"ओ कोराकरी!" – हे नाव जरी आज एक फॅशन ब्रँड म्हणून ओळखलं जात असलं, तरी त्यामागे दडलेली गोष्ट एका बाप-लेकाच्या गोड आठवणींतून सुरू झालेली आहे. डॉ. दिलीप मोरे यांचा मुलगा कोल्हापुरात चप्पल बनवताना चप्पलांचा ढिग पाहतो आणि तो वडिलांना विचारतो, " पप्पा, हे काय आहे?" त्यावेळी वडील उत्तर देतात – "कोल्हापुरी चप्पल." आणि बोबड्या स्वरात मुलगा म्हणतो – "ओ कोराकरी!"हेच नाव पुढे एक बुटीक स्टाईल ब्रँड झालं – कोल्हापूरच्या परंपरेला आधुनिकतेची जोड देणारा ‘कोराकरी’ ब्रँड आज नावारुपास आला. कोराकरी ही केवळ चप्पलांची गोष्ट नाही – ती आहे कौटुंबिक वारसा, भारतीय परंपरा, आणि ग्रामीण कारागिरांच्या कलेला दिलेलं ग्लोबल व्यासपीठ. २०१४ पासून या व्यवसाय सुरूवात झालीय.
कोल्हापूरची कारागिरी म्हणजे कोराकरी. याचे उद्योजक हे डॉ. दिलीप मोरे आहेत. मुळचे म्हाळुंगे (ता. करवीर) गावातील. B.E. (Mechanical Engg.), M.Tech (IIT Dhanbad), PhD (IIT Bombay). Ex. Faculty- IIM Calcutta येथून त्यांनी उच्च शिक्षण घेतलं.रंजक इतिहास
त्यांचे आजोबा हे चप्पल बनवायचे. म्हाळुंगे गावी त्यांची ४० जणांची को-ऑपरेटिव्ह संस्था होती. त्यावेळी डॉ. दिलीप हे पाच ते सहा वर्षांचे होते. चप्पला कशा बनवल्या जातात, हे सगळे काम बघत होते. एकदा काळम्मावाडीच्या धरणाला भेट द्यायला इंदिरा गांधी आल्या होत्या. त्यावेळी आजोबांनी त्यांना भेटवस्तू म्हणून कोल्हापुरी चप्पल दिली होती. ती त्यांना इतकी आवडली की, इंदिरा गांधींनी त्यांना निधनापर्यंत पेन्शन सुरू ठेवली. हा व्यवसाय पुढच्या पिढीने कुणी फारसा केला नाही. पण दिलीप यांनी तो पुढे नेला.
ऑनलाईन बिझनेसच भारी
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कलकत्ता येथे प्रोफेसर म्हणून काम करत असताना त्यांनी कोल्हापुरी चप्पलांचे ट्रेडिंग सुरू केले. सुरुवातीला ते दुकानदारांकडून घेऊन ऑनलाईन विकत असत. पण क्वालिटीची समस्या निर्माण झाल्याने त्यावर अभ्यास करून दिलीप यांनी स्वत:चा बिझनेस सुरु केला. पुढे कारागीर घेऊन कामाला सुरुवात केली. सुरुवातीपासून ते आतापर्यंत कोराकरीचा ऑनलाईन बिझनेस सुरु आहे
झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये व्यवसायाला सुरुवात
या चपला घरोघरी बनवल्या जातात. त्यामुळे फॅमिली बिझनेस म्हणून याकडे पाहिलं जातं. त्याकाळी कारागीर चप्पल बनवून द्यायला तयार व्हायचे नाहीत. पण, दिलीप यांना उत्तम दर्जाचे लेदर वापरून बिझनेस उभा करायचा होता. म्हणून कोल्हापुरातील आर के नगर येथे त्यांनी चार-पाच कारागीरांना हाताशी घेऊन झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये बिजनेस सुरू केला. ऑनलाईन व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर मागणी वाढली, त्यांनी 40 ते 50 लाखांची गुंतवणूक केली.
कंदलगाव येथे उभारला मोठा कारखाना
कंदलगान (तालुका करवीर) येथे दिव्यम लेदर क्राफ्ट प्रायव्हेट लिमिटेड नावाने कारखाना सुरू केला. या कंपनीत पार्टनर कम इन्वेस्टर म्हणून अमित कुमार त्यांना जॉईन झालेले आहेत. त्यांनी 55 लाखांची गुंतवणूक या बिजनेसमध्ये केलेली आहे.
