शम्मी कपूर भारतीय सिनेसृष्टीत अशा बॉलिवूड अभिनेत्यांपैकी एक आहेत, ज्यांना त्यांच्या डान्सच्या खास स्टाईलसाठी ओळखले जात होते. आज शम्मी कपूर यांची आज सहावी पुण्यतिथी. बॉलिवूडच्या या पहिल्या सुपरकूल डूड अभिनेत्याबद्दल काही गोष्टी जाणून घेऊयात.
जन्म
आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते शम्मी कपूर यांची इंडस्ट्रीत एक खास ओळख होती. पृथ्वीराज कपूर यांच्या घरी २१ ऑक्टोबर, १९३१ रोजी शम्मी कपूर यांचा जन्म झाला होता. पृथ्वीराज यांच्या चार मुलांपैकी एक शम्मी होते. त्यांच्या आईचे नाव रामशरणी कपूर होतं. शम्मी कपूर यांचं बालपणीचं नाव शमशेर राज कपूर होतं. राजकपूर आणि शशी कपूर हे त्यांची दोन भाऊदेखील वेटरन ॲक्टर होते.
डेब्यू
शम्मी कपूर यांचे वडिल पृथ्वीराज कपूर चित्रपट इंडस्ट्रीतील एक उत्तम अभिनेते होते. शम्मी कपूर यांनी 'जीवन ज्योति' या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केलं होतं. त्यांचा अंदाज इतर अभिनेत्यांपेक्षा वेगळा होता.
'या' अभिनेत्रीला केलं होतं प्रपोज
अभिनेत्री मुमताज ज्यावेळी १८ वर्षांच्या होत्या, त्यावेळी शम्मी कपूर यांनी लग्नासाठी त्यांना प्रपोज केलं होतं. असं म्हटलं जातं की, मुमताज यांचंदेखील शम्मी यांच्यावर प्रेम होतं. मुमताज यांनी आपलं चित्रपटातील करिअर सोडून आपल्याशी लग्न करावं, असं शम्मी यांना वाटत होतं. परंतु, मुमताज यांनी नकार दिला. त्यावेळी कपूर फॅमिलीत सुना चित्रपटात काम करू शकत नव्हत्या, असं म्हटलं जातं.

घरच्या मंडळींविरोधात जाऊन गीता बाली यांच्याबरोबर शम्मी यांनी लग्न केलं होतं. १९६५ मध्ये गीता बाली यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांनी आपल्या करिअरकडे फारसं लक्ष दिलं नाही.
दुसर्या लग्नासाठी ठेवली होती मोठी अट
गीता बाली यांचं निधन झाल्यानंतर शम्मी कपूर यांनी दुसरे लग्न करावे, यासाठी त्यांच्या घरच्या मंडळींनी शम्मी यांच्यावर दबाव आणला. कारण, शम्मी यांची मुले लहान होती. गीता यांच्या निधनानंतर ४ वर्षांनी त्यांनी नीला देवी यांच्याशी लग्न केलं. नीला एका रॉयल फॅमिलीतील होत्या. परंतु, शम्मी यांनी नीला यांच्यासमोर एक अट ठेवली की, ती आई बनू शकत नाही. नीला यांनीच गीता यांच्या मुलांचे संगोपन करावे, असे शम्मी यांचे म्हणणे होते. नीला देवी यांनी ही अट मान्य करून शम्मी यांच्याशी लग्न केलं.
जवळपास २०० चित्रपटांत काम
शम्मी कपूर यांनी आपल्या करिअरमध्ये जवळपास २०० चित्रपटांत काम केलं. 'रंगीन रातें', 'तुमसा नही देखा', 'मुजरिम', 'उजाला', 'दिल देके देखो', 'जंगली', 'प्रोफेसर चायना टाउन', 'ब्लफ मास्टर', 'कश्मीर की कली', 'राजकुमार', 'जानवर', 'तिसरी मंझील', 'ॲन ईव्हनिंग इन पॅरिस', 'ब्रह्मचारी', 'तुमसे अच्छा कौन है', 'प्रिन्स', 'अंदाज', 'विधाता'इत्यादी त्यांचे काही चित्रपट.

जेव्हा चित्रपट फ्लॉप ठरले
लग्नानंतर शम्मी यांनी ऑन स्क्रीन गीता बाली यांच्यासोबत चित्रपट केले. 'रंगीन रातें'मध्ये गीता यांच्यासोबत दिसलेल्या शम्मी यांचे एकानंतर एक चित्रपट फ्लॉप ठरले, त्यावेळी ते निराश झाले. एक दिवस त्यांनी गीता यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले, 'जर पुढचा चित्रपट फ्लॉप झाला तर चित्रपट सोडेन आणि आसामच्या चहाच्या बागेत मॅनेजरची नोकरी करेन.' गीता बाली यांनी त्यांना धीर दिला आणि चित्रपट न सोडण्याचा सल्ला दिला. त्यानंतर एका चित्रपटाने शम्मी यांचं नशीब बदललं. 'तुमसा नहीं देखा' हा नासिर हुसैन यांचा चित्रपट हिट ठरला. नासीर यांनी याआधी देव आनंद यांच्यासाठी 'पेईंग गेस्ट' आणि 'मुनीम जी' यासारखे हिट चित्रपट बनवले होते. यानंतर शम्मी यांचे अनेक चित्रपट हिट ठरले. 'जानवर,' 'जंगली,' 'प्रोफेसर,' 'दिल देके देखो' या चित्रपटांतून त्यांची वेगळी ओळख बनली. या बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांचे ते हिट हिरो ठरले.
शम्मी कपूर यांचे १४ ऑगस्ट २०११ ला निधन झाले.