपटांत एकत्र काम केले. दोघेही खर्‍या खुर्‍या आयुष्‍यात प्रेमात होते. अशोककुमार यांचे याआधीच लग्‍न झाले होते. पुढे नलिनी-अशोक कुमार दोघे लग्‍नही करणार होते. परंतु, त्‍यांचे लग्‍न होऊ शकले नाही. 

अशोकुमार आणि मधुबाला   

'महल' हा चित्रपट सुपरडुपर हिट झाल्‍यानंतर अशोकुमार आणि मधुबाला यांचे तीन चित्रपट हिट झाले. १९५० साली 'निशाणा' हा चित्रपट आला. त्‍यानंतर तब्‍बल सात वर्षांनी 'एक साल' हा चित्रपट आला. या चित्रपटातील ओ. पी. नय्‍यरच्‍या संगीताने धूम माजवली. या चित्रपटातील 'आईये मेहरबाँ, बैठीए जानेजा, शौकसे लिजिए जी इश्‍क के इम्‍तेहान' हे सुंदर रोमँटिक गाणे मधुबालाने आपल्‍या आयुष्‍यातील सर्वोत्तम नृत्‍य आणि अदाकारी पेश केली आहे. तिच्‍या या अदानी प्रेक्षकांना घायाळ केले. 

असं मिळालं 'मधुबाला' नाव 

'महल' चित्रपटाच्‍यावेळी अशोककुमार ३८ वर्षांचे होते. तर मधुबाला १६ वर्षांची होती. एकेकाळची 'बॉम्‍बे टॉकिज'ची मालकीण देविका राणी हिचा नायक म्‍हणून अशोककुमार यांनी काम केले होते. याच देविका राणी यांनी 'बेबी मुमताज' यांचे नाव 'मधुबाला' असे केले होते. 

किशोर कुमार आणि मधुबाला

गायक किशोर कुमार यांचा विवाह १९५० मध्ये बंगाली चित्रपटांची प्रसिध्द अभिनेत्री आणि गायिका रूमा गुहा ठाकुरताशी झाला. त्यांना एक बाळ झालं. त्याचं नाव अमित कुमार असं ठेवलं. रूमा आणि किशोर कुमार १९५८ मध्ये वेगळे झाले. पुढे रूमा यांनी लेखक-दिग्दर्शक अरूप गुहा ठाकुरताशी विवाह केला. यानंतर किशोर कुमार आणि मधुबाला यांच्या लव्ह स्टोरीला सुरूवात झाली. 

पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर किशोर कुमार एकटे पडले होते. किशोर कुमार यांच्या विनोदी स्वभावाने अभिनेत्री मधुबालाला त्यांच्याशी प्रेम झाले. किशोर यांनी ज्यावेळी लग्नासाठी मधुबालाला प्रपोज केले होते, त्यावेळी ती आजारी होती आणि उपचारासाठी लंडन जात होती. मधुबालाच्या ह्रदयाला छिद्र होते. दोघांनी १९६० मध्ये कोर्ट मॅरेज केलं. 

'किस्‍मत' हा १९४२ ला आलेल्‍या चित्रपटाने अशोककुमार यांना प्रचंड प्रसिध्‍दी मिळवून दिली. याच चित्रपटाच्‍या शूटिंगवेळी बेबी मुमताज (मधुबाला) 'बॉम्‍बे टॉकिज'मध्‍ये यायची. त्‍यावेळी ती ९ वर्षांची होती. अशोक कुमार यांचा लहान भाऊ किशोरकुमार आणि विनोदी अभिनेता मुमताज अलीचा मुलगा मेहमूद त्‍यावेळी बॉम्‍बे टॉकिजमध्‍ये खेळत असायचा. मधुबाला आणि किशोरकुमार हे भातुकलीचा खेळ खेळणारे खर्‍याखुर्‍या जीवनात पती-पत्‍नी बनले. मधुबालाचे प्रेम नाकारणारे अशोककुमार मोठे दीर बनले. 

सून म्‍हणून मधुबाला मान्‍य नव्हती...

किशोर कुमार आणि मधुबाला यांच्‍या लग्‍नाने अशोककुमार यांची आई प्रचंड संतापली. सून म्‍हणून मधुबाला त्‍यांना मान्‍य नव्‍हती. परंतु, अशोककुमार यांनी आपल्या आईची समजूत घातली आणि मधुबालाला सन्‍मानाने सून म्‍हणून घरात घ्‍यायला लावले. 

अशोक कुमार यांचे ३०४ चित्रपटांमध्‍ये काम 

अशोक कुमार यांनी ३०४ चित्रपटांमध्‍ये काम भूमिका केल्‍या. हिमांशू यांचा मृत्‍यू झाल्‍यानंतर 'बॉम्‍बे टॉकिज' ही चित्रपटनिर्मिती संस्‍था कर्जात बुडाली. अशोककुमार यांनी बॉम्‍बे टॉकिजला कर्जातून बाहेर काढले. असे म्‍हटले जाते की, त्‍यावेळचे ३५ लाख रुपयांचे बॉम्‍बे टॉकिजचे कर्ज अशोक कुमार यांनी फेडले होते. 


अशोक कुमार-नलिनी जयवंत 

नलिनी जयवंत आणि अशोक कुमार यांचे नाते फार काळ टिकले नाही. नलिनी आणि अशोककुमार चेंबूरच्‍या युनियन पार्क कॉलनीमध्‍ये समोरासमोरच्‍या बंगल्‍यात राहत असे. मृत्‍यूपर्यंत ते तेथेच राहिले होते.    

कोल्‍हापुरच्या कलानगरीतला कौतुक सोहळा आणि लतादीदी



चाळीसच्या दशकापासून ज्यांचा आवाज संगीत क्षेत्रात घुमतो आहे, अशा गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा २८ सप्टेंबरला वाढदिवस. मुलगी गळ्‍यात गंधार घेऊन जन्‍मली आहे. ही फार मोठी होईल. नाव मिळवेल, हे उद्‍गार आहेत लता मंगेशकर यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांचे. ते स्‍वत: अभिजात गायक होते. परवशता पाश दैवी हे त्‍यांचे नाट्‍यगीत अमर कीर्तीचे आहे. त्‍यांची स्‍वत:ची बलवंत कंपनी होती. तसेच चित्रपट संस्‍थाही त्‍यांनी स्‍थापन केली. परंतु, १९३२ च्‍या बोलपटांच्‍या झंझावातात त्‍यांचे नाट्‍यतेज झाकोळले आणि त्‍यांची सिनेमा कंपनीही अयशस्‍वी झाली.

लता, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही भावंडे. १९४१ मध्‍ये सांगलीत दीनानाथ यांचं निधन झालं. त्‍यानंतर मंगेशकर कुटुंब कोल्‍हापुरात आले. कोल्‍हापुरातील खरी कॉर्नरला बाबूराव पेंटर यांच्‍या घराजवळ मंगेशकर कुटुंब राहायचे. लतादिदी काही दिवस भवानी मंडपाजवळील जुन्‍या वाड्‍यातील एमएलजी हायस्‍कूलमध्‍ये शिकत होत्‍या. त्‍यांची अंगकाठी सडपातळ होती. त्‍या कबड्‍डी आणि खो-खो चांगल्‍या खेळायच्‍या. असा संदर्भ बाबुराव धारवाडे यांच्‍या जुनं कोल्‍हापूर या पुस्‍तकात सापडतो.

