दिग्दर्शक करण जोहरचे वडील आणि निर्माते यश जोहर हे चित्रपट बनवण्यापूर्वी मिठाईचे दुकान चालवायचे. त्यांच्या आईने आपले दागिने विकून त्यांना मुंबईला पाठवले होते. आज त्यांचा जन्मदिवस. त्यांच्या जन्मदिनी जाणून घेऊयात काही खास गोष्टी.
यश जोहर यांचा जन्म ६ सप्टेंबर १९२९ रोजी लाहोरमध्ये झाला होता. त्यांच्या चित्रपटांचे वैशिष्ट्ये म्हणजे भव्य सेट आणि परदेशी लोकेशन्स होते. यश जोहर यांनी 'कल हो ना हो', 'कुछ कुछ होता है' यसारखे सुपरहिट चित्रपट प्रोड्युस केली आहेत.

यश जोहर यांचे कुटुंबीय दिल्लीत आले. येथे यश जोहर यांच्या वडिलांनी 'नानकिंग स्वीट्स' नावाने मिठाईचे दुकान सुरू केले. यश हे ९ भाऊ-बहिणींमध्ये सर्वांत जास्त शिकलेले होते. दुकानाचे सर्व आर्थिक व्यवहार सांभाळण्यासाठी यश यांच्या वडिलांनी त्यांना मिठाईच्या दुकानात बसवलं. परंतु, त्यांना हे काम करणं अजिबात आवडत नव्हतं.
यश जोहर यांच्या आईने त्यांना साथ दिली. मिठाईचे दुकान सांभाळण्यासाठी तुझा जन्म नाही, असे म्हणत यश यांच्या आईने त्यांना मुंबईला पाठवले. त्यावेळी आईने आपले दागिने विकून यश यांना मुंबईला पाठवण्याची सोय केली. परंतु, यश यांच्या आईने दागिने विकल्याची घरात कुणाला माहिती नव्हती. दागिन्यांचा संशय सुरक्षारक्षकावर घेण्यात आला आणि त्याला मारहाणही झाली होती.

यश मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांना सुरूवातीला बराचं संघर्ष करावा लागला. ते येथील एका वृत्तपत्रात फोटोग्राफरची नोकरी शोधण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु, त्यांना नोकरी मिळत नव्हती. दरम्यान, दिग्दर्शक के. आसिफ 'मुगल-ए-आजम'चे शूटिंग करत होते. त्यावेळी यश यांनी मधुबाला यांचा फोटो काढला होता. मधुबाला यांच्याबद्दल म्हटलं जायचं की, त्या आपला फोटो कुणाला काढू देत नाहीत. यश जोहर यांना इंग्लिश बोलायला येत होतं. त्यामुळे प्रभावित होऊन मधुबाला यांनी आपला फोटो काढण्यास त्यांना परवानगी दिली होती. त्याचबरोबर मधुबाला यांनी यश जोहर यांना आपल्या सोबत नेऊन गार्डनही दाखवलं. या फोटोमुळे यश यांना नोकरीही मिळाली.
यश जोहर पूजाअर्चा करायचे. सकाळी-सकाळी आंघोळ करून ३ मिनिटे ते प्रार्थना करत होते. त्यांच्या घरी छोटं मंदिर होतं. त्यामुळेच कदाचित, त्यांच्या चित्रपटातही याची छाप पाहायला मिळते.
त्यांनी १९५५ मध्ये आपल्या चित्रपट करिअरला सुरूवात केली. सुरुवातीला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केलं. यश जोहर यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली. त्यांनी धर्मा प्रॉडक्शनची स्थापना १९७६ मध्ये केली होती. या प्रॉडक्शनच्या बॅनरखाली त्यांनी 'दोस्ताना' चित्रपट बनवला. १९८४ मध्ये त्यांनी दिलीप कुमार यांना घेऊन 'दुनिया' चित्रपट बनवला. त्यांनी आपला मुलगा करण जोहरला 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवली. पुढे हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
यश जोहर यांचं निधन २६ जून २००४ ला रात्री मुंबईतील लीलावती रुग्णालयात झालं होतं. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांचं निधन झालं होतं.



















