'ये हसीन पैर जमीन पे मत रखिये, मैले हो जायेगे' असे मीना कुमारी यांच्या सुंदर पायांचे वर्णन अभिनेते राजकुमार यांनी पाकिजामध्ये केले होते. जिच्या पायांचे इतके सुंदर वर्णन केले जाते, तिच्या सौंदर्याची तारीफ काय करावी? नव्वदच्या दशकात आपल्या अदाकारीने सिनेरसिकांना घायाळ करणार्या अभिनेत्री मीना कुमारी यांना 'ट्रॅजिडी क्वीन' नावाने ओळखलं जातं. त्यांनी आपल्या अभिनयाने, सौंदर्याने रसिकांची मने जिंकून घेतली. मीना कुमारी यांना प्रसिध्दी, सन्मान, पैसा, सर्वकाही मिळालं, परंतु, खरं प्रेम नाही. मीना कुमारी यांच्या जन्मदिनी त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी जाणून घेऊया.
बॉलिवूडमध्ये मीना कुमारी हे नाव प्रसिध्दचं. परंतु, त्यांना 'फीमेल गुरु दत्त' नावदेखील दिलं गेलं. केवळ अभिनेत्रीच नाही तर त्या कवयित्रीही होत्या.
मीना कुमारी यांना अनाथालयाबाहेर सोडून आले होते वडील
मीना कुमारी यांचा जन्म १ ऑगस्ट, १९३२ रोजी झाला. त्यांच मूळ नाव महजबीन होतं. मीना कुमारी यांचा जन्म झाला होता, त्यावेळी त्यांचे वडिल अली बख्श आणि आई इकबाल बेगम (मूळ नाव प्रभावती) यांच्याजवळ डॉक्टरांना देण्यासाठी देखील पैसे नव्हते. परिस्थिती अशी होती की, दोघांनी मीना कुमारी यांना अनाथालयाच्या बाहेर सोडण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यांच्या वडिलांनी हा निर्णय बदलला आणि मीना कुमारी यांना ते परत घरी घेऊन आले.
बालपणातच मोठी जबाबादारी
मीना कुमारी यांच्यावर बालपणीच मोठी जबाबदारी आली. सात वर्षांच्या असताता त्या चित्रपटात काम करू लागल्या. त्या 'बेबी मीना' या नावाने पहिल्यांदा ‘फरजद-ए-हिंद’ चित्रपटात दिसल्या. यानंतर त्यांनी 'लाल हवेली,' 'अन्नपूर्णा,' 'सनम,' 'तमाशा' यासारखे चित्रपट केले. पण, १९५२ मध्ये आलेला चित्रपट ‘बैजू बावरा’ने त्यांना खरी ओळख दिली. ‘बैजू बावरा’साठी मीना कुमारी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार मिळवणार्या त्या पहिल्या अभिनेत्री होत्या. यानंतर त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. 'परिणीता,' 'दिल अपना प्रीत पराई,' 'श्रद्धा,' 'आजाद,' 'कोहिनूर'...'बहरहाल, 'शारदा,' 'गोमती के किनारे', 'यहुदी,' 'मिस मेरी,' 'भाभी की चुडिया', 'फुल और पत्थर', 'चिराग कहा, रोशनी कहा', 'मैं चुप रहूंगी', 'मेरे अपने' यासारखे चित्रपट केले.
असे म्हटले जाते की, मीना कुमारी अभिनयासाठी कधी ग्लिसरीनचा वापर करत नसत.
मीना कुमारी-राजकुमार यांची सुपर केमिस्ट्री
मीना कुमारी इतक्या सुंदर होत्या की, त्यांना पाहून सुपरस्टार राजकुमार डायलॉग्ज विसरत असे. सेटवर मीना डायलॉग्ज म्हणताना राजकुमार त्यांना पाहतच राहायचे. अनेकदा ते आपले डायलॉग्ज विसरायचे.
'आपके पांव देखे, बहुत हसीन हैं. इन्हें जमीन पर मत उतारिएगा, मैले हो जाएंगे' हा प्रसिध्द डायलॉग मीना कुमारी-राजकुमार यांच्या 'पाकिजा' या चित्रपटातील आहे. राजकुमार यांनी मीना कुमारी यांच्या सौंदर्याचे केलेले हे वर्णन आहे.

कमाल अमरोही यांचा चित्रपट 'पाकीजा' हा पूर्णपणे मीना कुमारी यांच्यावर केंद्रित करण्यात आला होता. तरीही राजकुमार यांच्या अभिनयाने 'पाकिजा' चित्रपट ओळखला जाऊ लागला. राजकुमार यांना मीना कुमारी खूप आवडायच्या. मीना कुमारीसोबत एक सीन करताना पहिल्यांदा ज्यावेळी राजकुमार यांनी जवळून मीना कुमारी यांचे पाय पाहिले, त्यावेळी त्यांना मीना कुमारी यांच्या सौंदर्याने घायाळ केलं होतं.
राजकुमार यांच्यावर कमाल अमरोही जळायचे
कमाल अमरोही राजकुमार यांच्यावर जळायचे. त्यांनी आपल्या चित्रपटात मीना कुमारी आणि राजकुमार यांचे कमी सीन्स शूट केले. चित्रपटातील एक गाणं खूप रोमँटिक होतं आणि ते चित्रित करणं खूप गरजेचं होतं. कमालने मीना कुमारी यांच्या डोळ्यांतूनच प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. सीनमध्ये दोघांना एकत्र न दाखवता रोमँटिक वातावरण आणि निसर्गावर अधिक फोकस केलं होतं. ते गाणं होतं - 'चलो दिलदार चलो, चांद के पार चलो...' त्यानंतर कमाल अमरोही यांनी राजकुमार यांना आपल्या कोणत्याही चित्रपटात घेतलं नाही. राजकुमार आणि मीना कुमारी यांनी 'दिल अपना और प्रीत पराई'मध्येही काम केलं होतं.