लताजींना २५ रूपयांचे बक्षीस

त्‍यावेळी कोल्‍हापुरात मास्‍टर विनायक यांची हंस पिक्‍चर्स कंपनी फार्मात होती. मास्‍टर विनायक यांनी लताजींना बोलावून घेतले आणि कंपनीसाठी काम करायची ऑफर दिली. त्‍या मॉबमध्‍ये, मुलींच्‍या मेळ्‍यात, नृत्‍यात आणि गायनाच्‍या स्‍पर्धेतही भाग घ्‍यायच्‍या. १९४१ रोजी पंजाबी चित्रपट खजांची गाणी प्रसिध्‍द होती. गायिका नूरजहाँने ती गायली होती. त्‍या चित्रपटांच्‍या गाण्‍यांची एक स्‍पर्धा राजाराम टॉकीजमध्‍ये आयोजित करण्‍यात आली होती. त्‍यातील 'लौट गई पापन अंधी' असं काही तरी गाणे लोकप्रिय होते. ते लताजींनी खूप सुंदर गायले होते. त्‍यावेळी त्‍यांना २५ रुपयांचे पहिले बक्षीस मिळाले होते.

शमशाद बेगम यांच्या आवाजातल्या गाण्यांनी "खजांची' चित्रपट सुपरहिट ठरला. यातल्या "सावन के नजारे हैं अहा अहा' या गाणं हिट ठरलं होतं. त्यावेळी पुण्यात या चित्रपटाच्या रौप्यमहोत्सवाच्या निमित्तानं ग्लोब थिएटरमध्ये नवोदित कलाकारांसाठी गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत बारा वर्षांच्या लतानं भाग घेऊन 'खजांची'मधील गाणं गाऊन पहिला क्रमांक मिळवला होता.

लता मंगेशकर या ताऱ्याचा उदय होण्यापूर्वी ज्या गायिकांची आपली संगीत कारकिर्द फुलवली होती, त्यापैकी एक शमशाद बेगम होत्या.

पुण्‍यात स्‍थलांतर

दरम्‍यानच्‍या काळात विनायकरावांनी पुण्‍यास स्‍थलांतर केले. तेथे त्‍यांनी आचार्य अत्रे, राजगुरू आदींच्‍या सहकार्याने युग फिल्‍म कंपनी प्रा. लि. ही संस्‍था काढली. दामुअण्‍णा मालवणकर, मीनाक्षी, विष्‍णूपंत जोग, सहाय्‍यक दिग्‍दर्शक दिनकर द. पाटील, माधव शिंदे, वसंत शेळके यांच्‍यासोबत लतादिदींनाही त्‍यांनी पुण्‍यात नेले. तेथे 'सरकारी पाहुणे,' 'पहिली मंगळागौर' हे चित्रपट काढले. त्‍यात लता यांनी 'आम्‍ही वळिखले गं' हे गाणे परकर पोलक्‍यात नाचत बागडत गायले होते. विनायकराव परत कोल्‍हापुरात आले. येथे त्‍यांनी शालिनी स्‍टुडिओत प्रफुल्‍ल पिक्‍चर्स संस्था काढली. त्‍यामुळे लताजी पुन्‍हा कोल्‍हापुरात आल्‍या.

पार्श्वगायनाची संधी

संगीत दिग्‍दर्शक दत्ता डावजेकर यांनी लताजींना पार्श्वगायनाची संधी दिली. विनायकरावांनी पुन्‍हा मुंबईस प्रफुल्‍लचे स्‍थलांतर केले. विनायकरावांनी येथे मोठे चित्रपट काढले. त्‍यांनी आपल्‍या चित्रपटात गोड गळ्‍याची अभिनेत्री नूरजहाँ यांना काम दिले.

लता आणि नूरजहाँ यांचा परिचय

नूरजहाँ आणि लता यांचा परिचय चित्रपटातूनच झाला. पार्श्वगायिका म्‍हणून लताजींना मुंबईत प्रसिध्‍दी मिळाली होती. राजकपूर यांच्‍या 'बरसात'मधील 'हवा में उडता जाये,' 'आवारा'मधील 'घर आया मेरा परदेशी' या गाण्‍यांनी लोकांच्‍या मनावर अधिराज्‍य गाजवले. मेहबूब यांच्‍या 'अंदाज' चित्रपटात संगीत दिग्‍दर्शक नौशाद यांनी लताबाईंच्‍या आवाजाचे सोने करून घेतले होते. तसेच संगीत दिग्‍दर्शक खेमचंद्र प्रकाश यांनी 'महल'मधील 'आयेगा, आयेगा आनेवाला' हे गाणे प्रेक्षकांच्‍या पसंतीस उतरलं. नंतर सी. रामचंद्र यांच्‍याबरोबर काम केले. 'अनारकली' चित्रपटातील 'ए जिंदगी उसी की है'ने सिनेरसिकांना मोहून टाकलं.


कोल्‍हापुरात कौतुक सोहळा

लताबाईंच्‍या या सर्व यशाचे कोल्‍हापुरकरांना अभिमान वाटला. कोल्‍हापुरकरांनी लताजींना अक्षरश: डोक्‍यावर घेतले. भालजी पेंढारकर यांनी मदनमोहन लोहियांच्‍याकरवी लताजींचा सत्‍कार करायचे ठरवले. लता मंगेशकर यांच्‍या पार्श्वगायनाचा रौप्‍यमहोत्‍सव कलानगरीत करण्‍याचे ठरले. १९६७ चे हे वर्ष. शाहू खासबाग कुस्‍त्‍यांच्‍या मैदानात संध्‍याकाळी सत्‍कार सोहळा झाला. गर्दीने मैदान तुडूंब भरले होते. भाई एम. के. जाधव नगराध्‍यक्ष होते. दिनकरराव यादव जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष, विख्‍यात कादंबरीकार आणि मा. विनायकांच्‍या कुटुंबातले ज्‍येष्‍ठ सदस्‍य वि. स. उर्फ भाऊसाहेब खांडेकर यांच्‍या हस्‍ते सत्‍कार झाला. नगराध्‍यक्षांनी भाषण केले. ते म्‍हणाले, 'लताचा गळा म्‍हणजे ईश्‍वरी लेणे आहे. ते क्‍वचितच कुणाला तरी लाभते. ते त्‍यांना त्‍यांच्‍या पित्‍यांच्‍या वारशाने आणि पुण्‍याईने लाभले आहे. लतादीदींच्‍या आवाजाने सारं कोल्‍हापूर 'लता'मय झाले.'

गौतम राज्‍याध्‍यक्ष आणि फोटोग्राफी



गौतम राजाध्‍यक्ष यांची अनेक प्रख्‍यात मॉडेल्‍स आणि फिल्‍मी जगतातील नामवंत अभिनेत्रींचे फोटो काढणारा ख्‍यातनाम फोटोग्राफर अशीच ओळख राहिली. त्‍यांची देशभरात आणि देशाबाहेरही ख्‍याती राहिली. 

