कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका दुग्धजन्य पदार्थ निर्माण करण्यात अग्रेसर आहे. दत्तवाड (ता.शिरोळ) येथे बाहुबली आणि भरत नेजे या दोघा भावंडांनी जिद्द व चिकाटीतून दुधाच्या व्यवसायात आईस्क्रिमची कंपनी काढून ती दोन राज्यात पोहोचवण्याचे काम केले आहे. आज पारस मिल्क आईस्क्रिम कर्नाटक, महाराष्ट्र येथे विस्तारले आहे. नेजे बंधूंनी विश्वास आणि क्वालिटीच्या बळावरच हे यश संपादन केले आहे. आजच्या युवकांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
दत्तवाड येथील बाहुबली जिवंधर नेजे व भरत जिवंधर नेजे या दोघा भावांचा जन्म दत्तवाड येथील जैन समाजात झाला. वडील जिवंधर नेजे हे एक अल्पभूधारक शेतकरी होते. आपली शेती कसत असतानाच आपल्या मुलांनी मात्र शिकून मोठे व्हावे, या भावनेतून त्यांनी बाहुबली व भरत यांना शिक्षण घेण्याची प्रेरणा दिली. दोघा भावंडांनी ही आई-वडिलांची इच्छा पूर्ण करत बी. कॉम पदवीपर्यंत शिक्षण घेतले. शिक्षण घेता घेताच दत्तवाडमधील पतसंस्थेमध्ये दोघांनीही पिग्मी एजंट म्हणून कामाला सुरुवात केली. मात्र केवळ पिग्मीचे काम करून आपली प्रगती होणार नाही हे लक्षात आल्यानंतर सोबत कोणतातरी जोडधंदा सुरू करावा असा विचार केला. याच विचारातून आपल्या वडिलोपार्जित अर्धा एकर शेतीमध्ये गवताचे कुरण तयार करून आपल्या घरी गाईंचा गोठा तयार केला.
येथूनच त्यांच्या यशाच्या प्रवासाला सुरुवात झाली. अल्पावधीतच दोन गाईचे चार, सहा अशी प्रगती करत बारा गाईंचा गोठा तयार झाला. यातूनच दुसर्यांच्या डेअरीत दूध घालण्याऐवजी आपलीच दूध डेअरी असावी अशी संकल्पना दोघा भावंडाच्या मनात आली. आणि थोड्याच दिवसात दूध डेअरी फार्मचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले.
दुधाचे संकलन करून ते दूध बाहेर पाठवण्याऐवजी आपणच त्यावर प्रक्रिया केली तर आपल्याला व ग्राहकांना याचा फायदा होईल, या विचाराने दुधावर प्रक्रिया करून खवा तयार करण्यात येऊ लागला. उत्तम क्वालिटीचा खवा तयार होऊ लागल्याने दत्तवाडसह परिसरात या खव्याला चांगलीच मागणी येऊ लागली.
दूध डेअरी व त्यातून खव्याची निर्मिती हा व्यवसाय उत्तमरीत्या आपल्या कुटुंबासह सुरू असतानाच ध्येयवेड्या भावंडांनी परिसरातील विविध दुग्ध व्यवसायातील इतर उद्योगधंद्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली. यातून त्यांच्या लक्षात आले की आपल्या परिसरात कोठेही आईस्क्रीमचा कारखाना नाही. ही बाब लक्षात येताच प्रचंड धाडसाने व मोठ्या आत्मविश्वासाने सुरुवातीला छोट्या स्वरूपात राहत्या घरीच पारस मिल्क आईस्क्रीम या नावाने सन २०१४ रोजी आईस्क्रीम व्यवसायाची पायाभरणी करून छोटा कारखाना सुरू केला. सुरक्षित पॅकिंग व उत्कृष्ट चवीमुळे हळूहळू आईस्क्रीम लोकप्रसिद्ध झाले.