चेन्नईवरून आणला जातो माल
चेन्नईवरून लेदर आणलं जातं. स्टूल, रापी, पॉलिश, आयर्न असा कच्चा माल लागतो. मोजे कुरुंदवाडी, कापशी, शाहू, असे विविध प्रकारचे कोल्हापुरी चपला याठिकाणी तयार केल्या जातात. खास म्हणजे पूर्वीच्या विंटेजची चपलांना आधुनिकतेचीजोड देऊन जनरेशन झेडला देखील वापरता येईल असे, कम्फर्टेबल, अट्रॅक्टिव्ह, फॅशनेबल चपला बनवल्या जातात. फिनिश लेदर चेन्नई वरून आणतात, ज्यामुळे चप्पल टिकाऊ बनतं. एकावेळी आठ ते दहा लाखांचं मटेरियल मागवलं जातं.
१००० हून अधिक डिझाईन्स
स्वतः मोरे डिझाईनचं स्केच तयार करतात. नंतर इतर प्रोसेस प्रोडक्शनमध्ये तयार होते. आतापर्यंत त्यांनी 1000 हून अधिक डिझाईन तयार केलेले आहेत. सर्व कारागीर हँडमेड चप्पल बनवतात. थोड्या प्रमाणात हायड्रोलिक मशीनवर सोल कट केलं जातं. शंभरहून अधिक कारागीर त्यांच्याकडे काम करतात. चेन्नईवरून आणलेले १९ लाखांचे आठ ते दहा मशीन्स आहेत. त्या मशीन्सवर कटिंग, शिलाई, एम्बुस (चपलांची अप्पर डिझाईन बनवले जाते) केले जाते.
खासियत कोराकरी चपलांची
कोराकरी चपला कम्फर्टेबल, मऊ, टिकाऊ आहेत. जखम होण्यासारखे किंवा त्वचा निघण्यासारखे प्रकार होत नाहीत. काही चपलांच्या टाचांना विमान किंवा रबरी सोल लावले जाते. काही चपलांना पूर्ण टीपीआर लावलं जाते. टीपीआर हे एक लेदर असतं ज्यामुळे स्लीप होत नाही.
२०१४ मध्ये त्यांनी https://www.korakari.com नावाची वेबसाईट सुरू केली. यामाध्यमातून प्रोडक्ट विकले जातात. ॲमेझॉन, नायका, मिंत्रा, फ्लिपकार्ट अशा ई-कॉमर्स वेबसाईटवरूनह माल विकला जातो. आता फॅब इंडिया आणि मिंत्रा- हाऊस ऑफ पतौडी ब्रँडसाठी काही डिझाईन प्रोडक्शन करून दिले जाते.
मोठमोठ्या ब्रँड कंपनीचे सीईओ यांच्याशी नेटवर्क बनवलं गेलं. त्यासाठी मोरे यांना त्यांच्या उच्च शिक्षणाचा फायदा झाला. मिंत्राचे मोठे ऑर्डर मिळाल्यानंतर त्यांच्या व्यवसायाला गती आली. नीरज मथाने यांनी त्यांना पाठिंबा दिल्यामुळे मोठ्या ऑर्डर्स त्यांना मिळत गेल्या आणि उद्योग साकारण्याचं स्वप्न पूर्ण झालं.
डी टू सीचा फंडा
डी टू सी (डायरेक्ट टू कस्टमर) हा फंडा वापरून सर्व माल वेबसाईटच्या माध्यमातून आणि ऑनलाईन ई-कॉमर्सच्या माध्यमातून जगभरात विकला जातो. ऑर्डर प्लेस केल्यानंतर कुरियर एजंटच्या माध्यमातून चपला निश्चित स्थळी पोहोच केल्या जातात. आतापर्यंत यूएसए , ऑस्ट्रेलिया या ठिकाणी कोराकरी चप्पल निर्यात केले आहेत.
4500 पर्यंत किंमतीचे चप्पल
850 पासून 4500 पर्यंतचे चप्पलचे किमती आहेत. एक चप्पल बनवण्यासाठी साधारण दोन तास लागते आणि अवघड असेल तर ते चार ते पाच दिवस लागतात. खूप वर्क असणारे चप्पल चार हजार पाचशे रुपये किंमतीला जाते.
चप्पल बनवण्याची कला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी
म्हणजे कारागीरांना मजुरी मिळत नाही, या लोकांकडे फारसे साहित्य उपलब्ध होत नाही. पावसाळ्यात तर पूर्ण व्यवसाय बंद राहतो. तसेच या इंडस्ट्रीमध्ये लीडर कोणीही नाही जो कारागिरांना मार्गदर्शन करेल, अशा खूप सार्या समस्या आहेत. त्यामुळे या व्यवसायाकडे अधिक करून कुणी वळत नाही. ही कला पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी आता मोरे यांनी कारागिरांनाही प्रोत्साहन, प्रेरणा देण्यास सुरुवात केली आहे. हे चप्पल बनवण्याची कला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली तरच कोल्हापुरी चप्पल अस्तित्वात राहील. त्यामुळेच डॉक्टर मोरे या व्यवसायाकडे वळले आहेत.
डॉ. दिलीप मोरे - 7558581451, 9822950246