Image result for gautam rajadhyaksha


काजोलपाजसून ते माधुरीपर्यंत अनेक अभिनेत्रींचे त्‍यांनी एकापेक्षा एक फोटोज काढले. त्‍यांनी काढलेले फोटो चांगले गाजले. गौतम राज्‍याध्‍यक्ष यांच्‍या फोटोग्राफीबद्‍दल थोडक्‍यात जाणून घेऊया. 

मृदू बोलणारे आणि गोड स्‍वभावाचे, मैत्रीपूर्ण सौदार्ह आणि दिसायला सुंदर असणारे, साधा झब्‍बा घालणारा माणूस, असे त्‍यांचे व्‍यक्‍तीमत्त्‍व. चमचमणार्‍या दुनियेत असूनही अत्‍यंत साधेपणाने राहणारे अशी गौतम राज्‍याध्‍यक्ष यांची ख्‍याती.  

गौतम राजाध्‍यक्ष फॅशन फोटोग्राफीतील ख्‍यातनाम व्‍यक्‍ती. १६ सप्‍टेंबर १९५०, रोजी मुंबई येथे त्‍यांचा जन्‍म झाला. त्‍यांचे शिक्षण सेंट झेवियर हायस्‍कूल, तर पुढील शिक्षण सेंट झेवियर मुंबई येथे झाले. त्‍यांनी advertising and public relations मध्‍ये डिप्‍लोमा केल्‍यानंतर ते एका कंपनीत नोकरी करू लागले. १९७४ पासून त्‍यांनी आपल्‍या करिअरला सुरूवात केली. बॉलिवूडमधील अनेक प्रख्‍यात अभिनेत्रींना त्‍यांनी आपल्‍या फोटोंच्‍या माध्‍यमातून प्रकाशझोतात आणले. फिल्‍मफेअर आणि इतर मासिकांमध्‍ये त्‍याचे फोटो नेहमी प्रसिध्‍द व्‍हायचे.

१९८०मध्‍ये शबाना आझमी, टिनामुनीम, जॅकी श्रॉफ या हिंदी चित्रपटसृष्‍टीतल्‍या अभिनेत्‍यांची त्‍यांनी काढलेल्या फोटोजना चांगली प्रसिध्‍दी मिळाली. १९८७ साली त्‍यांनी नोकरी सोडली. आणि पूर्णवेळ फोटोग्राफी व्‍यवसाय करण्‍याचा निर्णय घेतला. पुढे त्‍यांनी product, fashion, company आणि portfolio फोटोग्राफी करण्‍यास सुरूवात केली. 

Image result for gautam rajadhyaksha

ते कॉपीराईटर म्‍हणून काम करत होते. नंतर शोभा डे यांच्‍या चुलत भावाच्‍या मासिकासाठी (सेलिब्रिटी) फोटोग्राफी सुरू केले. त्‍यांची एक ग्‍लॅमर फोटोग्राफर म्‍हणून ओळख निर्माण झाली. त्‍याचबरोबर इतर मासिकांसाठी त्‍यांनी कामास सुरूवात केली. काही मराठी मालिका हिंदी चित्रपटांसाठी काम करण्‍यास सुरूवात केली. १९९७ मध्‍ये त्‍यांनी स्‍वत: लिहिलेले coffice table पुस्‍तक प्रकाशित केले. १९९२ साली त्‍यांनी 'भेहेखुदी' चित्रपटासाठी पहिला स्‍क्रिन प्‍ले लिहिला. त्‍यांच्‍या २० वर्षांच्‍या करिअरमध्‍ये काढलेल्‍या फोटोंचे प्रदर्शन २०००ला पुण्‍यात भरवण्यात आले. त्‍यानंतर कोल्‍हापूर, गोवामधून त्‍यांना चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर सॅनफ्रान्‍सेस्‍को, दुबई येथे प्रदर्शन भरवले.

पुण्‍यामध्‍ये त्‍यांनी नवख्‍या फोटोग्राफरसाठी प्रशिक्षण केंद्रही सुरू केले. भारतातील एक उत्तम फोटोग्राफर म्‍हणून राज्‍याध्‍यक्ष ओळखले जाऊ लागले. त्‍याचशिवाय मराठी, हिंदी चित्रपटसृष्‍टीतील उत्तम स्‍टील फोटोग्राफर म्‍हणून त्‍यांची ओळख निर्माण झाली. अनेक मासिकामध्‍ये त्‍यांनी विविध अभिनेत्रींच्‍या काढलेल्‍या फोटोला स्‍थान मिळालं. फिल्‍मी जगतातील अभिनेते-अभिनेत्रींचे असंख्‍य फोटो वेगवेगळ्‍या पोझमध्‍ये काढणे, ही त्‍यांची स्‍पेशालिटी होती.  

Image result for gautam rajadhyaksha bollywood actress photographs


माधुरी, काजोल आणि तत्‍कालीन टॉपच्‍या अभिनेत्रींचे फोटो काढून ते त्‍या फोटोंचे प्रदर्शन भरवायचे. नामवंत मासिके आणि फिल्‍मी मासिकांमध्‍ये त्‍या-त्‍या अभिनेत्रींचे फोटो प्रकाशित व्‍हायची. १३ सप्‍टेंबर २०११ रोजी हृदयविकाराने त्‍यांचे निधन झाले. 

मनावर रुंजी घालणारा शाहरूख!...




छोट्‍या पडद्‍यावरून आपल्‍या करिअरची सुरुवात करणार्‍या शाहरुखला 'बॉलिवूडचा बादशाह' म्‍हणून ओळख निर्माण करायला बराच संघर्ष करावा लागला. आजदेखील लाखो-करोडो लोकांच्‍या मनावर रुंजी घालणारा तो शाहरूखच आहे.

चित्रपट इंडस्‍ट्रीत 'किंग खान' अशी ओळख असलेल्‍या शाहरुखचा जन्‍म २ नोव्‍हेंबर १९६५ रोजी दिल्‍लीत झाला. त्‍याचे वडिल टान्‍सपोर्ट व्‍यवसायाशी संबंधित होते.

शाहरुखने जामिया मिलिया इस्‍लामिया विद्‍यापीठातून पदवी घेतली.

१९९८ मध्‍ये शाहरुख खानने टीव्‍हीवरील 'फौजी' मालिकेतून करिअरला सुरुवात केली. १९९१ मध्‍ये आपले स्‍वप्‍न पूर्ण करण्‍यासाठी तो मुंबईत आला. अजीज मिर्झा यांनी शाहरुखला आपली मालिका सर्कसमध्‍ये काम करण्‍याची संधी दिली. त्‍याचवेळी हेमा मालिनी यांना त्‍यांचा पहिलाच दिग्‍दर्शित चित्रपट 'दिल आशना है'साठी नायक म्‍हणून नव्‍या चेहर्‍याचा शोध सुरू होता. त्‍यात दिव्‍या भारतीची प्रमुख भूमिका होती.