व्यवसाय वृद्धीसाठी नवनवीन यंत्राची त्यामध्ये भर पडू लागली. आईस्क्रीमचा व्यवसाय वाढवण्यासाठी महत्वपूर्ण असे भांडवल उभे करण्यासाठी नेजे बंधूंना युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दत्तवाड व सर्वोदय पतसंस्था शाखा दत्तवाड या वित्तीय संस्थेचे अतिशय मोलाचे सहकार्य लाभले. बघता बघता त्यांच्या आईस्क्रीम व्यवसायाने परिसरातील भाग व्यापला.
व्यवसाय वाढू लागल्याने घराजवळ सुरू करण्यात आलेला आईस्क्रीम कारखान्याची जागा कमी पडू लागल्याने दत्तवाड-टाकळीवाडी माळावर जागा खरेदी करून आईस्क्रीमचा कारखाना सन २०१९ मध्ये उभा केला.
व्यवसाय वाढू लागल्याने घराजवळ सुरू करण्यात आलेला आईस्क्रीम कारखान्याची जागा कमी पडू लागल्याने दत्तवाड-टाकळीवाडी माळावर जागा खरेदी करून आईस्क्रीमचा कारखाना सन २०१९ मध्ये उभा केला.
दरम्यानच्या काळात नवीन कारखाना उभा केल्यानंतरच कोरोना महामारी पसरल्याने व्यवसायावर विपरीत परिणाम झाला. मात्र अडचणीवर कशी मात करावी याची कलाच नेजे बंधूना अवगत असल्याने या परिस्थितीला न घाबरता कोरोना महामारी नंतर अल्पावधीतच आपल्या कौशल्याने त्यांनी आईस्क्रीम व्यवसायात पुन्हा भरारी घेतली.
दोन भावंडासह दोन कामगारांनी सुरुवात झालेला हा आईस्क्रीम चा व्यवसाय इतका पसरला आहे की, आज रोजी २५ कामगारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. परस्परातील समन्वय एकमेकांवरील विश्वास व प्रचंड कष्ट व जिद्दीच्या जोरावर आपण शून्यातून विश्व निर्माण करू शकतो हे या महत्त्वाकांक्षी नेजे भावंडांनी दाखवून दिले आहे. नेजे बंधूंचा यशाचा हा जीवन प्रवास ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना नक्कीच प्रेरणादायी ठरणारा असा आहे.
१०० पेक्षा अधिक व्हरायटी
आईस्क्रीम कारखान्यात अत्याधुनिक अशा सर्व प्रकारच्या यंत्राचा समावेश केला गेला आहे. जवळपास १०० पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम या कारखान्यात तयार होत आहेत. उत्कृष्ट गुणवत्तेमुळे कारखान्यात तयार होणार्या पारस आईस्क्रीम इंडस्ट्रीची ख्याती दोन राज्यात पसरली आहे. दोघा भावंडांपैकी भरत नेजे हे मार्केटिंगचे काम सांभाळतात तर बाहुबली नेजे हे प्रोडक्शन विभाग सांभाळतात.
क्वालिटी व गुणवत्तेमुळे विश्वसार्हता
व्यवसायिकांना मागणीनुसार वेळेवर पुरवठा, चोख व्यवहार, व उत्तम क्वालिटी या त्यांच्या गुणांमुळे महाराष्ट्र, कर्नाटकातील व्यावसायिकामध्ये त्यांची विश्वासार्हता निर्माण झाली. पारस आईस्क्रीमच्या उत्तम चवीमुळे जेथे जेथे दत्तवाड मधील या पारस आईस्क्रीमची चव ग्राहकांनी घेतली आहे. तिथे 'आईस्क्रीम खावे तर पारस चेच' अशी प्रसिद्धी जनमानसात त्यांची निर्माण झाली आहे.
मोबाईल क्रमांक -
भरत नेजे - ९७६६०११५२२
बाहुबली नेजे - ९९७०७१५६०९
बाहुबली नेजे - ९९७०७१५६०९

No comments:
Post a Comment