सिध्द अभिनेते कमल हसनचा जन्म ७ नोव्हेंबर १९५४ रोजी तामिळनाडूतील परमकुडी येथे झाला. त्यांचे वडील श्रीनिवास हे वकील होते. तर आई राजलक्ष्मी ही गृहिणी होती. भाऊ चारु हरान हाही अभिनेता होता. बहिण नलिनी शास्त्रीय नृत्यांगणा होती. अशा कलासक्त कुटुंबात त्यांचा जन्म झाला.

बालपणापासूनचं कलेचे संस्कार
कमल यांच्यावर बालपणापासूनच कलेचे संस्कार झाले. बालपणी शिक्षणातही हुशार असल्याने त्यांच्या मोठ्या भावाने कमल यांनी उच्च शिक्षण घेण्याचा आग्रह धरला. कमल यांनी मद्रास येथे उच्च शिक्षण घेतले.

अभिनयात स्वारस्य
अभिनयात असलेली आवड पाहून कमल यांच्या वडिलांनी त्यांना चित्रपट आणि नाटकामध्ये काम करण्यास प्रोत्साहन दिले. पहिल्यांदा कमल यांनी काही चित्रपटांमध्ये दुय्यम भूमिका केल्या. तथापि, नंतरची ७ वर्षे ते चित्रपटापासून दूर राहिले.

पुन्हा चित्रपटसृष्टीत प्रवेश
१९७० मध्ये कमल यांनी पुन्हा एकदा प्रवेश केला. 'मानवन' या चित्रपटात त्यांना पहिली महत्त्वाची भूमिका मिळाली. तथापि, ती भूमिका नृत्याशी संबंधित होती. १९७३ ते ७५ या काळात त्यांनी सहाय्यक भूमिका करण्यातचं समाधान मानले. 'अवलोरु थोडरकथाई' आणि 'नानअवनीलाई' या चित्रपटात त्यांना रजनीकांत यांच्याबरोबर भूमिका करण्याची संधी मिळाली.

बहरलं अभिनय क्षेत्र
१९७५ नंतर त्यांचा अभिनय खर्या अर्थाने बहरला. त्यानंतरच्या १० वर्षांत त्यांनी १००हून अधिक चित्रपटात भूमिका केल्या. 'मनमधा लिलाई,' 'उधापू कानसिमितूगिरधू' यातील त्यांचा अभिनय चांगला गाजला. या भूमिकेसाठी त्यांना सलग दुसर्या वर्षी तामिळ फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. या काळात त्यांनी 'मुंद्रू मुदिचू' या नाटकातही भूमिका गाजवली. १९७८ मध्ये तेलगू चित्रपट सोमोकादिधी सोक्कादिधी या चित्रपटातील त्याची दुहेरी भूमिका संस्मरणीय ठरली.

हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश
१९८० मध्ये त्यांचा हिंदी चित्रपसृष्टीत प्रवेश झाला. 'एक दुजे के लिये' या चित्रपटातल्या त्यांच्या अभिनयाने सिनेरसिकांना अक्षरश: वेड लावलं. हिंदीबरोबरच त्यांनी तेलगु आणि तमिळ चित्रपटही सुरूच ठेवले होते. १९८१ मध्ये 'राजा पारवई' या चित्रपटातून त्यांनी अभिनयाचे शतक साजरे केले. याच चित्रपटातून त्यांची निर्माता म्हणून ओळख निर्माण झाली. त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सलग तीनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. १९८४ नंतर त्यांनी 'सागर,' 'विक्रग,' 'स्वाती मुथियम,' 'राजतिलक' आदी चित्रपटात प्रुमख भूमिका केल्या. आंध्र प्रदेशातही त्यांच्या चित्रपटांना लोकप्रियता मिळाली. नंतर त्यांच्या अनेक चित्रपटांचे तेलगू रिमेक करण्यात आले.

'पुनागायीमनन' या चार्ली चॅप्लीनच्या चित्रपटावर आधारित तामिळ चित्रपटातील त्यांचा डबल रोल चांगलाच गाजला. मणिरत्नम यांच्या 'नायकन' या (१९८७) चित्रपटातलीही भूमिका फार गाजली. या चित्रपटासाठी त्यांना दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 'पुष्पक' या चित्रपटातील (१९८८) त्यांची मूक भूमिका आजही सिनेरसिकांच्या स्मरणार्थ आहे. एक विनोदी अभिनेता अशी ख्यातीही कमल हसन यांना याच कालावधीत मिळाली.




