शाहरुखला ज्‍यावेळी ही गोष्‍ट समजली, त्‍यावेळी आपल्‍या मित्रांच्‍या मदतीने या चित्रपटाच्‍या स्‍क्रिन टेस्‍टसाठी जाण्‍याचा शाहरुखने निर्णय घेतला.

हेमा मालिनी यांना अखेर हिरो सापडला...

हेमा मालिनी यांना मात्र, 'त्‍या' अज्ञात नायकाबद्‍दल खात्री वाटत नव्‍हती. ठरवल्‍याप्रमाणे हेमा मालिनी हैदराबादचा कार्यक्रम आटोपून मुंबईला आल्‍या. सवयीनुसार, घरी आल्‍यानंतर हेमा यांनी टीव्‍ही लावला. चॅनेल बदलत असताना अचानक टीव्‍हीवर 'फौजी' मालिका लागली होती. हेमा यांना एक लक्षवेधी चेहरा दिसला होता. त्‍या तरुणाचा चेहरा होता -शाहरूखचा. हेमा यांनी तत्‍काळ ऑफिसमधल्‍या माणसांना शाहरूखचा पत्ता शोधायला सांगितलं. शाहरुख त्यावेळी दिल्‍लीमध्ये राहत होता. त्‍याचा फोन नंबरही मिळाला होता. त्‍यानुसार, प्रभा यांनी (हेमा यांची मावस बहिण) शाहरुखला फोन लावला. खुद्‍द शाहरुखने फोन उचलला. हेमा यांच्‍या ऑफिसमधून फोन आलाय, याचा शाहरुखला विश्‍वासच बसेना. आपली कुणीतरी चेष्‍टा करतयं, असं वाटल्‍याने शाहरुखने प्रभा यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. खरचं हा फोन हेमा यांच्‍या हुकमाप्रमाणे करण्‍यात आलाय, हे पटवून देण्‍यासाठी प्रभा यांना तारेवरची कसरत करावी लागली होती. अखेर प्रभा म्‍हणाल्‍या, 'तुला मी हेमाचा डायरेक्‍ट नंबर देते. तू स्‍वत:च फोन करून खात्री करून घे. मग शाहरुखने होकार देत हेमा यांना फोन केला.'

जेव्‍हा हेमा यांना पहिल्‍यांदाच भेटला शाहरुख...

दोन दिवसांनी शाहरुख खान मुंबईत हेमा यांच्‍या घरी आला. हेमा यांना त्‍याचा अभिनय आधीच आवडला होता. हेमा त्‍याला म्‍हणाल्‍या, 'तू जरा केस एका जागी ठेवशील का?' शाहरुखने आपले केस ठिक केले. हेमा यांनी मेकअप मॅनला बोलावलं. त्‍याने शाहरुखच्‍या केसांना जेल लावून केस नीटनेटके बसवले. हे सुरू असताना धर्मेंद्र यांची एन्‍ट्री झाली. 'हा माझ्‍या नव्‍या सिनेमाचा हिरो-शाहरुख खान' असे म्‍हणत हेमा यांनी धर्मेंद्र यांच्‍याशी शाहरुखची ओळख करून दिली. धर्मेंद्र यांनी हेमा यांच्‍या चॉईसला दाद दिली. त्‍यावेळी 'दिल आशना है'साठी शाहरुखची हिरो म्‍हणून निवड झाली.

याबद्‍दल एकदा हेमा म्‍हणाल्‍या होत्‍या, 'फौजी बनवणार्‍यांना शाहरुख चांगला नट आहे, हे लगेचं कळत होतं. पण, तो एक दिवस देशाचा इतका मोठा स्‍टार बनेल, असं कुणालाही वाटलं नसले.'

थाटामाटात चित्रपटाचा मुहूर्त

मुंबईच्‍या एका हॉटेलमध्‍ये मोठ्‍या थाटामाटात हेमा यांच्‍या चित्रपटाचा मुहूर्त झाला. 'दिल आशना है' असं चित्रपटाचं नाव. 'दिल आशना है'ची कथा शर्ली कॉनरॅन या लेखिकेच्‍या 'लेस' या गाजलेल्‍या कादंबरीवर आधारीत होती. तीन स्‍त्रियांमध्‍ये विशिष्‍ट परिस्‍थितीत निर्माण होणार्‍या भावबंधनाची ती कथा आहे. या चित्रटासाठी हेमा यांनी डिंपल कपाडिया, अमृता सिंग, सोनू वालिया या त्‍याकाळी गाजलेल्‍या अभिनेत्री आणि दिव्‍या भारतीची निवड केली होती. हा चित्रपट स्‍त्री प्रधान होता. तर शाहरुख खान, कबीर बेदी, जीतेंद्र, असीफ हे मुख्‍य नायक होते. स्‍त्री प्रधान चित्रपट म्‍हणजे त्‍याकाळी 'भलतचं काहीतरी' असं असायचं. त्‍याची या नायकांना जाणीव होती. याबद्‍दल हेमा म्‍हणाल्‍या होत्‍या की, 'कुणी नाराज नव्‍हतं. सर्वांनी उत्तम सहकार्य केलं. हे नट सेटवर आले की, वातावरण बदलायचं. मी या चित्रपटाचे दिग्‍दर्शन करीत होते, तरीही कॅमेर्‍यातून त्‍यांच्‍याकडे पाहताना माझ्‍यातली अभिनेत्री जागी व्‍हायची आणि त्‍यांचं निरीक्षण करायची. आणि या नात्‍यानंसुध्‍दा कॅमेर्‍यासमोर उभं राहून त्‍यांच्‍या चेहर्‍यावरचे भाव न्‍याहाळण्‍याऐवजी कॅमेर्‍यामागून ते वाचणं वेधक वाटत होतं.'
१९९१ मध्‍ये 'दिल आशना है' रिलीज झाला.

दरम्‍यान, दीवानामध्‍ये काम करण्‍याची शाहरुखला संधी मिळाली. ऋषी कपूर या प्रसिध्‍द अभिनेत्‍याबरोबर काम करून शाहरुखने त्‍याला मिळालेल्‍या संधीचं सोनं केलं. 'दीवाना'साठी शाहरुखला फिल्‍मफेअर पुरस्‍कार देखील मिळाला. त्‍याचवेळी दिग्‍दर्शक अली अब्‍बास यांची नजर शाहरुखवर पडली. अली अब्‍बास यांना इंग्रजी कादंबरी 'ए किस बिफोर डेथ'वर एक चित्रपट काढायचा होता. शाहरुखला त्‍यांच्‍या चित्रपटात घेण्‍यात आलं. १९९३ मध्‍ये रिलीज झालेला चित्रपट 'बाजीगर' सुपरहिट ठरला. त्‍यामुळे इंडस्‍ट्रीत शाहरुखला वेगळी ओळख मिळाली.
१९९३ मध्‍ये यश चोप्रा यांच्‍या 'डर' चित्रपटात काम करण्‍याची संधी शाहरुखला मिळाली. 'क...क...क...किरण' हा शाहरुखचा डायलॉग चांगला गाजला. १९९५ मध्‍ये यश चोप्रा यांनी 'दिलवाले दुल्‍हनिया ले जाएंगे'मध्‍ये काम दिलं. हा चित्रपट ब्‍लॉकबस्‍टर ठरला.