कमाल अमरोही प्रेमात
मीना कुमारी यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर असा इतिहास रचला, ज्याला विसरणे कठिण आहे. 'बैजू बावरा' चित्रपटामुळे मीना कुमारी स्टार झाल्या. त्यांची १९५१ मध्ये कमाल अमरोही यांच्याशी भेट झाली होती. त्याचदरम्यान, मीना कुमारी यांच्या कारचा अपघात झाला होता. त्यावेळी कमाल यांनी मीना कुमारी यांची खूप काळजी घेतली. याचदरम्यान त्यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. बरेच दिवस त्यांनी आपलं लग्न लपवून ठेवले होते. नंतर कमाल आणि मीना कुमारी यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि १९६४ मध्ये दोघे वेगळे झाले.
मीना कुमारीला दिला होता 'तीन तलाक'
मीना कुमारी यांनी चित्रपट 'पाकीजा'चे दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्याशी विवाह (निकाह) केला होता. एकदा कमाल अमरोही यांनी रागाच्या भरात मीना कुमारी यांना तीन वेळा 'तलाक' म्हटलं होतं आणि दोघांचा घटस्फोट झाला. नंतर कमाल अमरोही यांना पश्चाताप झाला. मीना कुमारी यांच्याशी पुन्हा विवाह करण्याचा निर्णय घेतला.
धर्मेंद्र यांच्यासोबत अफेअरची चर्चा
अभिनेते धर्मेंद्र यांना चित्रपट 'पाकीजा'साठी साईन करण्यात आलं होतं. परंतु, धमेंद्र आणि मीना कुमारी यांच्या अफेअरच्या चर्चेमुळे कमाल यांनी चिडून धर्मेंद्र यांना चित्रपटातून बाहेर केले. नंतर मीना कुमारीसोबत धमेंद्र यांनी अनेक चित्रपट केले. , असे म्हटले जाते की, मीना कुमारी यांच्यासोबत काम केलं नसतं तर धर्मेंद्र इतके मोठे अभिनेते झाले नसते. धमेंद्र यांचं मीना कुमारी यांच्यावर प्रेम होतं, असंही म्हटलं जातं.
मीना कुमारीसोबत रोमान्स करण्याची संधी मिळणार होती, म्हणून राजकुमार यांनी 'काजल' चित्रपटात काम केलं. राजकुमार रोमँटिक हिरो नव्हते. परंतु, 'काजल' मध्ये एक रोमँटिक गाणं 'छू लेने दो नाजुक होठों को, कुछ और नहीं हैं जाम हैं ये, कुदरत ने जो हमको बख्शा है, वो सब से हसीं इनाम है ये...' हे त्यांच्यावर आणि मीनाकुमारी यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं.
ज्यावेळी निर्माते-दिग्दर्शक राम माहेश्वरी यांनी राजकुमार यांना 'काजल' चित्रपटासाठी विचारलं, त्यावेळी राजकुमार खुश झाले होते. ते म्हणाले, 'मीनाजी यांच्यासोबत रोमान्स करायला कुणाला आवडणार नाही.' या चित्रपटात अभिनेते धर्मेंद्र देखील होते.
भारत भूषणने यांनीही व्यक्त केलं होतं प्रेम
विजय भट्ट यांनी भारत भूषण-मीना कुमारी यांना साईन करून कमी बजेट असणारा 'बैजू बावरा' हा चित्रपट बनवला. अभिनेते भारत भूषण यांनी देखील मीना कुमारी यांच्याबद्दल प्रेम व्यक्त केलं होतं.
मीना कुमारी यांनी कमाल यांच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतरही 'पाकिजा' चित्रपट केला. हा चित्रपट १४ फेब्रुवारी, १९७२ रोजी रिलीज झाला. पाकिजातील गाणी आजही अमर आहेत. दरम्यान, त्यांची तब्येत सातत्याने बिघडत होती. आजारी असतानाही त्यांनी अनेक चित्रपट केले. परंतु, हा आजार बळावला. प्रेमात अयशस्वी झालेल्या मीना यांनी मद्य पिण्यास सुरूवात केली, ज्यामुळे त्यांना लिव्हर सिरोसिस झाला. 'पाकिजा' चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही आठवड्यांनी ३१ मार्च १९७२ ला त्यांचं निधन झालं. त्यावेळी मीना कुमारी ३९ वर्षांच्या होत्या.
पुरस्कारासाठी स्वत:शीच स्पर्धा
१९६३ मध्ये १०व्या फिल्मफेअर अॅवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या कॅटेगरीत तीन चित्रपट नॉमिनेट करण्यात आले होते. 'मैं चुप रहूंगी,' 'आरती', 'साहिब बीवी और गुलाम' हे तीन चित्रपट नॉमिनेट झाले होते. त्यांना हा अॅवॉर्ड 'साहिब बीवी और गुलाम'मधील ‘छोटी बहू’च्या भूमिकेसाठी मिळाला होता. विशेष म्हणजे, तिन्हीही चित्रपटात मीना कुमारी होत्या. म्हणजेच या ॲवॉर्डसाठी त्यांची स्पर्धा स्वत:शीच होती.