निर्मिती क्षेत्रात पदार्पण

१९९९ मध्‍ये शाहरुख खानने चित्रपट निर्मितीकडे लक्ष वळवले. अभिनेत्री जूही चावलासोबत मिळून शाहरुखने ड्रीम्‍स अनलिमिटेडची स्‍थापना केली. या बॅनरअंतर्गत शाहरुखने 'फिर भी दिल है हिंदुस्‍तानी' चित्रपट बनवला. चांगली पटकथा आणि अभिनय असतानाही बॉक्‍स ऑफिसवर हा चित्रपट चालला नाही. याच बॅनरखाली त्‍यांनी 'अशोका' चित्रपट बनवला. हा देखील चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर सटकून आपटला. परंतु, तिसरा चित्रपट 'चलते चलते' सुपरहिट झाला.

२००४मध्‍ये शाहरुख खानने 'रेड चिली एंटरटेनमेंट' कंपनीची निर्मिती केली. या बॅनरखाली 'मैं हू ना' बॉक्‍स ऑफिसरवर आणला. हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्‍यानंतर 'पहेली,' 'ओम शांती ओम,' 'बिल्‍लू बार्बर,' 'चेन्‍नई एक्‍सप्रेस,' 'हॅप्‍पी न्‍यू इयर,' 'दिलवाले' यासारखे चित्रपट बनवले.

२००७ ला त्‍याचा लंडनमध्‍ये मादाम तुसाद संग्रहालयात मेणाचा पुतळा उभा करण्‍यात आला.


सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेता

शाहरूखला त्‍याच्‍या सिनेकरिअरमध्‍ये आठ वेळा सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेता फिल्‍म फेअर पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले आहे. शाहरुखची ऑनस्‍क्रीन जोडी काजोल आणि माधुरी दीक्षित यांच्‍यासोबत चांगली जमली.

तपस्विनी सुरस्‍वरालक्ष्‍मी सुब्‍बुलक्ष्‍मी


'त्यांची' सुंदर बोटे तानपूऱ्यासोबत तारांवर थिरकायची. डोळे बंद करून त्या तानपुऱ्याच्या झंकारित तारांसोबत गायकीच्या विश्वात रमायच्या. त्यानंतर, त्या आपल्या मागे बसलेल्या व्यक्तीकडे तानपुऱ्याचा स्वर सोपवायच्या आणि आपलं गायन सुरू करायच्या. दुपारच्या कडक ऊनातदेखील गायकीचा रियाज त्या करायच्या. त्यांनी रियाज केला नाही, असा एकदेखील दिवस गेला नाही. संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणाऱ्या महान व्यक्ती म्हणजे सुब्बुलक्ष्मी. ११ डिसेंबरला त्यांचा स्मृतीदिन. सुब्बुलक्ष्मी यांच्‍याबद्‍दल थोडक्‍यात जाणून घेऊया.  
केसांच्या मधून पाडलेली भांग, कपाळावर लावलेली गोल मोठी टिकली, त्याखाली लावलेला टिळा, नाकात दोन्हीकडे घातलेली नथणी, कानात घातलेली छोटी फुले (दागिना), स्मितहास्य असं सुब्बुलक्ष्मी यांच्या चेहऱ्यावरचं तेज. त्यांच्या या सौंदर्याबरोबरच त्यांच्या गायकीतील सुरेल सौंदर्याने संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवले. 'मदुरै षण्मुखवडिवु सुब्बुलक्ष्मी' अर्थातच एम. एस. सुब्बुलक्ष्मी प्रसिध्‍द गायिका. कुंजम्मा या नावाने त्यांना बालपणी लाडाने बोलवत असत. त्यांची आई अक्कमलाई या प्रसिध्‍द व्हायोलिन वादक होत्या. संगीताचं बाळकडू त्‍यांना त्‍यांच्‍या आईकडूनच मिळालं. किशोरी अमोनकर त्यांना 'आठवा सुर' आणि लता मंगेशकर त्यांना 'तपस्विनी' म्हणायच्या. बडे गुलाम अली खान त्यांना 'सुरस्‍वरालक्ष्‍मी सुब्‍बुलक्ष्‍मी' म्हणत होते. सरोजिनी नायडू त्यांना 'भारताची स्‍वरकोकिळा' म्हणायच्या. १९४७ मध्ये आलेला चित्रपट 'मीरा'मधून त्या राष्‍ट्रीय पातळीवर चमकल्या. एकदा नेहरू सुब्बुलक्ष्मी यांच्याविषयी म्हणाले होते, 'सुरांची मलिकासमोर मी कोण आहे, केवळ एक पंतप्रधान.'

देशातीलच नव्‍हे तर आंतरराष्‍ट्रीय पातळीवरची ख्‍यातनाम गायिका. गायिकाच नाही तर त्या संगीतकार देखील होत्‍या. व्‍यकंटेश स्तोत्रामुळे त्‍या प्रसिध्‍दीच्‍या झोतात आल्‍या. त्‍यांचे गाजलेले गाणे म्‍हणजे विष्णुसहस्रनाम. त्‍यांचं भक्‍ती संगीत भारतातल्‍या घराघरांत पोहोचलेलं. संपन्‍न घराण्‍यातल्‍या त्‍या गायिका. श्रीनिवास अय्यंगर, मुसिरी सुब्रमण्यम अय्यर व सेम्मानगुडी श्रीनिवास अय्यर यांच्याकडे एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचे सांगीतिक शिक्षण झाले. 
वयाच्‍या दहाव्‍या वर्षी त्यांची पहिली मैफिल झाली. पुढे जवळजवळ ७५ वर्षे त्‍यांनी मैफिली केल्‍या. त्‍याचं वैशिष्‍ट्‍ये असं की, साधारणपणे, १९८४-८५च्‍या नंतर त्‍यांनी जाहीर कार्यक्रम मोफत केले. त्‍या-त्‍या संस्‍थेसाठी म्‍हणून त्‍या बिदागी (मानधन) घ्‍यायच्‍या नाहीत. कोट्‍यवधीं रुपयांची मदत त्‍यांनी अनेक संस्‍थांना केली. त्‍यातल्‍या प्रमुख संस्‍था म्‍हणजे, पुण्‍यातील महात्‍मा गांधी ट्रस्‍ट, गांधी स्‍मारक निधी, कस्‍तुरभा स्‍मारक निधी, अशा राष्‍ट्रीय पातळीवरच्‍या संस्‍थांसाठी त्‍यांनी मैफिली केल्‍या. अनेक सार्वजनिक संस्‍थेसाठी त्‍यांनी कार्यक्रम केले. अनेक संस्‍थांना त्‍यांनी मदत केली. तिरुपती बालाजी, चेन्‍नईचा गांधी मेमोरिअल मंडप, हिंदी प्रचार सभा, रामनाथ स्‍वामी मंदिर, अमेरिकेतल्‍या हिंदू मंदिरांसाठी मदत, शाळा आणि महाविद्‍यालये आणि अनेक संगीत संस्‍थांना मदत त्‍यांनी केली होती. 
अनेक थोर गायकांशी त्‍यांचे निकट संबंध होते. बडे गुलाम अली खाँ हे सुब्‍बुलक्ष्‍मी यांचा उल्‍लेख करताना 'सुस्‍वरलक्ष्‍मी शुभलक्ष्‍मी' असे करायचे. विलायत खाँ हेदेखील त्‍यांना खूप मानायचे. त्‍यानंतर पंडित रविशंकर, पंडित जसराज, अमजद अली खान यासारखे अनेक मोठे कलावंत त्‍यांचा आदर करायचे. परमेश्‍वरी साधना आणि ईश्‍वरभक्‍ती ही त्‍यांच्‍या गाण्‍यांची वैशिष्‍ट्‍ये.  
महात्‍मा गांधी, नेहरू गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्‍याशी त्‍यांचे चांगले संबंध होते. महात्‍मा गांधी यांचं आवडतं भजन 'हरि तुम हरि' हे सुब्‍बुलक्ष्‍मी यांनी गायलं होतं, असे म्‍हटले जाते. नेहरू त्‍यांना आपली मुलगी मानायचे. पंडित नेहरू सुब्‍बुलक्ष्‍मींना म्‍हणायचे, 'तू माझी पहिली मुलगी आहेस आणि इंदू दुसरी.' (इंदिरा गांधी)
इंदिरा गांधी आणि सुब्‍बुलक्ष्‍मी एका कार्यक्रमात शेजारी-शेजारी बसल्‍या होत्‍या. राजीव गांधी त्‍यावेळी ४ वर्षांचे होते. त्‍यावेळी कार्यक्रमात राजीव खूपच दंगा करत असल्‍यामुळे सुब्‍बुलक्ष्‍मी यांनी इंदिराजींच्‍या हातातून राजीव यांना घेतले. त्‍यांना थोपटलं आणि शांत केलं, अशी आठवण सुब्‍बुलक्ष्‍मी यांनी राजीव गांधी यांची हत्‍या झाल्‍यानंतर एका ठिकाणी बोलून दाखवली होती. नेहरू-गांधी परिवाराशी सुब्‍बुलक्ष्‍मी यांचे संबंध होते. 
असं म्‍हटलं जातं की, त्‍यांचे गाणं-स्‍तोत्र ऐकल्‍याशिवाय लोक कामाला सुरुवात करायचे नाहीत. त्‍यांनी जी गाणी गायली त्‍यात व्‍यकंटेशस्‍तोत्र तर आहेच. शिवाय, त्‍याच्‍यापलीकडे मीरा, तुलसीदास, कबीर, सूरदास आणि तुकारामांचे अभंग (मराठी) अशा थोर संतांच्‍या रचनाही त्‍यांनी गायल्‍या. लोकांच्‍या मनावर अधिराज्‍य गाजवणार्‍या गानसम्राज्ञी सुब्‍बुलक्ष्‍मी यांनी बंगाली रवींद्र संगीत देखील त्‍यांनी गायले आहे.  
अखेरच्‍या काळात त्‍यांनी बिदागी (मानधन) घेऊन त्‍यांनी एकही मैफिल केली नाही. २०० पेक्षा अधिक मैफिली त्‍यांनी सार्वजनिक कार्यासाठी आणि ३ कोटी रुपयांहून अधिक देणग्‍या त्‍यांनी विविध कामांसाठी दिल्‍या. त्‍यांचे पती ‘कल्‍की’ नावाचे साप्‍ताहिक चालवायचे. सुब्‍बुलक्ष्‍मी आणि त्‍यांचे पती यांनी मिळून ‘सावित्री’ हा चित्रपट काढला होता (१९४१). त्‍यात सुब्‍बुलक्ष्‍मी यांनी नारदाची भूमिका केली. तर सावित्रीची भूमिका मराठमोळी अभिनेत्री शांता आपटे यांनी साकारली होती.  
दक्षिणेतील लोकप्रिय साप्‍ताहिक कल्‍की नंतरच्‍या काळात तोट्‍यात आलं. आर्थिकदृष्‍ट्‍या तोट्‍यात आल्‍यामुळे त्‍यांनी साप्‍ताहिक बंद केलं. चेन्‍नईत त्‍यांचा 'कल्‍की गार्डन्‍स' नावाचं एक बंगला होता. आर्थिकदृष्‍ट्‍या अडचणीत आल्‍यामुळे त्‍यांनी तो बंगला विकला आणि साध्‍या घरात राहायला गेल्‍या. बंगला विकून त्‍यांनी कामगारांची देणी भागवली.  
'संत मीरा' नावाचा चित्रपट सुब्‍बुलक्ष्‍मी यांनी काढला. तो दाखवण्‍यासाठी सुब्‍बुलक्ष्‍मी या दिल्‍लीत पं. नेहरूंच्‍या निवासस्‍थानी गेल्‍या होत्‍या. त्‍या सिनेमाचं स्‍क्रिनिंग नेहरूंसाठी ठेवण्‍यात आलं होतं, असं म्‍हटलं जातं. 'मीरा' या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर त्यांनी अभिनय क्षेत्राला पूर्णविराम देऊन आपलं संपूर्ण लक्ष संगीतावर केंद्रित केलं. त्यांनी चित्रपटांतही अभिनयही केला. त्यांच्या चित्रपटांत सेवासदनम, शाकुंतलम या तमिळ, आणि मीरा/मीराबाई या तमिळ/हिंदी चित्रपटाचा समावेश आहे. त्रिवेंद्रम येथील मंदिराच्या श्रीरंगम गोपुर बांधणीच्या खर्चासाठी सुब्बलक्ष्मी यांनी मुंबईत मैफिल केली होती. 
सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील काही हिंदी/संस्कृत गीते -
चाकर राखो जी (हिंदी), पग घुंगरु बाँध मीरा नाचे रे, भज गोविंदम, मधुराक्षतम्‌, मोरे आँगना में (हिंदी), मोरे तो गिरिधर गोपाल (हिंदी), श्रीवेंकटाचलपते तव सुप्रभातम्‌, विष्णुसहस्रनाम, वृंदावन कुंज भवन (हिंदी), हनुमान चालिसा, हरि तुम हरो (हिंदी).
 पुरस्कार -
पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्‍न पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, संगीत कलानिधी, संगीत कलाशिखरमणी पुरस्कार, कालिदास सन्मान, रॅमन मॅगसेसे पुरस्कार.
११ डिसेंबर २००४ रोजी त्‍यांचं चेन्नई येथे निधन झालं. 

ॲसिड हल्ले आपण रोखू शकू का?


दीपिका पादुकोनचा ‘छपाक’ हा चित्रपट १० जानेवारीला रिलीज झाला. लक्ष्मी अग्रवाल या ॲसिड हल्ला पीडितेच्या आयुष्यावर आधारित असणाऱ्या छपाक चित्रपटात दीपिका ‘मालती’ची भूमिका साकारत आहे. अशा अनेक 'मालती' आहेत, ज्यांना आपल्या आयुष्यात पुन्हा उभे राहण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. लक्ष्मी अग्रवाल, अलिगढमध्ये राहणारी शबनम, डॉली, रूपा आणि बऱ्याच जणी ॲसिड हल्ल्याला बळी पडल्या आहेत. परंतु, हा ॲसिड हल्ला आपण रोखू शकलो असतो तर? ही सल मनात कायम आहे. 

महाराष्ट्रात डिसेंबर २०१९ ची ताजी घटना आहे. नागपूरच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिकणाऱ्या एका २० वर्षीय तरूणीवर ॲसिड फेकण्यात आलं होतं. ही दुर्दैवी घटना गोंदिया जिल्ह्यामध्ये घडली होती. याला जबाबदार कोणाला ठरवायचं? ॲसिड हल्ला करणारा, ॲसिड विक्री करणारा? सरकार? की समाज? 
ॲसिड हल्ल्याच्या घटना बहुतांशी मानसिक विकृतीतून घडलेल्या आहेत. प्रेम नावाच्या प्रकरणामध्ये अधिक घटना घडलेल्या दिसून येतात. मुलीची इच्छा नाही. परंतु, कोणीतरी मागे लागलेला आहे. आधी ओळख झालेली आहे. पण, 'तिने' नकार दिला असेल. किंवा बिनसल्यानंतर सूड उगवण्याचा जो एक प्रकार आहे त्यातून अथवा 'तिने' रिस्पॉन्स दिला नाही तर; मित्र असेल पण लग्नाला नकार दिला असेल, आधी ओळख झालेली आहे आणि पुढे त्यांच्यामध्ये काहीतरी बिनसले असेल तर आणि एकतर्फी प्रेमातून ॲसिड हल्ल्यामागची कारणे आहेत. बहुसंख्य ॲसिड हल्ल्याची प्रकरणे अशा गोष्टींवरून झाली आहेत. अशा पुरूषी मानसिकतेतून उद्भवणारा प्रकार हा ॲसिड फेक होय. मुलींच्याबाबतीतच हे हल्ले झाले आहेत. तिचं विद्रुपीकरण करणं, ही पुरूषी मानसिक विकृती आहे. 'ॲसिड फेक' हे विकृतीकरणचं प्रकटीकरण आहे. 
असे हल्ले थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो? ॲसिड हल्ल्यासारखी विकृती थांबवायची असेल तर दोन मार्ग आहेत. एक प्रबोधन आणि दुसरे म्हणजे मुलांच्या जीवनातील खुलेपणा. 
मुलांचे 'प्रबोधन' करणं हा त्यातील एक महत्त्वाची गोष्ट आहे. ज्याप्रकारे पुरूषांना प्रेम करण्याचं स्वातंत्र्य आहे, तसं प्रेम नाकारण्याचे मुलीला स्वातंत्र्य आहे. हा जो समजूतदारपणा आहे, तो मुले किशोरवयीन असल्यापासून यायला हवा. येथे मुलांचे कौंटुबिक पातळीवर प्रबोधन करणे गरजेचे आहे. मुख्यत्वे जी किशोरवयीन मुले आहेत, त्यांच्या भावभावना दडपण्याचा प्रकार काही वेळा होतो. त्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये विविध पातळींवर प्रबोधन होणे आवश्यक आहे. 
मुलींच्याबद्दल आकर्षण असो वा सेक्सविषयक, मुलांच्या जीवनात खुलेपणाने यावर चर्चा व्हायला हवी. मग ते कुटुंब असो वा शालेय जीवन. सहशिक्षणाच्या काळात हा खुलेपणा आला किंवा शालेय जीवनातच मुलांना त्यांच्या बोलण्यामध्ये मोकळेपणा आणू दिला तर कदाचित असे प्रकार कमी होण्याची शक्यता आहे. 
दुसरं म्हणजे विकृतीला कोणताही इलाज नसतो. त्यामुळे ॲसिड फेकसारख्या विकृतीला कठोर शिक्षा, कठोर कायद्याची अंमलबजावणी हा एक मार्ग आहे. जर आरोपी मोकाट सुटले तर त्यांना अधिक प्रोत्साहन मिळाल्यासारखं होईल. त्यामुळे कायद्याचा धाक, कठोर शिक्षा असायलाच हवी. पण, त्याच्या जोडीला प्रबोधनाचीही गरज आहे. प्रबोधन हे शैक्षणिक पातळीवर असेल, समाज पातळीवर असेल किंवा कौंटुंबिक पातळीवर असेल. विविध प्रकारचे प्रबोधन आणि कायद्याचा धाक या दोन गोष्टींमुळे ॲसिड हल्ल्यासारख्या विकृती कमी होऊ शकतात. 
५९ टक्के अविवाहित तरूणींवर, ४१ टक्के विवाहितांवर ॲसिड हल्ले 
मध्यंतरी, एक वृत्त वाचनात आले होते. त्यामध्ये एका वेलफेअर टीमने आतापर्यंत शंभर ॲसिड ॲटॅक पीडितांवर सर्व्हे केला होता. त्या अहवालात म्हटले होते-६९ टक्के एकट्या व्यक्तीने तरूणीवर ॲसिड फेकले आहे. २९ टक्के एकाहून अधिक व्यक्तींनी तरूणीवर ॲसिड हल्ला केला आहे. तर २ टक्के लोकांची माहिती अद्याप समोर आलेली नाही. ५९ टक्के अविवाहित तरूणींवर आणि ४१ टक्के विवाहित महिलांवर ॲसिड फेकण्यात आले आहे. यातील काही ६४ टक्के घटना दिवसांत आणि ३६ टक्के घटना रात्री घडल्या आहेत. 
ॲसिड ॲटॅकचे एकानंतर एक झालेल्या घटनांनंतर २०१३ मध्ये एक कायदा झाला. त्यानुसार, ॲसिड खरेदीविषयीचे नियम कडक करण्यात आले. सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, ॲसिडच्या बाटल्या विकणाऱ्या दुकानदाराला रजिस्टर ठेवावं लागेल. यामध्ये ॲसिड खरेदी करणाऱ्याचे पूर्ण नाव आणि पत्ता तसेच कोणत्या कामासाठी ॲसिड घेऊन जात आहे, हे सर्व लिहावं लागेल. परंतु, अडचण ही आहे की, या नियमांचे पालन कुठेच करण्यात आले नाही. न ही ॲसिड विकणाऱ्यांनी, न विकत घेणाऱ्यांनी हे नियम पाळले. आजही सर्व नियम मोडीत काढत खुलेआम ॲसिड विकले जाते. 
समाजाचा भाग होण्याच्या नात्याने आपण सर्वच जण यावर विचार करूया.

राज कपूरची रंगपंचमी देव आनंदने कधीच खेळली नाही



रंगपंचमी आली म्‍हणजे आठवते ती राज कपूर यांच्या आरके स्‍टुडिओमध्‍ये खेळली जाणारी रंगपंचमीची. कारण, राज कपूर यांच्‍या घरी होणार्‍या रंगपंचमीसारखं सेलिब्रेशन आजपर्यंत कोणीही करू शकलं नाही. आरके स्‍टुडिओमध्‍ये रंगाने भरलेल्‍या पाण्‍याच्‍या टाकीत बुडवून ही होळी (रंगपंचमी) साजरी केली जायची. होळीला येणार्‍या सर्व पाहुण्‍यांना हा खास मान दिला जायचा, असे मिश्‍किलपणे म्‍हटलं जायचं. रंगपंचमीच्‍या निमित्तानं राज कपूर आपल्‍या फॅमिलीसोबत सेलिब्रेशनसाठी हजर असायचे. त्‍यांचे भाऊ शम्मी आणि शशी कपूर, तीन मुले-रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि राजीव कपूर तसेच सुना आणि नातवंडे सर्वजण येथे असायची. चित्रपट सृष्‍टीतील कलाकारही या सेलिब्रेशनमध्‍ये सहभागी व्‍हायची.

आरके स्टुडिओमध्‍ये रंगपंचमीची सुरुवात पृथ्वीराज कपूर यांनी केली होती. यानंतर ही परंपरा राज कपूर यांनी कायम ठेवली. ६०च्‍या दशकात त्‍यांनी आपल्‍या स्टुडिओत होळी आणि गणशोत्सव सुरू केले होते. मात्र, १९८८ मध्‍ये राजकपूर यांचे निधन झाल्‍यानंतर आरके स्‍टुडिओत रंगपंचमीचं सेलिब्रेशन झालं नाही. 
Image result for r k studio holi
आर. के. स्टुडिओ १९४८ मध्‍ये उभारण्‍यात आला होता. राजकपूर यांच्‍या नावाने हा स्‍टुडिओ उभारण्‍यात आला होता. शो मॅन नावाने प्रसिध्‍द असणारे अभिनेते राज कपूर यांनी अधिकतर चित्रपटांचे शूटिंग याच स्‍टुडिओत झाले होते. हा स्‍टुडिओ जवळपास २ एकर परिसरात होता. आता हा स्टुडिओ पाडण्यात आला असून ही जागा विकण्यात आली आहे.  
हिंदी चित्रपट 'आवारा,' 'श्री ४२०,' 'मेरा नाम जोकर' आणि 'बॉबी' यासारख्‍यां अनेक चित्रपटांचे शूटिंग येथे झाले होते. मुंबईच्‍या चेंबूरमध्‍ये असणारा हा स्‍टुडिओ ७० वर्षे जुना आहे. या स्‍टुडिओच्‍या एका भागात गेल्‍यावर्षी एका रिॲलिटी शोच्‍या शूटिंग दरम्‍यान आग लागली होती. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रींचे पोशाख, ज्वेलरी, मेरा नाम जोकरचा क्लोन मास्क, जिस देश में गंगा बहती है मधील बंदूके तसेच आवारा, संगम आणि बॉबी चित्रपटातील ग्रँड पियानो देखील जळाले होते. 
रजा मुराद यांची आठवण 
पाचशेहून अधिक चित्रपटात काम करणारे अभिनेते रजा मुराद यांनी एका वेबसाईटशी बोलताना आपले आरके स्‍टुडिओशी निगडित अनुभव शेअर केले होते. त्‍यांनी बॉलिवूडकरांच्‍या रंगपंचमीविषयी आपले अनुभव सांगितले होते. त्‍यांनी सांगितले की, आर. के स्टुडिओमध्‍ये रंगपंचमीचा उत्सव खूपच शानदार असायचा. 
Image result for r k studio holi
मुराद म्‍हणाले होते, आर. के. स्टुडिओमध्‍ये रंगपंचमीच्‍या उत्सवाचा अर्थ भांग आणि फूड फेस्टिव्‍हल असे होते. स्टुडिओमध्‍ये एक तात्‍पुरता विहिरीसारखे एक डबके बनवले जायचे. त्‍यामध्‍ये प्रत्‍येकाला उडी मारण्‍यास भाग पाडले जायचे. मला पहिल्‍यांदा स्टुडिओमध्‍ये ज्‍यावेळी रंगपंचमी उत्‍सवात सहभागी होण्‍याची संधी मिळाली, त्‍यावेळी मला खूप आनंद झाला होता. अनेक वर्षे हा उत्‍सव स्‍टुडिओत साजरा होत राहिला.
राज कपूर यांची रंगपंचमी बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडपर्यंत प्रसिध्‍द होती. बिग बी अमिताभ बच्चन यांच्‍यासोबत अनेक कलाकारदेखील आर के रंगपंचमीचा उत्‍सव साजरा करण्‍यास स्‍टुडिओत येत असत. 
देव आनंद कधीच सहभागी झाले नाहीत
दिलीप कुमार, मनोज कुमार, शम्मी कपूर, शशी कपूर, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, जितेंद्र, धर्मेंद्र, हेमा मालिनी यांच्‍यासारखे सेलिब्रिटीज आर के स्टुडिओच्‍या रंगपंचमी पार्टीत दिसत होते. परंतु, बॉलिवूडचे एक असे सुपरस्टार होते, जे या पार्टीत कधीच सहभागी झाले नाही. राज कपूर यांच्‍याआधी बॉलिवूडमध्‍ये याप्रकारे भव्य पध्‍दतीने रंगपंचमी सेलिब्रेट करण्‍याची परंपरा नव्‍हती. परंतु, राज कपूर यांनी स्‍टार्ससाठी रंगपंचमी पार्टी सुरू केली.
आर के स्टुडिओमध्‍ये राज कपूर यांच्‍या पार्टीमध्‍ये बॉलिवूडचे तमाम कलाकार सहभागी व्‍हायचे. परंतु, सदाबहार अभिनेते देव आनंद त्‍या पार्टीमध्‍ये कधीच सहभागी होत नसत. असे म्‍हटले जायचे की, देव आनंद आणि राज कपूर यांच्‍यामध्‍ये कोणताही वाद नव्‍हता. दोघे चांगले मित्र होते. परंतु, देव आनंद कधीच रंगपंचमीसाठी या स्‍टुडिओत गेले नाहीत. त्‍यांना रंगपंचमी साजरी करणे आवडत नसायचे. ते नेहमी सण-उत्‍सवापासून दूर असायचे. राज कपूर यांना देव आनंद यांची ही गोष्‍ट माहिती होती. त्‍यामुळे त्‍यांनी कधीही देव आनंद यांना आर के स्टुडिओच्‍या होळी पार्टीमध्‍ये आमंत्रण दिले नाही. 
Image result for r k studio holi
१९८८ पर्यंत आर. के. मध्‍ये रंगपंचमी साजरी व्‍हायची. परंतु, राज कपूर यांच्‍या निधनानंतर आर. के. स्टुडियोच्‍या रंगपंचमीचा सिलसिला कायमचा थांबला. 
आरके स्टुडिओमध्‍ये होळीची सुरुवात पृथ्वीराज कपूर यांनी केली होती. यानंतर ही परंपरा राज कपूर यांनी कायम ठेवली. ६०च्‍या दशकात त्‍यांनी आपल्‍या स्टुडिओत होळी आणि गणशोत्सव सुरू केले होते. मात्र, १९८८ मध्‍ये राजकपूर यांचे निधन झाल्‍यानंतर आरके स्‍टुडिओत होळीचं सेलिब्रेशन झालं नाही. 

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...